युरुगुचे पुस्तक : भाग ९

Submitted by पायस on 28 July, 2015 - 20:36

पूर्वसूत्र येथे वाचू शकता - http://www.maayboli.com/node/54397

गोरो त्या विचित्र जागेत एकटाच हिंडत होता. त्याची इलेगुआ सापडल्याशिवाय या जगातून सुटका नव्हती. त्याच्या आजूबाजूला वेगळ्याच प्रकारची घरे होती. हे जे काही आहे ते रंगीत दगडापासून बांधले आहे. काही घरांमधल्या आतल्या वस्तु दिसत होत्या पण तो जेव्हा आत शिरण्यासाठी पुढे सरसावला तेव्हा एका अदृश्य वस्तुला धडकला. त्याच्या डोक्यात कसले कसले शब्द येत होते - काँक्रीट, काच - काय आहे हे? तो एका घरापाशी येऊन थांबला. इतर कोणत्याही घरात त्याला कोणीही दिसले नव्हते पण इथे.......... तो आत शिरला.

आत मोठ्ठे अंगण होते आणि पूर्वी कधीही न पाहिलेल्या वस्तु होत्या. एका दरवाज्यापाशी तो उभा होता. इलेगुआच्या अंगावर वेगळेच कपडे होते. तो त्या दारातून आत शिरला. तपकिरी रंगाच्या अनेक वस्तु एकमेकांना लागून रांगेत रचून ठेवल्या होत्या. मध्ये मध्ये मोकळी जागा सोडली होती. त्यातल्या एका वस्तुवर इलेगुआ बसला होता.

"ये रे गोरो! माझ्यामागे तुला अजून खूप पळापळ करायची आहे, जरा विश्रांती घे. बैस. हा अस्सा. या गोष्टीला थिएटर म्हणतात. तू ज्यांना मनात वस्तु म्हणत होता त्या खुर्च्या आहेत. त्या बसण्यासाठीच असतात. हा पुढे जो पडदा आहे तर त्याच्यावर खरे तर इतरांनी बनवलेल्या गोष्टी पाहायच्या असतात. पण आपली स्मृती युरुगु देवाकडे पाहिजे ना! मग आता आपणच आपली कथा पडद्यावर पाहायची. बघ तिकडे तुला आता वाचता येईल"
१० ....... ९......८ ..... ७...... ६...... ५....... ४....... ३.......... २........... १..........

"इट्स फ्लॅशबॅक टाईम!!"
~*~*~*~*~*~

लहानपण!! आपल्या डोक्यात लहानपण म्हटल्याबरोबर - कित्ती गोड!!, छो छ्वीट!!, कावाई!!, किन्ना सोणा/सोणी - फक्त असेच शब्द जर येत असतील तर तुम्हाला लहानपण समजलेच नाही! भाषा कोणतीही असू दे पण निरागसपणा हा लहानपणाचा जितका अविभाज्य भाग आहे तितकाच वापरायला उपलब्ध असलेली प्रचंड बुद्धिमत्ता हा देखील आहे. संगणकामध्ये प्रचंड रॅम आहे पण त्याच्या हार्ड ड्राईववर काहीच नाही. अशा वेळी तुम्ही जे काही भराल त्यानुसार तो काम करेल. अशा वेळी जर तुम्ही वेळच्या वेळी योग्य गोष्टी सेव्ह नाही केल्या तर रॅम वाया जाईल. असो! याच्या उलट शक्यता अशी आहे कि जर तुम्ही देत असलेले इनपुटच करप्ट आहे. त्याने रॅम तर वाया जाणार नाही पण............
.................
.................
.................

राजाने जोरात टाळी वाजवली व त्याबरोबर अनेक भाले ओझाच्या अंगात घुसले. ओझाचा चेहरा भयचकित होऊन पाहत होता. गोरो त्या चेहर्‍याकडे पाहतच राहिला. त्याचा भाला धरलेला हात तसाच होता. मग कोणाच्या तरी लक्षात आल्यावर त्याचा भाला खेचून बाहेर काढला गेला. भयाण मरण! त्यानेच ज्या मुलांना या प्रथेची माहिती दिली त्याच मुलांकडून आपल्याला असे मरण येईल अशी कल्पना स्वप्नातही ओझाला आली नसणार. गोरोची अवस्था फार विचित्र होती. तसा तो कबिल्याच्या नियमांप्रमाणे मोठा झाला होता पण प्रथमच त्याने एका मनुष्याला मारले होते. राजाने नेमके याच उद्देशाने त्याला या दंडप्रक्रियेत सहभागी करून घेतले होते. हा आता मोठा नाही होणार तर कधी होणार. इलेगुआ नाहीसा झाल्याने राजाचे संतुलन थोडेसे ढासळले होते पण याची फार थोड्या लोकांना कल्पना होती. गोरोचा त्या थोड्यांमध्ये समावेश होता. भले तो राजाचा फारसा लाडका नसेल पण तो त्याचा मुलगा होता. तसेही इलेगुआ गेल्यानंतर राजाकडे दुसरा पर्यायही उरला नव्हता. गोरोने एका पानात आपला हिस्सा वाढून घेतला आणि तो झोपडीत जाण्याआधी त्याने फक्त एकदा नजर टाकली. बेधुंद होऊन नाचणारा त्याचा बाप एका शक्तिशाली कबिल्याचा राजा आहे हे त्याचे मन पटवून घ्यायला तयार नव्हते. तुच्छतेने एकदा तो थुंकला आणि मग तो झोपडीत शिरला.
~*~*~*~*~*~

"हे हे हे चोत्तो माते यो" इलेगुआ गोरोचा वार चुकवत म्हणाला. गोरोच्या हातात त्याचे आवडते शस्त्र होते. त्या शस्त्राचा विचित्र आकार बघता त्याला तलवार म्हणता येत नव्हते. साधारण कोयत्याच्या जातकुळीतले ते शस्त्र होते.
"अरे मक्रक असं कुठेही चालवू नकोस! लागला असता मला आत्ता!" जणू काही फार मोठा विनोद केला अशा थाटात इलेगुआ त्यावर जोरात हसला.
गोरोच्या चेहर्‍यावरची माशीही न हललेली पाहून इलेगुआ हसायचा थांबला.
"अरे यार भावाच्या जोकवर हसायचं असतं. आता इतके दिवस तू या जगात फिरतो आहेस. इतक्या नव्या नव्या गोष्टी शिकला तू. ब्रो कोड पण शिकून घे!"
"तू पहिल्यांदा मधूनच विचित्र भाषांमध्ये बोलणं बंद कर!! आणि हे दाखवून काय साधत आहेस? तो ओझा तुझ्या अविचारामुळेच फुकट मेला! काय गरज होती तुला पळून जायची?"
"हे बघ मी अगदी साधे सोप्पे इंग्रजी शब्द वापरले आणि आधी जपानीत थोडे शब्द. बाकी तो ओझा भारी मेला ना........ हे..........अरे............आह्ह्ह्ह"
मक्रकाचा वार यावेळी निसटता लागला होता.
"यू सायको!!"
"हाहाहाहा. बघ तू पण इंग्रजी बोलला आता! अनिश्चिततेच्या या जगाची हीच तर मजा आहे. पण आता मलाही थोडं गांभीर्याने लढावं लागेल असं दिसतंय!" इलेगुआ आपल्या हाताला लागलेल्या निसटत्या वाराकडे बघत उद्गारला.
~*~*~*~*~*~

मुंबईसाठी मात्र काळ जणू थांबला होता. त्या दिवशी काय भयंकर आपत्ती आपल्या शहरात आली आहे हे कळल्यानंतर प्रज्ञा व इतरांना हे अधिक जाणवू लागले होते. वर्तमानपत्रात बातम्या वेगवेगळ्या येत असल्या तरी तारीख बदलत नव्हती, जणू तोच दिवस ते पुन्हा पुन्हा जगत होते. इतर देशाला मुंबईची ही अवस्था का कळत नसेल हे आता त्यांच्या ध्यानी येत होते. मुंबई हळूहळू युरुगुच्या आयामात स्थलांतरित नव्हे एकरुप होत होती. हा आयाम आता असाच आजूबाजूच्या परिसराला आपल्यात सामावत वाढतच जाणार होता. इतर जगापासून एका वेगळ्याच जगाबरोबर ते जोडले गेले होते. पण मग आपली नायिका काय करत आहे?

ते सर्व मोदिबोच्या झोपडीत बसले होते
डॉ. नाडकर्णींनी सर्वांच्या वतीने सुरुवात केली,
"आपल्याला तो किल्ल्यावरच विचित्र अनुभव घेऊन बरेच दिवस झाले. प्रथम अपडेट्स! इन्स्पेक्टर जॉनीचा काही पत्ता लागला?"
"अजूनही नाही. पण काही धागे नक्की सापडले आहेत. एक म्हणजे गँगवॉरची जी भीति कमिशनर साहेबांना वाटत होती ती अगदीच अनाठायी ठरली आहे. जॉनीच्या मदतीने, म्हणजे खरे तर त्या पुस्तकाच्या मदतीने रसूलने काही महत्त्वाच्या गँगस्टर्सना ठार केले आहे. रसूलच्या गँगला मला नाही वाटत कोणी विरोध करू शकेल. दे आर वे टू पॉवरफुल फॉर एनी अदर गँग! जर हे आपले साधारण जग असते तर एव्हाना रसूल मोठा डॉन बनून परदेशात जायच्या तयारीत असता."
"जाधव सर आपल्यासमोर त्याच्यापेक्षा मोठे प्रश्न आहेत आत्ता." प्रज्ञाने गाडी पुन्हा मूळ विषयावर आणली.
"आय नो प्रज्ञा. पण कमिशनर कधीच पूर्ण पोलिस फोर्स वापरू देणार नाहीत. जर त्या दिवशी आम्ही दोघांनी तो अनुभव घेतला तर अजूनही या सर्व गोष्टींना भाकडकथा म्हणून दुर्लक्षित केले असते. काय शिंदे?"
"अगदी बरोबर! आणि एका अर्थाने संपूर्ण पोलिस फोर्स कामाला लागली नाही आहे हे बरेच आहे! यामुळे सामान्य माणूस या सर्व गोंधळात अडकणार नाही. अजून तरी तो तितकासा या सर्व प्रकाराला बळी पडला नाही आहे आणि तो न पडावा याला पोलिस अधिकारी म्हणून आमचे प्राधान्य असणार."
"पण मग तुम्ही आमची काहीच मदत करू शकत नाही का? जॉनी नाही तर नाहीच पण ला आणि नोम्मोचा तरी तुम्हाला काही पत्ता लागला का?" - कुणाल
जाधवांनी पुन्हा एकदा नकारार्थी मान हलविली.
"त्या दोघांना जणू जमिनीने गिळले आहे. तुम्हाला त्यांना ट्रॅक नाही करता येणार का?"
हा प्रश्न अर्थातच बुसुली आणि मोदिबोसाठी होता. त्यांनीही मान हलविली.
"जोवर ते काहीतरी हालचाल करत नाही तोवर आम्हाला त्यांची खूण मिळू शकत नाही."
जाधवांनी खांदे उडवले. "मला माहित आहे कि तुम्हाला या प्रकरणाचा शेवट लवकरात लवकर झालेला हवा आहे पण विदाऊट क्लूज वी कान्ट डू एनिथिंग!" असे म्हणत ते जायला निघाले. तेवढ्यात..
"बाय द वे, एक गोष्ट आहे जी कदाचित आपल्या उपयोगाची असू शकते."
सर्वांनी कान टवकारले. "जॉनी इज नॉट वेल! त्याला काहीतरी झाले आहे हे नक्की! ड्यूटी रिस्ट्रिक्शन्समुळे आम्ही त्याचा फार मागोवा नाही घेऊ शकलो पण आम्हाला असे कळले कि रसूलच्या गँगचा नवीन मेंबर जुगार खेळता खेळता अचानक रक्ताची उलटी करून बेशुद्ध झाला. आता हा जॉनीच असू शकतो हे तर कुणीही सांगेल पण त्याच्या वर्णनाचा माणूस अजून तरी कुठल्याही हॉस्पिटलमध्ये आल्याची खबर नाही. आणि हे घ्या "
त्यांनी एक फोटो प्रज्ञाकडे दिला.
"हा जॉनीचा फोटो आहे. इन केस तुम्हाला दिसलाच तर आम्हाला कळवा. बाकी शक्य तितकी मदत करू हे वेगळे सांगायची गरज नाही."
ते दोघे बाहेर पडले. आपापल्या मोटरसायकलींवर बसत त्यांनी एकमेकांकडे पाहिले.
" आत्ताच्या ड्यूटीपेक्षा जॉनीला शोधत फिरणे कधीपण जास्त चांगलं काम आहे."
"कधी नव्हे ते मी तुझ्याशी सहमत आहे."
त्या दोघांना निश्चितानंदांच्या यज्ञस्थळाची प्रोटेक्शन ड्यूटी लावण्यात आली होती. निश्चितानंदांनी त्या करड्या कोल्ह्याला पकडल्याचा दावा केला होता!!
~*~*~*~*~*~

"थकलास?" इलेगुआने विचारले. गोरोने नाईलाजाने का होईना अंग टाकत मान डोलावली.
"छान! आता पुढे ऐक आपल्या आयुष्यात काय काय घडलं. हे मी का सांगतो आहे ते सगळं नंतर. आधी ऐकून घे."
....................
....................
....................

गोरो व त्याच्या बरोबर गेलेले सैनिक विजयी होऊन परत आले होते. राजाने त्यांचे स्वागत केले. जंगी मेजवानी दिली गेली. गोरो मात्र फार काळ रमला नाही. तो थोडा वेळ इतरांमध्ये मिसळला आणि मग जरा आडबाजूला जाऊन एकटाच मद्य पीत बसला. आजही त्याच्या हातून अनेक हत्या घडल्या होत्या. कबिल्याच्या रक्षणासाठी त्या आवश्यक हत्या होत्या. आजही त्याचे वडील खूश होते. पण आजच्या खुशीत आणि त्याच्या पहिल्या हत्येच्या खुशीत फरक होता. आजचा आनंद हा मुलासाठी होता तर तेव्हाचा आनंद इज्जत वाचवल्याचा होता. गोरोला त्याचे बालपण आठवत होते.
हा कबिला इतर डोगोन कबिल्यांपेक्षा थोडा वेगळा होता. त्यांचे कुणाशीच पटायचे नाही. याला कारण होते त्यांची अवाजवी क्रूरता! हा राजा क्रूरपणाला अपवाद नव्हताच! गोरो त्याचा मोठा मुलगा! पण गोरोला त्याच्या वडलांचे प्रेम लहानपणी मिळाले नाही. याचे कारण जरी थोरला असला तरी गोरो राजाच्या नावडत्या स्त्रीपासून झालेला मुलगा होता. राजाच्या आवडत्या स्त्रीला नंतर जुळी मुले झाली जी अर्थातच त्याची आवडती होती - इलेगुआ नावाचा मुलगा आणि इलेलगी नावाची मुलगी. राजा फक्त इलेलगीवरच मनापासून प्रेम करत असे. इलेगुआ त्याचा आवडता नव्हता अशातला भाग नव्हे पण इलेगुआ लहानपणापासूनच विचित्र होता. आपल्या भावाच्या लहानपणीच्या क्रूरपणाची उदाहरणे आठवून गोरोच्या अंगावर शहारे आले. अर्थातच इलेलगीची आई गोरोशी फटकून वागे. इलेलगी स्वतः गोरोशी फार बोलत नसे पण इलेगुआ गोरोबरोबर मित्रत्वाने वागत असे. कदाचित यामुळे इलेगुआ राजाचा तेवढा आवडता नव्हता.
गोरोला आठवत होता तो दिवस जेव्हा त्याने प्रथम एका नोम्मोशी एकनिष्ठ राहण्याची शपथ घेतली. ही जुनी प्रथा आता फक्त त्यांचा कबिलाच पाळत असे. गोरोने एकनिष्ठ राहण्यासाठी ओगोची निवड केली किंवा असे म्हणूयात कि ओगोने गोरोला निवडले. गोरोला मात्र इलेगुआ या बाबतीत जवळचा वाटे कारण दोघांचीही ती निवड प्रक्रिया म्हणजे मोठ्ठा विनोद असल्याची ठाम समजूत होती. एक दगड एका विशिष्ट खड्ड्यात फेकून मारायचा आणि मग त्यावर उमटणार्‍या खुणांवरून ओझा, ज्याच्यावर कबिल्याला उपयोगी तंत्र-मंत्र करण्याबरोबर लहान मुलांना लढाईशिवायचे शिक्षण द्यायची पण जबाबदारी होती, कोणत्या नोम्मोची उपासना शिकायची हे ठरवायचा.
इलेगुआच्या दगडावर आधी कधीही न पाहिलेल्या खुणा आल्या होत्या हे त्याला ओझाकडून नंतर समजले जेव्हा ओझाने त्याला आणि त्याच्या आईला स्वतःसाठी राजाकडे रदबदली करण्यासाठी विनवले होते. गोरोला तेव्हा त्याला नकार देऊन पाठवताना वाईट वाटले होते पण तो हतबल होता. इलेगुआच्या दगडावरच्या खुणा ओझाने खोट्याच अम्माच्या खुणा असल्याचे सांगितले होते. तेव्हा तर राजा खुश झाला होता पण लवकरच स्पष्ट झाले कि इलेगुआला युरुगुच्या उपासनेत रस आहे. युरुगुची उपासना! तिच्यावर कबिल्याने कित्येक वर्षांपासून निर्बंध लावले होते. ओझाला जेव्हा हे कळले तेव्हा त्याने इलेगुआला समजावण्याचा खूप प्रयत्न केला पण त्याच्या पदरी अपयश आले. इलेगुआ एके दिवशी युरुगुच्या शोधात, युरुगुची उपासना शिकवणार्‍या ओझाच्या शोधात नाहीसा झाला.

गोरो स्वतःशीच हसला. इलेगुआच्या या एका कृतीने माझ्या आयुष्यात प्रचंड फरक पडला. राजाला दुसरा लायक वारस नसल्याने माझ्याशी जुळवून घ्यावेच लागले. माझे आणि माझ्या आईचे स्थान कधी नव्हे ते उंचावले. तो ओझा मात्र बिचारा हकनाक मेला. इलेगुआ! कुठे आहेस तू?

"मलाही हा आनंदाच्या नावाखाली चालू असलेला दंगा फारसा आवडत नाही." मागून त्याच्या खांद्यावर हात ठेवत ती व्यक्ति म्हणाली "काय गोरो. पुन्हा स्वतःच्याच विचारांमध्ये हरवलास तर!"
"इलेलगी!" इलेलगी त्याच्याकडे बघून उत्तरादाखल हसली.
हाही एक बदल गोरोच्या आयुष्यात आता होऊ घातला होता. इलेलगी त्याच्याशी अधिक प्रमाणात संवाद साधत होती."
..................
..................
..................

"ओह मॅन! आत्ताचा तुझा वार अधिक जलदगतीने होता. थोडक्यात चुकवला मी. असं का करतो आहेस तू गोरो? तुकड्या तुकड्यात फ्लॅशबॅक रेकॉर्ड करायला किती त्रास होतो तुला कल्पना आहे का?"
उत्तरादाखल गोरोने मक्रकाचा अजून एक वार केला. इलेगुआने तो चुकवत सरळ थिएटर बाहेर पळ काढला.
~*~*~*~*~*~

***** तो ची कहाणी *****

स्थळ : हैदराबाद

हैदराबादसारख्या मोठ्या शहरात तो पहिल्यांदाच येत होता. नाही म्हणायला आता त्याचा मनुष्यवस्तीशी अधिक प्रमाणात संबंध येई. झटे देत देत आता तो तेलुगु आणि थोड फार हिंदी बोलायला शिकला होता. हैदराबादमधल्या वास्तव्यात त्याचे हिंदी अजून सुधारणार होतं. हे त्याचे नशीब, का हैदराबादचे नशीब, कि त्याला हैदराबादमध्ये भेटलेला पहिला माणूस हा एक भला माणूस होता.

"ए मुला, तुझे आईवडील कुठे आहेत? असा एकटाच का हिंडतो आहेस?"

का कोणास ठाऊक त्या दिवशी 'तो' ने संधी असून सुद्धा त्या माणसाला मारले नाही. त्या माणसाने आधी त्याला पोटभर जेवायला दिले आणि मग तो त्याला घेऊन पोचला थेट 'सेंट मोनिकाज् होम फॉर होमलेस' येथे!
सेंट मोनिका चौथ्या शतकातील एक कॅथॉलिक संत होती. तिच्या नावाने हा अनाथश्रम चालू होता. सिस्टर क्लेअर तिथल्या प्रमुख होत्या. 'तो' ला त्याचे नाव गाव यापैकी काहीच आठवत नव्हते. त्याच्या डोक्यात त्याची असलेली एकमेव आठवण, त्याच्या आईचा मृत्यु कसा झाला हे सांगितल्यावर सिस्टरने त्याला अधिक काही विचारले नाही. केवळ "ओह पुअर चाईल्ड" म्हणत त्याला घट्ट मिठी मारली. केवळ त्या मिठीमुळे सिस्टर क्लेअर जिवंत राहिली.
************

'तो' चे पहिले नामकरण तिथेच झाले. हॅन्स - जर्मन मध्ये याचा अर्थ देवाची भेट असा घेतला जाऊ शकते हे त्याला खूप नंतर कळले. त्याला स्वतःला हॅन्स नाव फारसे कधीच आवडले नाही पण त्याचा इथे नाईलाज होता. त्याला तिथले लोक कुठल्या ना कुठल्या नावाने हाक मारणारच! हॅन्स मग तिथेच काही वर्ष राहिला. त्याचे अनौपचारिक शिक्षणही तिथेच झाले. हॅन्स अभ्यासात जात्याच हुशार असल्याचे लवकरच लक्षात आले. त्याला इथेच आपल्याला शास्त्रात रस असल्याचे लक्षात आले. तसा तो अनाथाश्रम फारच चांगला होता. काही मुले त्याच्या खोड्या काढायची पण आता त्याची मूळची रासवट पाशवी वृत्ती पुष्कळच निवळली होती. आता तो खोड्या आणि त्रास यांतला फरक ओळखू लागला होता. हॅन्सला अज्जिबात न आवडणारी कुठली गोष्ट असेल तर ती होती सिस्टर अ‍ॅग्नेस! अ‍ॅग्नेस तिशीतली तरुणी होती. ती आश्रमातल्या मुलांची शिक्षिका होती. शिक्षिका असल्याने मुलांना शिस्त लावण्याचा प्रयत्न तिने करणे साहजिक होते. हॅन्सने सुरुवातीला तिला विरोध करून पाहिला पण तो त्यात अयशस्वी राहिला. शिक्षणाचे महत्त्व त्याला हळू हळू पटू लागले होते. ज्या गोष्टींसाठी तो आधी नाहक झगडला होता त्या जर त्याने बरोबर पद्धतीने मागितल्या असत्या तर त्याला त्या किती विनासायास मिळू शकल्या असत्या हे त्याला आत्ता कळत होते उ.दा. प्यायचे पाणी हे बिसलेरीची बाटली हिसकावून मिळवायचे नसते. आणि त्याला नुकताच आवडू लागलेला विषय शास्त्र शिकायचा म्हटला तर अ‍ॅग्नेसशी जुळवून घेणे भाग होते. जेवताना काटा-चमच्याचा नीट वापर करणे भाग होते. स्वतःला नीटनेटके ठेवणे भाग होते. हे सर्व त्याला शिकायला, करायला आवडत नव्हते अशातला भाग नव्हता पण कोणीतरी त्याच्यावर बॉसिंग करत आहे हा अनुभव त्याला नवीन होता आणि पचवायला जड जात होता. त्यात अ‍ॅग्नेस शिस्तीच्या बाबतीत राणी व्हिक्टोरिया असल्याने हॅन्सचे सुरुवातीचे दिवस खूप कठीण गेले. क्लेअरसाठी एक रहस्यही याच काळात निर्माण झाले. ठराविक काळाने राखण करणारा कुत्रा कुठे गायब होतो?
*************

हॅन्स जेव्हा १३ वर्षांचा होता तेव्हा त्या प्रकाराला सुरुवात झाली. मुंबईहून एक मोठा गृहस्थ त्या अनाथाश्रमात अवचित येऊन थडकला. सिस्टर क्लेअरने त्याचे स्वागत केले. त्याने आपली भूमिका स्पष्ट केली.
"मी मुंबईतला एक नामांकित गृहस्थ आहे. तुम्ही माझं नाव ऐकले नसेल कारण मुंबईच्या बाहेर मी प्रसिद्ध नाही पण मुंबईत मात्र माझ्या नावाला किंमत आहे. माझ्या मुलाला लहानपणी प्रचंड ताप आला. तेव्हाची आमची गव्हर्नेस दुर्दैवाने निष्काळजी होती. तिने नक्की काय हलगर्जीपणा केला मला सांगता येणार नाही पण रेअरेस्ट ऑफ रेअर केस मध्ये त्याचा ताप ७ पर्यंत वाढला. केवळ देवाची कृपा म्हणून तो वाचला पण त्याच्या मेंदूवर याचा परिणाम झाला. तो उर्वरित आयुष्य मतिमंद म्हणूनच जगला. ४ दिवसापूर्वी त्याचे निधन झाले."
"ओह आय अ‍ॅम सो सॉरी."
"यू डोन्ट नीड टू. गॉडच्या मर्जीसमोर कोणाचे कायबी चालत नाही. आता कामाची गोष्ट ऐका. माझा मुलगा मेला ही गोष्ट अजून कोणाला माहित नाही. अगदी जवळच्या नातेवाईकांना सुद्धा! खरे सांगायचे तर त्याला कित्येक वर्षात मी, माझी बायडी आणि त्याच्या दिमतीला ठेवलेला एक नोकर सोडून कोणी पाहिलेले नाही."
"व्हॉट आर यू गेटिंग अ‍ॅट?"
"सिस्टर आय वॉन्ट टू अ‍ॅडॉप्ट अ चाईल्ड हू विल टेक प्लेस ऑफ माय डेड सन! मी त्याला माझा मुलगा दैवी चमत्काराने बरा झाला असे सांगून समाजासमोर आणेन. त्याला चांगले शिक्षण, परवरीश देईन. माझी बायडी त्याला कित्ती प्रेम करेल तुम्हाला कल्पना नाही सिस्टर. प्लीज सिस्टर, हेल्प अस. ओन्ली कंडिशन इज ही मस्ट बी १३ यिअर्स ओल्ड!"

क्लेअरने तासभर शांतपणे विचार करून मग त्याची व हॅन्सची गाठ घालून दिली. हॅन्सने या गोष्टीला संमती दर्शविली. त्याने आपण हॅन्सला एका आठवड्यानंतर घेऊन जाऊ तोवर कागदपत्रे रेडी करा असे सांगून क्लेअरचा निरोप घेतला. क्लेअरच्या चेहर्‍यावर हॅन्सची सोय लागत असल्याचा आनंद होता. हॅन्सच्या डोळ्यातही आनंद होता पण ते डोळे हॅन्सचे नव्हते. ते त्याच्या आतल्या जनावराचे होते. तो आठवडा 'सेंट मोनिकाज् होम फॉर होमलेस' साठी जीवघेणा ठरणार होता!!
~*~*~*~*~*~

प्रज्ञा आणि कुणाल आता दोघेच बाहेर उभे होते. चंद्राची कोरदेखील मावळायला आली होती. दोघांनाही इतकं निराश कधीच वाटलं नव्हते. पण त्यांचा नाईलाज होता. ते कमजोर होते, त्यांच्याकडे साधने नव्हती. रिपोर्टरशी संपर्क होत नव्हता.
"प्रज्ञा आपण काहीच करू शकत नाही का ग?"
प्रज्ञा त्याला काही उत्तर देणार एवढ्यात तिचा फोन वाजला. आलोकचा मेसेज होता. अनेक दिवसात तो तिला भेटला नव्हता. विचारपूस करणारा तो मेसेज पाहून ती फोन मिटणार एवढ्यात तिच्या डोक्यात एक कल्पना चमकून गेली.
"कुणाल, मला एक सांग. आलोक एका खूप मोठ्या हॉस्पिटलमध्ये काम करतो ना?"
"हो. म्हणजे तो त्या फेमस सर्जन डॉ. सायरसबरोबर काम करतो एवढं मला माहित आहे."
"मग त्याचे वैद्यकीय जगात बर्‍यापैकी नेटवर्क असणार."
"असेल. त्याचं काय?"
"डोन्ट यू गेट इट? आलोक स्वतः कदाचित जॉनीला ट्रीट करायला बोलावलेला डॉक्टर नसेल, कदाचित रसूल ज्या डॉक्टरला वापरत आहे तो आलोकच्या हॉस्पिटलमध्ये ये जा करतही नसेल किंवा रसूल त्या हॉस्पिटलपासून अजिबात संबंध ठेवत नसेल पण देअर इज अ चान्स कि जॉनीची ट्रीटमेंट करणारा माणूस आलोकच्या नेटवर्कमध्ये असेल! आपल्याला कदाचित आलोकची मदत होऊ शकते."
कुणालचे डोळे विस्फारले. ही मुलगी काहीही विचार करू शकते. आलोक नाही म्हटले तरी या क्षेत्रात खूपच ज्युनियर होता. इट वॉज प्युअर गॅम्बलिंग मूव्ह!
"तुला कळतंय ना कि या चान्सचे चान्सेस किती कमी आहेत!"
"हो. पण शून्य देखील नाही आहेत. तसेही आपण आत्ता प्युअर चान्सच्या, रँडम दुनियेशी एकरुप होत आहोत. मग हा चान्स घ्यायला काय हरकत आहे?"
.....................
.....................
आलोकला मेसेज गेला होता - उद्या सकाळी ९ वाजता. आपल्या नेहमीच्या ठिकाणी कॉफी.
~*~*~*~*~*~

निश्चितानंद लांबूनच त्या पकडलेल्या जनावराची पाहणी करत होते. दिसायला तो कोणत्याही साध्या कोल्ह्यासारखाच होता फक्त तो करड्या रंगाचा होता. आत्ता तो गुंगीत होता.
"कुठून मिळाला हा?" प्रश्न आनंदसाठी होता.
"अंडरवर्ल्ड ब्रोकर्स!" आनंदने नम्रपणे उत्तर दिले.
निश्चितानंद पुन्हा एकदा त्याला न्याहळू लागले. ते थोडे जवळ जाऊ लागताच आनंदने त्यांना सावध केले
"स्वामीजी सावधान! जनावर तापट आहे. आत्ता गुंगीत असले तरी धोकादायक आहे."
निश्चितानंदांनी एकवार आनंदकडे आणि मग त्या कोल्ह्याकडे पाहिले. काही क्षण थांबून मग त्यांनी पावले मागे वळवली. आनंदला आपल्याबरोबर येण्याचा इशारा करून ते त्यांच्या कक्षात आले.
आज त्यांच्या अंगावर भगवी कफनी होती. त्यावर त्यांनी पूजेतली रुद्राक्ष माळ चढवली. थोड्याच वेळात त्यांना प्रवचन द्यायचे होते.
"किती दिवस लागतील?"
"प्रयत्न शक्य तितक्या लवकर व्हावे असेच आहेत."
"मी विचारले किती?"
आनंद गप्प राहिला. आता तो कोल्हा किती दिवसात भीतिने शांत राहायला शिकेल हे तो कसं सांगणार होता? अर्थात त्या कोल्ह्याचा स्वभाव बदलणे आवश्यक होते कारण निश्चितानंदांना त्याचा एकट्याने सामना करायचा होता तो ही जनतेसमोर. भलेही सर्व खबरदारी घेतल्या तरी ऐनवेळेला काही गडबड होऊ नये इतपत त्या कोल्ह्याला ट्रेनिंग देणे भाग होते. आनंद काही बोलत नाही हे पाहून निश्चितानंदच म्हणाले
"हरकत नाही. पण लवकर!"
"जी स्वामीजी!"
निश्चितानंद प्रवचनासाठी निघून गेले. पण हे ना त्यांना ठाऊक होते ना आनंदला
.......................
......................
कि त्यांनी पकडलेला करडा कोल्हा बनावटी नसून ज्याच्या अफवा पसरल्या होत्या तोच कोल्हा आहे!
~*~*~*~*~*~

ला आणि नोम्मोशी बोलून 'तो' बाहेरच्या खोलीत आला. कधी नव्हे ते त्याच्या दोन साथीदारांना त्याने आपल्या रेफ्रिजरेटर हाऊसमध्ये बोलावून घेतले होते. त्याने आपला प्लॅन त्यांच्यासमोर मांडायला सुरुवात केली.
"ओके आता नीट ऐका. आपल्याला हव्या असलेल्या माणसाला या लाने एक अत्यंत गुप्त क्रिया करून आजारी पाडले आहे."
"पण बॉस लाने जर क्रिया केली असेल तर ते दुसरे आफ्रिकन तिला ट्रॅक नाही का करणार?"
"नाही करणार! कारण ते मूर्ख आहेत. त्या म्हातारीचा ट्रॅकर काय प्रकारचे तंत्र आहे मी समजावून घेतले. तिला दर दिवशी ते संपूर्ण तंत्र नवीन अभिमंत्रित सामानाने पुन्हा बनवावे लागते. इट इज लाईक रिबूट! तो वेळ ४ तासांचा आहे. त्या वेळात ला एक छोटी क्रिया करून तिचे ट्रेसेस मिटवू शकते. एवढ्या वेळात तो माणूस शोधण्याची क्रिया ला करू शकत नाही आणि ते ही क्रियाच करू शकत नाहीत कारण त्यांच्याकडे मूळ पुस्तक नाही. पण ला इतर छोट्या क्रिया करू शकते. त्यांच्या डोक्यात हा ऑप्शनच येणार नाही कारण ला त्या माणसाला आजारी पाडण्याचा प्रयत्न करेल हे त्यांच्या डोक्यातच येऊ शकत नाही."
ते दोघे हसले. त्यांचा बॉस हुशार होता यात वादच नव्हता.
"असो. यातून आपल्याला हे तर कळले कि हा माणूस रसूल्च्या गँगमध्ये आहे. तू उद्या डॉक्टर म्हणून रसूलकडे जाशील." तो त्या दोघांमधल्या स्त्रीकडे बोट दाखवत म्हणाला.
"आपल्याला लगेच रसूलकडून तो माणूस काढून घ्यायचा नाही आहे, सो टेक इट इझी. उद्या फक्त, आय रिपीट, फक्त कन्फर्म कर कि आपल्याला हवा असलेला माणूस तोच आहे. एकदा कन्फर्म झाले कि वी विल प्रोसीड टू नेक्स्ट स्टेज."
"गॉट इट बॉस!"
"पण बॉस" आता पुरुष बोलत होता. "या ला आणि नोम्मोचे काय करायचं? नेक्स्ट स्टेज पूर्णपणे त्यांच्या हातात आहे. दे कॅन बिट्रे अस."
'तो' कुत्सितपणे हसला. "आय नो दॅट यू इडियट! पण आपण त्यांना आधी धोका देणार आहोत. त्या मूर्ख लोकांनी युरुगुचे पुस्तक मिळवण्यावरच लक्ष दिले. कोणीही युरुगुचे पुस्तक नक्की कसं काम करतं याचा शोध घेण्याचा प्रयत्नच कधी केला नाही. जर माझी थिअरी बरोबर असेल तर नेक्स्ट स्टेजला ला आणि नोम्मोने आपले काम केले कि वी कॅन डू सम अ‍ॅडिशन्स ऑफ अवर आणि मग त्यांच्यासाठी इथल्या फ्रिजमध्ये पुष्कळ जागा आहे."
तिघेही यावर खदाखदा हसले.
"पण मग आपण नक्की करणार काय आहोत बॉस?"
...............
...............
"आपण युरुगुचा वारसा म्हणजे युरुगुच्या पुस्तकाची मालकी या जॉनीकडून माझ्याकडे ट्रान्सफर करणार आहोत!!!"

क्रमशः

टीपः

मक्रक - हे आफ्रिकेतल्या झांडे नावाच्या जमातीचे कोयत्यासारखे हत्यार आहे. झांडे हे सेंट्रल आफ्रिकेचे रहिवासी आहेत. हे हत्यार झांडे योद्धा क्लोज रेंज कॉम्बॅटमध्ये वापरतात. (संदर्भ : डेडलिएस्ट वॉरियर)

सेंट मोनिका - मोनिका ऑफ हिप्पो या नावानेही प्रसिद्ध. संत मोनिका अशी खरी संत बाई चौथ्या शतकात होऊन गेली. तिच्या नावाची अशी कुठलीही संस्था/अनाथालय टू द बेस्ट ऑफ माय नॉलेज अस्तित्त्वात नाही. तिचे नाव फक्त नेहमीची सेंट जोसेफ/पीटर/अ‍ॅन नावे वापरायची त्याऐवजी जरा वेगळं नाव म्हणून वापरले आहे.

पुढील कथासूत्र येथे वाचू शकता - http://www.maayboli.com/node/55257

Group content visibility: 
Public - accessible to all site users

लागला भुंगा डोक्याला परत Happy आता मागचे सगळे भाग पुन्हा वाचणं आलं. थोडं थोडं समजतंय असं वाटेपर्यंत कन्फ्यूजन होतंय पुन्हा. कादंबरी पूर्ण झाली की पुन्हा सगळी सलग वाचावी लागणारे.

पुढचे भाग पटापट आले तर बरे. हा भाग खुप उशिरा आला त्यामुळे आदले सगळे ट्रेसेस मिटुन गेले >> +१
अंतिम भाग केव्हा देतोयस पायस.. शेवटचा आल्यावर परत सगळ पहिलेपासुन वाचाव लागणारे.. मस्त लिहिलय.. 'तो' बद्दल पन मस्तच..कुठ्ल्या पात्राशी हे पात्र संलग्न आहे त्यावर विचार करन आल आता..
पुढला भाग लवकर येउ दे प्लीज..

लोक्स प्रतिक्रियांबद्दल धन्स.
पटापट भाग मलाही टाकायचे आहेत पण गेला महिना फारच हेक्टिक गेला सो नाही जमलं. बघुयात कसे जमते. या उशीराच्या बदल्यात काही extra features.

१) पुढचा भागही flashback ने भरलेला असेल (आशा करुया की गोरो जरा गप्प बसेल Wink ) युरुगुचे पुस्तक नक्की काय करतं हेही कळेल.
२) 'तो' म्हणजेच आपला रहस्यमय खूनी कोण आहे हे देखील उघड होईल. लाचे हेतु कदाचित त्याच्या पुढच्या भागात.
३) मेंदूला खुराक - Random Number Generators. हे संगणक वापरतात. युरुगुचे पुस्तक आणि random यांच्या संबंधातून काही कळते आहे का बघा. कदाचित 'तो' च्या डोक्यातल्या plans चा तुम्हाला आधी अंदाज बांधता येईल.

लागला भुंगा डोक्याला परत स्मित आता मागचे सगळे भाग पुन्हा वाचणं आलं. थोडं थोडं समजतंय असं वाटेपर्यंत कन्फ्यूजन होतंय पुन्हा. कादंबरी पूर्ण झाली की पुन्हा सगळी सलग वाचावी लागणारे. >>+++

पायस खुप छान चाललीय कथा. मागच्या दोन तीन दिवसात सगळे भाग वाचुन काढलेत. "तो" काय करेल ह्याचा अंदाज बांधता येत नाहिये पण "तो" कोण आहे ह्याचा अंदाज मागल्या भागापासुनच आलाय अस वाटतय. पुढचा भाग लवकर टाका प्लीज, अंदाज बरोबर आला कि नाहि ह्याची उत्सुकता आहे.