भगवद्गीता - सोप्या मराठीत - १ व २

Submitted by एम.कर्णिक on 25 January, 2009 - 02:49

‘श्रीमद्भगवद्गीता’
समजेल अशा सोप्या मराठीत

उपोद्घात

ख्रिस्तपूर्व ३१०२ या वर्षात कुरूक्षेत्रावर महाभारत युध्द सुरू होण्याच्या ऐन वेळी अर्जुनाच्या मनावर स्वकीयांवरील प्रेमापोटी मळभ आले. ते मळभ दूर सारून त्याला पुन्हा क्षात्रधर्मानुसारचे आपले कार्य करायला उद्युक्त करण्यासाठी म्हणून भगवान श्रीकॄष्णानी त्याला रणभूमीवर केलेला उपदेश, आणि त्या अनुषंगाने अर्जुनाला आलेल्या शंकांचे निरसन करावे म्हणून सविस्तर सांगितलेले ज्ञान, यातून हा गीतोपनिषदाचा ग्रंथ बनला आहे जो ‘श्रीमद्भगवद्गीता’ अथवा सुटसुटीतपणे ‘गीता’ या नावाने ओळखला जातो.

गीता ही अठरा अध्यायांत विभागलेली आहे आणि या अठरा अध्यायात एकूण सातशे एक श्लोक आहेत. (गीतेच्या काही प्रतींमध्ये तेराव्या अध्यायातील पहिला श्लोक प्रक्षिप्त मानून गाळला गेलेला आहे. तो गाळल्यास एकूण श्लोकसंख्या सातशे होते).

अध्याय पहिला अर्जुनविषादयोग ४७
अध्याय दुसरा सांख्ययोग ७२
अध्याय तिसरा कर्मयोग ४३
अध्याय चौथा ज्ञानकर्मसंन्यासयोग ४२
अध्याय पाचवा संन्यासयोग २९
अध्याय सहावा ध्यानयोग ४७
अध्याय सातवा ज्ञानविज्ञानयोग ३०
अध्याय आठवा अक्षरब्रम्हयोग २८
अध्याय नववा राजविद्याराजगुह्मयोग ३४
अध्याय दहावा विभूतियोग ४२
अध्याय अकरावा विश्वरूपदर्शनयोग ५५
अध्याय बारावा भक्तियोग २०
अध्याय तेरावा क्षेत्रक्षेत्रज्ञविभागयोग ३५
अध्याय चौदावा गुणत्रयविभागयोग २७
अध्याय पंधरावा पुरूषोत्तमयोग २०
अध्याय सोळावा दैवासुरसंपद्विभागयोग २४
अध्याय सतरावा श्रध्दात्रयविभागयोग २८
अध्याय अठरावा मोक्षसंन्यासयोग ७८

या अठरा अध्यायांत मिळून अर्जुनासाठी केवळ ‘युध्द कर’ एवढाच उपदेश नाही. चारी वर्णां साठी स्वभावधर्माप्रमाणे नियोजित असलेली आपआपली कर्मे करण्यामध्ये पाप नसून ईश्वरावर नितांत भक्ती आणि विश्वास ठेऊन, निरिच्छबुध्दीने, म्हणजे फलाची आशा न धरता आणि, ‘हे मी त्या परम् ईश्वरासाठी करतो आहे’ ही भावना बाळगून केली तर त्या त्या कर्मात असलेल्या नसलेल्या सर्व दोषांचे आपोआप निवारण होते. किंबहुना कर्मे करणार्‍याला जरी ती तो स्वत: करतो आहे असे वाटत असले तरी ती सारी त्या परम् ईश्वराच्या प्रेरणेवरून घडत असतात. त्यामुळे कर्म करणेच नको अशी भावना धरून निष्कर्मी रहाणे अथवा कर्मसंन्यास घेणे हे व्यर्थ आणि त्या परम् ईश्वराच्या आदेशाच्या बाहेर होईल म्हणून तसे करणे टाळावे. फलाची अपेक्षा न धरता नियोजित कर्मे करून ईश्वराची भक्तीपूर्वक आराधना केली म्हणजे मनुष्याला पुनर्जन्ममरणाच्या फेर्‍यातून मुक्ति मिळते. असे हे ब्रम्हज्ञान स्वत: भगवान श्रीकॄष्णाने कुरूक्षेत्रावरील महाभारतयुध्दाच्या निमित्ताने अर्जुनाला दिले. त्याला युध्द करण्याने आपणच आपल्या आप्तजनांचा संहार करणार असल्याबद्दलची जी शंका होती ती स्वत:च्या परम् ईश्वर या विराट स्वरूपाचे दर्शन दाखवून आणि तो संहार अर्जुन नव्हे तर आपण स्वत:च करीत असल्याचे स्पष्ट करून निवारण केली आणि अर्जुनाच्या मनावर आलेले मोह आणि अज्ञानाचे सावट दूर करून त्याला त्याचे क्षत्रियाकडून अपेक्षित असे असलेले युध्दकर्तव्य पार पाडण्यास प्रवॄत्त केले.

हे सारे ज्ञान संजय, जो त्याला व्यासमुनीनी दिलेल्या दिव्य दॄष्टीमुळे कुरूक्षेत्रावरील घटनाक्रम बसल्या जागेवरून समक्ष पाहू शकत होता, याने धॄतराष्ट्रासाठी वर्णन केलेल्या भगवान श्रीकॄष्ण आणि अर्जुन यांच्या संवादाच्या रूपात पण मराठी श्लोक स्वरूपात मी पुढे सादर करत आहे.

संस्कॄत भाषेत समास आणि संधि यांच्या सहाय्याने वाक्यरचना छोटया स्वरूपाची करता येते मराठीत तसे संधिरूपातले शब्द वापरण्याने दुर्बोधता येते ती टाळावी आणि मूळ श्लोकाचा संपूर्ण अर्थ मराठी रचनेत यावा म्हणून काही श्लोक दोन चरणांऐवजी चार अथवा प्रसंगी आठ चरणांचेही केले आहेत

हे मराठीकरण करताना मूळ संस्कॄतमधील ‘गीतोपनिषद’, कै. विनोबा भावे यांची ‘गीताई, कै. लोकमान्य टिळकांनी केलेला मराठी गद्यात्मक अनुवाद ‘श्रीमद्भगवद्गीता मूळ श्लोक व भाषांतर’, ‘भावार्थ दीपिका­ज्ञानेश्वरी’, श्री भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद यांचे अनुवादित पुस्तक ‘भगवद्गीता जशी आहे तशी’ आणि इंटरनेटवरून उपलब्ध असलेली माहिती या सार्‍यांचे परिशीलन करून मी हा प्रयत्न केला आहे.

ज्ञानेश्वरीचिये पाठी ओवी करोनि मर्‍हाटी मी अमृताचिये ताटी नरोटी ठेविली असेल. तरीही आजच्या प्रचलित मराठी बोलीत रूपांतर केलेली गेय स्वरूपातली गीता लोकाना समजणे सोपे जाईल अशा प्रामाणिक मनोभावनेनेच हा प्रमाद मी केला आहे.

मुकुंद कर्णिक
दुबई

इथे सुरू होतो
श्रीमद्भगवद्गीतेच्या उपनिषदातील
ब्रम्हविद्यायोगशास्त्रामधील कृष्णार्जुनसंवादापैकी
अर्जुनविषादयोग
नावाचा पहिला अध्याय

धृतराष्ट्र म्हणाला,
पंडूच्या अन् अमुच्या पुत्रां होउन युध्दज्वर
करति काय कुरूक्षेत्री ते मी जाणाया आतुर १

संजय म्हणाला,
पांडवसेनेची झालेली रचना पाहून
भीष्माचार्यांसमीप जाउन वदला दुर्योधन २

'पहा गुरूवर, ठाकली इथे ही पांडवसेना
द्रुपदपुत्र तुमच्या शिष्याने केलि तिची रचना ३

यांत सात्यकी, द्रुपद महारथी, आणिक युयुधान
शूर धनुर्धर इतके जितके भीम अन् अर्जून ४

धृष्टकेतु, चेकितान, काशीराज, वीर्यवान,
पुरूजित, कुंतीभोज, शैब्य हे वीर धैर्यवान ५

युधामन्यु, विक्रांत आणखी उत्तमौज हे रथी
अभिमन्यू समवेत द्रौपदीपुत्रहि महारथी ६

आता अपुल्या सेनेमधल्या विशेष वीरांची
नावे मी सांगतो, लक्ष्य द्या, स्मृतीत ठेवायची ७

भीष्म, कर्ण, कृप, अश्वत्थामा, विकर्ण, भूरिश्रव
वीर अन्यही स्वप्राणांवर उदार माझ्यास्तव ८, ९

अमर्याद सेना ही अमुची भीष्माच्या रक्षणीं
मर्यादित ती पांडवसेना भीम जिचा अग्रणी १०

व्यूहमुखे नेमून दिलेली लढवा, शूरांनो
सर्व दिशांनी भीष्मांना द्या रक्षण वीरांनो, ११

सुयोधनाला आनंदविण्या भीष्माचार्यानी
प्रतापवान् हा शंख फुंकिला सिंहनाद करूनि १२

लगेच भेर्‍या, शंख, नौबती या रणवाद्यांनी
करूनी तुंबळ नाद टाकिलें आसमन्त भरूनि १३

श्वेताश्वांच्या रथात बसल्या कॄष्णअर्जुनानी
प्रत्त्युत्तर मग दिले आपले दिव्य शंख फुकुनी १४

हृषिकेशाचा पांचजन्य, अन् देवदत्त पार्थाचा
पौंड्र नामक महाशंख तो बलिष्ठ भीमाचा १५

युधिष्ठिराचा अनंतविजय, सुघोष नकुलाचा
सहदेवाने नाद काढला मणीपुष्पकाचा १६

काशीराज, शिखंडि, सात्यकी, विराट अन् द्रुपद
धृष्टद्युम्न, अभिमन्यु आणखी द्रौपदिचे नंद १७

या सर्वांनी दणाणले मग नभ आणिक अवनी
पूर्ण स्वरानें आपआपले महाशंख फुंकुनी १८

तुंबळ नादे त्या विदारली कौरवांचि हृदये
सज्ज जाहले युध्दा ते, ओळखले धनंजये १९

हे धृतराष्ट्रा, हृषिकेशासी वदला मग पांडव
'दोन्ही सैन्यांमधे, अच्युता, रथ नेउनी ठेव २०

युध्दासाठी सज्ज जाहले लोक कोण कोण
कुणासवे मज लढायचे मी करीन अवलोकन २१, २२

दुर्बुध्दी दुर्योधन, त्याचे कोण साहयकर्ते
जमले येथे त्या सर्वां मज पाहू दे पुरते' २३

धनंजयाचे हे वच ऐकुन श्री हृषिकेशानी
दो सैन्यांच्या मधे ठेविला रथ मग नेऊनी २४

'भीष्म, द्रोण या आचार्यांसह सर्व वीर अन्य
पहा अर्जुना इथे उपस्थित' वदले श्रीकृष्ण २५

तेव्हा पार्था दिसले तेथे बंधु, आप्त, मित्र,
पिता, पितामह, श्वसुर, श्यालक, पुत्र तसे पौत्र २६

या सर्वांना पाहुनि तेथे दोन्ही सैन्यात
खिन्न मनाने, दीन वाणिने, वदला मग पार्थ २७

अर्जुन म्हणाला,
'हे सारे मम स्वकीय बघुनी युध्दोत्सुक येथे
शिथील पडती गात्रे माझी, मुखहि शुष्क होते २८

गांडिव हातातून निसटते अन् तनु थरकापते
राहावते ना उभे नि माझे मनही भिरभिरते २९

दिसति, केशवा, विपरित मजला युध्दातिल लक्षणे
कल्याणप्रद ठरेल कैसे स्वजनांना मारणे? ३०

नको विजय अन् नको राज्यही स्वजनां मारूनिया
उपभोगावे राज्य कसे रे जिवंत राहुनिया? ३१

ज्यांच्यासाठी सुखराशींची मनात अभिलाषा
पहा इथे ते उभे ठाकले त्यागुन जीवाशा ३२

पिता, पितामह, श्वसुर, श्यालक, पुत्र, पौत्र, प्रियजन
यांसर्वांसाठी तर धरतो राज्येच्छा आपण ३३

आम्हास मारावया जरी हे उभे ठाकले इथे
या सर्वांना मारून उरणे मनास ना पटते ३४

त्रैलोकाचे राज्य जरी मज मिळेल युध्दातुन
नको मिळाया त्रिलोक जर तो यांच्या मरणातुन ३५

मिळेल आम्हा काय जनार्दन कौरवांस मारूनी?
दुष्ट जरी ते, मारूनिया त्या आम्हि पापाचे धनी ३६

कौरव झाले तरि अपुले, मग कैसे मारावे?
स्वजनां मारून आम्ही पांडव सुखी कैसे व्हावे? ३७

बुध्दिभ्रष्ट अन् लोभी ते मित्रांशि द्रोह करिती
कुलनाशातिल पापाचीही त्यांना नाहि क्षिती ३८

आम्हाला परि कुलक्षयातिल भीषणता ज्ञात
का नाही मग टाळावा तो न पडुनि युध्दात? ३९

कुलक्षयाने विनाश पावे कुलधर्माचार
धर्माचारावाचुन माजे अधर्म जो स्वैर ४०

अधर्मातुनी कुलस्त्रियांमधी ये स्वैराचार
स्वैराचारी स्त्रियांकडुनि हो वर्णाचा संकर ४१

वर्णाच्या संकरामुळे कुल बुडते नरकात
पिंडोदक ना मिळून पूर्वज पडति रौरवात ४२

कुलबुडव्यांच्या संकरामुळे प्रचलित आचार
विस्मरले जाऊन त्या कुला उरे न आधार ४३

अशा कुलातिल मानव जातो निश्चित नरकात
आले आहे असे आजवर माझ्या श्रवणात ४४

ज्ञात असुनिही पाप काय जे स्वजन मारण्यात
राज्यसुखाच्या लोभाने का झालो प्रवृत्त ? ४५

यापेक्षा मी स्वस्थ रहातो टाकुनिया आयुधे
कल्याणच मम होइल कौरवहस्ते मरण्यामधे? ४६

बोलुनि इतके खालि ठेविले धनुष्य अन् बाण
अन् रथामधि बसुन राहिला खिन्नमने अर्जुन ४७

अशा प्रकारे येथे
श्रीमद्भगवद्गीतेच्या उपनिषदातील
ब्रम्हविद्यायोगशास्त्रामधील कृष्णार्जुनसंवादापैकी
अर्जुनविषादयोग नावाचा पहिला अध्याय पूर्ण झाला.

********

इथे सुरू होतो
श्रीमद्भगवद्गीतेच्या उपनिषदातील
ब्रम्हविद्यायोगशास्त्रामधील कॄष्णार्जुनसंवादापैकी
सांख्ययोग
नावाचा दुसरा अध्याय

अश्रूंनी डोळे डबडबलेले आणि मन खिन्न
अशा अर्जुना पाहुनि वदते झाले मधुसूदन १

"आर्यांना शोभा ना देती असली ही तर्कटे
कुठून तुझिया मनात, पार्था, आली ही जळमटे २

नको दाखवू नामर्दपणा जो लांछनकारी
खंबीरपणे युध्द कराया ऊठ, धनुर्धारी" ३

अर्जुन म्हणाला,
श्रीकॄष्णा, हे भीष्म, द्रोण या परमपूज्य व्यक्ती
त्यांना मारायासाठी मी आणु कुठुन शक्ती ४

गुरूहत्येपेक्षा खावे मी भिक्षा मागून
माखावें त्यांच्या रक्ताने बदतर त्याहून ५

आम्हि जिंकावे अथवा त्यानी या पर्यायात
मला केशवा योग्य काय ते हे नाही कळत
ज्याना मारून आम्ही उरावे हे न मना पटते
तेच उभे सामोरि लढाया, मम कौरव भ्राते ६

कुंठितमति मी, काय करू हे कळते ना मजसी
सांग केशवा, शिष्य तुझा मी शरण आलो तुजसी ७

स्वर्गधरेचे राज्य दिले तरि कुणि न सांगू शकते
अनुत्तरित शंका हि सर्वथा मनास मम शोषते ८

संजय म्हणाला,
इतुके सारे सांगुनी अर्जुन कॄष्णासी बोलला
"नाही मी लढणार" म्हणुनिया स्तब्ध उभा राहिला ९

दोन्ही सैन्यांमध्ये थांबल्या खिन्न अर्जुनाला
अस्फुटसे हसुनिया कॄष्ण मग वदले या बोला, १०

श्री भगवान म्हणाले,
"शोकासाठी पात्र जे न तू विचार त्याचा करिशी
आणिक मोठया विद्वानासम भाषण पण देशी
अरे कुणी जगला वा मेला शोक न पंडित करती
अन् मरण्या मारण्यावरून तुझि कुंठित होते मती ? ११

असे न की मी, तू, हे राजे, नव्हतो पूर्वी कधि
असेहि नाही की आपण यापुढे न होणे कधी १२

जो जन्मे त्या येइ बालपण, यौवन, वॄध्दपणा
अन् मग मिळते शरीर त्या दुजे ही तर क्रमधारणा
हे ठाउक ज्या ते ज्ञानीजन पडति न मोहात
कारण त्याना ज्ञात कि सारे असते क्रमप्राप्त १३

हे कुन्तिसुता, शीतउष्ण वा सुखदुखकारक जे
येते, जाते, संतत नसते, सहन करी तू ते १४
ज्या पुरूषाला या सर्वांची व्यथा न बाधे तो
सुखदु:खाला समान मानुनि अमरत्वा जातो १५

जें ‘आहे’ ते ‘नाही’ नसते जे ‘नाही’ ते ‘असते’ ना
ज्ञानी जाणती पूर्णपणें ‘आहे–नाही’ च्या तत्वाना १६

ज्या शक्तीने केलि निर्मिती अन् राहे व्यापून
तिच्या विनाशा समर्थ कुणिहि नसे‚ कुन्तिनंदन १७

नाशवंत देहांचा धारक ‘आत्मा’ अविनाशी
जाणुनि घे अर्जुना, आणि हो तयार युध्दासी १८

आत्मा मारी सर्वांना अन् स्वत:हि पावे मरण
असे समजती जे जे कोणी ते ते अनभिज्ञ १९

नाही जन्मत, मरतहि नाही आत्मा चिरंजिवी
आज असे अन् पुन्हा न होइल असाहि तो नाही
चिरंजीव अन् पुरातन असा हा आत्मा आहे
नाश पावली जरी शरीरे तरी उरून राहे २०

आत्म्याचे अविनाशि रूप हे असे जया अवगत
तो कैसा मारील, मारविल कुणासही, पार्थ ? २१

सहजपणे जैसी मनुजाने वसने बदलावी
तशीच आत्मा जीर्ण शरीरे त्यागुनी चढवी नवी २२

शस्त्रे नाहित समर्थ चिरण्या यास, अग्नि जाळण्या
पाणी पण असमर्थ भिजवण्या, वाराही शोषण्या २३

शस्त्र, अग्नि, जल, वारा याना करी पराभूत
सर्वव्यापि अन् स्थिर सदैव हा आत्मा कालातीत २४
अविकारी, अव्यक्त आणि समजाया कठिणतर
ऐशा आत्म्या जाणुन घेउनि शोक तुझा आवर २५

आणि जरी तू मानत असशिल जन्मुनि मरतो हा
तरी तयास्तव शोक मांडणे तुला न दे शोभा २६

जो जन्मे त्या मरणे आणि मॄता पुन्हा जन्मणे
असते हे अनिवार्य जाण अन् टाळ शोक करणे २७

प्राणिमात्र अदॄश्य आधि अन् मध्यकाली दॄश्य
पुन्हा अंति अदॄश्य होति, मग शोक अनावश्य २८

कुणास भासे नवल, वर्णितो कुणी नवलवत् हा
कुणी ऐकितो नवलच याचे, तरि कुणा न ठावा २९

अवध्य हा आत्मा सजिवांच्या शरिरांचा स्वामी
म्हणुन शोक सजिवांस्तव करणे ठरते कुचकामी ३०

धर्मोचित युध्दापरि श्रेयस्कर ना काहीही
युध्दापासुन विचलित होणे क्षात्रधर्म नाहीं ३१

स्वर्गाचे जणु द्वार असे हे धर्मयुध्द जाण
भाग्यवंत क्षत्रियास केवळ मिळतो हा मान ३२

तरि धर्मोचित युध्दाला जर नकार तू देशी
स्वधर्म आणि कीर्ति गमावून पापभार घेशी ३३

छी थू होइल तव कौंतेया, सार्‍या लोकात
मरणाहुनिही दु:खद ऐसी होइल दुष्कीर्त ३४

रणावरूनि पळणारा म्हणुनी तुझ्याकडे बघतील
प्रतिष्ठा तुझी विसरून तुजला कस्पटाशि तुलतील ३५

नको नको ते शब्द बोलतिल तव कुवतीविषयी
अशी कुचेष्टा ऐकुन घेणे होइल दुखदायी ३६
रणात मरूनी स्वर्ग मिळवशिल, विजयि होउनी राज्य
ऊठ करोनी विचार याचा हो युध्दाला सज्ज ३७

सुखदु:ख तसे नफा नि तोटा जय नि पराजयही
उभयाना सारखे गणुनि लढ, त्यात पाप नाही ३८

इथवर पार्था मी सांगितला सांख्ययोग तुजप्रती
कर्मयोग हा ऐक आता जै कर्मबंध तुटती ३९

प्रारंभित कर्माचा त्याने नाश नाहि होत
अल्पहि पालन या योगाचे करी भीतिमुक्त ४०

कर्में निश्चित करते जी ती बुध्दि हवी एकाग्र
विचलित बुध्दीचे नर होती वासनांमुळे व्यग्र ४१

वेदांमधल्या कर्मकांडपर वाक्यांना भुलणारे
वेदविशारद समजतात कर्माविण काहि न दुसरे ४२

‘नानाविध कर्मे केल्यावर होते फलप्राप्ती
जी असते ऐश्वर्यभोग’ ऐसे ते प्रतिपादिती ४३

भोग आणि ऐश्वर्यामागे जे हे पळतात
बुध्दि त्यांची होउ न शकते स्थिर समाधिस्त ४४

सत्व, रज, तम या त्रिगुणानी भरलेले वेद
त्रिगुणांच्या पलिकडे अर्जुना, हो तू स्वयंसिध्द ४५

महापूर पाणी असता जे महत्व विहिरीचे
ज्ञानी पुरूषाना बस् तितुके कौतुक वेदांचे ४६

कर्म करावे, करित रहावे हाच हक्क तुजला
कर्मफलाचा वाटा मिळणे हा नाही दिधला
फलप्राप्ती झालीच पाहिजे असा नसे न्याय
फलाअभावी कर्म न करणे हा नच पर्याय ४७

अनासक्त होऊन कर्म कर योगाच्या ठायी
कार्यसिध्दि हो वा ना हो तरि निर्विकार राही
यश अपयश मानुनी एक अन् राहुनि नि:संग
कर्म असे करण्यास अर्जुना, नाव कर्मयोग ४८

कर्म कधीही कनिष्ठ ठरते समबुध्दीपेक्षा
बापुडवाणे मनात धरती कर्मफल अपेक्षा ४९

पाप पुण्य दोन्हीतुन राही अलिप्त समबुध्दी
चतुराईने आचर कर्मे हीच कर्मबुध्दी ५०

कर्मफलाला दुर्लक्षिति जे राहुनी अलिप्त
जन्मबंधनापासुन होती ऐसे नर मुक्त ५१

गढुळ मोहपर्यावरणातुन मुक्त जधि होशी
ऐकलेस त्या, ऐकशील त्या वेदां कंटाळशी ५२

अन् वेदांनी कुंठित मति तव होइल स्थिर जेव्हा
स्थिरबुध्दी तुज कर्मयोग होइल प्राप्त तेव्हा ५३

अर्जुन म्हणाला,
सांग, केशवा, मज स्थिरबुध्दी मनुजाची लक्षणे
कैसे त्याचे उठणे, बसणे, अन् कैसे बोलणे? ५४

श्रीभगवान म्हणाले,
सर्व कामना तशा वासना सोडुनि जो तुष्ट
तो स्थिरबुध्दी अलिप्ततेने राहि आत्मनिष्ठ ५५

दु:खामधि ना खेद जया, ना सुखात आसक्ती
स्थिरबुध्दी तो सुटली ज्याची प्रेम, राग, भीती ५६

या सर्वांतुनी मुक्त होउनी हो ज्याची शुध्दी
शुभाशुभाचा मोद खेद ना ज्या तो स्थिरबुध्दी ५७

कासव जैसे अवयव आपुले घेइ आवरून
तसा विषयवासना आवरून धरी स्थितप्रज्ञ ५८
निराहारिचे भोजन सुटते परी न रसभक्ती
परमज्ञान मिळता पण सुटते सर्वच आसक्ती ५९

परमज्ञान ना, अन् आचरिती दमन इंद्रियांचे
सुप्तवासनांमध्ये भरकटे मनमानस त्यांचे ६०

संयम करूनी होती जे मम ठायी परायण
त्यांच्या स्वाधिन त्यांची इंद्रिये तेच स्थितप्रज्ञ ६१

विचार मनि जो करि विषयाचा, होई आधीन
आधिनता मग जने वासना, राग वासनेतुन ६२

रागातुन जन्मतो मोह जो करी स्मरणर्‍हास
विस्मरणाने बुध्दि फिरे, तदनंतर हो नाश ६३

काबु मनावर ठेवुनि वागे असा स्थितप्रज्ञ
रागद्वेषविरहितपणे घे भोग, तरि प्रसन्न ६४

अन प्रसन्न मन करते सार्‍या दु:खांचे हरण
प्रसन्नमन जो तो स्थिरबुध्दी हे निश्चित जाण ६५

अस्थिर बुध्दी ज्याची तो भावनाशील नसतो
शून्य भावना ज्याला तो कधि शांती न मिळवतो ६६

विषयवासनांच्या मागे मन स्वैर धाव घेई
वारा जैसी पाण्यावरली नौका भिरकावी ६७

जये इंद्रियांना आवरले मन करूनी ठाम
ते नर करती स्थिर आपुली बुध्दी निष्काम ६८

जागा राही, जग सारे असताना झोपेमधीं
अन् जग जागे असता झोपे तो नर स्थिरबुध्दी ६९

तुडुंब भरला सागर राही बंद किनार्‍यात
तरिहि पुराचें पाणी समावे त्याच्या उदरात
तसा शांत स्थितप्रज्ञ, असुनिही विषयज्ञान त्याला
अशी शांति नच लाभे कधिही विषयलोलुपाला ७०

सर्व कामना त्यागुनि जगतो जो निरिच्छवॄत्ती
निगर्वी तसा निर्मोही हो त्यास शांति प्राप्ती ७१

अशी स्थिती ही ब्राम्ही म्हणुनी ओळखली जाई
मिळता जी मनुजाला कसला मोह कधि न होई
अशा स्थितित जरि मनुष्य राहिल अंतिम समयाला
तरि ब्रम्हनिर्माणस्वरूपी मोक्ष मिळे त्याला ७२

अशा प्रकारे येथे
श्रीमद्भगवद्गीतेच्या उपनिषदातील
ब्रम्हविद्यायोगशास्त्रामधील कॄष्णार्जुनसंवादापैकी
सांख्ययोग नावाचा दुसरा अध्याय पूर्ण झाला.
********
अध्यायांसाठी दुवे :
अध्याय आठरावा http://www.maayboli.com/node/6531
अध्याय सतरावा http://www.maayboli.com/node/6448
अध्याय सोळावा http://www.maayboli.com/node/6370
अध्याय पंधरावा http://www.maayboli.com/node/6307
अध्याय चौदावा http://www.maayboli.com/node/6226
अध्याय तेरावा http://www.maayboli.com/node/6166
अध्याय बारावा http://www.maayboli.com/node/6101
अध्याय अकरावा http://www.maayboli.com/node/6072
अध्याय दहावा http://www.maayboli.com/node/5966
अध्याय नववा http://www.maayboli.com/node/5937
अध्याय आठवा http://www.maayboli.com/node/5868
अध्याय सातवा http://www.maayboli.com/node/5790
अध्याय सहावा http://www.maayboli.com/node/5720
अध्याय पाचवा http://www.maayboli.com/node/5651
अध्याय चौथा http://www.maayboli.com/node/5613
अध्याय तिसरा http://www.maayboli.com/node/5613
अध्याय दुसरा http://www.maayboli.com/node/5479
अध्याय पहिला http://www.maayboli.com/node/5479

प्रिय मित्रांनो,
माझ्या इतर कवितांसाठी माझ्या http://mukundgaan.blogspot.com या ब्लॉगवर भेट देण्याचे आग्रहाचे आमंत्रण देत आहे.
-मुकुंद कर्णिक.

गुलमोहर: 

काका हे तुम्ही केलंय?
oh my god !! कित्ती प्रचंड काम आहे हे ?
मला काय बोलू सुचत नाहीये........
------------------------------------------------
विनोबा भावे यांची गीताई ना काका?वॉव !! न राहवून तुलना केली मी ; पण सॉरी......... गीताई ती गीताईच!!
तुमचा प्रयत्नही अत्यन्त स्वागतार्ह!!

__/\__

बापरे, काय भगीरथ कार्य आहे हे! मुकुंदराव, तुम्हाला त्रिवार प्रणाम!!

एक अवांतर प्रश्न आहे. इ.स.पू. ३१०२ या वर्षी श्रीकृष्णाचा मृत्यू झाला आणि त्याबरोबरच कलियुग सुरू झाले असे मानतात. तर मग महाभारतीय युद्ध सुमारे छत्तीसेक वर्षे अगोदर झालेले असणार, नाहीका? लहान तोंडी मोठा घास घेतल्याबद्दल क्षमा असावी.

आ.न.,
-गा.पै.

कर्णिक काका, तुम्ही पूर्वी जेव्हा हे प्रसिद्ध केले होते, तेव्हाच वाचले होते. आज पहिला आणि दुसरा पुन्हा अध्याय पुन्हा वाचले. सुंदर जमले आहे. Happy

संत एकनाथांच्या मतानुसार ‘ज्ञानेश्वरीचिये पाठी ओवी करोनि मर्‍हाटी’ मी ‘अमॄताचिये ताटी नरोटी ठेविली’ असेल.
>>
कृपया गैरसमज नसावा, पण 'ज्ञानेश्वरीचिये पाठीं' म्हणजे 'ज्ञानेश्वरीच्या नंतर' असे नसून 'ज्ञानेश्वरीच्या ह्या पाठात' असा त्याचा अर्थ साखरे महाराजांच्या ज्ञानेश्वरीमध्ये दिला आहे. ह्या ओवीच्या मागील ओव्या पाहता तो बरोबर वाटतो. कारण मागील ओव्यांमध्ये 'आज ह्या ह्या दिवशी, ह्या ठिकाणी, पाठभेदांमुळे (पदरच्या ओव्या टाकून) अशुद्ध झालेली ज्ञानेश्वरी मी शुद्ध केली' असे एकनाथांनी म्हटले आहे. त्यामुळे ह्या वरील ओवीचा अर्थ 'आता पुन्हा ह्या पाठात पदरची ओवी जो टाकेल त्याने अमृताच्या ताटात नरोटी ठेवण्यासारखे आहे' हा तर्कसंगत व योग्य वाटतो.

चूक दाखविण्याचा हेतू नाही. प्रस्तावना वाचताना सहज लक्षात आले म्हणून लिहिले.

सोप्या भाषेत अनुवादाचा प्रशंसनीय प्रयत्न.... आवडला.
हळू हळू सर्व अध्याय वाचेन. सद्ध्या तुमचा हा उपक्रम पाहून
तुम्हाला सलाम करावासा वाटतो.
किंवा माबो पद्धतीत _______/\_______

अर्चना, मी_चिऊ, वैभवराव,
विभाग्रज, गामा पैलवान, प्रद्युम्न,
सुनील, सचिन, निलेश आणि उल्हासराव

तुकारामाची गाथा इंद्रायणीत तरली होती. माझे लिखाण दोन वर्षानंतर नैसर्गिक, राजकीय, आर्थिक उलथपुलथ इत्यादींच्या सुनामीमधून तरून पुन्हा अवतीर्ण झालेली पाहून आनंद झाला. तुमचे सर्वांचे मनापासून आभार.