तोहफा तोहफा तोहफा, लाया लाया लाया...

Submitted by पल्लवी अकोलकर on 23 July, 2015 - 00:58

आज टि.व्ही.चे चॅनल सर्फ करता करता, अचानक एका चॅनलवर जितेंद्र आणि जयाप्रदाचे, तोहफा सिनेमातील गाणे चालू असलेले दिसले.
भरपूर साड्यांचे प्रदर्शन असलेले हे गाणे बघून, मला माझ्या लहानपणीची आठवण आली.
माझ्या बालपणी आलेला हा सिनेमा, केवळ यातील या गाण्यामुळेच मला भावून गेला होता.
गाण्यांच्या ओळींचा काहीही अर्थ कळत नव्हता.
पण एकूणच, त्या गाण्याची चाल, आणि त्याचे हे असे, भरपूर साड्यांचे असलेले प्रदर्शन आणि मजेशीर सादरीकरण मात्र मनात घर करून गेले होते.
ह्या गाण्यातील या माणसाने, या बाईला खूपश्या साड्या भेट दिलेल्या आहेत, एवढेच मला त्यावेळी समजले होते.
तर अशी ही साडी !
भारतीय संस्कृतीचे द्दयोतक.
तसं बघायला गेलं तर, "६ किंवा ९ मिटर कापडाचा लांब पट्टा" एवढेच साडीचे वर्णन करता येइन.
पण अगदी अम्मा पासून ते झीरो फिगर बेबपर्यंत सर्वांनाच, त्यात कुठलेही शारीरिक आणि वयाचे बंधन न घालता, कोणालाही आपल्यात प्रेमाने सामावून घेणारा हा वस्त्र प्रकार, म्हणजे साडी.
भारतीय स्त्री, मग ती कुठल्याही प्रांताची असो, वयाची असो, कोणत्याही वर्णाची अथवा कुठल्याही बांध्याची असो, साडी परिधान केल्यानंतर तिचे सौदंर्य आणि शालीनता (कदचित प्रत्यक्षात नसली तरी) अधिकच खुलून उठते.
मला वाटतं, हिंदी सिनेमातल्या बर्‍याचश्या नट्या, या पेहरावामुळेच लोकांच्या लक्षात रहातील अशी विशेष काळजी, बॉलिवूडवाले नेहमीच घेत आलेले आहेत.

कोणतेही गाव असो, अथवा शहर... साड्यांच्या दूकानाला अथवा साड्यांच्या प्रदर्शनाला भेट न देणारी महिला विरळाच.

म्हणजे असे म्हणता येइन, गेली कित्येक शतके, भारतीय स्त्रीला जर कोणी गुंडाळून ठेवले असेन, तर ते फक्त साडीनेच.
मध्यंतरी असेच, टि.व्ही. बघता बघता, मराठी चॅनलवर ’होम-मिनिस्टर’ कार्यक्रमाची आरोळी ऐकू आली.
माझ्या मते जवळ जवळ, गेली १० वर्षे अव्याहतपणे चालू असलेला हा कार्यक्रम नेमका कोणत्या कारणाने लोकप्रिय झाला असेल बरं?
तर त्याचे उत्तर आहे,
"या कार्यक्रमाच्या शेवटी देण्यात येणारी पैठणी."
महाराष्ट्रात साक्षात साड्यांचे महावस्त्रच जिला म्हणतात, अशा या पैठणीने स्त्रीच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे.
तर अशी ही, या कार्यक्रमातील पैठणी साडी मिळालेली भाग्यवान महिला, आणि तिला उचलून घेणारा तिचा नवरा बघतांना, सगळ्यांनाच हेवा वाटत असावा.

पूर्वीच्या सिनेमातील नवरेही, काही खास कारणाने बायकोला साडी आणि गजरा भेट द्यायचे हे आपण बघितले आहेच.
’माहेरची साडी’ हे एखाद्या सिनेमाचे नुसते नाव जरी असले, तरी त्याचा परिणाम काय होतो हे आपणा सर्वांनाच माहीत आहे.
म्हणजे एकूणच, साडी हा भारतीय महिलेच्या किती जिव्हाळ्याचा विषय आहे हे कळून येते.

त्यामुळे आज कितीही साड्या घरात असल्या, आणि त्यांनी कपाट अगदी ओसंडून जरी वहात असलं, तरी दर दिवाळीला खरेदी केली जाणार्‍या साडीची आवड मात्र काही केल्या कमी होत नाहीये.
उलट आता त्यात, नऊवारी साडीचीही जोमाने भर पडत आहे.
मध्यंतरी, व्हॉट्सॲपवर कुठल्याशा दूकानातील साडीचा फोटो असलेली इमेज येत होती.
त्या साडीची किंमत (म्हणे) फक्त ५२ लाख होती.
आता एवढ्या किमतीची साडी देखील, त्याच ताकदीची असणार हे ओघाने आलंच, परंतू याचा अर्थ या पातळीपर्यंतही कोणीतरी साडीसाठी किंमत मोजायला तयार आहे असा होतो.

परवा, पु.ल. देशपांडेंची सी.डी. ऐकतांना, त्यातही साडी खरेदीच्या वर्णनाचा उल्लेख ऐकून मनमुराद हसायला आले.
या कथेमधील बायको, नवर्‍याला घेवून साडीच्या दूकानात खरेदीला गेली असता, नवरा बसल्या बसल्या कंटाळून इकडे तिकडे जरा ’प्रेक्षणीय’ स्थळांकडे बघत असता, अचानक बायको तिच्या नादात, ह्या नवर्‍याला विचारते, "या पातळाचं अंग कसं आहे हो...?"
तेव्हा, अनवधानाने, हा नवरा तिला, ’गोरं’... म्हणून जातो, तेव्हा बायकोसकट दूकानातील समस्त मंडळी त्याच्याकडे चकीत होवून बघतात.
असा हा प्रसंग वर्णावा, तर पु.लं. नीच!
तसेच, त्यांचा तो ’नारायण’ मोठ्या शिताफिने घरातल्या काकू-मावशींना साड्या खरेदीला घेवून जातो, आणि हे अवघड प्रकरण अगदी चूटकीसरशी सोडवतो, हे वाचतांना किंवा ऐकतांना आजही तेवढीच मजा येते.
त्यावरूनही, पु.लं.नी साडी ह्या विषयाचं महत्व किती आधीच ओळखलं होतं, हे दिसून येतं.

एकूणच बायकांचा, साडीखरेदी प्रकार, हा या समस्त नवरे मंडळींना फारसा रुचत नसतोच.
सुरूवातीला, "तुला ही साडी छान शोभून दिसेल" असे बायकोला अगदी इंटरेस्ट घेवून सांगणारा हा नवरा, नंतर मात्र जांभई द्यायला कधी सुरूवात करतो, हे त्याचे त्यालाच कळत नाही.
थोड्या वेळाने त्याच्या हे लक्षात आलेले असते, आपण जे म्हणतोय, त्याच्या अगदी विरुद्धच बायकोला आवडतंय.

बाकी, साड्यांच्या दूकानात काम करणार्‍या पुरुष मंडळींचं, म्हणजेच सेल्समनचं मला नेहमीच कौतूक वाटत आलंय बरं का.
बायकोबरोबर नुसते, साडी खरेदीला जावूनही समस्त नवरेमंडळी कंटाळून जातात, परंतु हा, दूकानातील साड्या दाखवणारा माणूस मात्र तासन तास उभे राहून, न थकता, न कंटाळता विविध प्रकारच्या साड्या, चोखंदळ अशा महिला वर्गाला अखंडपणे दाखवत असतो.
कधी काठा-पदराच्या पारंपारीक, तर कधी लेटेस्ट फॅशन्सच्या, कधी बजेटनुसार, तर कधी विशिष्ट रंगसंगतीच्या, असे महिला सांगतील त्यानुसार त्यांना साड्या दाखवत रहातो.
त्यांच्या मनात नेमके काय चालू आहे हे ओळखण्याचा प्रयत्न करत असतो.
त्यांचा कल कोणत्या प्रकाराकडे, कोणत्या रंगाकडे आहे, कोणत्या किमतीकडे आहे हे समजावून घेतो.
समोरील महिलेसाठी, किंमतीचा घटक महत्वाचा आहे का? की साडी आवडली तर किंमतीकडे ती बघणार नाही याचा अंदाज लावण्यात, हा सेल्समन तरबेज असतो.
प्रसंगी, तो स्वत: साडी नेसून, ती अंगावर कशी दिसेन याची, समोर प्रश्नार्थक चेहरा करून बसलेल्या महिलेला, कल्पना देत रहातो.
तर अशा या सगळ्या भूमिका रंगविणे म्हणजे माझ्या मते, निव्वळ त्याच्या सहनशक्तीचा कळसच आहे.
मग काही वेळेस,
"तुम्ही गोर्‍या आहात ताई, तुम्हाला काय, कोणताही रंग शोभून दिसेन", अशी प्रशंसा करायलाही हा प्राणी कधी कमी पडत नाही.
किंवा,
बास एकच? अजुन कुठली दाखवू ?
किंवा,
तुम्ही त्या अमुक अमुक सिनेमातील श्रीदेवीने नेसलेली साडी नेसून बघा, सगळेजण तुम्हाला विचारतील, साडी कुठून घेतली आहे.
किंवा,
ह्या साडीची किंमत बघा, फक्त ५००० रुपये!
ताई, तुमच्या मैत्रिणी नक्की विचारतील, एवढी स्वस्त(!) साडी कुठून घेतली म्हणून.
इत्यादी डायलॉग्जही हा माणूस, भावनिकरित्या कोणातही न अडकता बायकांना मारू शकतो.

कशा प्रकारचे संवाद होत असतात बायकांचे साड्या खरेदी करतांना?
बघा हं!
अगं, हा रंग चांगला आहे, पण याचे काठ किनई फारच बारीक आहेत बाई...
ए, ही जांभळी छान आहे बघ, ही घेवू का मी?
अगं पण हा रंग तर आहे ना तुझ्याकडे?
नाही गं. माझ्याकडे कुठे झालाय असा जांभळा रंग?
अगं असं काय करतेस, परवा शकूताईच्या लग्नातच नव्हती का नेसलीस तू ती जांभळी साडी?
अरे हो, पण त्याचं डिझाईन वेगळं आहे, यावर फुले आहेत.
किंवा,
ओ, जरा पिवळ्या रंगाची दाखवता का...?
पण त्याला लाल काठ नको बरं का!
आणि पिवळा म्हणजे, पिवळाधमक नको हं,
जरासा सोनेरी...त्या चित्रात दाखवलाय ना अगदी तस्साच!
किंवा,
अरे बाप रे, ही अशी लाल रंगाची नका दाखवू बरं का.
जरा वयस्कर बाईंनाच द्यायची आहे ही साडी.
अहो, हा हिरवा रंग तर देवीच्या साडीचा वाटतोय, लोकं मला बघून माझी आरतीच करतील, जरा बॉटल ग्रीन कलरची दाखवा ना!
तो तुमचा शर्टचा रंग आहे ना त्याच शेडची.
किंवा,
सेल्समनने, १०/१२ साड्या दाखविल्यानंतर,
अहो अहो, असे डार्क रंग नका दाखवू, ज्यांना भेट द्यायची आहे ना, त्या बाई काळ्या/सावळ्याच आहेत जरा...
किंवा,
तुम्हाला लक्षातच येत नाहीये, मी कोणती साडी म्हणतेय ते,
अहो, ती नाही का, मी मागच्या महिन्यात आले होते तेव्हा, तुमच्या या स्टॅच्यूला नेसवली होती, काळ्या रंगाची, ज्यावर असे बारीक खडे होते.
काय हो, कलरची गॅरेंटी आहे ना ?
नाही तर धूतल्यावर डोक्याला हात लावायची पाळी यायची...
साडीची उंची व्यवस्थित आहे ना ?
कारण आमच्या काकू जरा जास्तच उंच आहेत बरं का, उंचीला लहान झाली आणि त्यांना नाही आवडली तर लगेच नावं ठेवतील, कसली साडी दिली म्हणून!
मग काय, स्वत: दुसर्‍यांना देतांना नाही विचार करायचा, पण आम्ही काही दिलं की मात्र नावं ठेवायला मोकळ्या.
काय हो, तुमच्याकडे त्या सिनेमातल्या साड्या आहेत का ?
अहो त्यात नाही का, ती आलिया भट्ट नेसली आहे, त्या जरा जाड काठाच्या?
ही नको बाई, फारच बटबटीत दिसत्ये नां? डोळ्यांना फारच त्रास होतोय.
आणि आमच्या सासूबाईंना तर बिलकूलच नाही आवडणार हे असलं काहीतरी पारदर्शी नेसलेलं...
छे छे ! चारचौघात नाही नेसता येणार बाई ही अशी साडी !
तुझं बरंय गं, तुझे सासू-सासरे तिकडे गावाकडे असतात, आमच्याकडे नाही चालणार ही अशी स्लीव्हलेस ब्लाऊजवाली फॅशन.
नविन लग्न झालं तेव्हा ठीक होते हे असले भडक रंग, आता या वयात काय करायचे हे असले काहीतरी नेसून!
सगळे म्हणतील, देशपांडेंच्या सुनेने तर लाजच सोडलेली दिसत्येय...
तुझं बरंय गं, तुला काय काहीही शोभून दिसतं, आम्हाला आधी, आमच्या देहाला शोभून दिसेन का, याचा विचार करावा लागतो.
जरा ती दाखवा हो,
ती ती.... त्या वरून तिसर्‍या कप्प्यातली...
नाही नाही त्याच्या खालची...
अहो, ती नाही,ती नाही... ती निळ्या रंगाची, त्या हिरवीच्या शेजारची...
हं हं, तीच तीच...ती दाखवा.
अशी ’ती’ साडी ह्या बिचार्‍या सेल्समनने त्या विशिष्ट कप्प्यातून ओढून काढून, उलगडून दाखविल्यावर,
शी! नको गं बाई, लांबून (?) बरी वाटली होती मला, उघडून दाखवल्यावर काहीतरीच वाटत्येय!
असे सांगायलाही या बायका घाबरत नाहीत.
सेल्समन फक्त हिंदीच समजणारा असेल तर...
अरे, वो साडी ऐसे लपेट के दिखाओ ना, पल्लू पे भी वोही डिझाईन है क्या ?
और ब्लाऊज-पीस है ना साथ में? कितने मीटर का? धोने के बाद आटेगा तो नहीं?

आणि मग बर्‍याचदा, एवढे रामायण घडल्यानंतर, आणि महाभारतातील द्रौपदीच्या साडी एवढ्या लांबीच्या साड्यांचा ढिग बघून झाल्यावर, या बायका म्हणतात, जाऊ दे, या दूकानात काही मनासारखी मिळतच नाहीये, त्या पलिकडच्या दूकानात बघू, हा माणूस काही नीट दाखवतच नाहीये.
अशा प्रकारच्या संवादांवरही, या भल्यामोठ्ठ्या नाटकाचा दुर्देवी शेवट होवू शकतो.
मग अशावेळी हा सेल्समन, कधी हताशपणे तर कधी खंबीरपणे किल्ला लढवतो, तर कधी विरक्तपणे त्या साड्यांच्या ढिगाच्या घड्या घालत बसतो.

आणि या गोंधळात लग्नसराईचा ’बस्ता’ असेल तर या परीक्षेचा कालावधी किती मोठा असेल हे काही सांगता येत नाही.
बस्ता खरेदीला येणार्‍या महिला (आणि पुरुष मंडळीही) मोठ्या संख्येने, आणि उत्साहाने या महत्वाच्या कार्यक्रमासाठी आलेले असतात.
आणि मग एकाचवेळी सगळेच जण आपापलं डोकं चालवायला लागतात.
त्यात प्रत्येकाची आवड-निवड, किमतीचे निकष, रुसवे-फूगवे यांची सांगड घालत, हा साडीवाला सेल्समन किल्ला लढवत रहातो.

अजुन सांगायचे म्हणजे,
समजा, तुम्ही एक ’नॉर्मल’ प्रकारातील स्त्री आहात.
आणि अगदी घाईघाईत, कामाच्या गडबडीत तुम्ही कुठेतरी चालला आहात, आणि त्या नादात तुम्हाला रस्त्यांत एक मोठ्ठे साडीचे शोरूम दिसते, मग अशावेळी, गडाबडीत असूनही, स्टॅच्यूला नेसवलेल्या साडीकडे तुमचे लक्ष जाणार म्हणजे जाणारच.
मग पहिला विचार तुमच्या मनात येतो तो म्हणजे, अरेच्चा, आपल्याला घ्यायची असते, तेव्हा नाही दिसत मेल्या अशा सुंदर साड्या... आता पहा, घ्यायची नाही तर कशा अगदी एक से एक लावल्या आहेत.
”व्वा, काय झक्कास कलर-कॉम्बीनेशन आहे” (माझ्याकडे बिलकूलच नाहीये, असे)
मग अशावेळी अगदी जड अंतकरणाने तुम्ही पुढे जाता, किंवा मग कधीतरी तुम्हाला निदान त्या साडीची किंमत ऐकण्याचा तरी मोह होतोच.
मग तुम्ही कुतूहलाने, आत जावून सेल्समनला त्या साडीची किंमत विचारता, किंवा स्वत: बघता, त्या साडीवरून हळूवारपणे हात फिरवून बघता.
आणि फार म्हणजे फारच आवडली तर, कोणतेही कारण नसतांना देखील ती साडी विकत घेवून टाकता.

तर असे हे, भारतातील तमाम महिलांचे साडीवरच्या प्रेमाचे पुराण !
अनादी काळापर्यंत चालत आलेले, आणि माझ्या मते पुढेही असेच चालू रहाणारे.
https://www.facebook.com/PallaviAnecdotes

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लेखन चांगले आहे. (४ तासात एकही प्रतिसाद येऊच नये इतके वाईट तर अजिबातच नाही.)

ताई, धागा ग्रूपसाठी मर्यादित केलाय तुम्ही, तो जरा 'पब्लिक' करा, म्हणजे जास्त लोक वाचतील, लॉगीन न होणारे लोकही वाचू शकतील.
दुसरं ते टायटल, अन धाग्याचा विषय यांचा एकाशी एक काही संबंध बाहेरून पाहताना लागत नाहिये. लोकांनी टिचकी मारून बघावंसं वाटेल असं 'साडी पुराण' वगैरे नांव द्या की Wink

मस्त खुसखुशीत!

मग पहिला विचार तुमच्या मनात येतो तो म्हणजे, अरेच्चा, आपल्याला घ्यायची असते, तेव्हा नाही दिसत मेल्या अशा सुंदर साड्या... आता पहा, घ्यायची नाही तर कशा अगदी एक से एक लावल्या आहेत. >> अगदी अगदी.

काही काही पंचेस छान आहेत . उ.दा. 'म्हणजे असे म्हणता येइन, गेली कित्येक शतके, भारतीय स्त्रीला जर कोणी गुंडाळून ठेवले असेन, तर ते फक्त साडीनेच'
प. अ., दी.मा. नी सांगीतल्या नुसार धाग सार्वजनीक केलात तर अधिक लोकांपर्यंत पोहोचेल.

चांगला आहे लेख..

वहीदा रेहमान, धर्मेंद्र, जया भादुरी चा फागुन नावाचा चित्रपट केवळ साडी याच विषयावर होता.. पिया संग खेलो होरी, फागुन आयो रे.. हे लताचे गाणे त्यातले.

धागा सार्वजनिक करायचा म्हणजे नेमके काय करायचे?
अहो, नाही तर कोणी तरी मला विचारेल, २ धागे का काढलेत म्हणून...
कुठे बदल करावे लागतात असे धागे सार्वजनिक करण्यासाठी?
पण असो,
तुम्हा तिघां/चौघांच्या प्रतिक्रियाही मला तितक्याच महत्त्वाच्या आहेत.
तुम्हाला (फक्त ४ जण का असेनात) माझा लेख आवडल्याबद्दल मी आभारी आहे.
दिनेश,
हो का? मला अगदी नवीनच माहिती मिळाली तुमच्यामुळे, फागुन चित्रपट ’साडी’ या विषयावर होता.
मला फक्त ’माहेरची साडी’च माहित होता.
असो,
धन्यवाद
पल्लवी अकोलकर

प.अ.,

तुमच लेख वाचल्यावर माबोच्या दुकानात नवा स्टॉक आल्यागत वाटलं! Happy

आ.न.,
-गा.पै.

>>>समजा, तुम्ही एक ’नॉर्मल’ प्रकारातील स्त्री आहात.<<<

लेखातील ह्या एका वाक्यामुळे येथे स्त्रियांचे प्रतिसाद दिसत नाही आहेत. स्त्रीजीवनाशी अतिशय जवळून निगडीत असलेल्या ह्या धाग्याचा अख्खा टी आर पी घालवला त्या वाक्याने!

धाग्यावर संपादन दिसत आहे तेथे जाऊन क्लिक करा. मग कर्सर खाली आणा आणि सगळ्यात खाली एक छोटा चौकोन दिसेल ज्याच्या आजूबाजूला 'सार्वजनिक' असे लिहिलेले असेल. त्यावर क्लिक करा आणि पुन्हा सेव्ह करा. मग धागा सार्वजनिक होईल.

मनापासून लिहिलेले आहेत, पण अधिक प्रभावी होऊ शकले असते असे वाटून गेले. शुभेच्छा!

-'बेफिकीर'!

चांगला आहे लेख पण मी साडी प्रेमी नसल्याने हे खरेदीचे प्रसंग माझ्यावर आणि नवर्यावर येत नाहीत.

तो तुमचा शर्टचा रंग आहे ना त्याच शेडची.>>> Lol

छान!
साडी म्हणजे स्त्रीयांचा अगदी जिव्हाळ्याचा विषय..
तमाम महिला वर्गाला, कपाट भरून असतील तरी एखाद्या समारंभात नेसायला चांगली साडीच नाही.. हे नेहमीचं फिलींग!!
दुकानदाराची काही वाक्ये हमखासच.. आमच्या इथून घेतल्यावर,नक्कीच विचारतील कुठे घेतली!

मग पहिला विचार तुमच्या मनात येतो तो म्हणजे, अरेच्चा, आपल्याला घ्यायची असते, तेव्हा नाही दिसत मेल्या अशा सुंदर साड्या... आता पहा, घ्यायची नाही तर कशा अगदी एक से एक लावल्या आहेत. >> अगदी अगदी++++१००% असेच होते.

.

मस्त लिहिलय... एकदम खुसखुशीत! Lol

पहिला विचार तुमच्या मनात येतो तो म्हणजे, अरेच्चा, आपल्याला घ्यायची असते, तेव्हा नाही दिसत मेल्या अशा सुंदर साड्या... आता पहा, घ्यायची नाही तर कशा अगदी एक से एक लावल्या आहेत.>> +1

तमाम महिला वर्गाला, कपाट भरून असतील तरी एखाद्या समारंभात नेसायला चांगली साडीच नाही.. हे नेहमीचं फिलींग!!>> +1. Proud
असं बोलून दाखवल्यावर नवरा आश्चर्यचकीत आणि हतबल होऊन एकदा आपल्याकडे आणि नंतर साड्यांकडे बघत बसतो. Proud