मोसम आला

Submitted by निशिकांत on 20 July, 2015 - 11:54

चिंब अंतरी भिजावयाचा मोसम आला
गूज मनीचे सांगायाचा मोसम आला

तुझ्या भोवती वसंतही रेंगाळत असतो
असून शुध्दोदक प्याला फेसाळत असतो
भान हरवुनी जगावयाचा मोसम आला
गूज मनीचे सांगायाचा मोसम आला

तुझ्यामुळे तर वाळवंटही हिरवे झाले.
पर्णफुटीचे ऋतू परतले, बरवे झाले
तृणासवे दव चमकायाचा मोसम आला
गूज मनीचे सांगायाचा मोसम आला

फूल उमलते बघून आशा मनी जागली
जगावयाची पुन्हा एकदा भूक लागली
काट्यांचाही उमलायाचा मोसम आला
गूज मनीचे सांगायाचा मोसम आला

तुझ्याविना मी, माझ्याविन तू किती अधुरे!
कसे फुटावे प्रेमाला मग नवे धुमारे?
झेप घेउनी उडावयाचा मोसम आला
गूज मनीचे सांगायाचा मोसम आला

लोक काय म्हणतील म्हणू दे, तमा न त्याची
खूप वाटली लाज जनांची, कधी मनाची
बंड करोनी उठावयाचा मोसम आला
गूज मनीचे सांगायाचा मोसम आला

नकोत सीमा, परीघही गुदमरण्यासाठी
तोड शृंखला परंपरेच्या जगण्यासाठी
क्षितिजाच्याही पुढे जायचा मोसम आला
गूज मनीचे सांगायाचा मोसम आला

निशिकांत देशपांडे. मो. क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com

Group content visibility: 
Public - accessible to all site users