सुसह्य मेलोड्रामा (Movie Review - Bajrangi Bhaijaan)

Submitted by रसप on 19 July, 2015 - 00:27

अनपेक्षित धनलाभाचा आनंद खरं तर अतुलनीय असतो, पण तरी जर तुलना करायचीच झाली तर, 'तद्दन गल्लाभरू, व्यावसायिक आणि अक्कलदिवाळखोर असेल', अश्या धारणेने एखादा 'सलमानपट' बघावा आणि तो व्यावसायिक असला तरी अगदीच अक्कलदिवाळखोर न निघाल्याची भावना ही अनपेक्षित घबाड मिळाल्याच्या आनंदाच्या जवळपास जात असावी, असं मला 'बजरंगी भाईजान'मुळे जाणवलं.
चित्रपटातली एक कव्वाली अदनान सामीने गायली आहे. पडद्यावरही अदनान स्वत:च आहे. कोणे एके काळी तंबूइतका घेर असलेला अदनान सामी इतका बारीक झाला आहे की स्वत:च्या जुन्या कपड्यांत आता तो एका वेळी किमान चार वेळा मावू शकेल. अदनान सामीने बारीक होऊन जो सुखद आश्चर्याचा धक्का दिला आहे, तसाच, किंबहुना त्याहूनही मोठा धक्का सलमान खानने दिला आहे ! प्रथेप्रमाणे शर्ट न काढून नव्हे, शर्ट तर उतरतोच. पण त्याने चक्क बऱ्यापैकी अभिनय केला आहे ! मला जाणीव आहे की हे विश्वास ठेवायला थोडं जड आहे. पण असं झालंय खरं !
अर्थात ह्यामध्ये दिग्दर्शक कबीर खानचं अभिनंदन करायला हवं. कारण माझ्या मते, चांगले दिग्दर्शक सामान्य अभिनेत्यांकडूनही चांगलं काम करून घेऊ शकतात. (गुलजार साहेबांनी काही चित्रपटांत तर जम्पिंग जॅक जितेंद्रकडून अभिनय करून घेतला होता !) कबीर खानने सलमानच्या नाकावर 'एक था टायगर'मध्येही माशी बसू दिली नव्हती आणि 'काबुल एक्स्प्रेस' आणि 'न्यू यॉर्क'मध्ये त्याने जॉन अब्राहमच्या चेहऱ्यावर आठ्यांबरोबर अभिनयरेषाही उमटवल्या होत्या. 'न्यू यॉर्क'मध्ये तर मख्ख नील नितीन मुकेशसुद्धा त्याने यशस्वीपणे हाताळला होता !

कहाणीवर घट्ट पकड असणे, सर्वांकडून चांगला अभिनय करवून घेणे, कथानक एका विशिष्ट गतीने पुढे नेणे, अनावश्यक गाणी, प्रसंग टाळणे वगैरे कबीर खानची, किंबहुना कुठल्याही चांगल्या दिग्दर्शकाची वैशिष्ट्यं. 'बजरंगी भाईजान' मध्ये मात्र मध्यंतरापूर्वीच्या बहुतांश भागात कबीर भाईजान आपल्या एखाद्या सहाय्यकाला जबाबदारी सोपवून डुलकी घेत होते की काय, असं वाटलं. त्या वेळात मंद आचेवर शिजणाऱ्या 'मटन पाया'सारखं कथानक शिजत राहतं. शेवटी कुठे तरी कबीरसाहेबांना जाग येते आणि ते ताबा घेतात. मग मध्यंतरानंतर घटना पटापट घडत जातात आणि खऱ्या अर्थाने उत्तम दिग्दर्शकाचा चित्रपट सुरु होतो.

चित्रपटाचे ट्रेलर इतके बुद्धिचातुर्याने बनवले आहेत की कथानक कुणापासूनही लपलेलं नाही !
म्हणजे -
एक पाच-सहा वर्षांची पाकिस्तानी मुकी मुलगी एकटीच भारतात पोहोचते, हरवते. ती पवन कुमार चतुर्वेदी (सलमान) ऑल्सो नोन अ‍ॅज 'बजरंगी'ला भेटते. अल्पावधीतच त्या गोंडस मुलीवर प्रचंड माया करायला लागलेल्या बजरंगीला, ती पाकिस्तानातून चुकून भारतात आलेली आहे, हे समजल्यावर तो तिला तिच्या घरापर्यंत पोहोचवण्याची शप्पथ घेतो आणि तिला घेउन पाकिस्तानात पोहोचतो.
- हे कथानक तर चित्रपटगृहात शिरण्याच्याही आधीपासून प्रत्येकाला माहित असतं. मला तरी एकदाच ट्रेलर पाहून समजलं होतं. त्यामुळे साहजिकच जे काही घडतं, ते कसं घडतं हे पाहणं हाच एक उद्देश उरतो. बजरंगी त्या लहान मुलीला घेऊन पाकिस्तानात कसा जातो ? तिला पोहोचवू शकतो का ? परत येतो का ? नवाझुद्दिन सिद्दिकीची काय भूमिका आहे ? सीमारेषेवर असलेला जीवाचा धोका तो कसा पार पाडतो ? वगैरे वगैरे लहान-मोठे प्रश्न पडत असल्यास 'बजरंगी भाईजान' अवश्य पाहावा.

images_3.jpg

पहिला अर्धा भाग खुरडत, लंगडत चालला असला तरी त्या भागाला अगदीच कंटाळवाणा न होऊ देण्याचीही खबरदारी घेतलेली आहे. ह्या भागात टिपिकल सलमानछाप पांचट कॉमेडी न दाखवता खुसखुशीत प्रसंगांच्या पेरणीतून विनोदनिर्मिती केली आहे.
अधूनमधून करीना बोअर करते. पण सध्या तिने असंही खर्चापुरतंच किरकोळ काम करायचं ठरवलेलं असल्याने तिच्या भूमिकेची लांबी तिच्या 'झीरो फिगर' प्रमाणे 'कंट्रोल्ड' आहे. तिच्या ओव्हर अ‍ॅक्टिंगला एक-दोन ठिकाणीच केंद्रित करून ठेवून एरव्ही तिला सलमान किंवा शरत सक्सेनाच्या जोडीला सहाय्यक म्हणूनच काम करायला दिलेलं आहे. जिच्याकडे काही काळापूर्वी एक आश्वासक अभिनेत्री म्हणून पाहिलं जात होतं, तिला अशी दुय्यम कामं मिळणं, ह्यामागे इतरांचा दोष वगैरे काही नसून तिचं तिनेच ठरवलेलं 'खर्चापुरतंच किरकोळ काम' आहे. त्यामुळे नो सहानुभूती !
लहान मुलगी 'मुन्नी/ शाहिदा' म्हणून झळकलेली चिमुरडी 'हर्षाली मल्होत्रा' अमर्याद गोंडस व निरागस दिसते. बजरंगीच्या आधी आपलाच तिच्यावर जीव जडतो. तिचा टवटवीत फुलासारखा चेहरा आणि डोळ्यांतला निष्पाप भाव ह्यांमुळे ती मुकी वगैरे वाटतच नाही. कारण ती गप्प बसूनही खूप बोलते.
एका पाकिस्तानी पत्रकाराच्या भूमिकेत नवाझुद्दिन सिद्दिकीची एन्ट्री उत्तरार्धात होते. गच्च भरलेल्या लोकलच्या डब्यात 'आता अजून कुणीही शिरू शकत नाही' वाटत असतानाही शिरलेला एखादा किमयागार जसा आपल्यापुरती जागा करूनच घेतो, तसा पहिल्या प्रसंगापासूनच नवाझुद्दिन कथानकात स्वत:साठी एक कोपरा पकडतोच. त्याचा 'चांद नवाब' खरं तर चित्रपटाच्या दुसऱ्या भागात बजरंगीच्याच बरोबरीचं मुख्य पात्र बनला आहे. अर्थात, नवाझुद्दिन हा एक हीरा आहे आणि सलमान 'हीरो', अभिनेता नाही. हीरा आकाराने कितीही छोटा असला तरी महाकाय दगड त्याच्यासमोर कधीही फिकाच. त्यामुळे ही तुलना खरं तर दुर्दैवी आहे.
करीनाच्या वडिलांच्या भूमिकेत शरत सक्सेनाची भूमिकाही मर्यादित आहे, ती ते जबाबदारीने पार पाडतात.
छोट्या छोट्या भूमिकांत सीमारेषेवरील अधिकारी, पोलीस अधिकारी, बस कंडक्टर वगैरे अनोळखी चेहरे धमाल करतात.

बहुचर्चित 'सेल्फी ले ले' गाणं चित्रपटगृहात शिट्ट्यांचा पाऊस पाडतं. मात्र इतर गाणी जास्त चांगली आहेत. 'चिकन सॉंग' तर मस्तच जमून आलं आहे आणि त्याची पेरणीही अगदी अचूक झाली आहे. 'ह्या जागी एक गाणं हवंच होतं' असं क्वचित वाटतं, ते ह्या गाण्याबाबत वाटलं. एकूणच सर्व गाण्यांत मेलडी आहे. पण संगीत प्रीतम चक्रवर्तीचं असल्याने नेमकं कौतुक कुणाचं करावं की करूच नये, हे समजत नसल्याने मी हात आखडता घेतो !

उत्तरार्धात 'गदर'ची कॉपी मारायचा फुटकळ प्रयत्न तर केलेला नाही ना, अशीही एक भीती मला होती. पण सुदैवाने तसं काही झालेलं नाही. अर्थात, काही ठिकाणी अतिशयोक्ती आहे, काही ठिकाणी मेलोड्रामाही आहे. पण हे सगळं सहनीय आहे. डोळ्यांत येणारं पाणी जर मेलोड्रामामुळे असेल, तर तो नक्कीच जमून आलेला आहे असं म्हणावं लागेल. ह्याचं श्रेय लेखक व्ही. विजयेंद्र प्रसाद आणि संवादलेखक कबीर खानला द्यायला हवं. संवाद अगदी लक्षात राहतील असे नसले, तरी मार्मिक आहेत, खुमासदार आहेत. तडातड उडणारी माणसं (एक किरकोळ अपवाद!), गाड्या आणि फुटणाऱ्या भिंती वगैरे टाईप हाणामाऱ्या इथे नाहीत.

उत्तुंग पर्वतराजी डोळ्यांचं पारणं फेडतात आणि नजरेच्या पट्ट्यात न मावणारी रखरखीत वाळवंटं थक्क करतात. छायाचित्रण अप्रतिमच झालेलं आहे.

'बाहुबली' आणि 'बजरंगी भाईजान' ह्यांच्या शक्तिप्रदर्शनात चित्रपटगृह चालकांची चांदी आहे, हे ओसंडून वाहणारे पार्किंग लॉट्स सांगत आहेत. सर्वत्र परवापर्यंत चर्चा होती की 'बाहुबलीमुळे बजरंगी मार खाणार की बजरंगीमुळे बाहुबली', प्रत्यक्षात दोघांमुळे इतरांना मार बसणार आहे.

थोडक्यात, सलमानभक्तांना 'बजरंगी' आवडेल ह्यात तिळमात्र शंका नाही आणि सलमानत्रस्तांनाही तो असह्य होणार नाही, अशी खात्री वाटते.
काबुल एक्स्प्रेस, न्यू यॉर्क आणि एक था टायगर ह्या हॅटट्रिकनंतरच कबीर खान माझ्यासाठी 'Must watch Director' च्या यादीत विसावला होता. 'बजरंगी'ने त्याचं स्थान अजून भक्कम केलं आहे !

रेटिंग - * * *१/२

- रणजित पराडकर

http://www.ranjeetparadkar.com/2015/07/movie-review-bajrangi-bhaijaan.html

हे परीक्षण मराठी दैनिक 'मी मराठी लाईव्ह' मध्ये आज १९ जुलै २०१५ रोजी प्रकाशित झाले आहे :-

19 - Bajrangi Bhaijaan - 19-Jul-15.JPG

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

टण्या सिनेमाची फार छान चिरफाड केली आहे Happy
पण तरीही त्यानंतरही हा सलमानचा सिनेमा उरला आहेच .. त्यामुळे आपल्या परीक्षणातील शब्द न शब्द खरा मानला तरी २०० - ३०० कोटी छापले जाणार.. Wink

असो,
<<<<<मात्र एक प्रेक्षक म्हणुन मला या परिक्षणातून माझ्या सिनेमा बघण्याच्या व आस्वाद घेण्याच्या कृतीत शून्य भर (वृद्धी) होते.>>>

हे ईंटरेस्टींग वाटले, याउलट भर पडणार्‍या प्रकारच्या परीक्षणांची काही उदाहरणे मिळतील का? मायबोली किंवा ईतर कुठलीही चालतील, पण भाषा हिंदी किंवा मराठी

रून्मेष, टण्याला विचारलेस पण तरी माझे २ सेंटस गोड मानून घे Happy - अनुपमा चोप्रा यूट्यूबवर मस्त परीक्षणे देतात. शी कॉल्स अ स्पेड अ स्पेड! त्यांनी दिलेले रेटींग बघून सहसा सिनेमे बघते.
बाकी कोमल नाहटा, राजीव मसंद इ पण रेटींग देतात. पण त्यांनी दिलेले रेटींग मायनस १.५ असा फॉर्मूला मी माझ्यापुरता डेव्हलप केला आहे Wink

गणेश मतकरी लिहितात (लिहायचे). आंतरजालावर मी हा ब्लॉग कधिमधी वाचतो: http://drishtiad.blogspot.com/
रेडिफवरचा राजा सेन बरेचदा चांगले रिव्यु लिहितो. आत्ता तू विचारलेस म्हणुन मी राजा सेनचा रिव्यु बघितला रेडिफवर आणि बेहोल्डः ही हेल्ड माय थेअरी! Happy इट इज अ राजु हिरानी स्कूल ऑफ सिनेमा. आता या परिक्षणाशी मी सहमत नसेन मात्र त्या परिक्षणात परिक्षकाने हिराणी स्कूल बद्दल लिहिणे, काही न्युआन्सेस दाखवणे (चांद नवाब विथ चांद नवाब), संवाद बाळबोध (हॅमहॅण्डेड) आहेत हे निरिक्षण इत्यादी इत्यादी.

http://www.rediff.com/movies/review/review-bajrangi-bhaijaan-is-a-solid-...

सिनेमा कशाला बघायचा, हेच वाचुया इतपत चिरफाड होणारे न्युयॉर्क टाइम्समधली परिक्षणे बघू शकता. रॉटन टोमॅटो वर परिक्षणे बघू शकता. एखादे चांगले हाताशी लागतेच.

फार पुर्वी म.टा.मध्ये (९४-९९ काळात) एकजण जहांगीरला लागणार्‍या प्रदर्शनांवर परिक्षणे लिहायचे. छोट्या गावात राहणार्‍या माझ्यासारख्या एकही अ‍ॅब्स्ट्रॅक्ट, इम्प्रेशनिस्ट, रिआलिस्ट, पोस्टमॉडर्निस्ट चित्रे न बघितलेल्या टीन-एज वाचकाला त्यातून चित्रकलेची ओळख झाली. मी ज्याला वृद्धी म्हणतो ती ही!

गणेश मतकरी लिहितात (लिहायचे).<<<< पुणे मिररमध्ये सध्या ते मराठी सिनेमांवर लिहत आहेत.

राजा सेनचे रीव्ह्युज पण बर्‍याचदा बॅलन्स्ड असतात.

टण्याचा परीक्षणाच्या मुद्द्यावर बरंच काही लिहाय्चं आहे. पन हात आवरता घेते, अन्यथा बीबी भरकटेल. (ऋन्मेष, परीक्षण-समीक्षण कसे लिहावे यावर बीबी काढायला तुला जमेल का?)

@टण्या,

'सर्‍हुदयी' चं तेव्हढं 'सहृदयी' कराल का ? (रच्याकने, हा शब्द नव्याने कळला आहे आणि आवडलाही आहे!)

ऋन्मेष, परीक्षण-समीक्षण कसे लिहावे यावर बीबी काढायला तुला जमेल का? >> Happy Happy नंदिनी, होमियोपॅथीचा अभ्यास सुरू केलास काय? Wink

(अवांतर बद्द्ल क्षमस्व! )

एखादा सिनेमा पाहिल्या पाहिल्या आवडून जातो. भाईजान (आणि सलमान चे बरेचसे सिनेमे) संपल्यावर उत्स्फूर्त पणे प्रतिक्रिया येते ती म्हणजे व्वा! नंतर मात्र १-१ गमतीशीर बाबी लक्षात येतात. करीना कपूर चा गेटअप आणि एकंदर वावरच गंडलाय. पैलवानाची शिक्षक मुलगी ती अजिबात वाटत नाही. शरद सक्सेनाच्या घरातल्या खंडीभर माणसांमध्ये ठळकपणे वेगळी दिसते ती. वर उल्लेख केलेली चाँद नवाब ची youtube लिंक पाहिल्यावर (व्हाट्सअप-फेबु वर अनेक दिवसांपासून हा वीडियो वायरल आहे) किती तंतोतंत उचलली आहे हे समजतं.शेवटचा मेलोड्रामा संपता संपत नाही.
बर...या गोष्टी तुम्हाला सिनेमा पाहताना लक्षात येत नाहीत असं नाही. पण तरीही पहिल्याच वाक्यात म्हटल्याप्रमाणे त्या गोडुली चा निरागस चेहरा आणि प्रसन्न वावर, नवाजुद्दीन च्या एंट्री नंतर पकडलेला सिनेमाचा वेग, आणि सरतेशेवटी तुम्ही कितीही नाही म्हणालात तरी सलमान चा एक्स फॅक्टर तुम्हाला सिनेमा त्याक्षणी एन्जॉय करायला लावतो.
रच्याकने मी सलमानपटांचा त्याच्या 'वॉन्टेड' पासून फॅन आहे. (सलमानचा फॅन नाही, तर सलमानपटांचा :))

अ‍ॅडवान्स बुकींग करुन शनिवारी पाहिला आणि आवडला. बर्‍याच ठिकाणी रडले आणि हसले. आय लव इट. आय लव बीबी.
रसप, करीना आणि हर्शाली बद्दल जे लिहिलय त्याच्याशी सहमत.

बाकी भाईच्या एन्ट्रीला जसं पब्लिक येडं होतंय नी शिट्या नी टाळ्या मारतय तसच नवाजुद्दिन च्या पण होतं. गाणी सगळीच छान आहेत.

ट्ण्या ने जे करीनाच्या दिसण्याबद्दल लिहिलय ते माझ्याही अगदी पट्कन मनात आलं होतं.
बाकी आम्ही ब्वा रेटींग बिटींग बघुन पिच्चर बघाणारं पब्लिक नाही. बस ये वाला देखना है तो देखना है. आमच्या पसंतीचे निकष अगदीच सामान्य आहेत.

करीना एरव्हीही बटबटीतच दिसते, असं माझं वै.म. आहे.>>>> Lol ती सर्वात सुंदर फक्त रेफ्यूजीमध्ये दिसली होती. त्यात तिचा नो मेकप लूक चांगला होता.

उत्तम अभिनेत्री असूनही केवळ बिग बजेट सिनेमामध्ये साईड रोल करण्यातच तिनं धन्यता मानली आहे. खात्यावर हिट चित्रपट जमा होतात, पण त्यात स्वतःचं योगदान शून्य राहतं. परिणामी ब्रॅम्ड इमेज घसरत चालली आहे याबद्दल तिला काहीच वाटत नाही!! नवीन येणार्‍या मुलींची अत्यंत वाईट शब्दांत थट्टामस्करी करणं हा तिचा एकमेव छंद आहे.कंगना रानावतची तिनं (आणि तिच्या कंपूनं) उडवलेली टर पाअता कंगनाला इथं टिकून राहनं मुश्किल झालं असतं, पण कंगनानं जिद्दीनं तोंड देऊन अख्खी इंडस्ट्रीच काबीज केली तरी हिचे डोळे अजून उघडले नाहीत.

नंदिनी अनुमोदन. पर्फेक्ट लिहीले आहे. बिपाशाला काली बिल्ली म्हटली होती अज नबी शूट दरम्यान.
आता करीना वयस्कर सिंधी ग्रू हिणी सारखी दिसो लागली आहे.

जब वुई मेट' हा एकमेव अपवाद.>>>>>>>>>> मला तर ती त्यातही ओव्हर च वाटली होती.

काल रडताना बरी दिसत होती.

केजो कँप कि अजुन कोण>>> केजो कँपच. आपणच या सिनेसृष्टीचे खरे वारसदार आणि बाहेरून आलेले सर्व नालायक आणि उपरे अशी घट्ट धारणा असलेला कंपू आहे.

नंदिनी प्लीज तुम्ही काढा तसा धागा, परीक्षण समीक्षण वगैरे.. तुमची हेडर पोस्टही उत्तम आणि नेमकी असेल त्या अनुषंगाने चर्चाही योग्यच होईल.

केजो कँपच. आपणच या सिनेसृष्टीचे खरे वारसदार आणि बाहेरून आलेले सर्व नालायक आणि उपरे अशी घट्ट धारणा असलेला कंपू आहे.

<<
Outsiders mhanje non filmy background ?

काल पाहिला. आवडला. पण फार मोठा आहे. अर्धा तास कमी चालला असता.

मुन्नी/शाहिदा प्रचंड गोड दिसते, डोळ्यातून सुंदर काम केलंय. सलमानचं कामही आतापर्यंतच्या रेकॉर्डपेक्षा भरपूर चांगलंय. बाकीचे सगळे त्यांच्या त्यांच्या भुमिकेत उत्तम.

बजरंगी पाकिस्तानात गेल्यापासूनचे बरेच प्रसंग 'ह्यॅ!! असं कधी होतं का...' कॅटेगरीमधले वाटू शकतात. पण तेंव्हा लॉजिकवाले डोके बाजूला काढून ठेवले तर चित्रपट एंजॉय करता येईल.

सहृदयी!

हा जुना व बराच प्रचलित शब्द आहे. तेव्हा ही चेष्टा आहे का खरेच नव्याने कळला आहे असे म्हणत आहात ते माहिती नाही.

टण्णपाखरा, सर्वच सिनेमे एकाच तर्ककर्कश चष्म्यातून नसतात पाह्यचे . रुचीपालट हवाच... आपल्याले तं भौ दबंग लैच आवडलेला...

दोन घटका करमणूक म्हणून बरा वाटला. मुलगी-हर्षाली- तर फार गोड आहे दिसाय वागायला!
(अवांतर :- रसप, मला तुझीच एक उत्कृष्ट कविता आठवली या मुलीला पाहून Happy )

सलमानचे वय जाणवायला लागले चांगलेच पण बराच संयमित आहे. त्याला जेवढा पोटापुरता अभिनय येतो तेवढा केलाय बिचाऱ्याने.

(बाकी बारीकसारीक मर्यादा/बाबी सिनेमा पाहताना मला न सुचल्याबद्दल देवाचे आभार; अन्यथा "मिस्टर बीन्स हॉलिडे" चित्रपटात शेवटी विल्लम डॅफोचा पिक्चर पाहताना प्रेक्षकांचा होतो तसा लांबुळका चेहरा करून बसावे लागले असते आणि इतर लोक का मस्त हसताहेत, एंजॉय करताहेत हे न कळून जीव जळला असता ते वेगळेच Wink Happy )

परीक्षण आवडले, लेखनातील काही ठिकाणची अलंकारिकता जssरा कमी केली तर आणखी मजा येईल असे वाटते.

बजरंग भाईजान.. दर्जा वाला नसला तरी टिपी मूव्ही आहे.. पण अगदी डोक्याला शॉट लावणारा पण नाही.. अपनेको आवडेश ! मग सल्लू ला एक्टींग जमते की नाही तो प्रश्ण बाजूला राहीला.. ! बाकी चिकन कुकडू कुकडू कू !

>> टण्या | 20 July, 2015 - 19:39 नवीन
सहृदयी!

हा जुना व बराच प्रचलित शब्द आहे. तेव्हा ही चेष्टा आहे का खरेच नव्याने कळला आहे असे म्हणत आहात ते माहिती नाही. <<

मला खरोखर माहित नव्हता.

अमेय२८०८०७ | 20 July, 2015 - 20:36

>> अवांतर :- रसप, मला तुझीच एक उत्कृष्ट कविता आठवली या मुलीला पाहून <<

'अशी लाडकी लेक माझी असावी' का ?

>> परीक्षण आवडले, लेखनातील काही ठिकाणची अलंकारिकता जssरा कमी केली तर आणखी मजा येईल असे वाटते. <<

नोटेड अमेयदा.
लिहिता लिहिता वाहवत गेलोच बहुतेक. ह्यापुढे भान ठेवीन !

मुव्ही सो सो वाटला, ओव्हरहाइप्ड वाटतोय, टण्याने लिहलेल्या पॅराशी बर्‍याच अन्शी सहमत सलमान इज नॉट अ अ‍ॅक्टर ! त्याने रन्गवलेले कॅरेक्टर गोविन्दाने अनेकदा केलेय आणि उत्तम केलेय
सलमान, शाहरुख आणि (काही काळापुर्वी अमिताभ) सिनेमातल्या पात्रापेक्षा मोठे वाटतात म्हणजे त्या कॅरेक्टर मधे बेमालुम मिसळणे जमत नाही पुर्ण सिनेमाभर ते पात्र नाही तर ते ते हिरो दिसत राहतात, इन अ वे हे बॅड आहे.

करिनाने इत्का फुटकळ रोल का केला असावा तिच जाणे, ति अजुनही आपण नबर वन आहोत या भ्र्मात असावी किन्वा लग्नानन्तर चालतय तस चाललय हु केअर्स हा अ‍ॅटिट्य्ड असावा..

हर्शाली गोड आहे, करिनापेक्षा तिच मुख्यतः लक्षात रा हते.

Pages