सुसह्य मेलोड्रामा (Movie Review - Bajrangi Bhaijaan)

Submitted by रसप on 19 July, 2015 - 00:27

अनपेक्षित धनलाभाचा आनंद खरं तर अतुलनीय असतो, पण तरी जर तुलना करायचीच झाली तर, 'तद्दन गल्लाभरू, व्यावसायिक आणि अक्कलदिवाळखोर असेल', अश्या धारणेने एखादा 'सलमानपट' बघावा आणि तो व्यावसायिक असला तरी अगदीच अक्कलदिवाळखोर न निघाल्याची भावना ही अनपेक्षित घबाड मिळाल्याच्या आनंदाच्या जवळपास जात असावी, असं मला 'बजरंगी भाईजान'मुळे जाणवलं.
चित्रपटातली एक कव्वाली अदनान सामीने गायली आहे. पडद्यावरही अदनान स्वत:च आहे. कोणे एके काळी तंबूइतका घेर असलेला अदनान सामी इतका बारीक झाला आहे की स्वत:च्या जुन्या कपड्यांत आता तो एका वेळी किमान चार वेळा मावू शकेल. अदनान सामीने बारीक होऊन जो सुखद आश्चर्याचा धक्का दिला आहे, तसाच, किंबहुना त्याहूनही मोठा धक्का सलमान खानने दिला आहे ! प्रथेप्रमाणे शर्ट न काढून नव्हे, शर्ट तर उतरतोच. पण त्याने चक्क बऱ्यापैकी अभिनय केला आहे ! मला जाणीव आहे की हे विश्वास ठेवायला थोडं जड आहे. पण असं झालंय खरं !
अर्थात ह्यामध्ये दिग्दर्शक कबीर खानचं अभिनंदन करायला हवं. कारण माझ्या मते, चांगले दिग्दर्शक सामान्य अभिनेत्यांकडूनही चांगलं काम करून घेऊ शकतात. (गुलजार साहेबांनी काही चित्रपटांत तर जम्पिंग जॅक जितेंद्रकडून अभिनय करून घेतला होता !) कबीर खानने सलमानच्या नाकावर 'एक था टायगर'मध्येही माशी बसू दिली नव्हती आणि 'काबुल एक्स्प्रेस' आणि 'न्यू यॉर्क'मध्ये त्याने जॉन अब्राहमच्या चेहऱ्यावर आठ्यांबरोबर अभिनयरेषाही उमटवल्या होत्या. 'न्यू यॉर्क'मध्ये तर मख्ख नील नितीन मुकेशसुद्धा त्याने यशस्वीपणे हाताळला होता !

कहाणीवर घट्ट पकड असणे, सर्वांकडून चांगला अभिनय करवून घेणे, कथानक एका विशिष्ट गतीने पुढे नेणे, अनावश्यक गाणी, प्रसंग टाळणे वगैरे कबीर खानची, किंबहुना कुठल्याही चांगल्या दिग्दर्शकाची वैशिष्ट्यं. 'बजरंगी भाईजान' मध्ये मात्र मध्यंतरापूर्वीच्या बहुतांश भागात कबीर भाईजान आपल्या एखाद्या सहाय्यकाला जबाबदारी सोपवून डुलकी घेत होते की काय, असं वाटलं. त्या वेळात मंद आचेवर शिजणाऱ्या 'मटन पाया'सारखं कथानक शिजत राहतं. शेवटी कुठे तरी कबीरसाहेबांना जाग येते आणि ते ताबा घेतात. मग मध्यंतरानंतर घटना पटापट घडत जातात आणि खऱ्या अर्थाने उत्तम दिग्दर्शकाचा चित्रपट सुरु होतो.

चित्रपटाचे ट्रेलर इतके बुद्धिचातुर्याने बनवले आहेत की कथानक कुणापासूनही लपलेलं नाही !
म्हणजे -
एक पाच-सहा वर्षांची पाकिस्तानी मुकी मुलगी एकटीच भारतात पोहोचते, हरवते. ती पवन कुमार चतुर्वेदी (सलमान) ऑल्सो नोन अ‍ॅज 'बजरंगी'ला भेटते. अल्पावधीतच त्या गोंडस मुलीवर प्रचंड माया करायला लागलेल्या बजरंगीला, ती पाकिस्तानातून चुकून भारतात आलेली आहे, हे समजल्यावर तो तिला तिच्या घरापर्यंत पोहोचवण्याची शप्पथ घेतो आणि तिला घेउन पाकिस्तानात पोहोचतो.
- हे कथानक तर चित्रपटगृहात शिरण्याच्याही आधीपासून प्रत्येकाला माहित असतं. मला तरी एकदाच ट्रेलर पाहून समजलं होतं. त्यामुळे साहजिकच जे काही घडतं, ते कसं घडतं हे पाहणं हाच एक उद्देश उरतो. बजरंगी त्या लहान मुलीला घेऊन पाकिस्तानात कसा जातो ? तिला पोहोचवू शकतो का ? परत येतो का ? नवाझुद्दिन सिद्दिकीची काय भूमिका आहे ? सीमारेषेवर असलेला जीवाचा धोका तो कसा पार पाडतो ? वगैरे वगैरे लहान-मोठे प्रश्न पडत असल्यास 'बजरंगी भाईजान' अवश्य पाहावा.

images_3.jpg

पहिला अर्धा भाग खुरडत, लंगडत चालला असला तरी त्या भागाला अगदीच कंटाळवाणा न होऊ देण्याचीही खबरदारी घेतलेली आहे. ह्या भागात टिपिकल सलमानछाप पांचट कॉमेडी न दाखवता खुसखुशीत प्रसंगांच्या पेरणीतून विनोदनिर्मिती केली आहे.
अधूनमधून करीना बोअर करते. पण सध्या तिने असंही खर्चापुरतंच किरकोळ काम करायचं ठरवलेलं असल्याने तिच्या भूमिकेची लांबी तिच्या 'झीरो फिगर' प्रमाणे 'कंट्रोल्ड' आहे. तिच्या ओव्हर अ‍ॅक्टिंगला एक-दोन ठिकाणीच केंद्रित करून ठेवून एरव्ही तिला सलमान किंवा शरत सक्सेनाच्या जोडीला सहाय्यक म्हणूनच काम करायला दिलेलं आहे. जिच्याकडे काही काळापूर्वी एक आश्वासक अभिनेत्री म्हणून पाहिलं जात होतं, तिला अशी दुय्यम कामं मिळणं, ह्यामागे इतरांचा दोष वगैरे काही नसून तिचं तिनेच ठरवलेलं 'खर्चापुरतंच किरकोळ काम' आहे. त्यामुळे नो सहानुभूती !
लहान मुलगी 'मुन्नी/ शाहिदा' म्हणून झळकलेली चिमुरडी 'हर्षाली मल्होत्रा' अमर्याद गोंडस व निरागस दिसते. बजरंगीच्या आधी आपलाच तिच्यावर जीव जडतो. तिचा टवटवीत फुलासारखा चेहरा आणि डोळ्यांतला निष्पाप भाव ह्यांमुळे ती मुकी वगैरे वाटतच नाही. कारण ती गप्प बसूनही खूप बोलते.
एका पाकिस्तानी पत्रकाराच्या भूमिकेत नवाझुद्दिन सिद्दिकीची एन्ट्री उत्तरार्धात होते. गच्च भरलेल्या लोकलच्या डब्यात 'आता अजून कुणीही शिरू शकत नाही' वाटत असतानाही शिरलेला एखादा किमयागार जसा आपल्यापुरती जागा करूनच घेतो, तसा पहिल्या प्रसंगापासूनच नवाझुद्दिन कथानकात स्वत:साठी एक कोपरा पकडतोच. त्याचा 'चांद नवाब' खरं तर चित्रपटाच्या दुसऱ्या भागात बजरंगीच्याच बरोबरीचं मुख्य पात्र बनला आहे. अर्थात, नवाझुद्दिन हा एक हीरा आहे आणि सलमान 'हीरो', अभिनेता नाही. हीरा आकाराने कितीही छोटा असला तरी महाकाय दगड त्याच्यासमोर कधीही फिकाच. त्यामुळे ही तुलना खरं तर दुर्दैवी आहे.
करीनाच्या वडिलांच्या भूमिकेत शरत सक्सेनाची भूमिकाही मर्यादित आहे, ती ते जबाबदारीने पार पाडतात.
छोट्या छोट्या भूमिकांत सीमारेषेवरील अधिकारी, पोलीस अधिकारी, बस कंडक्टर वगैरे अनोळखी चेहरे धमाल करतात.

बहुचर्चित 'सेल्फी ले ले' गाणं चित्रपटगृहात शिट्ट्यांचा पाऊस पाडतं. मात्र इतर गाणी जास्त चांगली आहेत. 'चिकन सॉंग' तर मस्तच जमून आलं आहे आणि त्याची पेरणीही अगदी अचूक झाली आहे. 'ह्या जागी एक गाणं हवंच होतं' असं क्वचित वाटतं, ते ह्या गाण्याबाबत वाटलं. एकूणच सर्व गाण्यांत मेलडी आहे. पण संगीत प्रीतम चक्रवर्तीचं असल्याने नेमकं कौतुक कुणाचं करावं की करूच नये, हे समजत नसल्याने मी हात आखडता घेतो !

उत्तरार्धात 'गदर'ची कॉपी मारायचा फुटकळ प्रयत्न तर केलेला नाही ना, अशीही एक भीती मला होती. पण सुदैवाने तसं काही झालेलं नाही. अर्थात, काही ठिकाणी अतिशयोक्ती आहे, काही ठिकाणी मेलोड्रामाही आहे. पण हे सगळं सहनीय आहे. डोळ्यांत येणारं पाणी जर मेलोड्रामामुळे असेल, तर तो नक्कीच जमून आलेला आहे असं म्हणावं लागेल. ह्याचं श्रेय लेखक व्ही. विजयेंद्र प्रसाद आणि संवादलेखक कबीर खानला द्यायला हवं. संवाद अगदी लक्षात राहतील असे नसले, तरी मार्मिक आहेत, खुमासदार आहेत. तडातड उडणारी माणसं (एक किरकोळ अपवाद!), गाड्या आणि फुटणाऱ्या भिंती वगैरे टाईप हाणामाऱ्या इथे नाहीत.

उत्तुंग पर्वतराजी डोळ्यांचं पारणं फेडतात आणि नजरेच्या पट्ट्यात न मावणारी रखरखीत वाळवंटं थक्क करतात. छायाचित्रण अप्रतिमच झालेलं आहे.

'बाहुबली' आणि 'बजरंगी भाईजान' ह्यांच्या शक्तिप्रदर्शनात चित्रपटगृह चालकांची चांदी आहे, हे ओसंडून वाहणारे पार्किंग लॉट्स सांगत आहेत. सर्वत्र परवापर्यंत चर्चा होती की 'बाहुबलीमुळे बजरंगी मार खाणार की बजरंगीमुळे बाहुबली', प्रत्यक्षात दोघांमुळे इतरांना मार बसणार आहे.

थोडक्यात, सलमानभक्तांना 'बजरंगी' आवडेल ह्यात तिळमात्र शंका नाही आणि सलमानत्रस्तांनाही तो असह्य होणार नाही, अशी खात्री वाटते.
काबुल एक्स्प्रेस, न्यू यॉर्क आणि एक था टायगर ह्या हॅटट्रिकनंतरच कबीर खान माझ्यासाठी 'Must watch Director' च्या यादीत विसावला होता. 'बजरंगी'ने त्याचं स्थान अजून भक्कम केलं आहे !

रेटिंग - * * *१/२

- रणजित पराडकर

http://www.ranjeetparadkar.com/2015/07/movie-review-bajrangi-bhaijaan.html

हे परीक्षण मराठी दैनिक 'मी मराठी लाईव्ह' मध्ये आज १९ जुलै २०१५ रोजी प्रकाशित झाले आहे :-

19 - Bajrangi Bhaijaan - 19-Jul-15.JPG

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

lalitshinde | 19 July, 2015 - 10:29 नवीन
चार वर्षाच्या मुलीला घेऊन जाऊ का ?

>> माझ्या मते चार वर्षांच्या मुलांना कुठलाच सिनेमा नेऊन दाखवूच नये. तरी, ह्या सिनेमात अश्लील, भडक, डिस्टर्बिंग किंवा अति-हिंसक असं काही नाही त्यामुळे तुम्ही तुमचा निर्णय घ्या !

एखाद्या कलाकाराच्या खाजगी आयुष्यातील घटना वा घडामोडीमुळे तो सामाजिक पातळीवरील आपली प्रतिमा खराब करून घेतो हे जितके खरे (कारण समाजाला कुणी आवडावे वा नावडावे हे ठरविण्याचा अधिकार आहे) तितकेच हेही खरे की असा कलाकार काही वेळा पडद्यावर येताना अशा एका भूमिकेत समोर येतो त्यावेळी किमान ते अडीच तास आपल्याला समर्थ सादरीकरणाने अक्षरश: खिळवून टाकतो, भावुक करून टाकतो....त्यानंतर चित्रपटगृहातून बाहेर पडताना त्याच कलाकाराविषयी अचानक प्रेम आदर निर्माण होतो....आणि मला वाटते ही जितकी त्याची कमाई वा पुण्याई तितकीच रसिक म्हणून आपलीही चांदी लखलखीतपणे सिद्ध होते. नार्‍याला जर नार्‍याच म्हणायचे असेल तर जरूर म्हणावे......पण जेव्हा वाटेल नारायण तेव्हा नारायण असे संबोधन देणे ही देखील त्याच्यातील गुणांना पावतीच देण्यासारखे आहे.

रसप यांचे वरील परीक्षण अगदी याच धाटणीचे झाले आहे. त्याना नारायण असेच म्हणायचे आहे आणि ते त्यानी हातचे न राखता म्हटले आहे हे आवडले. असेल काहीसा मेलोड्रामा तरीही कबीर खान याना मस्ट वॉच डायरेक्टर मध्ये त्यानी नोंदविले आहे ही खरी बजरंगीची कमाई.

मस्त मस्त..
आता बघावाच लागेल.. उगाच्च वाचल पण परिक्षण अस झालय Sad
नवाजुद्दिन ची ओळख लपवली असती तर Sad ..
असो.. सलमान आवडतो आणि नवाजुद्दिन तर क्या कहना..बघेलच Happy

>> नवाजुद्दिन ची ओळख लपवली असती तर <<

चित्रपटाच्या ट्रेलरमध्येच ती लपवलेली नाही ! रिपोर्ट देताना दाखवलाय तो..!!

मामा,

>> नार्‍याला जर नार्‍याच म्हणायचे असेल तर जरूर म्हणावे......पण जेव्हा वाटेल नारायण तेव्हा नारायण असे संबोधन देणे ही देखील त्याच्यातील गुणांना पावतीच देण्यासारखे आहे. <<

खूप आवडला तुमचा प्रतिसाद !

मस्त आहे. संगीत मात्र एकदम ऑर्डीनरी आहे. सूफी कव्वाली ऐकताना रहमानची खूप आठवण आली. त्यां नी गाण्याला एका वेगळ्या उंचीवर नेउन ठेवले असते. चिकन गाणे आवडले.

मस्त आहे. संगीत मात्र एकदम ऑर्डीनरी आहे. सूफी कव्वाली ऐकताना रहमानची खूप आठवण आली. त्यां नी गाण्याला एका वेगळ्या उंचीवर नेउन ठेवले असते. चिकन गाणे आवडले.

लेखण आवडलं , पहायला पाहिजे ३.५ स्टार साठी Happy
( बरेच दिवस एवढे स्टार मिळालेले नाहीत कित्येक षिणेमांना )

million dollar smile हे वाक्य नक्कीच "शाहिदा" च्या स्माईल वरून बनले असेल. तिच्या निव्वळ गोंडस हसण्यावरून सलमानला ३ तास आरामात सहन करता येते.

आमच्याकडे तिकीटं मिळत नाहीत चक्क!! यावेळी थोडी इतर कामं असल्यानं अ‍ॅडव्हान्स बूकिंग केलं नाही, वाटलं पटकन तिकीटं मिळतील. पण हाऊसफुल्ल जातोय.

बाहुबलीचे काही शोज कमी करणार असं समजलंय. सध्यातरी मूव्ही टिकेट एक्स्चेंज ग्रूपवर हवाला ठेवून बसलो आहोत.

@नंदिनी,

bookmyshow.com वरसुद्धा नाहीत ?

चेन्नईच ना ? मी पाहिलं, उद्याच्या बहुतांश शोजची तिकिटं आहेत आणि आजच्याही काही शोजची दिसतायत.

आकडे कसले आहेत तीन दिवसात .. ६३.७५ करोड तर शुक्र शनि मधेच कमावले.. म्हणताहेत कि रवि मधेच १०० पुर्ण होतील Wink .. भारी..

उद्याची टीकीटं मिळून य्पयोग नाही. अजची तिकीटं मला हव्या त्या थीएटरची नाहीत. जिथली उपलब्ध आहेत त्यासाठी मला शंभरेक किमी प्रवास करावा लागेल

उद्याची टीकीटं मिळून य्पयोग नाही. अजची तिकीटं मला हव्या त्या थीएटरची नाहीत. जिथली उपलब्ध आहेत त्यासाठी मला शंभरेक किमी प्रवास करावा लागेल

छान.. पण एका गुन्हेगाराचा चित्रपट असल्यामुळे मी मोबाइल किंवा संगणकावरच पाहिन. (समस्त सलमान प्रेमींची माफी मागून) Proud

आश्चर्यकारक गोष्ट अशी आहे की बाहुबली व बजरंगी भाईजान या दोन्ही चित्रपटाची कथा विजेंद्र प्रसाद यांनी लिहली आहे व ते बाहुबली चे दिग्दर्शक राजमौली चे वडील आहेत काय योगायोग आहे. ..

छान.. पण एका गुन्हेगाराचा चित्रपट असल्यामुळे मी मोबाइल किंवा संगणकावरच पाहिन. (समस्त सलमान प्रेमींची माफी मागून)

म्हणजे अनधिकृतरित्या डाऊनलोड करुन? हाही एक गुन्हाच आहे. मग तुमच्यात आणि त्याच्यात फरक काय? दोघेही गुन्हेगार.

छान.. पण एका गुन्हेगाराचा चित्रपट असल्यामुळे मी मोबाइल किंवा संगणकावरच पाहिन. (समस्त सलमान प्रेमींची माफी मागून)

म्हणजे अनधिकृतरित्या डाऊनलोड करुन? हाही एक गुन्हाच आहे. मग तुमच्यात आणि त्याच्यात फरक काय? दोघेही गुन्हेगार.

मनुष्यवध आणि डाऊनलोड करून पाहणे यात काही फरक करतात की नाही ? Uhoh (डाउनलोड करून बघावा याचे समर्थन नाही)

सलमानचा (गुन्हेगाराचा) चित्रपट बघावा की नाही हा स्वतंत्र धाग्याचा विषय ठरेल. पोलही घेता येईल.
कारण चित्रपट हा एकट्या सलमानचा नसतो असा एक मतप्रवाह जनसामान्यांमध्ये असतो.
तर काहींच्या मते गुन्हेगाराबरोबर काम करणारेही दोषी म्हणून त्यांच्या चित्रपटावर बहिष्कार.

असो, मला बघायला जमेल असे वाटत नाही. परीक्षण मात्र आवडले. चित्रपटाने इमोशनची बाजू व्यवस्थित सांभाळलीय आणि त्याच्या ईतर भंकस चित्रपटांपेक्षा हा चांगला आहे असा माझा पब्लिक रिपोर्ट आलाय.

लहान मुलगी 'मुन्नी/ शाहिदा' म्हणून झळकलेली चिमुरडी 'हर्षाली मल्होत्रा' अमर्याद गोंडस व निरागस दिसते. बजरंगीच्या आधी आपलाच तिच्यावर जीव जडतो. तिचा टवटवीत फुलासारखा चेहरा आणि डोळ्यांतला निष्पाप भाव ह्यांमुळे ती मुकी वगैरे वाटतच नाही. कारण ती गप्प बसूनही खूप बोलते.>>>अगदी अगदी रसप. तिला बघून गोविंदाच्या ह्त्या फिल्म मधील त्या गोंडस मुक्या मुलाची आठवण झाली.

तद्दन फालतू कलाकृती आहे.
१. कुठलाही कलाकार चांगला अभिनय करत नाही - नवाझुद्दिन सिद्दिकी वगळता. त्यालाही इतके सामान्य दर्जाचे संवाद आहेत की त्या बर्‍या अभिनयाचा काहीच प्रभाव पडत नाही. वरील परिक्षणात लिहिलेल्या >> गच्च भरलेल्या लोकलच्या डब्यात 'आता अजून कुणीही शिरू शकत नाही' वाटत असतानाही शिरलेला एखादा किमयागार जसा आपल्यापुरती जागा करूनच घेतो, तसा पहिल्या प्रसंगापासूनच नवाझुद्दिन कथानकात स्वत:साठी एक कोपरा पकडतोच. >>> या वाक्यातील लोकलमध्ये असलेली गर्दी कुठली असा प्रश्न मला पडला. कदाचित ही हॉलो मॅन गर्दी असेल त्यामुळे मला दिसली नाही.
२. >> छोट्या छोट्या भूमिकांत सीमारेषेवरील अधिकारी, पोलीस अधिकारी, बस कंडक्टर वगैरे अनोळखी चेहरे धमाल करतात.>>> सिरिअसली? धमाल? शाळेत नाटक करतात त्यात जशी संवादफेक असते तसा अभिनय होता. हे कलाकार बरेच बरे असतील मात्र संवाद, पात्रांची उभारणी इतकी प्राथमिक दर्जाची आहे ही हे संवाद/प्रसंग अतिशय सपक आणि सुमार (खोली नसलेले) झाले आहेत. शार्कनॅडो/गुंडा चित्रपटांसारखे सो बॅड दॅट इट्स टू गूड हा दर्जाही इथे नाही.
३. सिनेमाचा नायक सलमान खान बीफ्ड अप (मसल्सने भरलेला) काहिसा विचित्र दिसतो. कुठलेही देशी मल्ल असे नक्कीच दिसत नाहीत (हा मनुष्य मल्ल असावा असे काही प्रसंगात सुचित झाले आहे). अभिनयाचा प्रयत्न देखील केलेला दिसत नाही. पहिल्याच गाण्यात कमरेत अर्धवट वाकत हाताची बोटे हालवत काहितरी विचित्र नाच आहे. अधेमधे डोळ्याचा क्लोजप व त्या लालभडत डोळ्यात तराळलेले पाणी दाखवतात. याला आजकाल अभिनय म्हणत असतील तर माहिती नाही. बावळट, साधा, स्वच्छ मनाचा असा एक मनुष्य उभा करणे हे काम सलमानला मुळीच जमलेले नाही. जे काही उभे केले आहे ते ओढून ताणून केलेले काहितरी आहे.
४. सिनेमॅटिक लिबर्टी हा तर हिंदी चित्रपटसृष्टीत न बोलण्याचा विषय. हिंदू/ब्राह्मण असे बोंबलणार्‍या सनातनी पैलवानी घरातली मुलगी डोळ्यात खंडीभर काजळ, चमचमणारे दागिने घातलेली कट्टर मुसलमान दिसणारी दाखवताना एकदाही दिग्दर्शक, वेशभूषा/मेकप आर्टिस्टला प्रश्न पडला नसेल का? जर एव्हढेही डिटेलिंग करता येत नसेल तर दिग्दर्शक कशाला म्हणायचा? मुके-बहिरे मूल कसे वावरते, कसे रिअ‍ॅक्ट होते याचा अभ्यास करणे इतके अशक्यप्राय आहे का? या सिनेमात दाखवल्यासारखे वागते का मूक (पण बहिरे नसलेले) मूल?
५. राजकुमार हिराणी स्कूल ऑफ सिनेमाप्रमाणे बनवण्याचा प्रयत्न केला आहे. सर्व लोक मनातून चांगले, चांगली बाजू अधोरेखीत करणे वगैरे वगैरे. मात्र दिग्दर्शकाची, प्रमुख अभिनेत्यांची कामगिरी इतकी सुमार आहे की पूर्ण कलाकृती निक्रुष्ट दर्जाची झाली आहे.
६. सिनेमाशी संबंधित नसलेला पण जाणवलेला मुद्दा: सलमान खानच्या विविध खटल्यात त्याला शिक्षा होणार याचा अंदाज आल्यावर टॉपच्या पी.आर. फर्मला पैसे देवून, स्ट्रॅटेजी बनवून दिलेल्या ब्लुप्रिंट प्रमाणे बनवलेला सिनेमा दिसतो. त्याला एक खोटे बोलू न शकणारा, सर्‍हुदयी, लार्जर दॅन लाइफ गूडनेस असलेला पण सामान्य माणूस दाखवला आहे. मार्केट रिसर्चशी संबंधित लोकांना लक्षात येईल की प्रॉडक्ट प्लेसमेंट करताना जसा अ‍ॅनालिसिस केला जातो व त्याप्रमाणे कॅम्पेन बनवली जाते तसा हा एकूण प्रकार दिसला.

हा सिनेमा बघितला म्हणुन हे परिक्षण वाचले व इथे लिहिले. तसेच परिक्षणकर्त्याचे इतरही परिक्षणे मागे जावून वाचली. एक पॅटर्न केलेला दिसतो. वरती उद्धृत केलेल्या लोकलच्या गर्दीच्या उपमेप्रमाणे चटकदार उपमा, थोडे इकडचे तिकडचे डिटेल्स, साइड कलाकारांवर एक-दोन कॉमेन्ट्स, संगीत-पार्श्वसंगीत-छायाचित्रण याबद्दल एखादे वाक्य आणि कथा. कदाचित प्रकाशित होत असल्याने वर्तमानपत्राच्या आकाराच्या/लांबीच्या मर्यादा पडत असतील. मात्र एक प्रेक्षक म्हणुन मला या परिक्षणातून माझ्या सिनेमा बघण्याच्या व आस्वाद घेण्याच्या कृतीत शून्य भर (वृद्धी) होते. हे परिक्षण नसून एक ओळख म्हणता येईल असे मला वाटते.
कदाचित या सिनेमाप्रमाणे अशी परिक्षणेही पब्लिक डिमांड असेल.

संवाद - एक सीन तर जसाच्या तसा यूट्यूब वरून ढापला आहे. क्रेडिट्स मध्ये बारीक अक्षरात कुठेतरी अ‍ॅक्नोलेज केले असेल तर बरे.
https://www.youtube.com/watch?v=_hSyva5ZxRg

Pages