मग जर कविता सुचली तर

Submitted by बेफ़िकीर on 18 July, 2015 - 22:23

ऋतू एकही नसला तर
सुखे नि दु:खे नसली तर
नाती गोती नसताना
कुणासही मन नसताना
कुणासही तन नसताना
झाडे, झुडुपे, डोंगर, क्षितिजे
नद्या, तळी, अन् प्राणी, पक्षी
जमीन वा नभ, रस्ते, वळणे
भुते, माणसे, अपुले, परके
लिंग, वासना, तहान वा भुक
गाड्या, घोडे, नोकर, चाकर
बालपणे, तारुण्ये, पिकणे

हे काहीही नसताना

हे काहीही नसले तर
मग बघ कविता सुचली तर

मग जर कविता सुचली तर
मान तिला ब्रह्मास्त्र तुझे
फेक तिला माझ्यावरती
चूर्ण होऊदे हे तन मन
कण कण माझा चिरडूदे
उडुदे माझी धूळ जगी
फिरुदे माझा धूर नभी

पण हा बकवासच सारा
अशी कधी कविता असते?
अंगवस्त्र असते ना ती?
हवी त्याक्षणी निजवावी
नको त्याक्षणी विझवावी
कवी म्हणोनी मिरवावे
जागोजागी गाजावे

कर अपुल्या फुसक्या कविता
फेक तुझ्या रसिकांवरती
मला देव शक्ती देवो
तुला कवी म्हणण्याइतकी

-'बेफिकीर'!

Group content visibility: 
Public - accessible to all site users