मूव्ह ऑन...

Submitted by मयुरी चवाथे-शिंदे on 18 July, 2015 - 07:28

मूव्ह ऑन...

प्रिया शून्यात नजर लावून बसली होती. रडून रडून डोळे सुजलेले पण कुठल्यातरी निर्णयावर ठाम असल्याचा त्या डोळ्यातील विश्वास कायम होता... गेला अर्धा तास ती अर्पिताच्या घरी येउन बसली होती पण दोघांमध्ये संभाषण सुरु झाल नव्हत....

बाजूलाच प्रियाच्या सेल फोन वरची, "मूव्ह ऑन..." ची रिंगटोन वाजत होती... एकदा, दोनदा, तीनदा... ती फोन उचलतच नव्हती.. शेजारीच बसलेल्या अर्पिता ने शेवटी विचारलंच... "अग काय चाललाय तुझ.. एकदा तरी बोल त्याच्याशी, काय बिनसलं अचानक? समजून घे न त्याला.." ते तीच वाक्य ऐकल आणि मग मात्र ती चिडली, एवढा वेळ शांत बसलेली ती आता अश्रू ढाळत बरसायला लागली... "मी समजून घेऊ? अग अजूनपर्यंत मीच समजून घेत आलेय म्हणून इतके महिने टिकलो, नाहीतर कधीच वेगळे झालो असतो ग. अग, यापूर्वीही कित्येकदा हे झालय पण नाही पटत आमचे स्वभाव, राहणीमान ... तो आणि मी फक्त तडजोड म्हणून एकत्र आहोत अस वाटतंय, हे नेहमीचच... उगाचच ओढून ताणून का ग एखाद नात टिकवायच आणि मग ते फुलवायचं? नाही होत तस.... आमच्या प्रत्येक भेटीनंतर तूच असायचीस माझ्या सोबत... सुरुवातीचे काही दिवस सोडले तर, नंतर सगळ्याच वेळी मला रडताना पाहिलं आहेस तू ... आणि तूच मला आज परत सांगते आहेस ...समजून घे त्याला?"

अजित आणि प्रिया. दोघांच प्रेम होत एकमेकांवर. तो श्रीमंत घरचा, थोडासा उद्धट, रागीट, प्रेमळही तितकाच आणि ती शांत स्वभावाची... मध्यमवर्गीय. काही भेटी ह्या घडून येतात, कोण कसे कुठले अनोळखी मग एकमेकांचे जीवाभावाचे सोबती होऊन जातात.. असच त्यांच काहीस झालेलं.

पावसाळ्याचे दिवस होते, ती चालली होती आणि त्याच्या आलिशान BMW ने तिच्यावर खड्ड्यातल चिखलाच पाणी उडवलं होत, ती देखील गाडी ज्या दिशेने गेली त्याच दिशेने चालत जात होती. गाडी बरीच पुढे जाऊन त्याने रिव्हर्स घेतली होती, तिला "सॉरी" म्हणायला. खर तर आता तो थोडा वाद घालायच्या तयारीतच आला होता.. कारण मागे गेल्यावर ती मुलगी चिडणार हे त्याने गृहीत धरल होत., पण झाल भलतच.. तो तिच्यासमोर आला आणि ती मुसमुसत रडायलाच लागली. हे अस काहीतरी समोर आल आणि तो गडबडला. तिच्या हुंदके देत रडण्यातून त्याला एवढंच कळाल कि ती इंटरव्यू साठी चालली होती. त्याने आजूबाजूला पाहिलं.. जवळच एक शॉप होत.. तिथे तो तिला घेऊन गेला आणि नवीन ड्रेस घेऊन दिला. "माझ्या हातून चूक झाली त्याच प्रायश्चित्त समजून हा ड्रेस घे प्लीज. तुला इंटरव्यू ला जायचय ना?" नोकरीची तिला गरज होती, आणि त्याक्षणी हे सगळ इतक गडबडीत झाल कि तिला “नाही” म्हणण शक्यच नव्हत. तिला वेळेवर पोहोचता याव म्हणून त्याने तिला लिफ्ट दिली आणि तिला सोडून जाताना स्वतःच कार्डही.,"मला एकदा कळव काय झाल ते ... प्लीज. काही नाहीच झाल तर मी प्रयत्न करेन.. तुझ्या जॉबसाठी, माझी ओळख आहे. AND ALL THE BEST.” ती फक्त हसली, "थ्यांक्स" म्हणाली आणि निघून गेली. पुढे काही दिवसांनी तिचा त्याला फोन आला, "जॉब मिळाला मला." आणि मग ती थ्यांक्स म्हणत राहिली आणि तो सॉरी म्हणत राहिला. पुढे असेच काही औपचारिक फोन होत राहिले... चौकशी, कस चाललय मग थोडस स्वतःच वैयक्तिक बोलण, त्याच चिडण आणि तीच, "शांत हो, धिंगाणा करून SOLVE होईल का?" अस विचारत त्याला समजावण. मग कधीतरी ठरवून होणार्या भेटी. मैत्री वाढत गेली आणि त्याने तिला सांगितलं, “मी तुझ्या प्रेमात पडलोय... तुझ मला ते समजून घेण, सावरण.. मला गरज आहे तुझ्या सोबतीची" त्याच ते अस आढेवेढे न घेत बोलण तिला खूपच भावलं. तरीही तिने विचार करायला थोडा वेळ मागितलाच.

प्रेमाच कस आहे न... जेव्हा दोघांमधला एक, दुसर्याच्या प्रेमात पडतो तेव्हा त्यातला बदल लगेच लक्षात येतो, फक्त तो आपल्याच बाबतीत आहे कि दुसर्याच्या हे माहित होण गरजेच ठरत आणि मग जेव्हा हा दुसरा त्या पहिल्याला विचारतो तेव्हा पहिला आणखीन विचारात पडतो. एक जण विचारून मोकळा होतो, परीक्षा देऊन निकालाची वाट पाहत आणि दुसरा त्यावेळेला परीक्षेला सामोरा जात असतो. उत्तर "नाही" असेल तर एकवेळ समजून घेतलं जात पण, "माहित नाही.. थोडा वेळ दे" अस उत्तर समोर येत तेव्हा अजून सगळ गुंतागुंतीच होऊन बसत. त्यालाही आणि तिलाही. तो विचारतो तेव्हा त्याच्यासमोर फक्त "ती"च असते आणि ती जेव्हा उत्तर देण्यासाठी वेळ मागते तेव्हा तिच्यासमोर सारा गोतावळा असतो, आई, बाबा, नातेवाईक इतकच काय दूरदेशी स्थायिक झालेले फार पूर्वी आपले असलेले शेजारी आणि त्यांच्या भविष्यातील प्रतिक्रियाही तिला आठवतात. ज्याने प्रेम व्यक्त केलेलं असत त्याला त्या मार्गातले फक्त फुल दिसत असतात आणि प्रेम असूनही ते व्यक्त न करणार्याला त्या मार्गावरचे काटेच दिसत असतात. प्रियाही विचार करत होती, "त्याने तर जे आहे ते स्पष्ट सांगितलं पण आपण करतोय का त्याच्यावर प्रेम ? तो आवडतो एवढ तर नक्की, एक रागीट स्वभाव सोडला तर तो मनाने खूप चांगला आहे , सगळ्यांच्या मदतीला धाऊन जातो आणि खरच आपल्यामुळे तो बराच शांतही होतो. दिसायला चांगलाच आहे पण माझ्यात आणि त्याच्या राहणीमानात खूप फरक आहे. गर्भश्रीमंत आहे तो... आपण शोभू का त्याला? पण माझही प्रेम आहेच कि त्याच्यावर." झाल... बर्याच विचारविनिमयानंतर तिला उत्तर मिळाल. "हो.. माझ उत्तर" तिने त्याला कळवलं. प्रेमात होकार मिळाल्यानंतर संपूर्ण जग जिंकल्याचा आनंद होतो. अजितचही तसच झाल.

नात्याची जेव्हा सुरुवात होते तेव्हा सारच गोड गोड असत. हवहवस वाटणार. पुढे प्रेम बहरत गेल. मला तू तुला मी अस करता करता एकमेकांच्या ग्रुपची ओळख व्हायला लागली. कधी एकत्र मुव्ही तर कधी एखादी ट्रीप. अर्थात अजितचा गोतावळा जास्त होता. प्रिया तशी मितभाशीच. बोलायची ती भरभरून पण सगळ्यांशीच नाही, तो मात्र दिलखुलास. हट्टी. बाहेर जायचं ठरलं तर जायचच त्यात "नाही जमणार" वगैरे ऐकल कि चिडायचा तो. मग थोडा वाद तरीही तयार व्हायचीच ती. कधीकधी त्याच्या रागाला घाबरून, तो बदलेल होईल शांत अस काहीस ती स्वतःच्या मनाला समजावत राहायची. त्याला आवरण कधीकधी अशक्य व्हायचं तिला पण जमवून घ्यायची ती. तोही उशिरा का होईना शांत व्हायचा. नात्यात वादळ यायचं आणि शांत व्हायचं पण त्याने माजवलेला उन्माद तिच्या मनाला टोचत राहायचा. स्पष्ट व्यक्तही होऊ शकत नव्हती ती. आता झालाय न सगळ नीट कशाला उगाळून काढायचं सगळ? पण मग ते नेहमीचच झाल... पुढे नात्यात अबोला येऊ लागला आणि त्यादिवशी तिने ठरवलं.. "आता संपवायचं सगळ. किती सहन करू? समजून घेऊ? जरा तरी त्याने समजून घ्याव न? माझ्या चेहऱ्यावरचे उतरलेले भाव दिसत नाहीत का त्याला? मी नाही बोलणार यापुढे त्याच्याशी ...कधीच... "बस... ठरवलं तिने , "विसरून जा मला, आपल नेहमीचच होणार भांडण त्रास देत मला.. नेहमीच वाद घालायचा आणि मग नंतर गोड बोलायचं अस नाही जमत मला.. आणि हो... काळजी घे स्वतःची. पैसे खूप उडवतोस तू... कुणाला मदत म्हणून ठीक आहे पण माणसांना ओळखायला शिक जरा...असतील शीत तर जमतील भूत असच आहे जग.. जाऊदेत. मी जातेय कायमची.." असच खूप काहीस लिहायचं होत तिला पण मग ती नंतर रडतच राहिली. त्यानेही काही दिवस फोन केला नाही आणि नंतर तो दररोज फोन करतच राहिला... मात्र तिने त्याचा फोन उचललाच नाही कि कोणतही स्पष्टीकरण दिल नाही. भांडणही नको आणि प्रेमही नको... त्याला माझ्यापेक्षा दहा पटीने चांगली मुलगी मिळेल... असे काही काही विचार करून ती आणखीन रडू लागली.

अर्पिताने प्रियाला प्यायला पाणी दिल, शांत केल आणि म्हणाली, "माझ्यावर एवढी बरसलीस, तुफान आलेल्या समुद्रातील लाटेसारखी कोसळलीस; पण एक विचारू?" प्रियाने मानेनेच होकार दिला अर्पिताने विचारलं," कधीतरी एकदा हे सगळ त्याला सांगितलस? तुझी होणारी तगमग बोलून दाखवलीस ? तू समजून घेतेस म्हणून तर त्याने तुझ्याजवळ साथ मागितली पण मग कुठेतरी तुला असह्य झाल तर त्याला सांगून त्याची प्रतिक्रिया घेतलीस? हे सांगूनही त्याने नाही समजून घेतलं तर खुशाल MOVE ON कर पण सांगून तर बघ."

अर्पिताने सांगितल्यावर प्रियाच्या लक्षात आल कि आपण खरच कधी त्याला काही सांगितलं नाही पण सांगून काय उपयोग, नाही समजून घेणार तो ... हे सगळ डोक्यात चालू असतानाच परत तिचा फोन वाजला, तिचा राग अजूनही गेला नव्हता, "माझीच चूक आहे अस म्हणायचं आहे का आपल्या जिवश्छ मैत्रिणीला...? ठीक आहे मग तिच्यासमोरच सांगते याला सगळ" तिने रागातच फोन उचलला आणि बोलू लागली..."अजित, का फोन करतो आहेस मला सारखाच?... नको करूस... वायफळ प्रयत्न आहेत तुझे, नाही यायचं मला परत .. तुझ्याकडे कधीच. तुला नेहमीच वाटत आल कि मी चुकतेय आणि तू बरोबर आहेस... पण तस नव्हत कधीच... तुला सोडून जातेय हे सांगून त्यादिवशीहि मी निघून आले, पण त्यानंतर कशी जगले हे तुला माहितीय? तू रागात होतास... ४ दिवस फोन केलासच नाहीस (हो.. ४ दिवस मोजले मी... ४ जन्मान्सारखे वाटत होते ते मला) आणि जेव्हा केलास तेव्हा म्हणालास, " परत ये .. माझ तुझ्यावर प्रेम आहे.. मी रागात होतो समजून घे." हे अस मनवतात का रे प्रेयसीला.. ? तुझा राग मी नेहमीच समजून घेत आले आहे. मुळात तू नेहमीच मला गृहीत धरलस... नव्हत माहित का रे तुला कि मी अशीच आहे .. काय म्हणालेलास , "काकूबाई" पण तशीच मी आवडले होते न रे तुला? अल्लड, भोळी मग का आता अचानक तुला वाटतंय कि मी खूपच मागासलेली आहे... मला नाही वाटत कम्फर्टेबल त्या तुझ्या मित्र मैत्रिणींबरोबर. तुझ्या भाषेत ... HIGH CLASS PROFILE ची माणस तुम्ही. मग का मला परत आणण्याचा प्रयत्न करतो आहेस तुझ्या आयुष्यात? नेहमीच छोट्या छोट्या कारणांवरून भांडतोस आणि मग सॉरी म्हणतोस... खरच सॉरी म्हटल्यावर त्या सॉरीच्या आधी दुखावलेल मन सुखावत का रे? ते तुटलेलच असत. आरशाला तडा गेला तरी त्यातही प्रतिबिंब दिसतच रे आपल, पण तडा हा असतोच न? तुंझ्यावर प्रेम अजूनही आहे पण आता फरक एवढाच आहे कि तुझ्यापेक्षा थोडस जास्त प्रेम मी आता स्वतःवर करते. I WANT TO MOVE ON”

अजितने तीच सगळ ऐकून घेतलं .. ज्वालामुखीचा जसा उद्रेक होतो तशी ती त्याला वाटली. स्वतःच एकतर्फी वागणंहि त्याला जाणवलं. "आपण चुकलो" हे त्याला कळत होत पण ती चूक आपल्या लक्षात हिने आज का आणून दिली? आधी म्हणाली असती तर बदललो नसतो का आपण? प्रेम चांगला बदल घडवून आणत वागणुकीत मग मी नसता का प्रयत्न केला हिला समजून घ्यायचा? थोडा वेळ दोघेही निःशब्द झाले. ती बोलून आणि रडून शांत झाली आणि हा विचारात अडकल्याने शांत झाला. पण ती शांतता भंग करण गरजेच होत तो म्हणाला, "I AM REALLY REALLY SORRY. नाही होणार माझ्या वागण्याचा त्रास पुन्हा तुला... फक्त एकदाच भेटशील मला? जमल तर आत्ताच ? तुझ्या काही गोष्टी परत करायच्या आहेत.. "
ती- मला नाही भेटायचं तुला... सांगितलं न मी..
तो- ठीक आहे मग, मी घरी येतो तुझ्या आत्ता.
ती- अरे ए.. बघ परत तुझा हट्ट ... अर्पिताकडे आहे मी... तिथे ये...
तो- यावेळचा माझा हट्ट त्रास नाही देणार तुला. प्रॉमिस. अर्ध्या तासात पोहोचतो मी.
ती- नीट ये.. लवकर पोहोचायचं म्हणून सिग्नल नको तोडुस. सावकाश कर Drive.
तो- तू का काळजी करतेयस एवढी? सोडून जातेयस न?
ती- नाही करणार यापुढे. तू नीट ये फक्त. बाय.
तो- हो. बाय.

आज प्रिया खूप वेगळी भासत होती त्याला, आपण नेहमीच ती आपल्याला समजून घेते म्हणून प्रेम करत आलो. तीच वागण, बोलण, हसण..सगळ्याच्याच तर प्रेमात पडलो मी... मग तरीही तिला मी अस दुखावत होतो? आणि ते कळालही नाही मला... आजपर्यंत अबोलाही धरला पण आज ती सोडून जातेय अस म्हणाली... प्रेम आहे ती माझ... आणि त्या प्रेमासाठी मला थोड तरी बदलायलाच हव न..? पण तिने मला अशी संधीच नाही दिली तर... नाही माझ्या प्रियाच माझ्यावरही तितकच किंबहुना माझ्यापेक्षा जास्तच प्रेम आहे.. आत्ताही "नीट ये" म्हणाली.. रुसलीय.. यावेळेस मी समजावेन तिला.. हे देवा मी चुकलो पण एक चान्स दे..

अजितने गाडी काढली, काहीतरी ठरवूनच तो हि बाहेर पडला. बर्रोबर २५ मिनिटांनी अर्पिताच्या घरची बेल वाजली. "नेहमीप्रमाणेच आजही तो वेळेच्या आधी हजर झाला असेल " प्रियाच हे बोलण ऐकून अर्पिता लगेच म्हणाली," किती मस्त न... तुला कधी ताटकळत ठेवत नाही तो ...उभ करत, वाट बघत" "हम्म." अर्पिताने दार उघडल.. अजित कसनुस हसत, डोळ्यातील आसव लपवत प्रियाजवळ येउन बसला.

ती- मला..मी .. मला नाहीये जमत.. (तिची मान खाली)
तो- हो... समजल.. आजची हि शेवटची भेट.. तुझ्या निर्णयाला माझा होकार आहे... मी चुकलोय आणि माझ्यामुळे तुला आणखीन त्रास होऊ नये. जातो मी तुझ्या आयुष्यातून.
ती- (खाली झुकलेली मान वर उचलत, दोन्ही हातानी डोळे पुसत...) ठीक आहे... माहित होत मला.. काही नाही समजून घेणार तू... जातेय मी.. काय द्यायचं होत तुला मला? मी दिलेली कार्ड्स कि गिफ्ट.. नव्हत आवडलं न तेही? लगेच मान्य केलस माझ जाण..?
तो- हो... परत करायचं आहे काहीतरी... माझ्या चुकीची शिक्षा म्हणून.

अस म्हणत त्याने सोबत आणलेला गुलाबाचा गुच्ध तिच्यासमोर धरला.. ती त्याच्याकडे बघतच राहिली. काय बोलतोय? काय करतोय तिला समजत नव्हत.

तो- तुला गुलाब खूप आवडत ना?
ती- हम्म
तो- तू नेहमी माझच ऐकत आलीस आणि त्यानुसारच बदलत गेलीस.. फक्त आजही एकदा ऐकून घे माझ. कदाचित आपल्या भेटीची, नात्याची उजळणी समज.
हे घे पाहिलं गुलाब माझ्याकडून.. पिवळ गुलाब, आपल्या नकळत न ठरवता झाल्येल्या मैत्रीची आठवण म्हणून.
हे दुसर गुलाब ..श्वेत वर्ण पांढर. तुझ्यातला अल्लडपणा मला आजही तितकाच आवडतो त्या तुझ्या शुद्ध स्वभावासाठीच हे गुलाब. आपल्या नात्यातला खरेपणा शुद्धपणा लपलाय यात. हे गुलाब.. गुलाबी रंगाचं. हे कशाचं प्रतीक आहे माहितीय? हळव्या नात्याचं, एकमेकांबद्दल वाटणाऱ्या कौतुकाचं...
आणि हे पाहिलस.. तुझ आवडत लवेन्डर गुलाब. हा तुझा आवडता रंग ना ग..? या गुलाबामुळेच मला ५ मिनिट उशीर झाला यायला.. खूप शोधल मग सापडलं. तुझी जादू आणि आकर्षण याच हे सांगण.
आणि या सगळ्यात शेवटी; लास्ट बट नॉट द लीस्ट खर तर सगळ्यात जास्त खूप खूप महत्त्वाचं हे लाल गुलाब. तुझ्यावर प्रेम करतो ग मी. I LOVE YOU आणि खरच ग माफ कर मला. तू मला काकूबाई नाही वाटत. पण तुझ जे मुक्तपणे उडायचं राहील आहे ना ते तू पूर्ण करावस अस वाटत. कोणाचाही विचार न करता, तू किती दिलखुलास आहेस ते कळावं जगाला अस वाटत. तुला माहितीय ना, मी कसा आहे ते.. अग सगळ आयत मिळालय मला , पहिल्यांदा तू भेटलीस तेव्हा नोकरीसाठी तुझी झालेली धडपड पाहून मी मला मिळालय त्या सर्वाची कदर करायला लागलो. उद्धटपणा कमी केला. हे गुलाब त्याच्या रंगांचा अर्थ हे असही असत आयुष्य ते समजल मला. पण बघ ना.. हे गुलाब आणि या सुंदर गुलाबाला असलेले काटे.. त्या काट्यासारखाच माझा राग आणि हे काटे कधी टोचतील तुला हे लक्षातच नाही आल माझ्या, पण तू तरी सांगायचस ना.. प्लीज एकदा शेवटच समजून घे मला..

प्रिया आता हुंदके देत रडायला लागली. त्याने तिचा चेहरा वर केला... कान पकडून , "I AM REALLY SORRY " म्हणाला... ती खुदकन हसली. गालावरची खळी फुलली. . "आता नाही ना जाणार तू सोडून मला? कि त्या HIGH CLASS PROFILE वाल्या सायलीला पटवू?" त्याने डोळा मारला, तशी ती त्याला फटका देत, "तिला काय पटवायची गरज नाही.. तिचीच मेलीची नजर आहे तुझ्यावर केंव्हापासून." दोघंही मनापासून हसले आणि अर्पितानेही तिचे पाणावलेले डोळे पुसले.. त्यांचाकडे जात ती म्हणाली," प्रिये, पहिले ती मोबाईलची "MOVE ON" ची रिंगटोन बदल आणि अजित, मला जंगी पार्टी हवीय बर पुन्हा प्रेमात पडल्याबद्दल..." दोघंही एकत्रच "हो" म्हणाले आणि आसवांनी भरलेल्या डोळ्यात धुरकट दिसणार सारच स्पष्ट दिसायला लागल. नात्यात आलेल वादळ शांत झाल यावेळेस बहुतेक कायमच.

मयुरी चवाथे-शिंदे

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान

आभार सर्वांचे.

टीना BMW - हाहाहा

मी एस एम- मंगलाष्टके चित्रपट, मी अजून बघितला नाही Sad

मस्त Happy

मी सध्या याच situation मधून जातेय. 8 वर्ष एकत्र आहोत पण 2 महिने झाले बोलणं नहि. reasons same आहेत वरती कथेत दिलेली, वाचतेवेळेस असं वाटत होतं माझंच मन व्यक्त होतय. move on होत नाहिये still waiting. खरंच खूप छान झालीय कथा. I really mean it...

sorry मी असं publicly माझं रडगाणं गायला नको होतं. पण story ईतकी चांगली झालीय की राहवलं नाहि.