जंबलाया

Submitted by स्वाती२ on 15 July, 2015 - 09:54

सध्या लेक घरी रहायला आलाय त्यामुळे बरेचदा शुक्रवारी संध्याकाळी माय-लेक मिळून स्वयंपाक करतो. काही वेळा पारंपारीक मराठी तर काही वेळा इतर प्रांतातले/देशातले त्याच्या आवडीचे पदार्थ केले जातात. या वेळी मूड क्रिओल पद्धतीच्या जेवणाचा होता. या विषयी थोडेसे. लुझियानाच्या न्यु ओरलिन्स भागात फ्रेंच लोकांनी वसाहती केल्या आणि काही काळ स्पॅनिश वसाहती देखील होत्या. त्याशिवाय वेस्ट आफ्रीकेतून १८ व्या शतकात गुलाम आणले गेले. तसेच 'फ्री कलर पिपल' या प्रकारात मोडणारे इतरही लोकं आले. वसाहतीत जन्मणारे युरोपिअन वंशाशी नाते सांगणारे ते फ्रेंच क्रिओल आणि इतर वंशाचे ते लुझिआना क्रिओल असे ओळखले जात असत. श्रीमंत मालक वर्गाकडे स्वयंपाकाचे काम करणारे गुलाम वेगवेगळे मसाले वापरुन तसेच क्रिम, बटर वापरुन विविध प्रकारचे पदार्थ बनवत. अमेरीकेच्या इतर भागातील पदार्थांपेक्षा वेगळ्या चवीचे हे पदार्थ क्रिओल फूड म्हणून ओळखले जातात. क्रिओल पदार्थांवर स्पॅनिश , फ्रेंच, वेस्ट आफ्रिकन, कॅरीबियन, इटालिअन वगैरे विविध खाद्यसंस्कृतीचा प्रभाव आहे.
जास्त खटपट नको म्हणून वन डीश मील असा जंबलाया हा स्पॅनिश आणि फ्रेंच प्रभाव असलेला भाताचा प्रकार करायचे ठरवले. घरात कोलंबी आणि चिकन ब्रेस्ट होते पण स्मोक्ड सॉसेज नव्हते म्हणून लेकाला ते आणायला पाठवून मी बाकी तयारीला लागले.

साहित्य-
१ कांदा बारीक चिरुन
२ सेलरीच्या दांड्या बारीक चिरुन
१ लाल किंवा हिरवी बेल पेपर बारीक चिरुन
४ लसूण पाकळ्या सोलून आणि बारीक चिरुन
१ कप बोनलेस स्किनलेस चिकन ब्रेस्ट चे साधारण १ इंचाचे चौकोनी तुकडे (बोनलेस, स्किनलेस थाईज चालतील)
१/२ पौंड मध्यम आकाराची कोलंबी( २० ते २५), सोलून , काळा धागा काढून
१ १/२ कप तांदूळ धुवून बाजूला ठेवणे . साधा लॉन्ग ग्रेन राइस वापरावा, बासमती न्को. मी घरात सोना मसुरी होता तोच वापरला.
१४ औस चिकन स्टॉक
१ कॅन (१४ औस) चिली स्टाइल टोमॅटो किंवा ४ -५ टोमॅटो बारीक चिरुन
२ टेबलस्पून तेल ( १ १/२ टेबलस्पून आणि १/२ टेबलस्पून)
१ टी. स्पून जीरे पावडर
२ टीस्पून ड्राइड ओरेगानो
१ टीस्पून ड्राइड थाइम
१ टी स्पून पाप्रीका
१/२ टी स्पून तिखट
५-६ मीरे भरड कुटलेले
१ टे स्पून वुस्टरशायर सॉस
मीठ चवीप्रमाणे

सर्व तयारी करुन ठेवली आणि लेक येइपर्यंत नेटवर टाईमपास केला. सॉसेज न वापरता कोलंबी आणि चिकन वापरुनही जंबलाया करु शकता. तसे केल्यास कोलंबी आणि चिकनचे प्रमाण वाढवा. तसेच अंडूइ ऐवजी इतर स्मोक्ड सॉसेजही वापरले तरी चालेल. लेकाने आणलेल्या अंडुइ सॉसेजमधल्या निम्म्या (७ औस) सॉसेजच्या साधारण १ सेमी जाडीच्या चकत्या कापून घेतल्या. मी चकत्या कापे पर्यंत लेकाने गॅस पेटवून मोठे जाड बुडाचे पातेले मध्यम आचेवर तापत ठेवले आणि त्यात दीड टे स्पून तेल घातले. तेल तापले तसे त्यात कापलेला कांदा, सेलरी, बेलपेपर आणि लसुण घालून परतायला सुरुवात केली. खाली लागू नये म्हणून माझ्या सुचना आणि लक्ष देणे सुरु होते. कांदा पारदर्शक दिसू लागला तसे त्यात पाप्रीका, ओरॅगानो, थाईम, तिखट, मीरे, जीरे पावडर आणि कॅन मधले टोमॅटो घातले. २-३ मिनीटे परतले. त्यात तांदुळ आणि सॉसेज घालून परतले. चिकन स्टॉक घातला. सर्व नीट ढवळून त्यात दोन कप गरम पाणी घातले. चव घेवून मीठ घातले. भांड्याखालची आच वाढवली. मिश्रण उकळू लागले तसे मी कोलंबी आणि चिकनच्या तुकड्यांवर १ टे स्पून वुस्टरशायर सॉस घालून नीट ढवळून घेतले. दुसर्‍या लहान भांड्यात तेल तापत ठेवले. तेल तापल्यावर त्यात चिकनचे तुकडे परतून घेतले आणि भाताच्या मिश्रणात घालून ढवळले. भात शिजत आला तसे मुरवत ठेवलेली कोलंबी भातावर पसरली आणि आच मंद करुन भांड्यावर झाकण लावले. १० मिनीटांनी आच बंद केली. झाकण उघडून कोलंबी भातात मिसळून घेतली. चव बघितली. थोडे तिखट आणि थोडे मीठ घातले.
बोलमधे भात वाढला. तेवढ्यात नवर्‍याने बागेतून कांद्याची पात आणून चिरली आणि भातावर शिवरली. पटकन फोटो काढला आणि जंबलायावर ताव मारला.
IMG_5292 (400x300).jpg

अधिक टीप : तिखटाचे प्रमाण प्रत्येकाच्या आवडीनुसार ठेवण्यासाठी जोडीला हॉट सॉस ठेवा. हा भात मोकळा नसतो. ओलसर असतो. पाण्याचे प्रमाण आवडीनुसार कमी जास्त करु शकता तसेच पाणी न वापरता पूर्णपणे चिकन स्टॉक वापरुन जंबलाया करु शकता. टोमॅटोचे प्रमाणही आवडीप्रमाणे बदलता येइल. कांद्याच्या पाती आमच्याकडे आवडतात म्हणून घातल्या नाही घातले तरी चालेल किंवा त्याऐवजी पार्सली देखील छान लागते.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त !
हा एव्हडा कोरडा आणि घट्ट असतो का ? म्हणजे मी न्यू ऑर्लिन्सला खाल्ला तो जरासा पातळ होता.. म्हणजे आपल्या गुरगुट्या भाताच्या कन्सिस्टन्सी सारखा.

जम्बलया हे गाणे आहे ना? समुद्रकिनारी जाऊन पिकनिक करण्याबद्दलचे. त्याचा याचेशी काही संबंध आहे का?

धन्यवाद साती, मैत्रेयी आणि पराग.
पराग, मी पण गुरगुट्या भात ते बेताचा ओलसर अशा वेगवेगळ्या कन्सिस्टंसीचा खाल्लाय पण माझ्या लेकाला गुरगुट्या नाही आवडत.

स्वाती, मी 'तिकडे' प्रतिसाद देणार होते.
पण जंबलाया हे मी 'मोकलाया' सारखं वाचलं आणि स्वतःच हसत सुटले.

'जंबलाया भाती अशा'
Wink

रॉबिनहूड, त्या गाण्यात खाद्यपदार्थांची नावे येतात त्यातला एक पदार्थ हा जंबलाया.

मस्तं पाककृती. नक्की करून बघेन.

फोटोमध्ये सॉसेजेस दिस्ताहेत, पण घटकांमध्ये नाही. कुठले सॉसेजेस आहेत तेव्हडं अ‍ॅड कराल का?

ही पाककृती 'नवीन पाककृती' मधून लिहिलेली दिसत नाहीये. चुकून गप्पांचं वाहतं पान तर झालं नाही?

ओ, पुन्हा वाचलं तेव्हा यादीत नाही, पण वरच्या परिच्छेदात 'स्मोक्ड सॉसेजेस' लिहिलेले दिसले. नेमके कुठले ते पण लिहा, प्लीज.

मृण्मयी,
<< तसेच अंडूइ ऐवजी इतर स्मोक्ड सॉसेजही वापरले तरी चालेल. लेकाने आणलेल्या अंडुइ सॉसेजमधल्या निम्म्या >>

पुढे लिहिलंय.

मी पण काल इथेच अडकले होते.
कारण अंडूई हे सॉसेजेसचं नाव हे काही मला पहिल्यांदा कळलं नाही.
साहित्यात अंडं नाही आणि कृतीत कुठून आलं असं वाटलं होतं.
Happy

मृण्मयी, लेखनाचा धागा मधे लिहिलयं. साहित्यात सॉसेज लिहीले नाही कारण तयारी केली तेव्हा नव्हते. ते आणल्यावर पुढे किती घेतले, त्याचे काय केले ते लिहिलयं . Happy
सशल, केशर मी पायेयात घालते यात नाही. सहसा अंडूइ असते नसेल तर चॉरेझो. स्पाइसी आणि स्मोक्ड फ्लेवर हवा.

मस्त. तोंपासू, वन डिश मील माझ्या आवडत्या. त्यातून त्या चमच्याने खाण्यासारख्या असल्या तर अधिक आवडत्या. फक्त चिकन घालून करून पाहण्यात येईल.

स्वाती...माझा लेक सध्या दुसरीकडे नोकरीनिमित्तं असल्याने ही मज्जा मिसतेय... तुमची किंचित असुया वाटली...

हे लेक-बीक लोकं मिळून स्वयंपाक भारी आवडलं. .. आमच्याकडे त्यातली 'बीक'लोकं स्वंयंपाकघरात आली की कामं करून ठेवतात Happy

जंबलाया... हे नाव पण... मस्तय.

वॉव.. सुपर लाईक जंबालाया रेसिपी.. टेस्टीच असेल, फोटोच इतका टेंप्टिंग दिसतोय..

स्पॅनिश पाएया (Paella ) ही आवडीचाच आहे, हा प्रकार नक्कीच ट्राय करेन.. Happy

माहिती आवडली. मेनू करुन बघणार नाही कारण ह्यात मांस आहे.

मी एक निरिक्षण केले जर रेसेपी ही अमेरिकेत राहणार्‍यानी असेल तर तिथली लोक लगेच अभिप्राय देतात. पण रेसेपी ही इतर कुठली असेल तर हीच लोक अभिप्राय देत नाही. असो. डिन्ट लाईक ईट सो हायलाईटेड!!!!

बी, तुमची तुलना स्वाती२ शी करू नका, प्लीजच. प्रतिक्रिया देताना त्या आयडीचा पूर्वेतिहास सर्वांच्याच लक्षात असतो, जसा तुमच्या डोक्यात वरच्या लोकांबद्दल आहे :फिदी:. तेव्हा आधी आपले वागणे, बोलणे कसे आहे ते बघा, मग पोस्ट टाका. रेसिपी आवडली नाही असे लिहिलेत ठी़क आहे, पुढील वाक्यांची गरज नाही!!!

बी, ते साहजिक नाही का,
अमेरिकेत बर्‍यापैकी खाल्ला जाणारा पदार्थं आहे, घटक अमेरिकेत उपलब्ध आहेत.
अमेरिकेतल्या लोकांनी हॉटेलात खाऊन बघितला असेल आणि हा पदार्थं सोप्या पद्धतीने घरी बनवता येतो हे कळल्यावर त्यांनी प्रतिसाद दिले असतील.
आमच्या कोंकणातली रेसिपी कुणी दिली की मी तिथे प्रतिसाद द्यायला जाण्याची शक्यता जास्त आहे की नाही?

Pages