माझे बाबा,मला उलगडलेले - डायरीच्या नोंदीतून. भाग आठ

Submitted by किंकर on 15 July, 2015 - 08:16

भाग एक - http://www.maayboli.com/node/54368

भाग दोन - http://www.maayboli.com/node/54425

भाग तीन - http://www.maayboli.com/node/54450

भाग चार - http://www.maayboli.com/node/54489

भाग पाच - http://www.maayboli.com/node/54490

भाग सहा - http://www.maayboli.com/node/54566

भाग सात - http://www.maayboli.com/node/54601

डायरीतील नोंद -- असलेली
श्री बल्लाळेश्वर मंदिराच्या धर्मशाळेत मुक्काम. समोरील दोन्ही तळ्याची स्वच्छता वाटली नाही. शेवाळ्याने झाकून हिरवट. चुळ. एक प्रकारचा वास.पुढे उन पाण्याच्या झऱ्यावर स्नान,काल उपवास अतिशय थकवा. स्नानोत्तर ग्लानी.

जवळ श्री विठ्ठल रुखमाई च्या देवळात दर्शन व जवळ हॉटेल मध्ये लाडू. जेवणाची सोय ( साधे) नसल्याचे सांगितले.सावकाश बल्लाळेश्वर मंदिरात जावून साष्टांग नमस्कार व बंगालला जाण्यास आशीर्वाद मागितला.

पुराणीकांच्या जेवणाची आयत्यावेळी सोय नाही. संन्यासी,अथिती, अभ्यागतांची देवस्थानातर्फे काही व्यवस्था होते किंवा नाही, याची चौकशी न करिता तेथल्या पेटीत, मूलतः निवृत्तीची प्रेरणा होवून आलेले,रानटी वाघ माणसाळविता येत नाहीत अशा अर्थाचे व शक्यतो राम कृष्ण परम हंसाच्या मार्गाने जाण्याबाबतचे पत्र रवाना करून बाहेर.

राइस प्लेट भागवत एक नमुना (धंदा करावयाचा तो कठोर वृत्तीने . भोजनगृह प्रोप्रायटर) दुपारी पुन्हा प्रवासास सुरवात.सुमारे पाच मैलावर मुक्काम.

आजच्या यजमानाचा मोठा विलक्षण अनुभव आला. संध्याकाळ संपून निरव रात्रीला सुरवात.रस्त्यावरील एकमेव झोपडीत मी एक वाटसरू असून सोय होईल का?म्हणून विचारल्यावर माझ्याकडे ढुंकूनही न बघता आपल्याच उद्योगात मग्न असताना हुं केले

.नंतर माझ्या जवळचे तांदूळ शिजवून द्याल का, त्यावर काय बुवा का? हो बुवाच म्हटल्यावर पातेल्यात भाताची हंडी चढवून त्याकडे मला पहावयास सांगून बुवा कसे? बायको मुले असता विरक्त वृत्तीचा त्याला भयंकर संताप येवून मी बरे केले नाही असी त्याची भावना.

त्याला स्वतःला ९ मुले असून एक मँट्रिक गावातला कार्यकर्ता, कॉंग्रेसशी संबंधी शिव शंकराचा भक्त. त्याची प्रथम ओळखच ,आज होला मारून आणलाय या शब्दाने. प्रांजळ ! मला निदान महिन्यातून एकदा बायको पाहिजे.

मी थापड्या बुवा असून थापेबाजी चालणार नाही संपूर्ण नाव व पत्ता लिहून हि हकीगत पोलीस पाटलांना कळविणार आहे.बुवा होऊन देशाचे कल्याण म्हटल्यावर, तुम्ही आणि देशाचे कल्याण करणार ?

म्हणून, उपहासाने तुम्ही जेवून घ्या जेवल्यावर तुम्हाला बांधून घालतो, गडबड कराल तर कोयत्याशी गाठ आहे,अशा वातावरणात जेवणाची सुरवात झाली. माझी वृत्ती शांत होती. त्याला बिडी प्यायचीही सवय जेवतांना स्थिर वृत्ती.भात तुम्ही घेवू शकता. त्याने आपली भाकरी कालवणासह आग्रहाने मला दिली

.तिथे असलेली गावातली माणसे गेल्यावर एक कातकरी फरारी असून त्याला पकडण्याकरिता पोलीस फिरताहेत त्याला आश्रय मी देतो हि समजूत (गावकऱ्यांची )असून तुम्ही शांतपणे जेवा.तुम्ही शिव शंकरच आहात.

परंतु मला वाटते तुमच्या डोक्यावर काहीतरी नक्की परिणाम झाला आहे.त्याकरिता तुमच्या कपाळावर डाग दिला पाहिजे. स्वतःला झालेली दुःखे व त्याकरिता त्याने हाता पायावर घेतलेले डाग पाहून,त्याच्या शूरत्वाचा प्रत्यय

.जेवण झाल्यावर आता तुम्ही बाहेर अंगणात झोपा, अशी माझी रवानगी. अंगावर पांघरूण नाही.वरील वातावरणात हि मी येथेच झोपणार.गृहस्थाने त्याच्या वृत्तीत पालट होऊन एक पोते पांघरावयास दिले.

नाथाच्या पोथीतल्या कथा ( बाळासाहेब) पोराला रसाळपणे सांगत होता.सकाळी निरोप घेतला. बंद दाराशी पोते ठेवले आभार मानले व विचारून निघालो.

-------------------x ------------------------

वार दिनांक खोपोलीच्या दिशेने उजाडण्या पूर्वी वाटचाल सुरु. सुमारे तेरा मैल चालल्यावर खाण्याची हालचाल. वाटेत कोयना पुनर्वसहातींची गावे. शिमडी, कारगाव . एके ठिकाणी मारुतीचे देऊळ . मुळ ठिकाणाहून त्यांनी श्रद्धेने आणला असला पाहिजे.

जवळचे तांदूळ कुठे शिजवून मिळतील का? अलीकडच्या गावच्या म्हातारीने सून बाहेर गेली आहे. पुढील गावी वस्ती आहे. पुढील गावी आई मला तांदूळ शिजवून मिळतील का ? म्हणून विचारल्यावर तिने शेजारच्या म्हातारीकडे बोट दाखवले.२-५ जण भोवती जमा झाले. परंतु कोठे सोय होण्यासारखी दिसली नाही.

प्रवास चालू शीळ फाट्याला रात्र. पूर्व इतिहास जेंव्हा घरावर जप्त्ती आली तेंव्हा आईने मला पोटाशी धरून " तुझा सांभाळ आता प्रत्यक्ष परमेश्वर करील" त्याची प्रचीती.राम कृष्णांना भावना नसतात त्यांना इतिहास ऐकावयाचा आहे हि भूमिका.

-------------------------- x --------------------------

वार दिनांक शीळ फाटा ते खोपोली. दैनंदिन संगीत भजनांची जोड देऊन खर्च भागवण्याची व रेल्वेने पुढील प्रवासाची कल्पना.

खोपोली कर्जत (अंबरनाथला शहादे येथे न जाता) रेल्वेने प्रवास.कर्जतला मध्यान्हीच्या वेळी हेतू सांगून अथिती म्हणून आलो आहे. स्टेशन जवळच्या बंगल्यात शेट लोक झोपलेले आहेत असे उत्तर.

दुसरीकडे वयस्क ब्राह्मणाकडे गेलो असता जात पोटशाखा चौकशी केली. देशस्थ यजुर्वेदी म्हटल्यावर मी तुम्हाला ५० पैसे देतो तुमची अपेक्षा काय? संग्रह नाही हे सूत्र सांगितले.

पुढे तुम्ही येथील श्रीराम मेढी ५ लाखांची असामी आहे, दिलच अस काही मी सांगत नाही परंतु तुम्ही त्यांच्या कडे जावू शकता गाडी २.४५ थांबावयाचे नाही म्हणून मध्ये हॉटेलमध्ये खावून कल्याणकडे रवाना.

कल्याणला हितगुज स्वतःची कुवत किती अदमास घे.जेवणाचे भान नाही स्टेशनवर खाऊन पाणी पिऊन वेटिंग रूम मध्ये झोप. बाकावरील जागा.पाय लागणे असे वादाचे विषय.छोटा मुलगा वय ८ते १० बाकावर झोपायचे नाही, असे पोलीस म्हणतात ,हि थाप देवून खाली झोपण्याची सूचना देई.

हमाल हितसंबंधी असावा असे पाहटे दिसले.शहादे विठ्ठल मंदिरात जाऊन वेडावाकडा गाईन, परंतु तुझाच म्हणवीन अशी योजना. दक्षिणेश्वराचे ओढीने टाळली.निवांत जागी पुस्तकावरील विठ्ठलाला साक्षी ठेवून भजने म्हटली. (क्रमशः)

डायरीतील नोंद-मला समजलेली --

माणूस देव शोधण्याचे मागे धावतो. पण त्या मागे त्यागाची भावना ठेवत दिनक्रम आचरला,तर अनंत अडचणीत देखिल मार्ग सापडतो. आणि मला वाटतेय कि पाली पासून कर्जत पर्यंतच्या प्रवासातील अनुभव याचीच साक्ष देतात.

उपवासाची तयारी आणि जिद्द असली तरी उपवास आणि पायी चालत राहणे यातून आलेला थकवा नोंदवताना, देवस्थानात जेवणाची व्यवस्था व्हावी अशी अपेक्षा पूर्ण न झाल्याने त्याचा निषेध लेखी, पेटीत टाकून पुढील प्रवास सुरु ठेवला.

मुक्कामासाठी झोपडीत मागितलेला आश्रय आणि तेथील घटना क्रम हा अलीप्तपणे पाहिल्यास संकटास तटस्थतेने सामोरे जाणे, हे त्यांनी अंगवळणीच पडून घेतले होते असे वाटते.

जेवण तयार करून मिळावे म्हणून अपरिचित ठिकाणी प्रयत्न करताना,झालेली भावना विवशता आईची आठवण येण्यास कारणीभूत ठरली. तर आजूबाजूस नतद्रष्ट वृत्ती दिसल्यास त्यातून संताप उफाळून येवू नये म्हणून भजनाचा आधार घेत त्यांनी त्याचा प्रवास सुरु ठेवल्याचे दिसत आहे. (क्रमशः)
माझे बाबा,मला उलगडलेले - डायरीच्या नोंदीतून. भाग नऊ- http://www.maayboli.com/node/54711

Group content visibility: 
Public - accessible to all site users