चांदणंभेट

Submitted by अनुराधा म्हापणकर on 15 July, 2015 - 03:31

अवसेच्या एका रातीला
माझ्याकडलं ओंजळभर चांदणं
मी देऊन टाकलं...

रात्र थोडी उजळली..

आभाळातला तो
असला नसलेला चंद्रही
जाता जाता हलकासा
क्षितीजावर ठेऊन गेला
आपल्या पावलाचे ठसे..

तोच जरासा उरला सुरला
उजेड घेऊन...
पहाट धुक्यातून जागी झाली..

पूर्वेतून वर आलेल्या
त्या तांबड्या लाल गोळ्यालाही
अद्याप कळलेलं नाही..
की ओंजळभर उजेड त्याला
मी दिला आहे...

तो मिरवतोय लक्ष दिवे..
त्यात एक तिरिप माझी आहे..
माझ्या चांदण्याची..!

पण मी बोलणार नाही..
त्याला सांगणार नाही..

तसंही...
मागच्या पौर्णिमेला मी दिलेल्या
चंद्राचं तरी कुठे माहितेय त्याला ?

- अनुराधा म्हापणकर

Group content visibility: 
Public - accessible to all site users