इंग्लिश मिडीअम मध्ये शिकणारी मराठमोळी मुलं

Submitted by पल्लवी अकोलकर on 11 July, 2015 - 09:00

नुकतेच मुलांच्या परीक्षेचे टाईम-टेबल मिळालेले आहे.
त्यामुळे सध्या घरात अभ्यासाचे वातावरण आहे.
अभ्यासाचे म्हणण्यापेक्षा, आभासाचे म्हणणे जास्त योग्य ठरेल.
असो,
टाईम-टेबलवर नजर टाकल्यावर मी नकळतच निवांत झाले होते.
पहिलाच पेपर मराठी भाषेचा आहे.
म्हणलं, चला मराठीचा पेपर म्हणजे, सुरुवात तरी चांगली आहे.
निदान विषय तरी सोप्पा आहे.
कारण अर्थातच, इंग्लिश मिडीअमच्या विद्यार्थ्यांना, लोअर लेव्हलचे मराठी असते.

पण माझ्या, इयत्ता ५ वीच्या मुलाचा अभ्यास घेतांना लक्षात आले, प्रकरण फारच गंभीर आहे.
घरात जरी मातृभाषा बोलली जात असली तरी, इंग्लिश मिडीअमच्या मुलांचे, मराठीचे ज्ञान किती अगाध असू शकते, याची प्रचिती, मला मुलाचा अभ्यास घेतांना आली.
माझा मुलगा, आणि त्याचा मित्र दोघेही अभ्यासाला बसल्यावर, मी त्यांना समानार्थी शब्द विचारायला सुरूवात केली.
मी : वाढदिवस = ? त्यांचे उत्तर : बर्थ डे
मी : पाचोळा = ? त्यांचे उत्तर : वाळलेल्या झाडांचा कुस्करा (?)
मी : पक्षी = ? त्यांचे उत्तर : पशू
मी : तोंड = ? त्यांचे उत्तर : थोबाड
मी : रात्र = ? त्यांचे उत्तर : गगन
मी : निधन = ? त्यांचे उत्तर : डोळे
इतका वेळ संयमाने घेत असूनही, हळूहळू माझा पारा चढायला लागला.
मी म्हणाले, निधन म्हणजे डोळे?
तर ते आत्मविश्वासाने ’हो’ म्हणाले.
मी विचारले, काय संबध ? निधन म्हणजे मृत्यू!
तर ते म्हणाले, ओके ओके, आत्ता आठवलं, नयन म्हणजे डोळे...”आमचा थोडा(?) गोंधळ झाला.”
अशा रितीने त्यांना, बहर, मोहोर इत्यादी शब्दांचा अर्थ समजावून सांगूनही लक्षात येत नव्हते, या दोन्हीत नक्की काय फरक आहे.

माझा पुढचा प्रश्न होता :-
पुढील शब्दांचे अनेकवचन सांगा.
मी : आंबा? त्यांचे उत्तर : आंबेज
अशा रितीने आमच्यात, अभ्यास कमी आणि खडाजंगीच जास्त होवू लागली.
संतापाच्या भरात मला काहीही बोलता येत नव्हते.

मी मैत्रीणीला, माझे दू:ख सांगितल्यावर, तिने तिच्या दू:खाची त्यात भर टाकली.
तिच्या मुलाने, "पुढील शब्दांचे वाक्यात उपयोग करा" नावाचा प्रश्न पुढीलप्रमाणे सोडविला होता.
१. तुरुतुरु : मी तुरुतुरु जेवतो.
२. थूई थूई : पाऊस थूई थूई पडतो.
३. सळ सळ : नदी सळसळ वाजत होती.
४. मुळूमुळू : मोर मुळूमुळू चालत होता.
५. रिमझिम : मी रिमझिम नाचतो.
आता, यात नेमकं काय चूकलं आहे, हे त्याला समजावून सांगणे हे, माझ्यासारखेच माझ्या मैत्रीणीच्याही आवाक्याबाहेरचे होते.
कारण हसण्यातच आमचा बराच वेळ गेला.
परंतु, परिस्थिती अशी आहे, आपल्यास जे शब्द कानाला ऐकून सहज सोपे वाटतात, ते ह्या मुलांच्या डोक्यावरून गेलेले असतात.
आणि चूक त्यांचीही नाहीये, कारण मुळूमुळू, रिमझिम सारखे शब्द आपल्या बोली भाषेतही क्वचितच येतात.

पण त्यामुळे, मला अचानकच एक शोध लागला आहे, तो म्हणजे जगातील सगळ्यात आनंदी, आणि हसून गडाबडा लोळणारी व्यक्ती कोण असू शकते?
तर ती म्हणजे, इंग्रजी मिडीअमच्या शाळेतील, मराठी विषय शिकवणारी शिक्षिका.

निबंध लिहा,
"माझा आवडता प्राणी"
माझा आवडता प्राणी कुतरा आहे.
आता एखाद्या निबंधाची सुरूवातच अशी असेल, तर विचार करा, पुढे किती गमती जमती असतील.
”माझे आवडते फळ”
पहिलीच ओळ.....
माझे आवडते, फळ कलंगड आहे.
ते वाचून मी म्हणाले, अरे कलंगड काय ? ते कलिंगड असते.
माहीत नाही तर, एवढे अवघड फळ लिहावे कशाला परीक्षेत ? आंबा तरी लिहावे. सोप्पे आहे ना लिहायला...
झेपत नाही तर अवघड काहीतरी लिहू नये माणसाने.
त्यावर मुलाचे उत्तर असे होते, माझे आवडते फळ कलिंगडच आहे, आणि तसंही आंबा सगळ्याच मुलांनी लिहीले होते, मग काही तरी वेगळे म्हणून मी हे फळ लिहीले आहे.
मी म्हणलं, म्हणजे तुला मार्कही सगळ्यांपेक्षा वेगळेच पडणार आहेत, असं दिसतंय.

एकदा मुलाला, मी पोलीस आणि चोराची गोष्ट सांगत होते.
गोष्टीच्या शेवटी मी मुलाला म्हणाले, ”अशा रितीने, पोलीस त्या आरोपीला पकडतात.”
ते ऐकल्यावर त्याने थंड आवाजात प्रश्न विचारला, लॉँग-फॉर्म काय?
मी विचारले, कशाचा लॉँग-फॉर्म ?
त्याने विचारले, आरोपीचा ?
त्याला आरोपी म्हणजे R-O-P असे वाटले.
ऐकून माझ्यावर ढसाढसा रडण्याचीच वेळ आली.

कधी कधी विचार मनात येतो, का मी माझ्या मुलांना इंग्लिश मिडीअममध्ये घातलं?
मुलांनी पाढे म्हणावेत असे जेव्हा मला वाटते, तेव्हा त्यांना असे सांगावे लागते, ”मुलांनो, टेबल्स म्हणा रे..."
मग ते ओरडून, ”आम्ही टेबल्सही म्हणणार नाही आणि चेअर्सही..." असले फालतू विनोद करतात.
”बे एके बे’... ची लय आणि सर कुठूनही, ” टू वन्स आर टू..." ला काही केल्या येत नाही.
त्यामुळे मुलांकडून पाढे म्हणवून घेतांना, पाढे पाठ असूनही, नेहमी पाढ्यांचे पुस्तक आधी हातात घ्यावे लागते.

अभ्यासाचे पुस्तक वाचले का? विचारल्यावर, मुलगा म्हणतो, ”ते मी कधीच Mind मध्ये read केलंय..."
काय उत्तर आहे वा...ना धड इंग्रजी, ना धड मराठी.
हे असं असल्याने, शिवाजी महारांजाच्या थोर इतिहासातील, "गड आला पण, सिंह गेला" या वाक्यातील गंभीरता, मुलाला इंग्रजीत समजावून सांगतांना, मी निश्चितच कमी पडते.

मध्यंतरी शाळेतून फोन आला, तुम्ही तुमच्या मुलांशी घरी इंग्रजीतून बोलत जा.
कारण शाळेत आम्ही जे इंग्रजीत बोलतो, ते पूर्णपणे तुमच्या मुलीला समजत नाहीये.
मी म्हणाले, अहो, घरात कुठल्याही भाषेत बोलण्यापेक्षा, मुलांवर ओरडण्याचीच वेळ जास्त येते.
मग इंग्रजीतून परिणामकारक वाटेल असे, मी मुलांवर नेमके कसे ओरडू ज्यामुळे माझी, त्यांच्यावर (थोडी तरी) दहशत बसेल...?
म्हणजे, पु. लं नी विचारल्याप्रमाणे, इंग्रजीत कसे गहीवरतात हो ?
त्याप्रमाणे, इंग्रजीतून कसे खेकसतात हो? असे निदान मला तरी विचारावेसे वाटते.
आणि तसंही, मुलांशी मराठीत बोलूनही, त्यांच्या मराठीची ही अशी बिकट अवस्था आहे, तर इंग्लिशमध्ये बोलल्यावर काय होईल ? असाही प्रश्न आहेच.
या बिकट अवस्थेत, ही मुलं, कुसूमाग्रज, पु.ल. कधी वाचणार?
आणि कधी ती त्यांना समजणार व आवडणार असा विचार मला बर्‍याचदा अस्वस्थ करून जातो.

माझ्या, कॉन्व्हेंट-स्कूल मध्ये शिकणार्‍या, लहान मावस भावानेही, एकदा असाच दारूण विनोद केला होता.
आमची घरात, मराठी वाङ्मय या विषयावर चर्चा चालली असता, त्याने विचारले होते, वाङ्मय...? ”हे कोणाचे आडनाव आहे’?
मी म्हणाले, आडनाव नाही रे, वाङ्मय म्हणजे साहित्य.
त्यावर तो म्हणाला, ओके, You mean tools? त्यावर त्याला, tools नाही रे, वाङ्मय म्हणजे, साहित्य, आणि साहित्य म्हणजे लिटरेचर... आणि लिटरेचर म्हणजे काय, तर त्यासाठी तूला थोडे मोठे व्हावे लागेल असे समजावून सांगतांना, केलेली बोळवण मला अजुनही आठवते.
आमच्या लहानपणी, आम्ही किशोर, चांदोबा, विचित्र विश्व, भा.रा. भागवतांचे फास्टर फेणे इत्यादी बालसाहीत्य वाचले.
आज जेरोनिमो स्टील्टन, टीन-टीन, आस्क मी व्हाय? चा जमाना आहे.

मुलांचं आपल्यासारखे पुढे काही अडू नये म्हणून, त्यांच्यासाठी इंग्रजी माध्यमाची शाळा मी निवडली.
मात्र, मातृभाषेतून शिक्षण घेतल्याने, आपलं नेमकं काय अडलं, याचा शोध मला अजुनही लागलेला नाही.
आणि जे काही अडलं, त्यात भाषेचा खरंच काही संबध होता का, असा प्रश्न जेव्हा मी स्वत:ला विचारते, तेव्हा त्यांचे उत्तर निश्चितच, ’नाही’ असे येते.
माझ्या आजूबाजूला कित्येक मंडळी मी अशी बघितली आहेत, जे आपापल्या मातृभाषेतून शिकूनही आयुष्यात प्रचंड यशस्वी झालेली आहेत.
ज्यांनी समाजात मोठं नाव आणि प्रतिष्ठा कमावलेली आहे.
थोर असे, धिरुभाई अंबानी यांनी तर विशेष असे कुठलेही शालेय शिक्षण न घेताही, आयुष्यात दैदीप्यमान असे यश प्राप्त केले आहे.

असो,
एकूणच, इंग्रजी माध्यमातल्या शाळेत घालून मराठीभाषेच्या सुधारणेसाठी, मी माझ्या मुलांकडून, कधी हतबल होवून, तर कधी जोमाने, प्रयत्न करत रहाते.
आणि आज ना उद्या, निदान या दोन्ही भाषेंवर तरी ते अधिपत्य गाजवतील अशी आशा करते.
बाकी, परदेशी भाषा जसे फ्रेंच, चायनीज, जपानी, किंवा जर्मन तर फारच लांबचा पल्ला आहे.
https://www.facebook.com/PallaviAnecdotes

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users