मला काहीच सुचत नाही.

Submitted by फूल on 8 July, 2015 - 20:05

झाकोळलेलं आभाळ
ओथंबलेले ढग
अंधुकसा प्रकाश
आणि जगण्याचा उबग
सगळं कसं नेहमीसारखं
कविता होण्यापूर्वीचं
तरीही ओसाड पडलाय कागद
त्यावर काहीच उमटत नाही
अशा वेळीच म्हणायचं असतं
मला काहीच सुचत नाही

कोंदटलेल्या मनात
विचारांची दाटीवाटी
आयुष्याची सारवट गाडी
कधी ओली कधी सुकी
कधी उमेदीचा प्रकाश
कधी निराशेचा अंधार
उतरत असतं कागदावर
असलंच काही बाही
पण आज काय झालंय?
मला काहीच सुचत नाही

सांगूनही न सांगितल्यासारखं
काही असायला हवं
इतुकं नको वाटायला
थोडं कमीच वाटायला हवं
अंधुकसे विचार
अजून स्पष्ट असायला हवेत
पण आकार स्पष्ट नकोत
थोडे अंधूक असायला हवेत
थोडं नसून असल्यासारखं
थोडं असून नसल्यासारखं
यातलं काहीच गणित
आज जुळत नाही
आज काही भलतंच...
मला काहीच सुचत नाही.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

बापरे.. सुचत नाही.. सुचत नाही म्हणत... इतकं?
अख्खी कविता अप्रतिम आहे.. त्यातही शेवटलं कडवं भारी भारी 'माझं' वाटलं. आपल्याला काय सुचायला हवय ते माहीत आहे... पण सुचत नाहीये.. गोचिच आहे...
भयंकर आवडलीये ही कविता... एखाद्या रेडिओ प्रोग्रॅममधे वगैरे वापरण्याची परवानगी घेण्यात येईल...

वा! सुरेख!!

हल्ली चांगल्या चांगल्या कविता देखील लोक वाचत नाहीत. फक्त एक अभिप्राय वाचून खंत वाटली.

क्या बात है .....
कविता तयार होतानाचे सूक्ष्मसूक्ष्मतर धागे अलवार उलगडून दाखवणारी एक अलवार रचना ....

छान