काचपात्र

Submitted by अमेय२८०८०७ on 30 June, 2015 - 01:14

माझ्या हाती खेळ खेळता
काचपात्र ते चुकून फुटले
मायेने तू सांधले तया
गुपीत अपुले कुणा न कळले

किशोरवेळा मुग्ध क्षणांची
तुझ्या संगती फुलली ऐशी
काळ सांडला पुढे कितीही
दरवळ राहे सतत मनाशी

भिन्न साधने भिन्न प्रवासी
वेगवेगळ्या वाटांवरती
आयुष्याच्या निबिडामधुनी
फिरून आलो दोघे जगती

काचपात्र तू, उरात तुकडे
पुन्हा भेटता थेट जाणवे
कशा जगाने दिल्या वेदना
हसऱ्या ओठी मुकी आसवे

त्या वेळी तो खेळ असावा
आज तुझा हा क्लेश डाचतो
विश्वासाने माझ्यापाशी
सांधण्यास ये हेच सांगतो

-- अमेय

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूप काही बोलणारी कविता . फक्त पाचंच कडव्यात त्या दोघांचा आता पर्यन्तचा एकमेकांच्या संदर्भातला जीवनपट उलगडत गेलाय ही किमायागारीच आहे या कवितेची . चौथं कडव वाचताना त्रयस्थपणे वाचणारयालाही काहीतरी सुक्ष्मसे रुपत असल्यासारखे वाटून जाते .' काचपात्र ' हे कवितेचे शीर्षकही लक्ष वेधून घेते.