देउनी गेली उसासा

Submitted by निशिकांत on 29 June, 2015 - 02:04

अंतरी खचल्या मनाला
पाहिजे होता दिलासा
एक क्षण आली सखी अन्
देउनी गेली उसासा

तू सखे येणार कळता
हासल्या भिंती कुडाच्या(*)
ग्रिष्म सरला, चिंबले मन
चाहुलीने श्रावणाच्या
नाव माझ्या झोपडीला
मी दिले होते लव्हासा
एक क्षण आली सखी अन्
देउनी गेली उसासा

वाट बघणे प्रेयसीची
छंद हा जन्मांतरीचा
जो कधी सुखवी मना तर
काच ठरतो अंतरीचा
मृगजळापासून मिळतो
का तृषार्ताला दिलासा?
एक क्षण आली सखी अन्
देउनी गेली उसासा

पूर्ण मी हरवून गेलो
माझिया पासून जेंव्हा
आरसा छद्मीपणाने
हासला पाहून तेंव्हा
हे असे का जाहले? मी
कोणता देऊ खुलासा?
एक क्षण आली सखी अन्
देउनी गेली उसासा

पाकळ्यांशी गूज माझे
तू सखे ऐकू नको ना!
गंध घेतो द्यावया तुज
संशयी होऊ नको ना!
गंधकोषी भेटशिल तू
हा मनी आहे भरवसा
एक क्षण आली सखी अन्
देउनी गेली उसासा

आठवांच्या संगतीने
दु:ख बोथटले जरासे
वाळवंटी नांदताना
वाटते निवडुंग खासे
जो दिवस उगवे सकाळी
वाटतो आहे बरासा
एक क्षण आली सखी अन्
देउनी गेली उसासा

(*)शेतात तुरीच्या शेंगा तोडून पीक काढल्यानंतर उरतात त्याला तुरांट्या असे खणतात. यांपासून झोपडीच्या भिंती बनवतात ज्यांना वरून शेणाने दोन्हीबाजूनी लिंपतात. अशा भिंतींना कुडाच्या भिंती म्हणतात

निशिकांत देशपांडे. मो. क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com

Group content visibility: 
Public - accessible to all site users