लोकल डायरी -- १८

Submitted by मिलिंद महांगडे on 27 June, 2015 - 02:34

http://milindmahangade.blogspot.in/2011/11/blog-post_21.html लोकल डायरी --१
http://milindmahangade.blogspot.in/2011/12/blog-post.html लोकल डायरी --२
http://milindmahangade.blogspot.in/2012/01/blog-post.html लोकल डायरी -- ३
http://milindmahangade.blogspot.in/2015/03/blog-post_8.html लोकल डायरी --४
http://milindmahangade.blogspot.in/2015/03/blog-post_10.html लोकल डायरी --५
http://milindmahangade.blogspot.in/2015/03/blog-post.html लोकल डायरी --६
http://milindmahangade.blogspot.in/2015/03/blog-post_27.html लोकल डायरी --७
http://milindmahangade.blogspot.in/2015/04/blog-post.html लोकल डायरी --८
http://milindmahangade.blogspot.in/2015/04/blog-post_19.html लोकल डायरी --९
http://milindmahangade.blogspot.in/2015/04/blog-post_26.html लोकल डायरी --१०
http://milindmahangade.blogspot.in/2015/04/blog-post_29.html लोकल डायरी --११
http://milindmahangade.blogspot.in/2015/05/blog-post.html लोकल डायरी -- १२
http://milindmahangade.blogspot.in/2015/05/blog-post_6.html लोकल डायरी -- १३
http://milindmahangade.blogspot.in/2015/05/blog-post_17.html लोकल डायरी --१४
http://milindmahangade.blogspot.in/2015/05/blog-post_22.html लोकल डायरी --१५
http://milindmahangade.blogspot.in/2015/06/blog-post.html लोकल डायरी --१६
http://milindmahangade.blogspot.in/2015/06/blog-post_19.html लोकल डायरी -- १७

सावंतांनी त्यांच्या घरी शकुंतलाबाईंबद्दल सांगून गडावरचे परतीचे दोर कापून टाकले होते . आता त्यांच्या पुढे कोणताच पर्याय उरला नव्हता . जे होईल ते बघत रहाणे इतकंच त्यांच्या हाती उरलं होतं .
" कशाला इतकी घाई केलीत ...? आपण दूसरा कोणता तरी मार्ग शोधला असता . " मी काल त्यांना म्हणालो तर ते म्हणाले होते की , " मला माझ्या बायकोपासून काहीही लपवायचं नाही . शकुंतला कोण आहे , ती सध्या काय करते , आता तिच्यावर काय प्रसंग ओढवलाय , मला शाळेत असताना आवडायची वगैरे सगळं सांगितलं … " मी डोक्याला हात लावला .
" मग तुमच्या मिसेस काय म्हणाल्या ? " मी काळजीत विचारलं होतं .
" काही नाही .... ती त्या क्षणापासून माझ्याशी बोलली नाही ..." खिन्न चेहऱ्याने ते म्हणाले होते . हे होणं अपेक्षितही होतं . कुठलीही सामान्य गृहिणी ह्यापेक्षा वेगळी वागली नसती . त्या तरी शांत राहिल्या होत्या दुसरी एखादी भांडकुदळ बाई असती तर घर डोक्यावर घेतलं असतं .
आज सावंत प्लेटफार्मवर आले तेव्हा त्यांचा चेहरा सुकलेला दिसत होता , ह्याचा अर्थ त्यांच्या मिसेसने अजुन अबोला सोडला नव्हता . आमचा सगळा ग्रुप जवळच असल्याने मी नजरेनेच ' कसं काय ? ' विचारलं . त्यावर त्यांनी नैराश्येने मान हलवली . मी त्यांना बाजूला घेतलं .
" त्या बोलल्या नाहीत तर तुम्ही बोला ना ... "
" मी हे केलं नसेल असं तुला वाटतं का ? हरतर्हेने बोलायचा प्रयत्न करतोय पण ती काही बोलतच नाही . " ते कळवळून सांगू लागले .
" त्या शांत आहेत ते एक बरं आहे . दूसरी कोणी असती तर भांडाभांडी केली असती . "
" अरे तोच तर प्रॉब्लेम झालाय , ती माझ्याशी भांडली असती तर बरं झालं असतं . ती काहीच बोलायला तयार नाही . आणि तेच जास्त भयानक वाटतंय मला . "
" ही वादळापूर्वीची शांतता तर नाही ना ... "
" त्याचीच तर भीती वाटतेय ना बाबा ... " सावंत हे बोलत असतानाच भरत तिथे आला. आणि आमचं बोलणं अर्धवट राहिलं . इतक्यात गाडीही आली . आमच्या ग्रुपमधे बाकीच्यांना बसायला जागा देऊन मी आणि भरत उभे राहिलो . मी पलीकडे पाहिलं तर सावंतांच्या टेंशनचं कारण समोर उभं असलेलं दिसलं . त्याही थोड्या निराश असल्यासारख्या मला वाटल्या . त्यांच्याच बाजूला अँटी व्हायरस उभी होती . तिने नेहमीसारखी माझ्याकडे बघुन ओळखीची स्माईल दिली . उन्हाळ्यात पहिला पाऊस पडल्यावर वाटतं तसं मला वाटलं . आजकाल मी जास्त विचार करणं सोडून दिलंय , तिची एंगेजमेंट झालीय , काही दिवसांनी लग्नही होईल . घडणाऱ्या गोष्टी कितीही प्रयत्न केल्या तरी घडणारच ...! मग त्या बाबतीत विचार करुन आपला आत्ताचा काळ का बिघडवा ...? आपण आपलं मस्त राहावं ... आत्ताच्या ह्या घडीला मी तिला मन भरुन बघत होतो , आणि हेच सुखद होतं . मला अचानक जूली फिल्ममधलं ते गाणं आठवलं , ' रोक नहीं सकती नजरोंको , दुनिया भर की रसमें .... ' वा .... काय ओळी आहेत .... मस्तच ...! माझ्या कानात ती ऑडियो वाजायला लागली . मी एकदम आनंदात डुलतोय हे मात्र भरतच्या नजरेतून सुटलं नाही . थोड्याच वेळात तो माझ्या कानापाशी आला , " काय शारूख , काय चाल्लंय आजकाल … ? "
" काय ? " मला समजत होतं तो असं का म्हणतोय , पण मी न समजल्यासारखं दाखवलं .
" आयला , नाटकं करतोयस काय ? पण ठीक आहे .... चांगली प्रगती आहे ..." त्याने नजरेनेच अँटी व्हायरसच्या दिशेने खुणावलं .
" ओह ... तू तिच्या बद्दल बोलतोय का ? ते काही नाही रे बाबा . नुसतीच ओळख आहे ... बाकी काही नाही . आणि तुला तर माहीत आहेच की , तिची एंगेजमेंट झालीय ती ...! " मी त्याचा गैरसमज ( ?) , जो बरोबर होता तो दूर केला.
" मला काय तुझी लक्षणं ठीक दिसत नाहीत . " भरत संशयाने बघत म्हणाला .
" बरं बाबा , तुला वाटतं तसंच आहे ... खुश ...! " समोरच्याला आपलं म्हणणं पटवून देता येत नसेल तर कंटाळून वापरायचं वाक्य मी त्याच्यावर फेकलं . तो पुढे जास्त काही बोलला नाही. पण थोड्या वेळाने तो पुन्हा माझ्या कानाशी आला . ," काय रे ? सावंतांचा काही प्रॉब्लेम झालाय का ? " तो हे बोलला आणि मी उडालोच ! ह्याला कसं कळालं ? मग माझ्या डोक्यात प्रकाश पडला , मघाशी आम्ही बोलत असताना भरत आमच्याकडे पहात होता . भरतने सावंतांचे लीपस् रीड केले होते . हा तर खुपच घातक प्रकार होता . म्हणजे आता लांब जाऊन बोलायचीही सोय राहिली नाही . पण त्याला मुख्य मुद्दा काय आहे ते कळलं नव्हतं , हे फार बरं झालं . मी त्याला काय सांगायचं याचा विचार करत असतानाच त्याने पुन्हा मला विचारलं .
" काही नाही रे ... त्यांचा घरगुती काहीतरी प्रॉब्लेम आहे ... आपण कशाला मधे पडा ? त्यांचं ते बघुन घेतील ... आणि आपल्याला प्रॉब्लेम्स काय कमी आहेत ... काय ? " मी असं काहीबाही बोलून त्याचा विचार दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न केला .
" हो ना यार ... जाऊ दे ... पण तुझं ठीक चाललं आहे ना ? " भरत तसा भोळसट आहे ... त्याला आत्ता माझाच काहीतरी झोल चालू आहे असा संशय होता आणि सावंतांवरुन त्याचं लक्ष दुसरीकडे खेचण्यासाठी मीही त्याला अपेक्षित असंच उत्तर दिलं ... त्याचं समाधान झालं . मी पुन्हा अँटी व्हायरसचा विचार करु लागलो . आज आपण तिच्याशी स्वतःहुन बोलुया का ? असा एक विचार माझ्या मनात डोकावून गेला . पण बोलणार काय ? आपण सावंतांचा प्रॉब्लेम तिच्याशी शेयर केला तर ? एखादी बाई ह्या प्रश्नाकडे कशा दृष्टिकोणातून पाहील ? किंवा तिची काय मतं असू शकतील अशा प्रसंगावर ? हे मला जाणून घ्यायचं होतं . आणि असंही आता तिच्याशी बऱ्यापैकी ओळख झाली आहे . त्या विचारानेच मला एकदम हुशारल्यासारखं वाटू लागलं . भायखळ्याला ती उतरल्यावर समोर येईल अशा बेताने मी लोकलमधून उतरलो .
" हाय ... " नजरानजर झाल्यावर मी म्हणालो .
" ओ हाय ... कसे आहात ? ” तिच्या चेहऱ्यावर हास्य उमटलं .
" मस्त ... आणि तुम्ही ? "
" मी सुद्धा ... तुम्ही जॉब बदलला का ? " तिने विचारलं .
" नाही , तोच आहे ... पण तुम्हाला असं का वाटलं ? "
" नाही , काल परवा तुम्ही आपल्या स्टेशनवर उतरला नाहीत , म्हणून वाटलं असं .... " मग माझ्या लक्षात आलं की मी सावंतांच्या बरोबर पुढे सी एस टी ला गेलो होतो . म्हणजे तिच्या लक्षात होतं तर .... ! आपल्या नकळत आपली आवडणारी व्यक्ती आपल्याबाबत विचार करते ह्यासारखी सुखद भावना दुसरी कुठली नसेल , आणि मी जे विचारणार होतो त्याची सुरवात तर तिनेच करुन दिली ... वा ! हे बाकी चांगलं जुळून आलं .
" एक्चुली , आमच्या ग्रुपमधले सावंत , त्यांचा एक प्रॉब्लेम झाला होता , त्यामुळे गेलो होतो . "
" कसला प्रॉब्लेम ? ..... नाही म्हणजे काही पर्सनल असेल तर सांगितलं नाही तरी चालेल ..."
" नाही तसं काही नाही , तुम्हाला थोडा वेळ आहे का ? "
तिने घड्याळात पाहिलं ." हो आहे थोडासा , असंही आमचे बॉस तसे चांगले आहेत . थोडा उशीर झाला तरी काही बोलत नाही " आता इतक्या सुंदर मुलीला थोडासा उशीर झाल्याबद्दल ओरडणारा बॉस एकतर मुर्ख तरी असेल किंवा आंधळा तरी असेल .
" मग ... बन मस्का आणि चहा ... ? " मी विचारलं .
" अम् ... चालेल .... " आम्ही आमच्या नेहमीच्या रेस्टॉरंटमधे आलो . हल्ली आम्ही तिथे जायला लागल्यापासून काऊंटरवरचा शेठ चेहऱ्यावर एक औपचारिक हास्य आणतो आणि ऑर्डर घेणारा पोरगा न सांगता बन मस्का आणि चहा घेऊन येतो . आता काय बोलायचं ह्या लोकांना ...! पण ही सगळी जादू अँटी व्हायरसची आहे हे मला माहित आहे . नाहीतर माझ्यासारख्या ओबडधोबड माणसाला कसली आलीय एवढी व्ही आय पी ट्रीटमेंट मिळायला ...! आम्ही दोघे एका गोल टेबलापाशी बसलो .
" हं ... बोला ... " मी काय बोलणार ह्याची उत्सुकता तिच्या चेहऱ्यावर दिसत होती .
" तुम्हाला मी एक सिच्युएशन देतो , समजा , तुमचं लग्न झालं आहे . आणि तुमचे मिस्टर एक दिवस तुम्हाला सांगतात की पूर्वी त्यांचं एका स्त्रीवर प्रेम होतं . आता ती त्यांच्या आयुष्यात परत आली आहे . आणि तिच्याबरोबर काही असा प्रसंग घडला की आता ती एकटी पडली आहे ... आणि तुमच्या मिस्टरांना त्या स्त्रीला आधार द्यावा असं वाटतं . हे तुम्हाला ते स्वतः सांगतात . तर तुम्ही काय कराल ? "
" आधार द्यावा असं वाटतं म्हणजे ? "
" म्हणजे .... समजा ते त्या स्त्रीला तुमच्या घरी घेऊन आले तर ? " मी अडखळत विचारलं .
" काय ? असं कसं घरी घेऊन येणार ? " ती एकदमच ओरडली , जसं काही खरंच असं घडलं होतं . आजुबाजूच्या टेबलवरचे लोक आमच्याकडे बघु लागले .
" हळू ... हळू ... अहो मी फक्त तुम्हाला विचारतोय हो ... " मी दबक्या आवाजात तिला म्हणालो
" ओह , सॉरी ... म्हणजे ही कल्पनाच विचित्र आहे ... मीच काय ... कोणतीही गृहिणी ह्या गोष्टीला तयार होणार नाही . "
" हम्म्म ... तेच झालंय ... "
" म्हणजे ... हे तुमच्या त्या सावंतांच्या बाबतीत झालंय ? ओह माय गॉड ...! मग आता ? "
" तेच कळत नाही ना काय करायचं ते ..." मी डोकं धरुन बसलो .
" पण मला हे कळत नाही , ही मुर्खपणाची आयडिया त्यांना सुचली कशी ? "
" त्यांना नाही सुचली ... मीच दिली ही आयडिया ..." मी चुकीची कबुली दिल्याच्या सुरात म्हणालो .
" काय .... तुम्ही ...? " असं म्हणून ती खदा खदा हसायला लागली . इतक्या जोरात की आजुबाजूचे लोक पुन्हा आमच्याकडे बघायला लागले . मला अगदी मेल्याहुन मेल्यासारखं झालं . मी खरंच वेडेपणा केला होता . अँटी व्हायरस म्हणाली तेच बरोबर होतं . कोणतीही सामान्य बाई असं करायला तयार होणार नाही .
" ओके ... होतं असं कधीकधी ... मला जसं सुचलं तसं त्यांना सांगितलं ..." काहीतरी म्हणायचं म्हणून मी म्हणालो . ती अजूनही हसत होती . हसता हसता म्हणाली , " सॉरी ... सॉरी ... एक्चुली मी तुमच्या आयडियावर हसत नाही ... पण ज्या पद्धतीने तुम्ही त्याची कबुली दिली त्यावर मला हसायला आलं ... द्याट वॉज सो इनोसंट...! " बाकी हसताना ती भलतीच गोड दिसत होती . मी माझं भान हरपुन तिच्याकडे बघत राहिलो . माझ्या मुर्खपणामुळे का होईना ती हसली हेच माझ्यासाठी खुप होतं . हसता हसता अचानक ती थांबली , चावीच्या खेळण्याची चावी संपावी तशी ! आणि समोर पाहू लागली . ती काय पहाते आहे हे बघण्यासाठी मी त्या दिशेला पाहिलं ... तिथे एक तरुण उभा होता आणि थंड नजरेने तिच्याकडे पहात होता . काळ थांबल्यासारखे ते दोघे एकमेकांकडे पहात राहिले . तो तरुण रागाने माघारी फिरला आणि निघुन जाऊ लागला . अँटी व्हायरस त्याच्या मागे धावली ... " अनिकेत थांब .... अनिकेत प्लीज ... " पण तो तसाच पुढे निघुन गेला . त्याने टॅक्सी पकडली आणि तो गेला . अँटी व्हायरस सुन्न चेहऱ्याने तो गेला त्या दिशेला पहात उभी राहिली . टळटळीत दुपारी सूर्यग्रहण सुरु व्हावं तसं काहिसं झालं . वातावरण एकदम उदास होऊन गेलं . ती उभी होती तिथे मी गेलो , " कोण होता तो ...? आणि तुम्ही इतक्या गंभीर का झालात अचानक ..." त्यावर ती नकरार्थी मान हलवत म्हणाली , " तो माझा होणारा नवरा होता ...अनिकेत … "

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users