शहारे मिटावे कसे?

Submitted by निशिकांत on 26 June, 2015 - 01:15

तुझी भेट होता मनी जागलेले हजारो शहारे मिटावे कसे?
चिरंजीव स्वप्ने मनी कोरलेली, अधूरी असोनी जगावे कसे?

सखे ब्रह्मकमळाप्रमाणे उमलणे तुझे एकदा फक्त वर्षातुनी
मनाच्या कपारीत गंधाळलेल्या क्षणांना प्रिये जोजवावे कसे?

किती हासण्याची तर्‍हा वेगळी! तू करावेस घायाळ कोणासही
तरी भोवती घोळका सावजांचा, कळेना तुला न्याहळावे कसे?

जशी चाळली डायरी जीवनाची, तुझ्या पावलांचेच दिसले ठसे
समासातला कोपरा एक माझा, तरी पान माझे म्हणावे कसे?

जरी वादळे लाख आली नि गेली, भिऊनी किनारा न धरला कधी
तुझा हात आश्वस्थ हातात असता, पुढे ध्येय, मागे वळावे कसे?

तुझ्या चाहुलीने निळे चांदणेही तुझा शोध घ्याया किती लागले!
जगी पौर्णिमेला अंधार झाला, कुठे चंद्र गेला कळावे कसे?

किती रेशमी खास नाजूक नाते, तुझ्या आणि माझ्यातले सांग ना!
ह्ळूवार जपणे न जमल्यास सखये, दवांचे फुलांशी निभावे कसे?

असे पैंजणांना नको वाजवू ना! शिकावेस चालायला तू हळू
तुझ्या चाहुलीने उरी आस उमले, मनाला सखे आवरावे कसे?

कुणी मूर्ख "स्मृतिभ्रंश" वर मागतो का? जसा तुष्टतो देव त्याच्यावरी
म्हणे प्रश्न सुटला "निशिकांत"चा की. "तुला नेहमी आठवावे कसे?

निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail---nishides1944@yahoo.com

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खालील दोन ओळींत एक एक लघु मिसिंग आहे.

>>>जगी पौर्णिमेला अंधार झाला, कुठे चंद्र गेला कळावे कसे?<<<

>>>म्हणे प्रश्न सुटला "निशिकांत"चा की. "तुला नेहमी आठवावे कसे?<<<

बाकी रचना रोमँटिक! मोठ्या वृत्ताला निभावण्याच्या मर्यादा स्वतंत्रच असतात. अनेक सुट्या ओळी व काही खयाल आवडले.

आश्वस्थ हा शब्द माझ्यामते आश्वस्त असा आहे.

शुभेच्छा!

म्हणायचे राहिले:

>>>तुझी भेट होता मनी जागलेले हजारो शहारे मिटावे कसे?
चिरंजीव स्वप्ने मनी कोरलेली, अधूरी असोनी जगावे कसे?<<<

मतला मस्त. (मिटावेत)