हृदयी वसंत फुलला

Submitted by निशिकांत on 16 June, 2015 - 10:17

पाऊस आठवांचा धो धो जसा बरसला
मन पल्लवीत झाले, हृदयी वसंत फुलला

रंगात रंगले मी सखया तुझ्या अशी की!
हरवून स्वत्व गेले, पण ताल सूर जुळला

बांधेन राजवाडा अल्पावधीत मी पण
तुझिया मनात घरटे करण्यात जन्म सरला

तू काफिया, अलामत अन् मी रदीफ होता
ईर्शाद मैफिलीचा, तकिया कलाम बनला

माझ्या नभात कोठे, नसतात चंद्र तारे
अंधार पाचवीला का जन्मताच पुजला?

दैदिप्यमान शिखरे इतिहास दावतो पण
शोधून वर्तमानी, विभुती न एक दिसला

आहे किती दरिद्री श्रीमंत वर्ग येथे!
पैशाशिवाय दुसरा, संचय करू न शकला

पुसण्यास भाव गेलो मंडीत अन् कळाले
श्रीमान सत्त्यवादी, बेमोल काल विकला

"निशिकांत" वाट पुढची अवघड जरूर आहे
पण चालणे कुणी का सोडून स्वस्थ बसला?

निशिकांत देशपांडे. मो. क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com

Group content visibility: 
Public - accessible to all site users