पेलुनी भार पावित्र्या

Submitted by निशिकांत on 7 June, 2015 - 09:32

पार मी वाकलो थकलो पेलुनी भार पावित्र्या
जीवनाचे तरी समजू न शकलो सार पावित्र्या

तुझे का स्वप्न रंगावे समाजाच्या मनी इतके?
दुर्बलांना हवा असतो तुझा आधार पावित्र्या

तुझा फडके जिथे झेंडा, आश्रमी भेटण्या गेलो
काक शिवण्याअधी तेथे बाटली नार पावित्र्या

पाप, खोट्यांस राजाश्रय, तयांचा थाट दरबारी
तुझे दुर्दैव तू व्हावे, आज द्वापार पावित्र्या

कुंभमेळे, पुजाअर्चा, दक्षिणा मोठमोठाल्या
जगाने मांडला आहे तुझा बाजार पावित्र्या

जगी म्हणतात शुचितेला "तुझी ऐशी कि तैशी" का?
तुझ्यावाचून कोणीही ना निराधार पावित्र्या

नेसता वस्त्र भगवे अन् घालता माळ तुळशीची
झाकला निश्चये जातो कसा व्यभिचार पावित्र्या?

मनाला मारुनी जगलो तुझ्याशी नाळ जोडाया
तरी पण प्राक्तनाचा का जाहला वार पावित्र्या?

शोध" निशिकांत "ला होता, पण कुठे भेट ना झाली
दिला निर्जन जरी रस्ता, तुझे आभार पावित्र्या

टीपः--आदरणीय श्री. भूषणजी कटककर यांची "चारित्र्या" रदीफ असलेली गझल वाचताना पावित्र्या ही रदीफ वापरून गझल लिहिण्याची उर्मी येऊन लिहिलेली गझल.

निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail---nishides1944@yahoo.com

Group content visibility: 
Public - accessible to all site users

निशिकांतजी,

माझा सन्मान समजतो मी!

मात्र आपला मतला व पुढचे शेर वेगवेगळ्या वृत्तात का झालेले आहेत?

कृपया तपासावेत.