युरुगुचे पुस्तक : भाग ६

Submitted by पायस on 4 June, 2015 - 12:38

पूर्वसूत्र येथे वाचू शकता - http://www.maayboli.com/node/53880

जॉनी कण्हत कुथत एका कोपर्‍यात पडला होता. पैसे बुडवल्यावर त्याच्या बाबत अजून काय होणार होतं म्हणा! त्याच्यासमोर चार धटिंगण उभे होते. जॉनीला आता दम लागला होता. त्यांनी त्याला सलग मार दिला नव्हता. गल्ल्यांमधून धावपळ होत, मध्ये हाताला लागेल ते फेकून त्याला मारत असा तो पाठलागाचा प्रकार चालू होता. आता मात्र जॉनी पुरता थकला होता. त्या धटिंगणांपैकी एकाने हातात ब्रास नकल चढवले. त्याने जॉनीला एका हाताने उठवले व नकल वाला हात मागे घेऊन एक ठोसा देणार इतक्यात...........
हवेत एक गोळी झाडली गेली. किलर तिथे उभा होता. त्याच्या हातात एक पिस्तूल होते जे आता त्याने त्या चौघांवर रोखले होते.
****

"तू माझी मदत का करत आहेस? कोण आहेस तू?"
जॉनी आणि किलर आता एका टपरीवर बसले होते. सुदैवाने जॉनीला फारसे काही झाले नव्हते. चहाचा एक घोट घेत किलरने त्याच्या प्रश्नाला बगल द्यायचा प्रयत्न केला
"चहा चांगला आहे ना?"
"ते सोड. माझी ५-६ हजारांची उधारी तू चुकवली आहेस. त्याच्या बदल्यात तुला काही मिळेलच असे नाही."
"०.५"
"काय?"
"प्रोबॅबिलिटी ०.५. तुझ्याकडून मला काही फायदा होण्याची शक्यता ५०%"
जॉनी हसतच सुटला. "म्हणजे मी दोनपैकी एका सिचुएशनमध्ये तुला उपयोगी पडेन?"
"चूक. प्रोबॅबिलिटी म्हणजे जर मी तुझ्याकडून मदत घेत गेलो तर अनंत केसेस पाहिल्यानंतर बरोबर निम्म्या केसेस मध्ये तू मला उपयोगी पडशील. जर १० किंवा १०० सिचुएशन्स घेतल्या तर कदाचित तू मला एकदाही उपयोगी पडणार नाहीस. मग मी म्हणेन कि आपला सॅम्पल साईज खूप कमी आहे."
"ओह मॅन यू आर टू फनी. तू जे काही बोलला ते मला अजिबात कळलं नाही. इन एनी केस तू माझी मदत केलीस, जरी मी तुला धन्यवाद द्यायला बाध्य नसलो तरी देखील ऑन अ प्युअर रँडम चॉईस मी तुला सोडून देतोय. बाकी ते चौघे काही वाचणार नाहीत."
"लाईक आय सेड, मला तुझ्याकडून काही नको आहे. पण जर तुझा रँडम आऊटकम मला फेवरेबल आहे तर मग व्हाय डोन्ट वी बी फ्रेंड्स?"
"काय म्हणतोस?" जॉनीने जमिनीकडे बघून विचारले.
"ओके, फ्रेंड्स."
"कूल. हे माझे कार्ड. भेटत राहू आपण असेच मधून मधून. आशा करतो कि पुढच्या वेळेस तुझ्यामागे गुंड लागले नसतील."
जॉनी खळखळून हसला आणि निघून गेला. हे बघून बाजूला असलेली एक गाडी पुढे आली. किलर तिच्यात शिरला. आतमध्ये बसलेल्या रसूलने त्याचे स्वागत केले.
"फायनली कॉन्टॅक्ट झाला. आपण याच्यावर आपली ५ माणसे आत्तापर्यंत वाया घालवली आहेत. ही चार पण पूर्वीच्या अनुभवावरून वाया जाणार असे गृहीत धरून चालुया. तू वाया गेलेला मला परवडणार नाही. इतकी रिस्क घ्यायची गरज होती का?"
"हो. आणि तो एकटा नाही जसे आपण समजत होतो."
"काय? पण इथे तर तो एकटाच होता."
किलरने फक्त हूं केले. पण त्याच्या डोळ्यात अजूनही ती प्रतिमा होती. जॉनी पाठमोरा, त्याच्या डाव्या बाजूला एक कोल्हा आणि उजव्या हातात एक पुस्तक!
*****

कधी कधी काही बातम्या ५व्या-६व्या पानांमध्ये कोपर्‍यात किंवा पुरवणीत छोट्याश्या जागेत हरवून जातात. जशी ही

"अतर्क्य प्रकार : गुंडांनी केले स्वतःहून आत्मसमर्पण

इथल्या पोलिस चौकीत आज एक अतर्क्य प्रकार घडला. ४ गुंड अचानक चौकीत घुसले. त्यांनी आपल्या पिस्तुली काढून ठेवल्या व आत्मसमर्पण करण्याची तयारी दाखवली. गडबडून गेलेल्या पोलिसांना पटकन काही सुचले नाही तेव्हा त्यांनी कसलेसे पुस्तक उचलून निरीक्षकावर फेकून मारले मग तिथल्या एका हवालदाराला गळा आवळून मारले. मग पुन्हा एकदा आत्मसमर्पण करण्याची तयारी दाखवली. आता या प्रकरणाची अधिक चौकशी चालू आहे."
~*~*~*~*~*~

जंगल! जंगलाविषयी जंगलात न राहिलेल्या व्यक्तिंच्या एकंदरीतच प्रचंड गैरसमज असतात. मला जंगली, रानटी हे शब्द कधीच आवडले नाहीत; त्या शब्दाच्या उच्चारात एकप्रकारचा कमी लेखल्याचा भाव आहे. केवळ दुसरा शब्द नसल्याकारणाने त्या मुलाला मला जंगली म्हणावे लागत आहे. मी कोण हा प्रश्न येथे अप्रस्तुत आहे. तो कोण आहे हा प्रश्न मात्र आत्ता महत्त्वाचा आहे आणि तुम्हाला लगेच याचे उत्तर मिळणार आहे. तत्पूर्वी आपण तो काय करत आहे हे तरी पाहूया -
त्या भागातून वाहत असलेल्या नदीकाठी तो एकटाच बसला होता. काहीतरी खुडबुड चालू होती त्याची. तेवढ्यात त्या नदीतून काही बुडबुडे येऊ लागले. मग लक्ष देऊन पाहिले तर दोन नाकपुड्या दिसून येत होत्या. लवकरच एक चिंचोळे तोंड वर आले. पण एवढे सर्व होऊनही अगदी बारीकसा आवाजही कदाचित झाला नसावा. मगरीविषयी आपल्या मनात कशीही प्रतिमा असेल पण त्या प्राण्याच्या आपल्या भक्ष्याचा पाठलाग करतानाच्या हालचाली अत्यंत डौलदार असतात. एका लयीत, कुठलीही अनावश्यक हालचाली न करता, संथ गतीने पाणी कापत मगर अलगद येते व अगदी शेवटच्या क्षणी आपल्या सावजावर हल्ला चढवते. त्या नदीकाठी पाणी पित असलेले ते हरीण अगदी बेसावधपणे पाणी पीत होते. सहसा कळपात हिंडणारा हरणासारखा प्राणी इथे एकटा कसा? असा प्रश्न कदाचित मगरीच्या मनाला शिवलाही नसेल; तिला फक्त आपले पोट भरण्याशी मतलब. ती हरणाच्या खूप जवळ आली आणि तेवढ्यात कसलासा गुरगुरण्याचा आवाज झाला. ते हरीण सावध झाले, मगरीची हालचालही वेगवान झाली, पण हरीण निसटले नाही. ते फक्त पाणी प्यायचे थांबवून काही पावले मागे सरले. अर्धवट पाण्याबाहेर असलेल्या मगरीच्या पाठीला तो स्पर्श जाणवला आणि तिचेही शरीर थरथरले. तो मुलगा अगदी निवांतपणे तिच्या शरीरावर हात फिरवत होता. खुदकन हसून तो म्हणाला
"तुला भूक लागली होय? पण हे हरीण मी पाळले आहे. तुला त्याला खाता येणार नाही."
मगरीला हे कळणार होते जणू! पण मगरीला एक गोष्ट जाणवली. त्या स्पर्शात एक प्रकारची जरब होती. अनेकदा पाळलेले बिबटे मालकाच्या एका स्पर्शाने गप्प बसतात. या स्पर्शांचे दोनच प्रकार पडू शकतात - प्रेमळ स्पर्श आणि भीति. मगरीला या अनोळख्या मनुष्यावर प्रेम असण्याची सुतराम शक्यता नव्हती.
"उम्म पण इथे तू मला कोड्यात टाकलंस गड्या! तो म्हातारा ओझा सांगत असतो आपलं सर्व काही निसर्गातून येतं जी अम्माची आपल्याला भेट आहे. त्यामुळे आपण आपलं सर्व काही कधी ना कधी निसर्गाला परत द्यायचं असतं. मी तसा त्या भंपक ओझावर विश्वास ठेवत नाही पण प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे? फक्त मला एक प्रयोग करू दे बरं का मग हे तुझं!"
तो अगदी सावकाश त्या हरणाकडे वळला. आता त्या हरणाची उजवी खोबण रिकामी असल्याचे दिसून येत होते. त्याने उजवा हात हरणाच्या मानेवरून फिरवत डाव्या हाताची बोटे हरणाच्या डाव्या खोबणीत रुतवली. मगर शहारली का नाही ते माहित नाही पण तिने कणभरही हालचाल केली नव्हती.
"काल ओझा बकबक करत होता कि अम्मा सर्वांना कधी ना कधी त्याला गरज लागेल, जशी स्वर्गात जागा होईल तसे बोलावून घेत असतो. आता जख्मी झालेले जनावर लवकर मरते पण अम्माला त्यांची काय गरज असणार? तो त्यांना का बोलावून घेईल? म्हणून हा प्रयोग फक्त. असो मला दुसरा कोणी शोधावा लागेल."
"इलेगुआ, इलेगुआ!!"
एक आदिवासी स्त्री तिकडेच येत होती. तो मुलगा धावत तिच्या पुढ्यात जाऊन ठाकला.
"तुम्ही कुठे गेला होतात? सरदार किती चिंतेत आहेत. आणि इकडच्या नदीत मगर आहे. तुम्हाला काही झाले असते तर?"
"परत असे करू नकोस."
"हो ते तर मी म्हणणारच होते."
"अंह. परत मला इलेगुआ म्हणण्याची चूक करू नकोस. मला ते नाव मुळीच आवडत नाही. युरुगु, फक्त युरुगु देवाचंच नाव मला आवडतं."
ती स्त्री बापडी काय बोलणार! याच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे अशी वदंता तिला ठाऊक होती. तिने त्याच्या हाताला धरून त्याला खेचत नेले. त्या नादात त्याच्या डाव्या हातात घट्ट धरलेली वस्तु घरंगळत गवतात पडली ती तसल्याच दुसर्‍या वस्तुला धडकून थांबली. त्या हरणाचा आणि मगरीचा काहीच पत्ता नव्हता. नदीचे पाणी मात्र काठाजवळ लालसर होते.
*****

"इलेगुआचा शाप खरा ठरणार. बुसुली काहीही करून हा अनर्थ थांबव."
"होय. मी थांबवेन. मी काहीही होऊ देणार नाही. भारत काय, आफ्रिका काय? माणसाचा जीव सारखाच महत्त्वाचा आहे. मी त्या खेळाला सुरु होऊ देणार नाही. मी युरुगुच्या पुस्तकाला पूर्ण होऊ देणार नाही. मी इलेगुआला थांबवेन, नक्कीच थांबवेन."
"कसं थांबवशील?" इलेगुआ आता हसत विचारत होता. बुसुलीचे वडिल कुठेही दिसत नव्हते.
बुसुली थक्क होऊन त्या तरुणाकडे बघत होता. इलेगुआच्या चेहर्‍यावर थट्टेखोर भाव होते.
"कसं थांबवशील? मला मारणे हा एक उपाय असू शकतो." त्याने बुसुलीचा ठोसा सहज चुकवत बोलणे पुढे चालू ठेवले. " पण मी तर कित्येक वर्षांपूर्वी मेलो आहे. मी फक्त एक विचार आहे बुसुली. अगदी अचूक शब्दात सांगायचे तर युरुगुच्या विचारांचे एक माध्यम. हे माध्यम कधीच नष्ट झाले आहे. आता जे काही उरले आहे त्या आहेत माझ्या विचारांच्या आठवणी! या आठवणींना तू कसा नष्ट करशील बुसुली. कसा? तू तुझ्या बाबांना वाचवू शकला नाहीस, या शहरातल्या लोकांना कसा वाचवशील? कसा वाचवशील बुसुली? कसा वाचवशील?
कसा वाचवशील बुसुली? कसा? कसा? कसा? कसा? कसा?
आह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह!
स्वप्न. एक अत्यंत वाईट स्वप्न! बुसुली घामाने भिजला होता. त्याने जवळच्या जगमधले पाणी थोडेसे ग्लासात ओतले. पाणी प्यायल्यावर त्याला बरे वाटले. त्याने दोन्ही हात केसातून मागे सारले. प्रश्न बरोबर होता. ला आणि नोम्मोला शोधण्याचे त्याचे आत्तापर्यंतचे सर्व प्रयत्न अयशस्वी ठरले होते आणि जिथे जिथे त्याला युरुगुच्या पुस्तकाचा वापर झालेला जाणवला होता तिथे तिथे त्याला ला आणि नोम्मोच्या अस्तित्त्वाच्या काहीही खुणा सापडल्या नव्हत्या. त्याला एकच आशा होती. एक नवीन घटना. ही इतर घटनांपेक्षा वेगळी होती. आता ही शेवटची आशा!!
~*~*~*~*~*~

आलोकने आपल्या नशीबाला बोल लावत बाईकला लाथ घातली. आज प्रज्ञाने त्याला पिकअपची रिक्वेस्ट केली होती. कशाला माटुंगाच्या आसपास तडमडली होती कुणास ठाऊक. किंग्ज सर्कलला उभी असणार होती म्हणे. धारावीच्या झोपडपट्टीत तडमडली असेल आता डिटेक्टिव बाई. हिला फोन लावून सांगावे सरळ आता काही जमत नाही.
"हॅलो आलोक, इकडे कोठे?"
शेजारी एक पांढरी पोलो उभी होती. तिच्यातून डॉ. सायरस हसत त्याच्याकडेच बघत होते. आलोकने थोडक्यात सर्व परिस्थिती सांगितली.
".....आणि बाईक बंद पडली आहे सर. आता हिला जवळच्या गॅरेजमध्ये हिला टाकतो आणि पळतो घरी."
"कसा?"
"लोकल. अजून काय करणार? डायरेक्ट टॅक्सी फार महाग पडेल."
"डोन्ट बी फुलिश. कम आय विल ड्रॉप यू. अ‍ॅन्ड वी विल ऑल्सो पिक युअर गर्लफ्रेंड अप."
प्रज्ञा माझी गर्लफ्रेंड नाही हे ओठांवर आलेले शब्द त्याने मागे घेतले. प्रज्ञा त्याला आवडायची पण त्याने तसा विचार कधी केला नव्हता. त्याला स्वतःचीच गंमत वाटली. सायरसने देखील त्याची चलबिचल पाहली आणि खळखळून हसत त्याने गाडीचे दार उघडलं.
*****

"थँक्स यार आलोक."
"मला थँक्स म्हणू नको, डॉक ना म्हण."
"ते तर मी म्हणणारच आहे. थँक्स आणि सॉरी डॉक."
"सॉरी का बरं? देअर इज अ‍ॅब्सोल्युटली नो प्रॉब्लेम अ‍ॅट ऑल डिअर! तसंही मी लवकर घरी पोचून काय करणार होतो? तेवढीच जरा चक्कर आणि रुटिनमध्ये बदल! असे छोटे छोटे बदलही नंतर नंतर छान वाटतात."
"कोणाला सांगताय डॉक? हिचं आधी रुटिन लागू द्या मग बदल होतील. बाकी बाईसाहेब, डिटेक्टिवगिरी मधून अभ्यास करायला वेळ मिळतो का? जरा लक्ष द्या अभ्यासाकडे. नाहीतर आहेतच नेहमीचे दिवे."
"व्हॉट डू यू मीन? मी अभ्यास करते बरं का! आणि का कोणास ठाऊक माझे गेल्या आठवड्यातले सगळे लेक्चर ऑफ गेले."
"एक मिनिट, प्रज्ञा तू डिटेक्टिव आहेस?"
"डॉक तिची डिटेक्टिवगिरी म्हणजे ......."
"आलोक आता तुला........."
"काम डाऊन बोथ ऑफ यू. प्रज्ञा मग कसला तपास करत आहेस?"
प्रज्ञाने अगदी वरवरची माहिती दिली. तिने अर्थातच जाधवांचा उल्लेख कटाक्षाने टाळला.
"मग तुझा हा मैत्रिणीचा भाऊ देखील कोल्ह्याचा शिकार नाही ना?"
"नाही." प्रज्ञा ठामपणे उत्तरली.
"का? असं का वाटतं तुला?"
"पहिल्यांदा तर माझा त्या जादुई कोल्ह्यावर विश्वास नाही. हे सर्व सायकोलॉजिकल आहे.........."
सायरसने आलोककडे नजर वळवली. आलोक त्यांच्याकडे बघणे टाळून बाहेर बघू लागला. तर इथे आहे तुझ्या थिअरीचे रहस्य. नाईस चॉईस माय यंग फ्रेंड.
"इंटरेस्टिंग पण मग........."
"लेट मी कंप्लीट डॉक; आणि मी त्या बेवारस प्रेतांच्या न्यूज ऐकल्या, त्यातले काही चक्क खून आहेत. काही काही तर क्लिअर कॅनिबलिजमच्या केसेस आहेत. बाकी अनिदादाला कोल्हा मारणे शक्य नाही. त्याच्या गळ्यावर ५ ठिकाणी जखमा आहेत. कोल्ह्याला चारच नखे असतात."
कर्रर्रर्रर्रर्र.......... ब्रेक लावत गाडी थांबली.
"तुझं घर आलं आलोक. प्रज्ञा तू इथेच उतरत आहेस का?"
"अं, अ‍ॅक्चुअली......."
"सॉरी पण मला एक काम आठवलं म्हणून मी तुला पुढे सोडू शकणार नाही. आलोक आय थिंक तू हिला इथून सोड शकतोस."
"नो वरीज डॉक." आलोक थोडासा आनंदलाच.
सायरसने वळून जाणार्‍या प्रज्ञाला अचानक हाक मारून बोलावून घेतले.
"आय डोन्ट नो तुझी अ‍ॅनॉलॉजी किती बरोबर आहे. पण पाच नखांवाले प्राणी पण असतात. आता आपणच बघ ना, म्हणजे माणसांना पाच नखे असतात. ती तशी कुचकामी असतात म्हणा. पण काही मार्जार वर्गीय प्राण्यांनाही पाच नखे असू शकतात. त्यामुळे तो एखादा सर्कशीतून पळालेला वाघ वगैरे पण असू शकतो. आता जर पंचशूल वगैरे वापरला नसेल तर.........."
"डॉक!!!!" प्रज्ञाच्या डोक्यात एक खतरनाक कल्पना चमकून गेली होती. आज हातात आलेल्या बातमीला जोड देणारी गोष्ट होती. थोडी असंभाव्य वाटत होती पण जाधवांबरोबर चर्चा करण्यासारखी होती.
जाधवांना लवकरात लवकर भेटायलाच हवे.
सायरसना मात्र या तरुणीच्या डोक्यात काय आलं होतं याची काही कल्पना नव्हती.
~*~*~*~*~*~

इकडे मुंबईत या नव्या बातमीने उलटसुलट प्रतिक्रिया आल्या होत्या. बाबा निश्चितानंदाच्या अनुष्ठानाच्या मंडपाला अनुष्ठानाच्याच दिवशी आग लागली होती. यामागे निश्चितानंदांनी त्या कोल्ह्याच्या शक्तीला कमी लेखल्याचे कारण दिले होते.
"मी त्या सैतानाला कमी लेखले. मला वाटले कि या पवित्र स्थळी तो प्रवेश करू शकणार नाही. पण मी विसरलो कि हे कलियुग आहे. तुम्ही इथे जमलेले आणि माझे भक्तगण श्रद्धेने त्या भगवंतावर विश्वास ठेवता, ज्याच्या इच्छेने सर्वकाही चालते, सर्वकाही निश्चित आहे, त्याची भक्ति करता. त्याचवेळी मी हे विसरायला नको होते कि अनेक पाखंडी देखील या शहरात आहेत. त्यांच्या अविश्वासाची जोड मिळाल्याने तो श्रुगाल इथे प्रवेश करून यज्ञभंग करून गेला. हरकत नाही. अजून काही काळ कळ सोसा. त्याचा अंत निश्चित आहेच, फक्त त्याची आज वेळ आली नव्हती. मी अजून परिपूर्ण यज्ञ करेन आणि यावेळी त्या कोल्ह्याला बंदिस्त करून तुमच्या समोर प्रकट होईन. तोवर मी कोणालाही दर्शन देणार नाही. मग तुमच्या समोर त्या कोल्ह्याचा अंत करून मी भगवंताने माझ्यावर सोपवलेली जबाबदारी पार पाडेन, तिच्यातून मुक्त होईन. सब निश्चित है!"
कमिशनरांनी हे प्रकरण आता थोडे अधिक गंभीरपणे घेतले. निश्चितानंदांना पुरेसे फॅन फॉलोईंग आधीच होते. आता या घटनेनंतर लोकांची उत्सुकता ताणली गेली. ज्या दिवशी हा मनुष्य कोल्हा घेऊन बाहेर येईल त्या दिवशी आंधळ्या भक्तांचे लोंढे मुंबईत येणार! याला अटक करणे आत्ता शक्य नव्हते पण याच्यावर इथून पुढे कसून लक्ष ठेवणे हा एकच पर्यात होता. बाबांची सुरक्षा या नावाखाली पोलिस संख्या वाढवण्यात आली. साध्या वेषातील पोलिस टेहळणी करू लागले. आणि इकडे स्वतः बाबा
"लवकरात लवकर एक करडा कोल्हा शोधून काढा. आता आपण माघार घेऊ शकत नाही. सब निश्चित है."
असे म्हणत त्यांनी खोलीचे दार लावून घेतले. आता बाबा पलंगावरच्या त्या देखण्या चेहर्‍यात हरवून जाणे निश्चित होते.
~*~*~*~*~*~

इन्स्पेक्टर जाधव नुकतेच रिपोर्टरकडून ती चिंताजनक खबर ऐकून घरी निघाले होते. त्यांचा या प्रकरणातील एकमेव क्लू हातातून निसटू पाहत होता. त्या खुन्याच्या हातून वाचलेला एकमेव माणूस गायब झाला होता. तो धारावीच्या झोपडपट्टीत कुठेतरी त्या रात्री निसटला होता यात काही संशय नव्हता. आता या झोपडपट्टीत त्याला शोधणार कसे हा प्रश्न होता? झोपडपट्टीवाल्यांनी सीआयडी ऑफिसरला कितपत सहकार्य केले असते यात शंकाच होती. त्यामुळे त्यांनी रिपोर्टरला त्याचा पत्ता काढायला सांगितले होते. पण रिपोर्टरच्या म्हणण्यानुसार तो त्या रात्रीनंतर दुसर्‍या दिवशी दिसला आणि नंतर गायब तो गायबच. फक्त एकच वेगळी माहिती होती, कधी गॉगल न लावणारा हा मनुष्य त्या संपूर्ण दिवशी गॉगल लावून फिरत होता. हा काय प्रकार आहे?

~*~*~*~*~*~

बुसुली बाहेर पडायला निघाला. तेवढ्यात त्याने ते संभाषण ऐकले.
"इलेगुआ, इलेगुआ........."
एक मिनिट. त्याने कुणाल आणि गंगाधर यांच्या अभ्यासात व्यत्यय आणला.
"तुम्ही काय करताय? तुमचा तर आमच्या जमातीच्या दंतकथांचा अभ्यास चालू आहे ना? इलेगुआ कुठून आला?"
"ओह. अरे बुसुली तुला माहित आहे का इलेगुआ काय आहे? याचा अर्थ काही लागत नाही बुवा."
"इलेगुआ हा अर्थ असायला शब्द नाही. ते एक नाव आहे. आणि ते शापित आहे. तुम्ही चुकीच्या वाटेवर गेला आहेत. मला सांगा हा काय घोळ आहे."
गंगाधर आधी काही क्षण गप्प बसले. मग त्यांनी कुणालला खूण केली.
"मी जुन्या दंतकथांची कागदपत्रे भाषांतरीत करत होतो. मला तिथे हा शब्द सापडला. काही तरी शापकथाच आहे. पहिल्यांदा काहीतरी कविता आहे......."
"शोधतोय शोधतोय, युरुगु शोधतोय
त्याचे या जगी नवीन घर तो बांधतोय
पूर्वी अम्माने केले ते पुन्हा तो बघतोय
आणि आता स्वतःला देह तो शोधतोय
मी तर नाही पटलो त्याला
पुढचा कोण आहे?"
कुणाल आणि डॉ. नाडकर्णी त्याच्याकडे पाहतच राहिले.
"तुला हे कसं काय ठाऊक?"
"मला ज्याची भीति होती तेच झालं! तुम्ही ज्या रस्त्यांवर जायचं नसतं त्याच रस्त्यांवर प्रवास सुरु केला आहे. तुम्हाला युरुगुच्या पुस्तकाचा उल्लेख सापडला का?"
त्या दोघांनी होकारार्थी मान डोलावली. बुसुलीने निराश होऊन खांदे झटकले.
"मला जेवढे माहित आहे तेवढे मी तुम्हाला सांगतो. बाकी तुम्ही ज्या मार्गावर तुमचं संशोधन करत आहात त्या रस्त्याला फक्त सुरुवात आहे. शेवट अनिश्चित आहे."
"एक सांगा, तुम्हाला युरुगुची कथा माहित आहे. पण युरुगु एक देव आहे. मी बाहेरच्या जगाचा अनुभव घेतला असल्याने मला माहित आहे कि आजच्या जगात देव फक्त विश्वासावर अस्तित्वात आहे. पण तरीही मी देखील या युरुगुला घाबरतो. का?"
याचे उत्तर दोघांकडे नव्हते.
"युरुगुचे पुस्तक पूर्वी केवळ एक दंतकथा असेलही. पण त्या दिवसानंतर युरुगुचे पुस्तक केवळ दंतकथा न राहता मृत्युसाठीचा समानार्थी शब्द बनला. इलेगुआ......... इलेगुआ आमच्या पूर्वीच्या सरदारांपैकी एका सरदाराचा मुलगा होता. आमचा प्रमुख होऊ शकला असता तो. मला अगदी बारीकसारीक तपशील माहित नाहीत पण इलेगुआने पहिले युरुगुचे पुस्तक बनवले. आमच्यासाठी इलेगुआ युरुगुचा, मला दुसरा शब्द सुचत नाही आत्ता, युरुगुचा अवतार आहे. मी असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही कि इलेगुआच युरुगु आहे!!!!"

~*~*~*~*~*~

क्रमशः

पुढील कथासूत्र येथे वाचू शकता - http://www.maayboli.com/node/54284

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हं AddEmoticons04261.gif

धन्यवाद Happy
सध्या शेड्युल नीट लावतोय म्हणजे एवढी मोठी गॅप होणार नाही पण निश्चित नाही (मी काय निश्चितानंद नाही गॅरेंटीने सगळं काही निश्चितपणे सांगायला Lol ). अंदाजे १५ भागात बसवायचा प्रयत्न करत आहे, प्रतिक्रिया बघून ठरवेन कि अजून लांबवायची का नाही. आत्तातरी पुढचा भाग सोमवारी सकाळी (भारतीय प्रमाणवेळ) येईल असे गृहीत धरायला हरकत नाही.