अंततः

Submitted by अमेय२८०८०७ on 4 June, 2015 - 02:55

आकर्षणात जातो काठावरी जळाच्या
भुलतो बघून लीला मंत्रावल्या तळाच्या
हलके तुषार, पाणी सादेत गूढ गाते
प्रतिबिंब हालताना लाटांत स्वैर न्हाते

भिंती खड्या सभोती फसवी कराल माया
आतूर नित्य घासा की कैद अप्सरा या
वाणी प्रदोषलेली भासे निनाद परका
घसरून लाल माती लावी जिवास चरका

सत्यापल्याड दृष्टी पाहून मोहलेली
जाणीव जीवनाची श्वासांत कोंडलेली
"नाही अजून आली ती वेळ अंतिमा रे!"
भानावरी स्वतःला आणून मी पुकारे

हसरे गढूळ पाणी काळा थरार वाहे
येणार शेवटी हा विहिरीस ज्ञात आहे

-- अमेय

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अमेय कसली अनोखी कविता,बालकवींची औदुंबर आठवली. कवीमनाला ओढ लावणारं आरस्पानी वाटणारे जलामृत अन् प्रत्यक्षातले अटळ वास्तव..असेही आपण प्रत्येकजण एकेका पावलागणिक त्याच अंतिम सत्या कडे नकळत वाटचाल करतोय.शेवटच्या दोन ओळी वाचताना शहारा येतोय.....