माणसेच..

Submitted by भारती.. on 3 June, 2015 - 10:20

माणसेच .. ( अष्टाक्षरी समानिका द्रुत )

माणसेच कोरतात
दु:खशिल्प कातळात
रात्ररात्र जागतात
जीवजन्म जाळतात

माणसेच खोदतात
खोल अर्थ शोधतात
व्याप थोर मांडतात
संहितेत कोंडतात

माणसेच पाहतात
वस्तुस्थिति साहतात
स्थळकाळी राहतात
शून्यभार वाहतात

युद्ध-बुद्ध माणसेच
तत्त्व हीच सत्य हीच
रूप ही विरूप हीच
हीच अन्य ना कुणीच

माणसेच, माणसेच ..

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद प्रकु , सहजच लक्षात आलं की आज मला मायबोलीवर येऊन तीन वर्षे पूर्ण झालीत ! मग एक अगदी लेटेस्ट लिहिलेली कविता टाकून सेलिब्रेट करावंसं वाटलं .

हॅप्पी बड्डे भारती. नेहमीप्रमाणेच अप्रतिम कविता.

मला अजिबात हक्क आणि ज्ञान नसताना एक बदल सुचवावासा वाटतोय.

माणसेच कातळात
खोल अर्थ शोधतात

खोल असा शब्द आल्याने, खोदणे अभिप्रेत होतेच. दुसर्‍या ओळीचा शेवट, पहिल्या कडव्यात क्रियापदाने झाला नाही म्हणून. तिसर्‍या कडव्यात पण असे काहीतरी हवे होते.

अर्थातच गुस्ताखी माफ Happy

पण कातळात खोदतात म्हटलं की खूप सीमित होतं, मन, विचार, शरीर, इतिहास असं बरंच काही खोदून अर्थ शोधतात हे जास्त भावलं. अर्थात भारती सांगतीलच.

दिनेश, अमितव , आभार Happy
दिनेश, तीन वर्षे झाली हे खरंच वाटत नाहीय ..त्यातून पहिल्या वर्षात जे काही झपाटलेलं दीर्घ लेखन झालं ! नंतर एक कवितांचा ऋतु आला, जो आता कदाचित काही काळ तरी ओसरेल असं वाटतंय इतकं पोटभर लिहिलं . असो.
आता तुम्हाला उत्तर देण्यासाठी मला कवीच्या मनात असलेल्या प्रतिमांबद्दल बोलावं लागणार आहे Happy
या अष्टपदीच्या प्रकारात - समानिका द्रुत- फक्त लगावलीचा नियम आहे, गाल गाल गाल गाल असा लघुगुरुक्रम. शिवाय माझ्या रचनेत प्रत्येक कडव्यात अंत्ययमक आहे.

दुसरा कोणताही pattern नाही.क्रियापदे वगैरे आहेत,पण आशय त्यांना बांधलेला नाही तर प्रत्येक कडव्यात एका सुप्तप्रतिमेला बांधलेला आहे. पहिल्या कडव्यात उभा कातळ आहे ( पायांखालचा नाही ) ज्यात माणसे दु:खशिल्प कोरत आहेत. ( उदा.लेण्यांची निर्मिती डोळ्यांसमोर आणा ) सामोऱ्या निर्मम परिस्थितीतून जगण्याचं , निर्मितीचं शिल्प घडवत आहेत जे सुंदर आहे पण दु:खमय. कदाचित दु:खामुळेच त्याला सौंदर्य आलंय.
दुसऱ्या कडव्यातली माणसे खोदताहेत..शोधताहेत ..उत्खनन करताहेत , ही प्रक्रिया जराशी वेगळी आहे.सौंदर्यापेक्षा सत्याचा ध्यास आहे पण त्याचंही पुढे कथानक होणारच आहे ( संहितेत कोंडतात )
शेवटच्या कडव्यात सारांश आहे ..
इतकं पुरे Happy

कविता वाचून झाल्यावर त्यावर अमितव आणि दिनेश यानी उपस्थित केलेल्या अर्थासंबंधीच्या शंका मला फार आवडल्या. कविता समजली नाही किंवा ती मनी पोचली नाही तर होणारी अस्वस्थता कशाप्रकारे असते याचा मी वेळोवेळी अनुभव घेतला आहे. कवी वा कवयित्री ओळखीचे असतील तर थेट त्या शंका विचारायला मन अडखळत नाही. पण कित्येकदा ओळख नसताना तशी अडचण शब्दरुपाने इथे मांडली तर ती व्यक्ती कदाचित दुखावेल जाईल का अशी (निरर्थक म्हटली जाणारी...) भीतीही मनी घर करून राहते....म्हणून काही प्रतिसाद न देताही मी कित्येकवेळा मुकाटही बसल्याची उदाहरणे घडली आहेत.

पण भारती यांची अशा शंकांना सहजतेने सामोरे जाऊन अत्यंत कोरीव लेण्यासारखा अभ्यासपूर्ण प्रतिसाद देवून आवश्यक तो खुलासा करण्याची जी विलक्षण अशी हातोटी आहे, ती पाहताना वा वाचताना मन अगदी भरून येते.

सरस्वती प्रसन्न आहे भारतीवर.

सुंदर रचना...

अभिनंदन भारतीताई

मनात असलेल्या प्रतिमा काव्यातून व्यक्त केल्यनंतर त्याबद्दल गद्यातून मांडता येणे हे खरोखरच थोर आहे.

फार फार सुरेख ....

सर्व प्रतिसादही वाचनीय, अभ्यासपूर्ण ...

सरस्वती प्रसन्न आहे भारतीवर. >>>> अग्दी अग्दी ...