द्विधा की दुटप्पी

Submitted by चेतन सुभाष गुगळे on 1 June, 2015 - 10:42

2 sides of faces.jpg

२००० सालच्या फिर भी दिल है हिंदुस्तानी चित्रपटाचं शीर्षक गीत मोठं गमतीशीर आहे. "हम लोगोंको समझ सको तो समझो दिलवर जानी, जितना भी तुम समझोगे होगी उतनी हैरानी" या ओळींनी सुरू होणाऱ्या या गीतात पुढे अनेक परस्परविरोधी वागण्याची उदाहरणे देऊन भारतीय समाजमन कळण्यास कसे अवघड आहे ते स्पष्ट केले आहे. नव्वदच्या दशकापासून आज २०१५ पर्यंत या परस्परविरोधी वर्तणुकीत काही बदल झाला आहे का यावर एक दृष्टिक्षेप टाकूयात.

नव्वदच्या दशकात गोविंदा आणि करिश्मा कपूर यांच्या प्रमुख भूमिका असलेला खुद्दार नावाचा एक हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यातले "बेबी, बेबी, बेबी मुझे लोग बोले; हाय बेबी हॅल्लो बेबी क्यों बोले" हे गीत फारच गाजले. सुरुवातीला ह्या गीतात बेबी हे सामान्य नाम नसून त्या जागी एक वेगळेच इंग्रजी विशेषण होते. हे इंग्रजी विशेषण आपल्या समाजाला इतके निषिद्ध होते की त्याचा खासगी चर्चांमध्ये दबक्या आवाजात उच्चार होत असला तरी ते जाहीर रित्या वापरणे म्हणजे महापाप होते. त्यामुळे जनमताचा रेटा विरोधात जाताच गीतात सुरुवातीला असलेले "सेक्सी" हे विशेषण बदलले जाऊन तेथे बेबी हे सामान्य नाम टाकण्यात आले. १९९४ साली जरी ही घटना घडली असली तरी प्रत्यक्षात त्याच्या फार आधी पासूनच वर लिहिल्याप्रमाणे खासगी चर्चांमध्ये हे विशेषण वापरले जात होते, परंतु जाहीर रित्या गीतात ते वापरले जाणे आपल्या समाजाला रुचले नाही. आता मात्र सर्रास हे विशेषण अनेक चित्रपटांमधील संवाद व गीतांत वापरले जाते व त्याबद्दल कोणास काही आक्षेप असल्याचेही दिसत नाही. त्याच बरोबर अनेक लेखांमध्ये, जनतेच्या सहज संवादांतही ह्या विशेषणाचा वापर केला जातो. इतकेच काय दरवर्षी स्त्री व पुरुषांमध्ये स्पर्धा होऊन ह्या विशेषणाने त्यातील विजेत्यांना गौरविले जाते. मग आपण १९९४ मध्ये व त्यापूर्वी जे लपतछपत करायचो ते आता उघड उघड करू लागलो आहोत असा त्याचा अर्थ घ्यावा का? आता आपण दुटप्पी राहिलो नाही असे समजायचे का?

हे इंग्रजी विशेषण अर्थात सेक्सी ह्या शब्दाचे शब्दकोशातील अर्थ - (१) लैंगिक आकर्षण निर्माण करणारी व्यक्ती, (२) स्त्री-पुरुषांच्या सहजप्रवृत्तींबद्दल फाजील आकर्षण असणारी व्यक्ती, (३) पुरुषांना आकर्षक वाटणारी स्त्री किंवा स्त्रियांना आकर्षक वाटणारा पुरुष असे दिलेले आहेत. आता जर प्रत्येक व्यक्तीने केवळ आपल्या लग्नाच्या जोडीदारासोबत लैंगिक संबंध ठेवणे आपल्या संस्कृतीला अपेक्षित असेल तर एखादी व्यक्ती तिच्या जोडीदाराव्यतिरिक्त इतरांना "सेक्सी" वाटणे उचित आहे काय? तसेच एखादी व्यक्ती "सेक्सिएस्ट" पुरस्काराची मानकरी कशी काय ठरू शकते? आणि समजा असा पुरस्कार एखादी अभारतीय संस्था एखाद्या भारतीय व्यक्तीला देत असेल तरी भारतीय समाजात ती बातमी इतकी चर्चेची कशी काय ठरू शकते? की मग दीपिका पदुकोण ने होमी अदजानिया यांच्या दृकश्राव्य लघुपटात व्यक्त केल्याप्रमाणे विवाहपूर्व / विवाहबाह्य लैंगिक संबंध ठेवणे हा प्रत्येकाचा व्यक्तिगत "चॉइस" असून सर्वांनाच तसे स्वातंत्र्य आहे? तसे असेल तर ज्याप्रमाणे एखादा अविवाहित / एकटा पुरुष त्याला आवडलेल्या त्याच्या परिचयातील एखाद्या अविवाहित / एकट्या महिलेला विवाहाचा प्रस्ताव देऊ शकतो तितक्याच खुलेपणाने एखादा अविवाहित / विवाहित पुरुष त्याला आवडलेल्या त्याच्या परिचयातील एखाद्या अविवाहित / विवाहित महिलेला विवाहपूर्व / विवाहबाह्य लैंगिक संबंधांचा प्रस्ताव देऊ शकतो का? त्याचे असे विचारणे हे सुद्धा फार मोठा सामाजिक / नैतिक / कायदेशीर अपराध ठरू शकते. ती महिला त्याच्या कार्यालयातील सहकारी असेल तर त्याच्यावर कार्यालयीन नियमांनुसार लैंगिक शोषणाचा गुन्हा देखील नोंदविला जाऊ शकतो. इतकेच नव्हे तर हे इंग्रजी विशेषण एखादी व्यक्ती "सेक्सी" दिसते असे तिच्या अपरोक्ष दोन वा अधिक व्यक्तींनी आपसात संभाषण करताना वापरले जाणे इतकाच ह्या विशेषणाचा व्यावहारिक उपयोग आहे. एखाद्या व्यक्तीला "तू सेक्सी दिसते" असे तोंडावर म्हणण्याचा (काही उच्चभ्रू गटांतील अत्यल्प अपवाद वगळता) प्रवाद अजून तरी आपल्या समाजात नाही. एखाद्या पुरुषाने एखाद्या स्त्रीला तसे म्हणणे म्हणजे स्वतःवर विनयभंगाचा गुन्हा ओढवून घेण्यासारखे आहे. असे असताना चित्रपटांतील गीते व संवादांतून या विशेषणाचा इतका भडिमार कशाकरिता? व कुणीच याला आक्षेप का घेत नाही? "माय नेम इज शीला, शीला की जवानी; आय ऍम टू सेक्सी फॉर यू, मै तेरे हाथ ना आयी" हे गीत लहान मुले गातात, त्यावर नाचतात. पालकही त्यांचे कौतुक करतात, पण जर मुलांनी या इंग्रजी विशेषणाचा अर्थ विचारला तर शब्दकोशात जे अर्थ दिले आहेत ते मुलांना सांगण्याची पालकांची तयारी आहे का? एक लहान मुलगा आईला या विशेषणाचा अर्थ विचारतो तेव्हा आई त्याला सेक्सी म्हणजे सुंदर असे उत्तर देते. पुढे तो मुलगा त्याच्या संपर्कात येणाऱ्या व त्याला सुंदर वाटणाऱ्या प्रत्येक व्यक्ती व वस्तूला "सेक्सी" म्हणू लागतो आणि मोठाच गोंधळ उडतो असे एका मराठी नाटकात पाहिल्याचे स्मरते.

या विशेषणालाच अनुसरून पुढचा मुद्दा पोशाखाचा. एखाद्या स्त्रीने कसा पोशाख परिधान करावा याचे तिला स्वातंत्र्य असावे. तिने अंगप्रत्यंगाचे प्रदर्शन करणारा पोशाख घातला म्हणून तिला त्यावरून "जज" करू नये. हेही बोधामृत महान विदुषी दीपिका पडुकोण यांनी त्यांच्या उपरोक्त होमी अदजानिया कृत दृकश्राव्य लघुपटातून प्रेक्षकांना पाजले आहे. परंतु यात थोडीशी गफलत आहे. त्यांच्याच आधीच्या विधानानुसार विवाहपूर्व / विवाहबाह्य लैंगिक संबंध ठेवणे हा प्रत्येकाचा व्यक्तिगत "चॉइस" असून सर्वांनाच तसे स्वातंत्र्य आहे. मग आता स्वातंत्र्य जोपासायचे तर अशा प्रकारे विवाहपूर्व / विवाहबाह्य लैंगिक संबंध ठेवणाऱ्या स्त्री-पुरुषांचे मीलन व्हायला हवे. पण ते कसे होणार? कारण उघड उघड असे कुणी कुणाला विचारू तर शकत नाही ना की तू माझ्याशी असे संबंध ठेवशील का? कारण प्रत्येक व्यक्ती अशा विचारांची नसते. विचारणाऱ्याने दीपिकाबाईंच्या विधानावरून मोठी स्फूर्ती घेत विचारले आणि ज्या व्यक्तीला विचारले ती एखादी सती सावित्री असली तर मोठीच आफत ओढवणार. खरे तर याची तरतूदही आपल्या पूर्वसुरींनी करून ठेवली आहेच. आपल्या संस्कृतीत जसा एकपत्नीव्रती राम होता तसा सोळा सहस्र पत्नी असणारा कृष्ण देखील होता. पतिव्रता सती सावित्री होती तशी पाच पती असूनही कृष्णाला सखा मानणारी आणि पुन्हा कर्णाकरिता मनोमन झुरणारी द्रौपदीदेखील होती. तेव्हा लैंगिक संबंध ठेवण्यावरून विविध विचारसरणीच्या व्यक्ती आपल्या इतिहासात पूर्वीपासूनच होत्या. पण कोणी एकमेकांना थेट विचारत नसे. प्रसिद्ध लेखक द. मा. मिरासदार यांनी त्यांच्या "व्यंकूची शिकवणी" या कथेत व्यंकू त्यांच्या मास्तरांना बाई ठेवायची कशी याचे अमूल्य मार्गदर्शन करताना आधी असल्या प्रकारची बाई ओळखायची कशी याच्या टिप्स देतो. त्यात बाईच्या पोशाखाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. तसेच तिचे चालणे, हावभाव इत्यादी. असल्या प्रकारची बाई कशी ठुमकत ठुमकत चालते याचे अचूक धडे व्यंकू मास्तराला देतो. त्याचप्रमाणे अशा बायकांची ओळख पटायचे अजून एक लक्षण म्हणजे त्यांच्या कपाळावरील कुंकू, टिकली इत्यादी. "पहिले कावळे संमेलन" ह्या प्रसिद्ध मराठी कथेत सर्व कावळे आडनावाच्या मंडळींचे संमेलन भरलेले असता भर सभेत व्यासपीठावरून एक ज्येष्ठ सौ. कावळे नव्या पिढीतील कावळे महिलांना मार्गदर्शन करताना म्हणतात, "आमचं लग्न झाल्यापासून मी चांगलं रुपयाएवढं ठसठशीत कुंकू लावतेय की ते दोन मैलांवरून पाहणाऱ्याला देखील व्यवस्थित दिसू शकतं. आजच्या पोरी टाचणीच्या टोकानं लावावं तसं एवढंसं कुंकू लावतात की त्या कुमारिका आहेत, सौभाग्यवती आहेत, विधवा आहेत, परित्यक्ता आहेत की मेल्या बाजारबसव्या आहेत तेच कळत नाही. " असो. तर पोशाख, केशभूषा व इतर शृंगाराची साधने, बाहेर फिरण्याच्या वेळा यातून व्यक्तीच्या "सेक्स ओरिएंटेशन" विषयी सिग्नल्स जातात असा पूर्वी समज होता. म्हणजे उत्तान कपडे घातलेली, भडक लिपस्टिक लावलेली, रात्री बेरात्री फिरणारी बाई "तसली" असा समज इतर पुरुष करून घ्यायचे आणि तिच्यापासून दूर व्हायचे तर "तसली" बाई म्हणजे "आपल्यातली" असा समज "तसले" पुरुष करून घ्यायचे आणि एक पाऊल पुढे टाकायचे. पंडिता दीपिकाबाई म्हणतात असा काही फरक नाहीच. बाईने कसाही पोशाख केला, ती रात्री बेरात्री एकटी फिरली तरी त्याच्यावरून तिला "जज" करायचे नाहीच. तसा चित्रपटांमधून हा फरक कधीच संपला होता. शिरीष कणेकर लिहितात - "पूर्वीच्या चित्रपटांमधून सोज्वळ कपड्यांत वावरणारी, स्वरात मार्दव असणारी नायिका असायची. स्वरांत सूचक चढ उतार ठेवून बोलणारी खलनायिका असायची. मादक शृंगार करणारी व उत्तान पोशाखात वावरणारी कॅब्रे डान्सर असायची. आजकालच्या चित्रपटांतून नायिका, खलनायिका, कॅब्रे डान्सर सगळ्या सारख्याच प्रकारचे पोशाख करतात, स्वरांत सारख्याच प्रकारचे चढ उतार काढत बोलतात, एकसारखाच मेक-अप करतात. काही फरकच राहिला नाही. नायिका, खलनायिका, कॅब्रे डान्सर एकमेकींपासून वेगळी ओळखायची कशी? " दीपिकाजींनी तर वास्तवातल्या महिलांमधलाही फरक संपवून टाकला. पण त्यांमुळे त्यांच्यासारखेच उदात्त विचार असणाऱ्यांचीच खरी गोची झालीय. कारण वस्त्रप्रावरणांवरून महिलेच्या विचारसरणीचा अंदाज लावायचा नाही तर विवाहबाह्य / विवाहपूर्व संबंधांकरिता तशी महिला ओळखून एखाद्या महिलेला एखाद्या पुरुषाने प्रस्ताव द्यावा तरी कसा? कारण जर तसे करायचे स्वातंत्र्य आहे म्हणता तर आधी तसा प्रस्ताव एकमेकांना द्यायला नको का? मग आधी अशी महिला ओळखता तरी यायला नको का? की असा प्रस्ताव देण्याचे स्वातंत्र्य फक्त स्त्रीला आहे? महान तत्त्ववेत्त्या दीपिका यांनी आपले विचार अधिक विस्ताराने मांडावेत जेणेकरून त्यातून परस्परविरोधी अर्थ निघून भक्तगणांचा गोंधळ उडू नये.

वस्त्रप्रावरणांना अनुसरूनच अजून एक मुद्दा तो म्हणजे अशी तोकडी वस्त्रप्रावरणे परिधान करणारी महिला वाईट चालीरीतीचे आहे असे समजायचा पुरुषांना मुळीच अधिकार नाही पण अशा तोकड्या वस्त्रांतील महिलेची छायाचित्रे पाहणारा पुरुष मात्र वाईट, आंबटशौकीन. तसेच अशा प्रकारची अल्पवस्त्रांकिता महिलेची छायाचित्रे किंवा अशी छायाचित्रे असलेली नियतकालिके आपल्या महिला सहकाऱ्याला दाखविणारा पुरुष मात्र लगेच त्या महिलेचे लैंगिक शोषण / विनयभंग करणारा आरोपी ठरतो. हाच मुद्दा पुढे जाता जाता पोचतो तो थेट पोर्नोग्राफीपर्यंत. सनी लिऑन ही अनेकांकरिता प्रातःवंदनीय असणारी महिला कधी काळी पोर्न फिल्म्समध्ये काम करीत असे. त्यामुळे तिला माजी न्यायमूर्ती मार्कंडेय काटजू यांनी पतिता (अर्थात नैतिक अधःपतन झालेली स्त्री किंवा हिंदीत गिरी हुई औरत) असे म्हटले. झाले मोठाच गदारोळ उडाला. समाजात तसेच प्रसार माध्यमांत असलेले सनी बाईंचे भक्त मोठ्या प्रमाणात चिडले. पोर्नपटांत (खरे तर यांना पोर्नपट म्हणावे तरी कसे? कारण पट म्हणजे कपडे आणि पोर्न फिल्म्समध्ये कपड्यांचे स्थान तरी काय? असो. ) काम करणे सनीताईंचा उदरनिर्वाहाचा भाग होता. चरितार्थाकरिता असे काम केल्याने सनीताई वाईट चारित्र्याच्या ठरत नाही असा भक्तांचा दावा. काटजूंनी सनीताईंचे चारित्र्यहनन करणारे वक्तव्य केल्याने त्यांना भक्तांच्या मोठ्या जहाल टीकेला सामोरे जावे लागले. यानंतर याच सनीताईंनी काम केलेल्या एका पोर्नपटाचा आस्वाद घेत असताना कर्नाटक विधानसभेच्या तीन सदस्यांना गॅलरीतील पत्रकारांनी कॅमेऱ्याद्वारे रेड हॅण्ड (की ब्ल्यू हॅण्ड) टिपले. झाले पुन्हा एकदा मोठा गदारोळ उडाला. कर्नाटक विधानसभेचे हे तीन आमदार पोर्नपट पाहिल्यामुळे सैल चारित्र्याचे (लूझ कॅरेक्टर) ठरविले जाऊन विधानसभेतून निलंबित झाले. काहींनी असाही युक्तिवाद केला की, विधानसभेच्या कामकाजाच्या काळात त्यांनी पोर्नपट पाहिले म्हणजे ज्या कामाचे त्यांना वेतन / मानधन मिळते त्यात त्यांनी चुकारपणा केला म्हणून त्यांना ही शिक्षा झाली. पण असे असेल तर कामकाजाच्या वेळी वर्तमानपत्रे वाचणाऱ्या, मोबाईल फोनवर अथवा बाजूच्या सहकाऱ्याशी गप्पा मारणाऱ्या, झोपणाऱ्या अशा किती सदस्यांना आजवर शिक्षा झाली? खरी गोष्ट ही की पुरुषांनी पोर्नफिल्म पाहणे म्हणजे त्यांचे चारित्र्य घसरल्याचे लक्षण असे आपली संस्कृती मानते आणि त्यामुळेच ह्या सदस्यांना शिक्षा झाली. गंमत म्हणजे सनीताईंच्या बाजूने काटजूंविरोधात बोलणारे भक्त या तीन विधानसभा सदस्यांची बाजू घेण्यास मात्र पुढे सरसावले नाहीत. पोर्नफिल्म मध्ये काम करणे हे नैतिक अधःपतन नसले तरी अशी फिल्म पाहणे मात्र अनैतिक असल्याचे मानणारा भारत हा कदाचित एकमेव देश ठरावा.

पूर्वीच्या काळी अमर प्रेम चित्रपटात किशोर कुमार यांच्या आवाजात राजेश खन्नाने आनंद बक्षींच्या शब्दांतून त्या वेळच्या समाजाचे वर्णन केले होते.

कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना
छोडो, बेकार की बातो में, कही बीत ना जाए रैना

या गीतात पुढे खालील शब्दांतून हे वर्णन कळते -

हमको जो ताने देते है
हम खोये हैं इन रंगरलियों में
हमने उनको भी छुप छुप के
आते देखा इन गलियों में

म्हणजे तेव्हा त्या गल्ल्या बदनाम होत्या आणि तिथे जाणारे गुपचूप जायचे त्यामुळे ते बदनामीपासून वाचायचे व जे उघडपणे जायचे त्यांना मात्र ते टोमणे मारायचे. आता अशी कामे करणाऱ्या बायका समाजात उघडपणे आपण हे काम करतो हे मान्य करतात तर त्या बदनामीपासून वाचतात आणि जे लोक लपून छपून त्यांची ही "कामे" पाहतात ते जर कधी पकडले गेले तर ते मात्र बदनाम होतात. वा! समाज बदलला, अगदी १८० अंशात त्याने यूटर्न घेतला, पण तरीही तो दुटप्पीच राहिला पूर्वी स्त्रियांना बदनाम करणारा तर आता पुरुषांना बदनाम करणारा. पण शेवटी दुटप्पीच.

भ्रष्टाचार, लाचखोरी यांबाबत देखील भारतीयांची अशीच परस्परविरोधी मते आहेत. लाच देऊ नये, घेऊ नये असे तात्त्विक पातळीवर सर्वच जण म्हणतात. प्रत्यक्ष व्यवहारात मात्र लाच देण्यास विरोध करणारा इतर सर्वांच्या दृष्टीने मूर्ख ठरतो. शासकीय दरबारातील आपले काम वेळेत मार्गी लागण्याकडे शहाण्या माणसाने लक्ष केंद्रित करावे. लाचखाऊ कर्मचाऱ्यांना विरोध करण्यात आपली ऊर्जा व्यथा खर्च करू नये असे मौलिक बोल त्यास इतरांकडून नेहमीच सुनावले जातात. माझ्याकडे असलेली विद्युत ठेकेदाराची अनुज्ञप्ती नूतनीकरण करण्याकरिता मी दरवर्षी उद्योग, ऊर्जा व कामगार विभागात जात असतो. तिथले कारकून, अभियंते आणि शिपाई काही ना काही रक्कम मागतात. मी कधीच त्यांना अशी अतिरिक्त रक्कम देत नाही. परंतु माझ्यासोबत आलेले इतर विद्युत ठेकेदार मात्र मागणी होण्यापूर्वीच कर्मचाऱ्यांना स्वतःहून १०० ते ५०० रुपयांपर्यंत बक्षिसी देतात. शिवाय मी अशी बक्षिसी देत नाही म्हणून मी कसा चुकतोय यावर मला ते उपदेशही करतात. जवळपास सर्वच शासकीय कार्यालयांमध्ये मला असाच अनुभव येतो. शासकीय अधिकारी / कर्मचाऱ्याला लाच घ्यायची जितकी इच्छा नसेल त्यापेक्षा जास्त त्या कर्मचाऱ्यासमोर रांगेत उभे असणाऱ्या नागरिकांना ती द्यायची हौस असते.

बरे, ह्या लाच खाणाऱ्या शासकीय मंडळींचीही अजब तर्कटे / तत्त्व असतात. काही वर्षांपूर्वी मी एका शेअर रिक्षातून प्रवास करीत होतो. उण्यापुऱ्या अर्ध्या तासाचा तो प्रवास, पण त्यातही मंडळींना आपले तत्त्वज्ञान इतरांना उपदेश रूपाने ऐकविण्याची ऊर्मी आली होती. खरे तर विश्वास पाटील यांच्यासारखे लेखक ग्रामीण भागातील गरिबीविषयी झाडाझडती, पांगिरा सारख्या पुस्तकांतून भरभरून लिहितात आणि वाचकांना त्यांचे डोळे भरभरून अश्रू वाहायला भाग पाडतात. परंतु विनोदी लेखक द. मा. मिरासदार वाचकांना हसविण्यासोबतच ग्रामीण भागातील गरिबीमागचे खरे कारण सांगतात. त्यांच्या कथांमधील ग्रामीण पात्रे कितीही महत्त्वाचे काम असले तरी ते सोडून अगदी अनोळखी गावकऱ्यांनीही "राम राम पाव्हणं" म्हणत हाक मारली की पारावर बसून, तंबाखूची चंची सोडत तास दोन तास गप्पा हाणल्याशिवाय पुढे जात नाहीत. "निरोप" या त्यांच्या कथेत एका महिलेच्या प्रसृतीवेदनांतून तिची सुटका करण्याकरिता तालुक्याच्या गावी जाऊन महिला डॉक्टरला बोलावण्या करिता धाडलेला निरोप पोचविणारी व्यक्ती एकतर स्वतः ते काम करीत नाहीच, दुसऱ्याला सांगते, दुसरी तिसऱ्याला आणि तिसरी चौथ्याला असा त्या निरोपाचा प्रवास होतो आणि शिवाय प्रत्येक व्यक्ती प्रत्येक टप्प्यावर गावकऱ्यांसोबत दोन चार तास गप्पा मारण्यात घालवून तो निरोप दोन दिवस उशीराने आणि चुकीच्या व्यक्तीस चुकीच्या पद्धतीने मिळतो. असो. तर विषय होता भारतीयांच्या गप्पा मारण्याचा. तर त्या शेअर रिक्षात एक वाहतूक पोलिसही होता. साहजिकच वाहतूक पोलिसांच्या पैसे खाण्यावर विषय वळला. आपण वाहनचालकांकडून लाच खातो हे त्याने खुल्या मनाने मान्य केले. "पण हां ... ह्यो हरामाचा पैका कधी घरच्या मंडळींवर खर्च केला नाय. " अशी पुस्ती जोडायला तो विसरला नाही. वाईट मार्गाने, बेइमानीने कमाविलेला पैसा त्याने बाई, बाटली, जुगार असल्या वाईट गोष्टींवरच खर्च केला. बायकामुलांकरिता अन्न, कपडेलत्ते, शैक्षणिक साहित्य यावर त्याने फक्त इमानदारीचा म्हणजे पगारातून मिळालेलाच पैसा खर्च केला होता. आपण वाईट मार्गातून मिळविलेला पैसा वाईट गोष्टींवरच खर्च केला त्यातला जराही अंश बायकापोरांवर खर्च न केल्याने त्यांना कुठलेही भोग, तळतळाट भोगावे लागणार नाहीत याचे त्याला आत्यंतिक समाधान वाटत होते. तसेच हा हरामाचा पैसा ज्या लोकांना लुबाडून कमाविला त्यांचे तळतळाट लागलेच तर ते त्या दारू दुकानदाराला, त्या वेश्येला लागतील ज्यांच्यावर आपण तो पैसा खर्च केला. त्याचे हे अफलातून तत्त्वज्ञान माझ्या काही पचनी पडले नाही, परंतु आजूबाजूची मंडळी ज्या कौतुकाने माना डोलावीत होती त्यावरून त्यांना हे तत्त्व मान्य असून भविष्यात कधी त्या वाहतूक पोलिसाने त्यांना लाच मागितली तर कुठलीही खळखळ न करता ते ती देतील असेच त्यांच्या चेहऱ्यावरून भासत होते. खरे तर ज्या कर्तव्याकरिता त्या पोलिसाला शासकीय नोकरीचे वेतन मिळते त्या कर्तव्यपालनातच तो लाच खाल्ल्यामुळे खरा ठरत नाही. त्यामुळे वेतनातून मिळालेला पैसा हा देखील बेइमानीचाच ठरतो हा साधा तर्क त्याला समजू नये हे मोठे आश्चर्य असले तरी मी त्याला ते समजावण्याचा प्रयत्न करणे हे त्याहून व्यर्थ असल्याने मी तसा काही प्रयत्न अजिबात केला नाही.

जातीयवादाविषयी देखील हीच समस्या आहे. भैरप्पा यांच्या एका कादंबरीत एक ब्राह्मण कन्या व एक क्षत्रिय तरुण यांच्या प्रेमाला त्यांच्या घरातून मोठा विरोध असतो. त्यातही विशेषकरून मुलीच्या वडिलांचा विरोध तीव्र असतो. त्यांच्या मते ह्या परंपरांचे पालन करण्याची जबाबदारी ब्राह्मण असल्यामुळे त्यांच्यावर आहे आणि त्यांनीच जर परंपरेविरुद्ध आंतरजातीय विवाह होऊ दिलेत तर समाज बुडायला कितीसा वेळ लागणार? नंतर काही दिवसांनी त्या ब्राह्मणकन्येच्या लक्षात येते की आपले वडील एका अस्पृश्य महिलेसोबत विवाहबाह्य संबंध ठेवून आहेत. आपल्या आंतरजातीय विवाहाला विरोध करणाऱ्या वडिलांना ती त्यांच्या या कृत्याचा जाब विचारते. तेव्हा ते म्हणतात की त्या स्त्रीबद्दल आकर्षण निर्माण होणे व त्यानंतर तिच्याशी शरीरसंबंध ठेवणे ही नैसर्गिक घटना आहे तिथे मानवनिर्मित नियम आडवे येऊ शकत नाहीत. परंतु विवाह हा एक मानवनिर्मित संस्कार असल्याने तो करताना मानवनिर्मित नियम पाळणे भागच आहे. आपल्या दुटप्पी वागण्याचे समर्थन करताना त्या ब्राह्मणाने केलेला युक्तिवाद वाचकांच्या बुद्धीला चक्रावून टाकतो. अर्थात ही जुन्या काळातील गोष्ट झाली. आजच्या काळात जातीयवादाचा विखार कमी व्हावा म्हणून सरकार आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देते. असे विवाह करणाऱ्या जोडप्यास रुपये पन्नास हजार पर्यंतच्या संसारोपयोगी वस्तू देण्याची एक सरकारी योजना आहे. परंतु त्याचवेळी असे विवाह मोठ्या प्रमाणात होऊच शकणार नाहीत याचीही काळजी शासनाने घेतली आहे. आता असे आंतरजातीय विवाह ठरवून थोडीच होणार? झालेच तर ते प्रेमविवाह होणार. परंतु त्याकरिता प्रेम व्हायला हवे व प्रेमाकरिता जवळीक हवी. नेमकी ही जवळीकच होऊ नये याची खबरदारी शासनाचा ऍट्रॉसिटी ऍक्ट घेतो. आता दोन शेजाऱ्यांमध्ये कधी ना कधी किरकोळ भांडणे ही होणारच, परंतु एक शेजारी खुल्या प्रवर्गातला आणि दुसरा दलित असेल तर भांडण झाल्यास तक्रार करताना ऍट्रॉसिटी ऍक्टचा दुरुपयोग होऊ शकतो या भयाने खुल्या प्रवर्गातील लोक दलित वस्तीत घर घेत नाहीत किंवा स्वतःच्या वसाहतीत दलित व्यक्तीस घर विकत घेऊ देत नाहीत. जातीजातीतल्या भिंती भक्कमपणे उभ्या राहाव्यात अशीच या कायद्याने व्यवस्था करून टाकली असूनही दुसरीकडे शासन जातिभेद कमी करायच्या बाता मारीत असते.

गुन्हेगारांविषयी देखील भारतीय समाजाची अशीच परस्परविरोधी मानसिकता असल्याचे आढळून येते. एखादा खिसेकापू किंवा साखळीचोर गर्दीच्या हाती लागला की त्याला मरेपर्यंत बेदम मारून मगच पोलिसांच्या ताब्यात देण्यात इथला जमाव तत्पर असतो. परंतु मोठ्या प्रमाणात बँकांना लुबाडणारे विजय मल्ल्यांसारखे उद्योगपती किंवा हर्षद मेहतांसारखे शेअर दलाल यांच्याबद्दल मात्र जनतेच्या मनात घृणा, राग, तिरस्कार दिसण्याऐवजी कौतुक, आदर अशाच भावना असल्याचे दिसून येते. याविषयी बोलताना एका विद्वानाने मला सांगितले की जनतेला त्यांच्या बदमाषीचे नाही तर हुशारीचे कौतुक वाटते. बदमाषी तर कित्येकांच्या मनात असते पण सर्वच जण अशी अब्जावधी रुपयांची अफरातफर करू शकतात काय? ह्यांना कसे शक्य झाले? हे कौशल्य यांच्या ठायी कुठून आले याबद्दल हे कौतुक असते. मुख्य म्हणजे ह्या लोकांना ही संधी कशी काय मिळाली? हे सर्वात महत्त्वाचे. संधी मिळाली असती तर जनतेतले इतरही अनेक जण मल्ल्या व मेहतांसारखेच वागले असते. संधीविना चारित्र्यवान राहिलेल्या लोकांची संख्या आपल्या समाजात फार मोठी आहे. अशा लोकांना मग असा एखादा मल्ल्या किंवा मेहता दिसला की त्यांचे कौतुक उफाळून येत असते.

दारू पिणे (व तंबाकू आदी इतरही व्यसने) याविषयीही आपली समाजधारणा अशी परस्परविरोधीच राहिली. सार्वजनिक चर्चांमध्ये या व्यसनांना सर्वांनी नावेच ठेवली पण प्रत्यक्षात व्यसनांचे उदात्तीकरणही थांबले नाहीच. मोठमोठ्या लेखकांच्या कादंबऱ्यात मद्यपानाची सविस्तर वर्णने येतच राहतात. नायकाने कामगिरीवर जाण्यापूर्वी कसा व्हिस्कीचा जळजळीत घोट घेतला, मग त्याने धाडसाने कसे आपले ध्येय गाठले या सर्व बाबींचा वाचकांच्या मनावर परिणाम होऊन मद्यपींच्या संख्येत वाढ होऊ शकेल ही शक्यता ह्या विद्वानांनी कधीच विचारात घेतली नसेल का? तीच बाब चित्रपटांबाबतही. मद्यपान व धूम्रपानाची दृश्ये सेन्सॉर बोर्डाने गाळायला सांगितली तर मोठा गहजब करणाऱ्या या चित्रनिर्मात्यांना आपल्या सामाजिक जबाबदारीचे काहीच भान नाही का?

अशा कित्येक गोष्टी सांगता येतील जिथे सोयीनुसार समाजाकडून स्वतःच्या परस्परविरोधी भूमिका इतक्या वेगाने बदलल्या जातात की पडोसन चित्रपटातील मेहमूदप्रमाणे "या तो घोडा बोलो या चतुर बोलो; यह घोडा चतुर घोडा चतुर क्या है जी? " असे ओरडून विचारावेसे वाटते. अर्थात त्या चित्रपटातदेखील गाता न येताही पार्श्वगायक मित्राच्या मदतीने लबाडी करून तसे भासविणारा नायक आधी नायिकेशी जवळीक साधतो. मग स्वतःचे न्यून उघड झाल्यावर नायिका जेव्हा स्वतःच्या गायन शिक्षकाशी विवाह करायला जाते तेव्हा रडीचा डाव खेळूनच तिला आपलीशी करतो. सत्याच्या मार्गाने चित्रपटातल्या नायकालाही विजय मिळविता आला नाही तर तो वास्तव समाजातल्या सामान्य माणसाला तरी कसा मिळविता येणार?

आपला समाज असा परस्परविरोधी का वागतो याचे उत्तरही समाजधुरीणांनी मोठ्या चतुराईने देऊन ठेवलेय. त्यांच्या मते आधी आपल्याकडे राजेशाही होती ती जाऊन मग इंग्रजांचे राज्य आले. इंग्रजी विचारसरणीने येथील जनमानस ढवळून निघाले. त्यानंतर स्वातंत्र्य मिळाले. आधी पन्नास साठच्या दशकात इंग्लंड व नंतर सत्तर ऐंशीच्या दशकात अमेरिकेत असे येथील सुशिक्षित जन उदरनिर्वाहाकरिता स्थलांतरित होऊ लागले. एकूणच आपल्या देशात संस्कृतींची सरमिसळ होऊ लागली. १९९२ नंतर जागतिकीकरणामुळे फ्रेंच, जपानी, रशियन, ऑस्ट्रेलियन अशा विविध देशांशी आपले संबंध प्रस्थापित होऊ लागले. जगाच्या नकाश्यावरील बहुतेक देशांमध्ये भारतीय नागरिक दिसू लागले. वेगवेगळ्या खंडांतील संस्कृतींशी आपल्या संस्कृतीचे आदानप्रदान होऊ लागले. आपला देश एका संक्रमणावस्थेतून जाऊ लागला. समाजमन गोंधळू लागले. काही जुनी मूल्ये सुटली तर काहींना अजूनही आपण कवटाळून बसलो तसेच काही नवी मूल्ये आपण सहज स्वीकारली तर इतर काही अजून आपल्या उंबरठ्याबाहेरच आहेत. या सर्वांचा परिपाक म्हणजे भारतीय समाजाकडून घडणारी अशी परस्परविरोधी वर्तणूक.

शिरीष कणेकर लिहितात हा बदल हळूहळू होत गेला. ते लिहितात - "पूर्वी नायिका म्हणायची - एक तू ना मिला, सारी दुनिया मिलेभी तो क्या है? आणि नंतर नायिका म्हणू लागली - आप जैसा कोई मेरी जिंदगीमें आयें तो बात बन जाएं. म्हणजे आधी तुझ्याशिवाय जग मिळालं तरी काही उपयोग नाही आणि नंतर तूच हवास असं काही नाही, तुझ्यासारखाच कोणीही चालेल असा विचारसरणीत बदल होत गेला. "

एखादी व्यक्ती हे करावे की ते करावे अशा गोंधळात सापडून एखाद्या विचारसरणीच्या बाजूने कधी वागत असेल आणि कधी नेमके त्याच्या उलट वागत असेल तर ती व्यक्ती द्विधा मन:स्थितीत आहे असे आपण म्हणतो. याउलट कोणी जर ठरवून मुद्दामच स्वतःच्या सोयीनुसार एखाद्या विचारसरणीच्या बाजूने आणि आपल्या सोयीचे नसेल तेव्हा त्याच्या नेमके उलट वागत असेल तर त्या व्यक्तीची दुटप्पी मानसिकता आहे असे मानले जाते. भारतीय समाजमन द्विधा मन:स्थितीत अडकले असावे असे मानायला मी धजावत नाही, उलट ते दुटप्पी मानसिकतेचेच असावे असे मला वाटते. "यह पूरब है पूरबवाले हर जान की कीमत जानते है" हे तद्दन भंपक वाक्य ऐकविणारा राज कपूर किंवा देशभक्तीचा देखावा करीत केवळ गल्लाभरू चित्रपट काढणारा मनोजकुमार पाहिला की याची पुरेपूर खात्री पटते. या राज कपूरला बंदूक म्हणता येत नाही तिला तो दंबूक म्हणतो इतका तो प्रत्येक चित्रपटात भोळा असतो पण नदीत अंघोळ करणाऱ्या नायिकेची वस्त्रे चोरून तिला मेरे मनकी गंगा और तेरे मनकी जमुना का बोल राधा बोल संगम होगा के नही? असे विचारतो आणि जोवर ती होकार देत नाही तोवर तिची वस्त्रे द्यायची नाहीत हे बरे त्याला समजते. बळजबरीने तिचा होकार तर मिळवतोच वर पुन्हा तिच्याशी लग्न केल्यावर ती मनाने आपली होत नाहीये असे म्हणत तिच्या पूर्वीच्या प्रियकरास आत्महत्या करण्यासही भाग पाडतो. दुसऱ्या एका चित्रपटात म्हातारी केळेवाली दोन आण्याची तीन केळी देत असताना तिच्याशी बराच वेळ तीन आण्याची दोन केळी दे म्हणून हुज्जत घालतो. थोड्या वेळाने हा भोळसट असल्याचा म्हातारीचा समज होतो आणि ती त्याला केळी खाऊ घालते तेव्हा प्रत्यक्षात आपल्याकडे पैसेच नाही म्हणत तो काखा वर करतो. पुढे ह्या म्हातारीचा आणि तिच्यासोबत सर्व वस्तीचाच विश्वास संपादन करून ह्या गरिबांच्या वस्तीला उजाड करून तिथे टॉवर उभारण्याच्या कारस्थानातही सामील होतो. आणखी एका चित्रपटात तर शाळकरी वयातच आपल्या शिक्षिकेला लपून छपून तिच्या खासगी अवस्थेतही पाहतो आणि हा राज कपूर स्वतःला भोळा म्हणवतो. स्वतःला भोळा म्हणत इतरांना हातोहात फसविणाऱ्या बेरकी ग्रामीण भारतीयाचे हा नक्कीच प्रतिनिधित्व करतो म्हणूनच याचे चित्रपट तुफान चालत असत. पुढे अभिनय सोडून केवळ दिग्दर्शन करतानाही राज कपूरचा बेरकीपणा कायमच दिसत राहिला. कधी धबधब्याखाली अंघोळीच्या निमित्ताने तर कधी इतर कुठल्या कारणाने नायिकेचे अंगप्रदर्शन कसे घडत राहील यावर त्याचा सदैव फोकस होता. तो दुसरा भारतकुमार उर्फ मनोजकुमार गोस्वामी देशभक्ती दाखवायला क्रांती चित्रपट काढतो तर मग त्यातल्या जिंदगीकी ना टूटे लडी या गाण्यात नायिकाला फाटक्या चिंध्या गुंडाळून जमिनीवर भर पावसात सरपटायला का लावतो? जयहिंद द प्राईड या चित्रपटात तर त्याचा मुलगा नायक आहे. त्याच्या शस्त्रक्रियेच्या वेळी नेमकी वीज जाऊन अंधार पडतो तेव्हा दोन नायिकांपैकी एक स्वतःचे सगळे कपडे काढून ते जाळते तर दुसरी नायिका त्या उजेडात नायकाची शस्त्रक्रिया करते असे एक अचाट दृश्य आहे. केवळ देशभक्तीवर चित्रपट चालू शकत नाही त्याकरिता नायिकेचे अंगप्रदर्शन अत्यंत गरजेचे आहे असा विचार त्याच्या मनाला शिवतोच कसा? त्याची देशभक्ती शुद्ध नाही की आपल्या देशबांधवांच्या आवडीविषयी त्याला शंका आहे.

दुटप्पी मानसिकतेबद्दल केवळ राज कपूर आणि मनोजकुमार यांनाच दोष तरी का द्यावा? इंग्रज, अमेरिकन आणि जागतिकीकरण यांनाही का द्यावा? ही दुटप्पी मानसिकता भारतीय संस्कृतीत फार पूर्वीपासूनच आहे. रामायणाचेच उदाहरण घ्या.

  1. परशुरामाने एकवीस वेळा पृथ्वी निःक्षत्रिय केली (खरे तर हे वाक्यच अतिशय भंपक आहे. एकदा निःक्षत्रिय केल्यावर दुसऱ्यांदा तशी वेळ आलीच का? पण तूर्तास ते राहू द्या) आणि मग शस्त्रत्याग करायचे ठरविले तेव्हा त्याने आपले शिवधनुष्य राजा जनकाकडे दिले. जनककन्या सीता बालपणी हे धनुष्य घेऊन त्याचा घोडा घोडा करीत खेळत असे. बालपणीच हे प्रचंड शिवधनुष्य लीलया हाताळणाऱ्या सीतेला पाहून परशुरामाने सीतेच्या ताकदीस साजेसा वर शोधण्याची सूचना राजा जनकास केली. त्यानुसार या धनुष्यास प्रत्यंचा लावू शकेल असा वर शोधण्याकरिता स्वयंवर रचले गेले. लंकाधिपती रावणाने ते शिवधनुष्य उचलण्याचा प्रयास केला असता त्यास ते जमले नाही. तो जमिनीवर उताणा पडला व शिवधनुष्य त्याच्या छातीवर पडले आणि ते दूर करण्याकरिता उपस्थितांपैकी चार पाच उमेदवारांची मदत घ्यावी लागली. नंतर श्रीरामाने ते धनुष्य हाती घेतले आणि ते ताणून त्यावर प्रत्यंचा बसवायच्या प्रयत्नात त्याच्या हातून ते तुटले आणि काडकन आवाज आला. म्हणजे तसे पाहता रामानेही पण योग्यरितीने पूर्ण केला नाही. रावणाची ताकद कमी पडली तर रामाने जास्तीची ताकद लावून धनुष्यच मोडून टाकले. सारासार विचार करता रावण जर परिपूर्ण उमेदवार नव्हता तर तसा रामही नव्हताच, पण तरीही सीता त्याला मिळाली.
  2. पुढे रामाला वनवासात जाण्याची आज्ञा झाली तेव्हा सीतेला अशी आज्ञा झाली नसतानाही ती त्याच्या सोबत वनवासात येऊ लागली. रामाने तिला घेऊन जाण्यास नकार दिला असता राजवाड्यात भरत व शत्रुघ्न असताना मी तुमच्या अनुपस्थितीत येथे सुरक्षित राहू शकणार नाही असे तिने श्रीरामास सांगितले. त्यावर आपल्या बंधूंविषयी श्रीरामाने खात्री दिली असता मग सीतेने रामास तुम्ही माझ्यावाचून चौदा वर्षे एकट्याने कसे काय राहू शकाल असा प्रश्न विचारत थेट श्रीरामाच्या पौरुषत्वावरच शंका घेतली. त्यानंतर नाईलाजाने राम सीतेस वनवासात घेऊन गेला.
  3. आपण वनवासात आनंदाने राहू, वल्कले नेसू असे म्हणणाऱ्या सीतेला अचानक एके दिवशी कांचनमृगाच्या कातड्याचा मोह झाला. त्या मृगाला मारून त्याच्या कातडीची चोळी शिवायची तिने ठरविले त्याकरिता तिने रामाला त्या हरिणाची शिकार करण्यास त्याच्या पाठीमागे धाडले. रामाने जाताना लक्ष्मणाला सीतेचे रक्षण करण्यास बजावले. नंतर दूरवर जेव्हा रामाने हरिणाची शिकार केली तेव्हा त्या हरिणाच्या रूपात असणाऱ्या मायावी मारीच राक्षसाने मरतेवेळी "लक्ष्मणा धाव" असे उद्गार रामाच्या आवाजात काढले. तेव्हा रामाच्या मदतीला जाण्याची आज्ञा सीतेने लक्ष्मणाला केली. त्यावर श्रीरामाच्या ताकदीविषयी आपणांस कोणतीही शंका नसल्याचे व सीतेनेही अशी शंका घेण्याचे काही कारण नसल्याचे लक्ष्मणाने सीतेला स्पष्ट केले. तसेच सदर आवाज रामाचा नसून आपण रामाच्या आज्ञेनुसार सीतेच्या रक्षणाकरिता पर्णकुटीतच थांबणार असल्याचेही लक्ष्मणाने सांगितले. त्यावर राम मरावा अशी लक्ष्मणाचीच इच्छा असून त्यापश्चात त्याला आपला लोभ असल्याचा आरोप सीतेने लक्ष्मणावर केला. या आरोपाने व्यथित होत लक्ष्मण तिथून निघून गेला परंतु जाण्यापूर्वी कुठल्याही परिस्थितीत लक्ष्मणरेषा न ओलांडायची सूचना त्याने सीतेला केली. या लक्ष्मणरेषेच्या आत सीता सुरक्षित असतानाही तिने लक्ष्मण तिथून निघून गेल्यावर ती रेषा ओलांडली व नंतर रावणाने तिचे हरण केले.
  4. रावणाने सीतेला अशोक वनात ठेवले. पुढे रामाने रावणाचा वध करून सीतेची सुटका केली व त्याला सीतेला घेऊन अयोध्या गाठण्याची घाई झाली होती कारण चौदा वर्षांचा वनवास संपवून राम ठरल्या वेळी परत न आल्यास अन्नत्याग करून प्राणत्याग करण्याचे भरताने बोलून दाखविले होते. तो समय समीप येत चालला असल्याने त्वरेने अयोध्या गाठणे भाग होते. याकरिता बिभीषणाने खास रावणाचे पुष्पक विमान रामास देऊ केले होते. विमानात बसून लवकर परतीच्या प्रवासास निघायचे असता सीता मात्र व्यथित होऊन अशोकवनातल्या रोपट्यांकडे पाहत बसली होती. आपल्या वास्तव्यात आपण लावलेल्या रोपट्यांना आपल्या पश्चात पाणी देण्याचे काम कोण करील अशी चिंता तिला लागली होती. तेव्हा रामाने चटकन आपल्या भात्यातून एक बाण काढून जमिनीच्या पोटात मारला (पुढे जमिनीने सीतेला गिळंकृत करीत या घटनेचा पुरेपूर सूड उगविला. पण ते असो) व तिथून एक अखंड पाण्याचा झरा निघून रोपट्यांच्या कायमस्वरूपी पाण्याची व्यवस्था केली आणि मग ते अयोध्येच्या प्रवासाला निघाले.

क्रमांक चारच्या प्रसंगात रोपट्यांच्या पाण्याकरिता व्याकूळ होणारे सीतेचे कोमल मन क्रमांक तीनच्या प्रसंगात हरिणाला मारून त्या कातडीची चोळी करण्याचा मोह व्हावा इतके कठोर कसे होते? क्रमांक एकमध्ये बालपणीच लीलया शिवधनुष्य हाताळणारी सीता, भर तारुण्यात तेच शिवधनुष्य छाताडावर पाडून घेणाऱ्या रावणापेक्षा निःसंशय जास्त ताकदवान असूनही क्रमांक तीनच्या प्रसंगात रावणाकडून तिचे अपहरण घडतेच कसे? क्रमांक दोनमध्ये सीतेला वनवासाची शिक्षा झालेली नसतानाही भरत व शत्रुघ्न यांच्या संभाव्य वर्तणुकीविषयी शंका उपस्थित करीत राजवाड्यात राहण्याचे नाकारणारी सीता वनवासात राम व लक्ष्मणासोबत राहण्यास तयार होते आणि पुन्हा लक्ष्मणाच्या हेतूविषयी शंका घेते. सीतेचे सारेच वागणे अचंबित करणारे वाटते. तरीही तिला संशयाचा फायदा देत ती कदाचित दुटप्पी वागत नसून द्विधा मानसिकतेत असावी असे म्हणता येते. परंतु रामायणातील नायिकेच्या वर्तणुकीचे असे तर्कशुद्ध पृथक्करण करण्यास परवानगी न देता तिला क्लीनचिट देत ती शंभर टक्के निर्दोषच होती अशी अंधश्रद्धा बाळगणाऱ्या भक्तांना मात्र दुटप्पी मानसिकतेचेच म्हणावे लागते.
एकीकडे मॅकॉलेला दोष देत नेहमीच ओरडा करायचा की त्याने भारतीय शिक्षण पद्धतीत विद्यार्थ्यांना स्वतंत्ररीत्या विचार करण्यास वावच ठेवला नाही आणि दुसरीकडे एखादा विद्यार्थी ऐतिहासिक महाकाव्यातील पात्रांच्या वर्तणुकीविषयी मुद्देसूद विवेचन करीत स्वतंत्र रित्या काही निष्कर्ष काढू पाहत असेल तर भक्तांच्या भावना दुखू नयेत म्हणून त्याचे स्वतंत्र विचार दाबायचे असा उपद्व्याप इथले ज्येष्ठ अध्यापक करीत असल्याचे पाहून अतिशय वाईट वाटते.

पिंपरी-चिंचवड नवनगरातल्या ज्ञानप्रबोधिनी विद्यालयात मी प्राथमिक व माध्यमिक शालेय शिक्षण घेतले. चौथीत असताना रोज तीस पर्यंतचे पाढे लिहिण्याची आम्हाला सक्ती होती. रोजच्या रोज प्रत्येक तारखेला पाढे लिहिले आहेत की नाहीत हे आमच्या वर्गशिक्षिका तपासत असत. काही दिवसांतच माझे पाढे पाठ होऊन गेले. तरीही सक्ती असल्याने ते रोजच्या रोज लिहिणे क्रमप्राप्त होते. मग या रोजच्या कंटाळवाण्या कामात काही तरी नावीन्य आणावे म्हणून मी आधीच पाठ असलेले हे पाढे कधी सर्व एके म्हणजे २१, २२, २३,..... ३० असे लिहून मग त्याखाली सर्व दुणे म्हणजे ४२, ४४, ४६,... ६० असे करीत दाहे पर्यंत लिहीत असे तर कधी उलट्या क्रमाने प्रत्येक पाढा, तर कधी उलट्या क्रमाने सर्व दाहे आधी मग नवे, आठे असे करीत असे, तर कधी सर्व विषम पाढे एकामागोमाग एक म्हणजे सर्व एके, सर्व त्रिक, सर्व पंचे मग सम म्हणजे दुणे, चोक, सखे असे लिहीत असे. एकदा आमच्या वर्गात आमचे तेव्हाचे प्राचार्य (व नंतर केंद्रप्रमुख बनलेले) श्री. वामन नारायण अभ्यंकर हे आले. ते सहसा नववी व दहावीच्याच विद्यार्थ्यांना शिकवीत असत. चौथीच्या वर्गावर त्यांनी येणे ही आमच्याकरिता मोठी नवलाईची बाब होती. त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना पाढे म्हणावयास सांगितले. आधी २ ते १० पर्यंतचे, मग ११ ते २० व नंतर २१ ते ३० पर्यंतचे. ज्यांना पाढे म्हणता येत होते त्याच विद्यार्थ्यांना उभे राहायला सांगितले न येणाऱ्यांनी बसायचे. ११ ते २० दरम्यान काही विद्यार्थी खाली बसले मग २१ ते २५ मध्ये अजूनही काही जण खाली बसले शेवटी २७, २८ व २९ चे पाढे पाठ असणारे मी व अजून दोनच विद्यार्थी राहिलो. आम्ही तिघांनीही २९ पर्यंतचे सर्व पाढे तोंडपाठ म्हणून दाखविले. मग त्यांनी आम्हाला पाढे उलट क्रमाने म्हणजे आधी दाहे, मग नवे अशा पद्धतीने म्हणून दाखवायला सांगितले. तेव्हा बाकीचे दोघे खाली बसले. मी मात्र तशा पद्धतीने म्हणून दाखविले. त्यानंतर त्यांनी बऱ्याच उलटसुलट पद्धतीने म्हणजे आधी सर्व विषम नंतर सम, त्यानंतर सर्व आडवे, सर्व विषम आडवे, सर्व सम आडवे अशा अनेक प्रकारे मला पाढे म्हणून दाखवायला सांगितले. मी त्यांच्या प्रत्येक पद्धतीप्रमाणे न चुकता पाढे म्हणत गेलो. बराच वेळ अशा पद्धतीने प्रश्नोत्तरे झाल्यावर त्यांनी मला "आजपासून तू माझा मित्र आहेस" असे सांगितले आणि तसे संपूर्ण वर्गासमोरही बोलून दाखविले. माझ्या काहीही अडचणी असतील तर त्या सोडविण्याचे आश्वासन देखील दिले.

मग मी त्यांना ग्रंथालयाचे सदस्यत्व मिळत नसल्याची समस्या सांगितली. चौथीच्या विद्यार्थ्यांना ग्रंथालयाचे सदस्यत्व मिळत नसे. परंतु विशेष बाब म्हणून त्यांनी मला ते मिळवून दिले. पुन्हा काही दिवसांनी मला माझ्या आवडीची पुस्तके वाचावयास मिळत नाही अशी तक्रार मी त्यांचेपाशी घेऊन गेलो असता ते माझ्यासोबत ग्रंथालयात आले. ग्रंथपालाने मी मोठ्या माणसांकरिता असलेली पुस्तके मागतो अशी माझ्याबद्दल तक्रार केली त्यावर मला माझ्या आवडीचे कुठलेही पुस्तक विना आडकाठी देण्याची सूचना अभ्यंकर सरांनी ग्रंथपालास केली. त्यानंतर मी श्रीपाद महादेव माटे यांचे विचार-शलाका, वि‌. स. वाळिंबे यांचे बिल्वदल, थिओसॉफी सोसायटीचे मृत्यूनंतर पुढे काय? अशी अनेक वैचारिक पुस्तके वाचली. विनोबा भावे यांच्या सात पुस्तकांचा एक संच तर माझ्या घरी होता तोही वाचून काढला. या पुस्तकांमुळे स्वतंत्ररीत्या विचार करण्याची माझी प्रवृत्ती बनू लागली. याच दरम्यान मी मूळ वाल्मीकी रामायणाचे मराठी भाषांतर वाचून उपरोल्लेखित सीतेच्या वर्तणुकीविषयीचे माझे मत अभ्यंकर सरांना सांगितले. त्यावर कोणतेही भाष्य न करता त्यांनी मला अजूनही काही पुस्तके वाचण्यास सुचविले व त्यानंतर सर्व पुस्तकांतील विचारांविषयी एकत्रच बोलू असे आश्वासन दिले.

पुढे काही दिवसांनी मला प्रल्हाद नरहर जोशी संकलित अठरा पुराणांचा संच ग्रंथालयात आढळला. या संचावर तो श्री. वा. ना. अभ्यंकर यांनीच ग्रंथालयास भेट दिल्याचे नमूद केलेले होते. त्यामुळे मोठ्या उत्साहाने मी त्यातील आत्मपुराण वाचावयास घेतले. त्यातील काही मजकूर मला अतिशय खळबळजनक वाटला. तो असा - "एखाद्या पुरुषाने एखाद्या महिलेशी समागम केला असता, त्या पुरुषाचा अंश त्या स्त्रीच्या शरीरात जातो. ती स्त्री त्या अंशाची माता होते, पर्यायाने ती त्या पुरुषाची देखील माता होते. त्यामुळे त्यापश्चात पुन्हा त्या पुरुषाने त्या स्त्रीशी समागम करणे म्हणजे आपल्या मातेशीच समागम करण्यासारखे आहे. त्यामुळे असा पुरुष महापापी आहे" त्याबरोबरच स्त्री ही क्षणकाळची पत्नी व अनंतकाळाची माता ह्या संकल्पनेचे मूळही मला उलगडले. याशिवाय राम हा मर्यादा पुरुषोत्तम होता म्हणजे काय याचेही स्पष्टीकरण मिळाले. मर्यादा पुरुषोत्त्तम या संकल्पनेनुसार रामाने सीतेसोबत आयुष्यात केवळ एकदाच संबंध ठेवले होते. त्यामुळेच पुढे जेव्हा तिला लव व कुश असे दोन पुत्र झाले तेव्हा तिच्या चारित्र्यावर शंका उपस्थित केली गेली (अर्थात आता विज्ञानाने सिद्ध झाले आहे की एकवेळच्या समागमामुळे देखील जुळे किंवा तिळे किंवा अधिक अपत्य होऊ शकतात). रामाने काय केले असेल त्याबद्दल तो कौतुकास नक्कीच पात्र आहे, पण स्वस्त्रीशी एकापेक्षा अधिक वेळा समागम करणारे सर्व पुरुष पापी? मग समाजात ज्यांना एकाहून जास्त अपत्ये आहेत ते सर्व पापीच मानावेत? मला एक भाऊ आहे मग मी माझ्या वडिलांना पापी समजावे? ह्या पुराणांचा संच शाळेच्या ग्रंथालयास देणाऱ्या अभ्यंकर सरांनाही दोन अपत्ये आहेत मग त्यांनाही मी पापी समजावे? विचार करून करून माझी झोप उडाली. मी अस्वस्थ राहू लागलो.

अशा वेळी माझ्या मदतीला धावून आले ते विनोबा भावे. एखाद्या व्यक्तीकडून तुम्ही सोन्याची वस्तू विकत घेतलीत आणि ती कस लावून तपासलीच नाहीत व फसवले गेलात तर तुम्ही जेवढे मूल्य त्याकरिता चुकते केले आहे तितके तुमचे नुकसान होऊ शकते. परंतु तुम्ही जर एखाद्याचा विचार स्वीकारण्यापूर्वी तो तर्काच्या कसोटीवर घासून पाहिला नाहीत तर तुमचे अपरिमित नुकसान होऊ शकते. कुठल्या पुस्तकात लिहिले म्हणून ते बरोबर असे आंधळेपणाने मानण्यापेक्षा तर्काच्या कसोटीवर जर ते तुमच्या बुद्धीला मान्य झाले तर ते बरोबर हा विनोबाजींचा विचार मला पटला. आत्मपुराणातील विचार मी माझ्या तर्काप्रमाणे तपासू लागलो. जर आत्मपुराणाच्या विचाराप्रमाणे प्रत्येक पुरुषाने एखाद्या स्त्रीसोबत केवळ एकदाच समागम करायचा तर प्रत्येक जोडप्याला केवळ एकच मूल होईल. मी हे आत्मपुराण वाचले तेव्हा भारताची लोकसंख्या सुमारे ८० कोटी होती. अशा वेळी कदाचित एक कुटुंब एक मूल हे आदर्श ठरूही शकले असते परंतु फार पूर्वी जेव्हा आत्मपुराण लिहिले गेले तेव्हा लोकसंख्या फारच कमी असणार अशा वेळी एका जोडप्याला एकच मूल झाले तर पुढच्या प्रत्येक पिढीत मागच्या पिढीपेक्षा लोकसंख्या निम्मी होत राहणार आणि अशाने शेवटी मानवजातच संपणार. मग हे टाळायचे तर एका पुरुषाने एकापेक्षा जास्त स्त्रियांशी विवाह करावा लागणार. असे असेल तर एकपत्नीव्रती रामाचा आदर्श घेण्याचे काय? पूर्ण विचारांती आत्मपुराणातला विचार मला तर्काच्या कसोटीवर अतिशय चुकीचा वाटला.

मग मी लवकरच पुन्हा श्री. वा. ना. अभ्यंकर सरांना त्यांच्या कक्षात जाऊन भेटलो. आत्मपुराणात लिहिलेला विचार तर्काच्या कसोटीवर अजिबात न टिकणारा असून तो व्यवहारातही कुणी अमलात आणलेला नसल्याचे (कारण सरांसकट समाजातील बहुतेक जोडप्यांना एकाहून अधिक अपत्ये असल्याचे दिसत होते) मी सरांच्या निदर्शनास आणून दिले. असे असतानाही ही पुराणे आपण पूजनीय / वंदनीय का मानावीत? त्याचबरोबर रामायण व महाभारत ह्या वास्तवात घडून गेलेल्या घटना आहेत असे न मानता ती ऐतिहासिक नसून काल्पनिक महाकाव्ये आहेत असे समजून त्यातील पात्रांच्या वर्तणुकीचेही कठोर मूल्यमापन करावे असे माझे मत होते. (नुकतेच २०१५ च्या सुरुवातीस एपिक या उपग्रह वाहिनीवरून प्रदर्शित करण्यात आलेल्या धर्मक्षेत्र या मालिकेत अशा प्रकारे महाभारतातील प्रमुख पात्रांवर चित्रगुप्ताच्या न्यायालयात त्यांच्यावर वेगवेगळे आरोप ठेवून खटला चालवीत त्यांच्या वर्तणुकीचे मूल्यमापन केले असल्याचे दाखविले आहे. ) माझ्या शंकेला उत्तर देताना सरांनी रामायण काय, किंवा आत्मपुराणे काय या प्रत्येक ग्रंथाचे इतके तपशीलवार वाचन कुणी करत नसल्याचे सांगितले. शिवाय हे ग्रंथ वाचले तरी त्यातील प्रत्येक ओळीचा असा कीस काढून वकिली युक्तिवाद करण्याची आपली परंपरा नसल्याचेही सांगितले. हे ग्रंथ पुरातन आहेत. आपल्या पूर्वजांनी काहीतरी विचार करूनच ते लिहिले असतील. आपण ते आपल्या संग्रही ठेवावेत. त्यांची पुजा करावी. त्यातील वाक्यांवाक्यांवर फार विचार करीत डोक्याला शीण देऊ नये असेही सरांनी पुढे समजावले. माझ्या विचारांचा विचारांनी प्रतिवाद करण्याऐवजी सरांनी ते दाबून टाकले याचे मला फार नवल वाटले. हे वागणे त्यांच्या नेहमीच्या जाहीर भूमिकेच्या अगदीच उलट होते.

त्यानंतर मला त्यांच्या आणि विद्यालयातील इतर अनेक अध्यापकांच्या वागण्यात दुटप्पीपणा ओतप्रोत भरलेला आहे असे आढळले.

  1. विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी गोळ्या, बिस्किटे, चॉकलेट्स आदी पदार्थ खाऊ नयेत. इतकेच काय आरोग्याला हानिकारक असे हे पदार्थ विद्यालयाच्या जवळपास असणाऱ्या दुकानदारांनी विक्रीसही ठेवू नये याकरिता प्रयत्नशील असणाऱ्या विद्यालयाच्या वार्षिकांकात चक्क दारूच्या दुकानाची जाहिरात छापली गेली होती. याबद्दल सरांना विचारले असता विद्यालयाच्या विकासाकरिता त्या दुकानाच्या मालकाने मोठा निधी दिला असल्याचे उत्तर मिळाले.
  2. एक शिक्षिका सौ. अलका अविनाश शाळू यांनी नववीची दिवाळीची सुटी संपवून पुन्हा शाळा सुरू झाली असता सुटीत नवीन काय शिकलात असे विचारले आणि उत्तरादाखल मी गावी दुचाकी चालवायलो शिकलो असे सांगितले. त्यावर आपल्याला कायद्याचे उल्लंघन करायचे नाही अशी समज या शिक्षिकेने मला दिली. गावातल्या कच्च्या रस्त्यांवर कायदे जास्त प्रभावी असावेत बहुदा, परंतु याच शिक्षिकेचे धाकटे चिरंजीव इयत्ता पाचवीत असल्यापासून पिंपरी-चिंचवड नवनगरातील रस्त्यांवर ल्युना चालवायचे ते एकतर त्यांना ठाऊक नसावेत किंवा यांच्याकरिता विशेष कायदे बनविले असावेत.
  3. अजून एक शिक्षिका कु. अलका नलावडे आम्हाला नववी व दहावीत अ तुकडीच्या वर्गावर विज्ञान व गणित विषय शिकवायला होत्या. तेव्हा दहावीत असताना जुने बोर्डाचे पेपर्स सोडवून ते शिक्षकांना तपासायला द्यायची पद्धत होती. त्याप्रमाणे मीदेखील गणिताचे काही जुने पेपर्स सोडविले परंतु ते कु. नलावडे यांना न देता ब तुकडीला शिकविणारे श्री. सुधीर कुलकर्णी या अध्यापकांना तपासायला दिले. ही गोष्ट कुठून तरी कु. नलावडे यांना समजल्याने त्यांनी भर वर्गात माझ्या या 'अपराधा'बद्दल मला खडे बोल सुनावले. माझ्या अपराधाचे प्रायश्चित्त म्हणून मग अजून काही पेपर्स सोडवून मी ते कु. नलावडे यांना तपासायला दिले. हे तपासलेले पेपर्स घेण्याकरिता त्यांनी मला त्यांच्या घरी बोलावले असता मी तिथे गेल्यावर पाहिले की त्या ब तुकडीच्या दोन विद्यार्थ्यांची स्वतःच्या घरी खासगी शिकवणी घेत आहेत. म्हणजे या बाईंनी कुलकर्णी सरांच्या वर्गातील विद्यार्थ्यांना घरी खासगी शिकवणीकरिता बोलावले तर ते क्षम्य आणि मी त्यांच्या वर्गातील विद्यार्थी असून कुलकर्णी सरांना पेपर्स तपासायला दिलेत तर तो मात्र अक्षम्य अपराध?
  4. एकीकडे आमचे काही शिक्षक आम्हांस फटाके वाजविल्याने ध्वनिप्रदूषण, वायुप्रदूषण व संपत्तीचा अपव्यय होत असल्याने फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याचे आवाहन करीत असताना दुसरीकडे विद्यालयाचे व्यवस्थापन व इतर काही शिक्षक स्वतःच फटाकेविक्री करायचे व आम्हा विद्यार्थ्यांनाही सक्तीने या कामात सहभागी करून घेत असत. (परिसरातील नागरिकांच्या विरोधामुळे गेल्या पाच वर्षांपासून शाळेतर्फे होणारी ही फटाकेविक्री आता बंद करण्यात आली आहे. )

एकूणच माझ्या शालेय जीवनात शाळेच्या व्यवस्थापनाकडून व अनेक शिक्षक व शिक्षिकांकडून मला दुटप्पी वर्तणुकीची अनेक उदाहरणे अनुभवायला मिळाली.

पुढे विद्युत अभियांत्रिकी पदविकेकरिता कुस्रो वाडिया महाविद्यालयात प्रवेश घेतला तेव्हा विद्युत अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख श्री. निखिल परांडकर यांच्या व्यक्तिमत्त्वाने मी विशेष भारावून गेलो होतो. ते मला अतिशय आदर्श शिक्षक वाटत, परंतु पुढे त्यांच्याही वर्तणुकीत मला काही विसंगती आढळल्या.

  1. परांडकर सरांच्या कक्षात एक आटोपशीर ग्रंथालय होते व त्यात विद्युत अभियांत्रिकीवरील उत्तमोत्तम पुस्तके होती. ही पुस्तके वाचायला मिळू शकतील काय अशी विचारणा मी एकदा सरांना केली असता त्यांनी ही संदर्भ पुस्तके (रेफरन्स बुक्स) असून ती घरी नेता येणार नाहीत इथे बसूनच वाचावी लागतील असे सांगितले. त्यावर मी माझी तशी तयारी असल्याचेही दर्शविले. परंतु ही पुस्तके इतर दिवशी मिळणार नाहीत त्याकरिता दुसऱ्या व चौथ्या शनिवारी महाविद्यालयात यावे लागेल अशी अट त्यांनी घातली. मी त्यालाही तयार झालो. त्यावर एकट्या विद्यार्थ्याकरिता हे वाचनालय उघडले जाणार नाही. किमान पंचवीस विद्यार्थी तरी आले पाहिजेत. अशा विद्यार्थ्यांच्या नावाची यादी आणि ते येण्यास तयार असल्याचे पत्र व त्याखाली त्यांच्या सह्या असतील तरच ही सोय करता येईल असेही ते पुढे म्हणाले. त्यावर मी तशा तयारीला लागलो. सर्व विद्यार्थ्यांशी बोलून स्वाक्षरी व पत्रासह अठ्ठावीस जणांची यादी बनविली आणि ती देण्याकरिता त्यांच्या कक्षापाशी गेलो असता पाहिले की आमच्याच वर्गातील एक विद्यार्थी अंबरीष नातू यांस सरांनी त्या ग्रंथालयातील दोन पुस्तके घरी अभ्यासाकरिता दिली व त्याने ती माझ्या डोळ्यांदेखत स्वतःच्या बॅगेत टाकली आणि तो तेथून बाहेर पडला. मी हा प्रकार पाहिल्याचे सरांना कळले नाही. परंतु सरांनी इतर विद्यार्थ्यांकरिता इतक्या जाचक अटी टाकाव्यात व स्वतःच्या मित्राच्या मुलास मात्र सर्व अटी शिथिल करीत विशेष वागणूक द्यावी हे मला खटकले. मग मी माझ्याकडील यादीचा कागद सरांना दाखविलाच नाही व पुन्हा त्या पुस्तकांकरिता सरांना कधी विनंतीही केली नाही.
  2. पाचवे सत्र संपून सहावे सत्र सुरू होण्याआधी पंधरा दिवस सुटी होती तेव्हा सरांनी आमच्यापैकी कुणी प्रकल्प बनवून तो प्रदर्शनात मांडण्यास तयार होईल का अशी विचारणा केली. मी व माझा मित्र बिपीन विजय इनामदार असे आम्ही दोघे तयार झालो. आम्ही दोघांनी सुटीत रोज महाविद्यालयात येऊन आठ आठ तास मेहनत करून सिंगल फेज + थ्री फेज कॉंबो मोटर तयार केली. एक फेज कट झाल्यास एरवी तीन फेज वर चालणारी मोटर आपोआप सिंगल फेजवर चालावी अशी संकल्पना होती. याकरिता जुन्या मोटरमधील वाईंडिंग काढणे, त्या जागी नवीन दुहेरी वाईंडिंग बसविणे इत्यादी कष्टाचे काम आम्ही दोघांनी केले. इतकेच काय जुने तांबे बाजारात जाऊन विकणे, नवीन तार खरेदी करणे हेही आम्ही केले आणि सर्व मेहनत करून मोटर तयार झाल्यावर प्रदर्शनात मांडताना ती आम्हा दोघांसोबत सरांनि त्यांच्या आणखी एका मित्राचा मुलगा असलेला आमचा सहाध्यायी अभिजीत परब याचे नावही बळेच प्रकल्पकर्त्यांमध्ये घुसडले. सखेद आश्चर्य व्यक्त करण्याखेरीज मी व बिपीन यावर काहीच करू शकलो नाहीत.
  3. वरील दोन व अजूनही काही कृत्ये क्षम्य वाटावीत असा अजून एक भयानक अपराध परांडकर सरांनी शेवटच्या सत्रात केला. सिद्धारामेश्वर विजय हारके नावाचा एक विद्यार्थी प्रत्येक सत्रात अनुत्तीर्ण होत चार सत्रांकरिता चार वर्षे घालवून पाचव्या सत्रात आमच्या वर्गात आला होता. तो राम टेकडी येथील एस आर पी कॉलनीत राहत असे. त्याचे वडील राज्य राखीव पोलीस दलाचे कर्मचारी होते. हा सर्वच विषयांत सर्वच चाचण्यांत अनुत्तीर्ण होत असे. स्वतः ड्रॉईंग न करता इतरांच्या शीटस चोरून त्या स्वतःच्या म्हणून खपवित असे. त्याला मी स्वतः एकदा पकडून सरांच्या ताब्यात दिला होता. तसेच स्वतः प्रकल्प न करता इतरांचा प्रकल्प व तयार अहवाल चोरून आणलेला असता आमच्या एका शिक्षिकेनेही त्याला पकडले होते. अशा विद्यार्थ्याला परांडकर सरांनी स्वतःच्या अधिकारात शेवटच्या सत्रात उत्तीर्ण करून टाकले. त्याकरिता त्यांना काय मोबदला मिळाला हे मला ठाऊक नाही परंतु पुढे या अभियांत्रिकी पदविकेच्या जीवावर आणि वडिलांच्या वशिल्याने तो राज्य राखीव पोलीस दलाच्या बिनतारी विभागात नोकरीला लागला. याच नोकरीच्या बळावर त्याचे कर्नाटकातील एका सुशील कन्येशी लग्नही झाले. त्यानंतर याने व याच्या वडिलांनी मिळून त्या बिचारीला हुंड्याच्या लालसेपायी जाळून मारून टाकले. वर्तमानपत्रात ही बातमी आली तेव्हा मी मुद्दाम महाविद्यालयात जाऊन श्री. परांडकर सरांना भेटून या मुलीच्या मृत्यूकरिता तेही कसे अप्रत्यक्षरीत्या जबाबदार आहेत हे सुनावून आलो. सरांनी आपली जबाबदारी झटकली तरी माझे आरोप ऐकून त्यांचा चेहरा पार उतरला असल्याचे मला जाणविले. पुन्हा मी सरांशी कधी संपर्क ठेवला नाही.

महाविद्यालय सोडून नोकरीत रुजू झालो तिथे तर दुटप्पीपणाची अनेक उदाहरणे पाहिलीत. आधी फार राग येत असे परंतु "बॉस इज ऑलवेज राईट" हे सुवचन ऐकवून सहकारी मला शांत करीत. भ्रष्टाचार, अनीती, गुन्हेगारी या सर्व बाबींवर उक्ती आणि कृतीत फरक असणारी अनेक नामवंत व तथाकथित प्रतिष्ठित माणसे पाहण्यात आली आणि पार चक्रावून गेलो. अर्थात या नामवंत व प्रसिद्ध व्यक्तींनाच तरी दोष का द्यावा? सामान्य माणसेही दुटप्पीच वागत असल्याचे अनेकदा दिसून आले. झोपडपट्टीवाल्यांच्या अतिक्रमणाविरुद्ध नेहमीच आरडाओरडा करणारे पांढरपेशे मध्यमवर्गीय संधी मिळाली की कसे अधाश्यासारखे अतिक्रमण करतात हेदेखील पाहिले. पिंपरी-चिंचवड नवनगरातील पेठ क्रमांक २५ मध्ये लघु मिळकत गटाकरिता (लो इन्कम ग्रुप - एल आय जी) बनविलेल्या वसाहतीत असलेल्या सहाशे घरांपैकी केवळ दोन घरे सोडली तर उरलेल्या ५९८ घरमालकांनी मूळ घराच्या पाचशे ते सहाशे टक्के वाढीव अनधिकृत बांधकाम करीत पदपथ व रस्त्यावरही अतिक्रमण केलेले आहे. तसेच बहुसंख्य रहिवाशांनी या घरांचा व त्यापुढील जागेचा विनापरवानगी व्यावसायिक वापरही केला आहे. पुन्हा हेच नागरिक शहरांतील झोपडपट्ट्यांच्या अतिक्रमणाविषयी आवाज उठवितात हे विशेष.

२००९ साली मी निवडणुकांच्या वेळी मतदान का करीत नाही यावर स्पष्टीकरण देणारा एक विस्तृत लेख लिहिला होता. पूर्ण लेख न वाचताच बहुतेक सर्व वाचकांनी मी मतदान करीत नाही हे कसे चुकीचे आहे व त्याचे समर्थन करता येणार नाही अशा प्रतिक्रिया दिल्या होत्या. नव्वद टक्के प्रतिक्रिया या मतदान न करणे वाईट अशा आशयाच्या होत्या. जर नव्वद टक्के वाचकांना मतदान न करणे हे चूक वाटत असेल तर हे सर्वच्या सर्व नागरिक न चुकता मतदान करीत असायला हवेत ना? तसे असेल तर प्रत्येक निवडणूकीत नव्वद टक्के मतदान व्हायला हवे. परंतु मी तर बहुतेक निवडणुकांत जेमतेम पंचावन्न ते साठ टक्के मतदान होत असल्याचे पाहिले आहे. त्यातही निम्न आर्थिक वर्गातील मतदार हा आघाडीवर असतो. तो मतदार निश्चितच इंटरनेट वापरून माझ्या लेखावर प्रतिक्रिया देत नाही. मग माझ्या लेखावर प्रतिक्रिया देणाऱ्या वर्गातील किती टक्के मतदार हा खरोखरच मतदान करतो? इथेही कृती आणि उक्तीत लक्षणीय फरक दिसून आला.

माझे एक ज्येष्ठ मित्र म्हणतात "बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाउले" हे जर मान्य करायचे ठरविले तर फक्त अट्टल मद्यपींचेच पाय धरावे लागतील कारण ते अडखळत बोलतात आणि अडखळतच चालतात. यातील उपहास व गमतीचा भाग सोडला तरी उक्ती व कृतीत फरक असणारेच बहुतेक भेटलेत. सारेच तसे नाहीत हे मान्य परंतु असे सन्माननीय अपवाद फारच तुरळक. हे दुटप्पी लोक स्वतःचा लघु मुदतीचा (शॉर्ट टर्म) फायदा करून घेतात आणि समाजातील इतरांचे नुकसान करतात. त्यांचे वर्तन पाहून इतर जण एकतर त्यांच्यासारखेच प्रवाहपतित होत दुटप्पी तरी बनतात किंवा मग त्यांची अवस्था हीर रांझातल्या राजकुमार सारखी "यह दुनिया यह महफिल मेरे कामकी नही" नाही तर प्यासातल्या विजय सारखी "यह दुनिया अगर मिल भी जाएं तो क्या है" अशी होऊन ते निराशेच्या गर्तेत जाऊ शकतात.

पण या संख्येने अत्यल्प असणाऱ्या सन्माननीय अपवादांकरिता उर्वरित समाज आपली दुटप्पी भूमिका सोडायला तयार होईल असे वाटत नाही. दुटप्पी लोकांना सुधारविणे शक्य नाही परंतु इतरांनी तरी हा समाज असाच आहे व राहील ही वस्तुस्थिती मान्य करून स्वतःला निराशेच्या गर्तेत जाण्यापासून वाचवायला हवे याकरिता हा लेखनप्रपंच.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

दिनेश..माणुस कुठलिही कॄती कारणा शिवाय करत नाही. भलेही त्याच्या चेतन मनाला ते कळत नसेल किंवा

सांगता येत नसेल पण अचेतन मना ला माहित असते

माणसचे मन संस्काराने एक प्रकारे संप्रोग्रॅम्डच झालेले असते.

लेख उत्तम आहे ,आवडला
लेख थोडा मोठा आहे पण तुमच्या उत्तम लेखनशैलीमुळे वाचताना अजिबात कंटाळा आला नाही .
माझ्या आजूबाजूला नात्यांमध्ये आजपर्यंत पाहिलेले बहुतांश लोक दुटप्पीच होते ,आहेत
पूर्वी अशा दुटप्पी लोकांच्या वागण्याचा भयंकर त्रास व्हायचा ,आताही होतोच पण तीव्रता कमी झालीये

लेख पूर्ण वाचला..
निवडलेले मुद्दे आणि त्यांचा केलेला उहापोह उत्तम !

<<< दुटप्पी लोकांना सुधारविणे शक्य नाही परंतु इतरांनी तरी हा समाज असाच आहे व राहील ही वस्तुस्थिती मान्य करून स्वतःला निराशेच्या गर्तेत जाण्यापासून वाचवायला हवे याकरिता हा लेखनप्रपंच. >>>
एवढा विचार करून निराशेच्या गर्तेत जातील असे लोक समाजात अपवादात्मकच असतील असे मला वाटले..

************

वरच्या प्रतिसादांत अशोक यांनी मांडलेली द्विधा कि दुट्टपी बाबदची मते खूपच पटली.

धन्यवाद ..

आणि म्हणूनच, एखादी व्यक्ती ज्यावेळी आदर्शासाठी तडजोड करत नाही.. त्यावेळी तिचे उदाहरण आपण डोळ्यासमोर ठेवायचे. ते कठिण असते हे नक्कीच.. पण डोळ्यासमोर तशी उदाहरणे असली तर आपल्या स्खलनाची टोचणी कायम राहते. मग एखाद्या वेळेस आपल्यालाही तसे वागणे जमायला लागते.

आपण रामायण इ मधील उदाहरणे घेऊन पैराणिक ग्रंथांबद्दल जे विवेचन गेले आहे ते त्या त्या घटना लक्षात घेता ते योग्य आहे पण मला तसे करणे गरजेचे वाटले नाही. याची कारणे असे आहे कि,

१. पुरातन ग्रंथसंपदा हि साधारणतः कसे वागावे कसे वागू नये, धर्म काय अधर्म काय हे सांगणारी आहे. त्यातून आपल्याला जगण्यास उपयोगी तत्वे उचलावीत आणि त्याबाबद चिंतन करावे बाकी सोडून द्यावे असे माझे मत आहे.

२. कोणी सरळसोट तत्वज्ञान सांगू लागल्यास ते नीटसे पचनी पडत नाही. तसे लिहिलेले ग्रंथ वाचणेही सर्वसामान्यास शक्य होत नाही. कित्येक गोष्टी डोक्यात न जाताच वाहून जायचा संभव असतो. म्हणून तत्वज्ञानाच्या आजूबाजूला कथा गुंफून सांगितली गेली असावी जेणेकरून हळूहळू अप्रत्यक्षपणे तत्वज्ञान सर्वसामान्यांच्या पचनी पडू शकेल.
तेव्हा यामध्ये त्या कथेचा उहापोह न करता सार समजून घेणे अभिप्रेत असावे.

३. अशा प्रकारे उहापोह करायचा झाल्यास खूपच गोष्टींचा करता येईल पण मग तो वेळेचा अपव्यय होईल आणि निष्पन्न फारसे होणार नाही. त्यामुळे पुराणकथांमधून उपयोगी तेवढे वेचून बाकी सोडून देणे इष्ट असे मला वाटते..

धन्यवाद ..

श्री.चेतन सुभाष गुगळे यांच्या लेखावर आलेले प्रतिसाद वाचताना एक बाब लक्षात येते प्रत्येकला पटलेले आहे की मानवावर शिकवणीचा, संस्कारांचा, अनुभवांचा, आजुबाजूच्या वातावरणाचा, समाजातील जडणघडणीचा तसेच रोजच्या दिनक्रमाचा जाणवण्याइतपत परिणाम होत असतो. कालच्या सरकारने जे काही केले वा आजचे सरकार जे काही करत आहे त्याबाबतीत एक सर्वसामान्य नागरिक म्हणून आपली भूमिका नेहमीच ठाम राहील असे होत नाही. तिथेही सोमवारी मंगळवारी द्विधा मनस्थिती बनत असेल तर बुधवारी त्याच मताला बगल देवून मध्यम मार्गाने काही उपाययोजना होऊ शकेल का ? असा विकल्प समोर येत राहतो. हे सहजी घडू शकते असे नाही...त्याबाबतीतही मानसिक आंदोलनाला (व्यक्तिगत पातळीवर) सामोरे जावे लागतेच. हा सुस्वभावी संस्काराचाही भाग असतो. दुटप्पीपणा मात्र मतलबी ठरू शकतो...तो दोष आहे हे मानायला ती व्यक्ती तयार नसते...पण मनातील कुठलातरी कोपरा त्यानंतर वेदनेने ठसठसत राहतोच.

परिस्थितीनुसार वर्तन करण्याची ज्यावेळी पाळी येते त्यावेळी मनुष्यातील सत्वगुणांचा कस लागतो. यासाठी मला लख्ख स्मरते "सत्यकाम" या चित्रपटातील एक उदाहरण...द्विधा आणि दुटप्पी वर्तनाबाबत...

इंजिनिअर सत्यकाम आचार्य धरण बांधकामाच्या प्रोजेक्ट साईटवर काम करीत असताना कार्यालयातील एक कर्मचारी स्वतःच्या वा इतरांच्या आर्थिक लाभासाठी साहित्याचा गैरवापर करून लाचखोरीला मदत करतो, ते उघडकीस येते. चीफ इंजिनिअर या नात्याने सत्यकाम यांच्यासमोर ती केस येताच तो कर्मचारी दोषी आहे असे त्याना आढळल्यावर कार्यालय प्रमुख या नात्याने ते त्या कर्मचार्‍याच्या बडतर्फीची नोटीस बजावतात आणि मंजुरीसाठी खुलाशासह हेड ऑफिसला पाठवून देण्यासाठी हेड क्लार्ककडे सुपूर्द करतात. सायंकाळी त्या कर्मचार्‍याची पत्नी आपल्या लहान मुलाला घेऊन इंजिनिअरच्या क्वार्टर्सवर येते आणि आपल्या नव-याला कोणत्या परिस्थितीत प्रमुख कॉन्ट्रॅक्टरच्या सांगण्यावरून ते काम करावे लागले आणि इतरांनी त्याचा लाभ घेतला हे सांगते. शिवाय चुकीची शिक्षा ज्याना मिळायला हवी त्याना न मिळता माझ्या नवर्‍याला दोषी ठरविले जाते हे तुमच्या सदसदविवेक बुद्धीला पटते का ? त्याला नोकरीवरून काढल्यामुळे आता मी आणि माझ्या मुलाने पोटासाठी काय करावे ? असाही नित्याचा समाज अडचणीचा ती पाढा वाचते.

सत्यकाम आचार्य कार्यनिष्ठ आहेतच शिवाय कार्यालयीन शिस्तीचा आग्रह धरणारेही. ते त्या स्त्रीच्या विनंतीला उत्तर देताना, "दडपण आले म्हणून लाचखोरीचे काम करणे योग्य हे मी मानत नाही. मी केलेली कारवाई योग्य आहे असे मी मानतो" म्हणतात, पण "मग मी एक गरीब बाई आहे, मूल आहे...तुम्ही शेजारी आहात आमचे...त्या प्रती तुमची काही जबाबदारी नाहीच का ?" ~ या युक्तीवादाला सत्यकाम आचार्य यांच्याकडे काही उत्तर नसते. द्विधा मनस्थितीत ते रात्री पुन्हा साईटवरील कार्यालयाकडे येतात आणि हेडक्लार्कना उठवितात....ती नोटीस परत घेतात. हेडक्लार्कला म्हणतात..."मी गोंधळलो आहे. त्या कर्मचार्‍याने चूक केली आहे हे मला मान्य...पण माझी द्विधा मनस्थिती हेही सांगते की तो एकटा दोषी नसून अनेकजण आहेत. त्याना मी शिक्षा करू शकत नाही. यालाच केली तर याची बायकोपोरे उघड्यावर पडतील....नाही केली काही कारवाई तर मी माझ्या सरकारी नोकरीतील शिस्तीसंबंधाच्या नियमांचे पालन करायला नालायक शाबीत होईन...हा दुटप्पीपणा आहे माझ्या तत्त्वाचा... काय करू मी...?" ~ अशा प्रश्नाच्या भोवर्‍यात सापडून सत्यकाम आचार्य हेडक्लार्ककडून तो लखोटा घेतात व त्याच्या जागी दुसरे पत्र लिहितात....हेडक्लार्ककडे देतात....ते गृहस्थ आश्चर्यचकीत होऊन पाहातात....सत्यकाम यानी द्विधा आणि दुटप्पीपणाच्या भोवर्‍यावर ईलाज म्हणून आपल्या पदाचा राजीनामा लिहिलेला असतो.

द्विधा मनःस्थिती परवडते पण दुटप्पी वर्तन नको म्हणून त्याच्या बदली नोकरीचा राजीनामा देणारा तो आदर्श अधिकारी सर्वच ठिकाणी पाहायला मिळेल असे नसते.

चेतनजी,

अभ्यंकर सरांच आणो परांडकर सरांच नाव अजिबात गाळु नका. किंबहुना समाजाच्या समोर येऊन संस्कार करणारा प्रत्येक शिक्षक, व्याख्याता आणि तत्वज्ञ या झाडाझडतीला पात्र आहे.

आज दोघेही रिटायर्ड आहेत. अभ्यंकर सर बहुदा ८५ च्या घरात आहेत. परांडकर ७० च्या आसपास. यावयात त्यांच्या वर्गात शिकवलेल्या शब्दांपेक्षा त्यांची कृती परीक्षणाखाली आली ही शिक्षकी पेशाची ब्युटी.

प्रेमचंद यांनी लिहलेला एक धडा आठवला. एक फौजदार आणि शिक्षक काशीला जायला निघतात. रेल्वेत एक गुन्हेगार भेटतो जो त्या फौजदाराला जुना हिशोब चुकता करण्यासाठी फौजदाराच्या कुटुंबासमोर मारहाण करतो. मग काशीला एक विद्यार्थी भेटतो जो आपल्यावर झालेले उपकार जाणुन चार दिवस काशीला आपल्या घरात ठेऊन घेतो. प्रत्येक तिर्थस्थळ दाखवतो आणि सेवा करतो.

कधी काळी माजी विद्यार्थी भेट्तात, आदर व्यक्त करतात. याच बरोबर त्यांना ह्या झाडाझडतीला सामोरे जावे लागते. चेतनजी सारखा विद्यार्थी लाभण म्हणजे कधी काळी शिक्षकाचा पेशा विसरुन विद्यार्थी होणे आहे हे दोघांना आत्तापर्यंत समजले असावे.

The ultimate measure of a man is not where he stands in moments of comfort and convenience, but at the times of challenges and controversy. Dr Martin Luther King

एवढे तत्वज्ञान सांगणारा माणूस स्वतः बिनदिक्कत राँग साईडने गाडी चालवतो आणि समर्थन करतो !
हा दुटप्पीपणाच आहे.

बाकी लेख चांगला आहे.

एवढे तत्वज्ञान सांगणारा माणूस स्वतः बिनदिक्कत राँग साईडने गाडी चालवतो आणि समर्थन करतो !
हा दुटप्पीपणाच आहे.>>>.

हे तुम्हाला कुठे आणि कसे काळाले त्यांनी खरे सांगतले म्ह्णुनच ना?

@सुरेख१ : एखाद्या खेळाडूने उत्तेजक द्रव्य घेतले आणि स्पर्धेनंतर स्वतः सांगितले तरी तो गुन्हाच असतो .
बाकी चर्चा त्या बाफवर झाली आहेच.

चेतन अत्यंत परखड लेख. लेखात तुम्ही ज्या भावना व्यक्त केल्यात त्या व्यक्त करण्यास एक प्रकरचे धैर्य लागते. रामायण , महाभारत ह्या ग्रंथांचे जे परखड परीक्षण केलेत त्याबाबत तुम्हाला सलाम.... अनेकदा आपण पाहतो कि समाजातील मान्यवर व्यक्ती हे एखाद्या गोष्टीबाबत नरो व कुंजरो पद्धतीची भूमिका घेतात . उदा. सचिन हा भारतातला चांगल खेळाडू त्याला भारतरत्न मिळाले वैगरे सर्व ठीक आहे . तो बर्याचदा म्हणतो कि माझे क्रिकेटवर फार प्रेम आहे ते सर्व ठीक आहे पण ह्या खेळाला पोखरणाऱ्या फिक्सिंग प्रकरणाबाबत मात्र तो नरो व कुंजरो भूमिका घेतो ह्यामागे संबंधितांना कशाला दुखवा अथवा स्वत: कशाला अडचणीत सापडा अशी भूमिका दिसते. समाजही असल्याच मान्यवरांचे अनुकरण करतो मला काय त्याचे हि त्याची वृत्ती असते. तुम्ही मात्र जे तुमच्या मनात आहे ते लेखात उतरवण्याचे जे धैर्य दाखवले ते अनुकरणीय आहे..परखड लेखाबद्दल शुभेच्छा

अहो चेतन,

मी पहिला प्रतिसाद गमतीने दिला होता.
लेख आवडला. ठणकावून सत्य बोलण्याच्या तुमच्या स्पष्टवक्तेपणाबद्दल अभिनंदन.

जे कोणी अमेरिका / युरोप आणि भारत दोन्ही देशात राहिले आहेत, त्यांना हे नक्की पटेल कि भारतीय लोक ढोंगी / दुटप्पी आहेत. इथे समाजातील परस्पर संबध हे फक्त दोन गोष्टी वर चालतात - त्या माणसा कडे असणारा पैसा आणि त्याची उपयुक्तता . ते असेल तर त्याचाशी contact ठेवण्यात सगळे पुढे असतात. याला कारण ? तशी बरीच असतील . पण मुख्य कारण हेच कि भारतात कायद्याचे राज्य नाही. प्रत्येक ठिकाणी ओळख पाळख असणे मुख्य. कारण तुमचे सगळे मुद्दे / कागदपत्र बरोबर असताना पण कोणीही तुमचे काम अडवू शकतो.
US / युरोप मध्ये असे नसते. ( ९० % तरी ) तिथे कायदा हा मुख्य असतो. त्या मुळे इथली जनता हि अशी दुटप्पी / ढोंगी आहे.
whatsapp ग्रुप वर बरेच मेसेज येत असतात. वाचून थक्क होतो , कि लोक किती मोठ्या प्रमाणात पलटी मारू शकतात. BJP / फडणवीस राज्यावर आले. त्यांनी टोल काढायला नकार दर्शवला . लगेच इकडे टोल कंत्राट दाराची बाजू कशी बरोबर आहे याचे आकडेवारी सकट समर्थन सुरु झाले.
मद्रास IIT मधला आत्ताचा वाद. लगेच देशाचे किती पैसे प्रचंड प्रमाणावर IIT वर खर्च होत आहेत. देशाला त्यातून काहीच फायदा कसा होत नाहीये. IIT मधल्या विद्यार्थी लोकांनी कसे कर्ज काढून शिकायला पाहिजे इत्यादी इत्यादी ..
आणि हे सांगणारे लोक उच्च वर्गीय / सुशिक्षित / सुसंकृत वगैरे वगैरे ..

आत्ता पण maggi चा गोंधळ सुरु आहे. सरकारने माधुरी / अमिताभ यांच्यावर केस टाकली आहे. त्यांचा काय संबंध ? ते पगारी कलाकार आहेत. ते काही केमिस्ट नाहीत कि जाहिरात आली कि लगेच त्या पदार्थाचा analysis करून बघतील . असा इथला कायदा गाढव आहे. कायद्या पेक्षा तो चालवणारे लोक जास्त xxxxx आहेत. तुमचे सगळे बरोबर असले तरी कोण कशी मारेल तुमची उद्या याचा भरवसा नाही. म्हणून मग ढोंगी / दुटप्पी पणा ने वागा. कारण आज तुम्ही एका ताकदवान माणसाचि चुकीची बाजू उचलून धरली तर उद्या तुम्ही कुठल्या संकटात असाल तर तो मदत करेल याची काही प्रमाणत खात्री देऊ शकता ..

BJP / फडणवीस राज्यावर आले. त्यांनी टोल काढायला नकार दर्शवला . लगेच इकडे टोल कंत्राट दाराची बाजू कशी बरोबर आहे याचे आकडेवारी सकट समर्थन सुरु झाले.
>>>>>

राजकारणाचा पायाच दुटप्पीपणा आहे. ते त्यावरच पोसले जाते. तिथे दुटप्पीपणा हा नियम म्हणून येतो. वगैरे वगैरे..

मी दुटप्पी पणे कधीच वागत नाही
असे जर कोणी म्हणत असेल तर तो नक्कीच दुटप्पी बोलत आहे.

न मी खोटे कधीच बोललो नाही
असे कोणी म्हणत असेल तर तो नक्कीच खोटे बोलत असला पाहिजे.

जगाच्या पाठीवर कुठल्याही मनुष्यप्राण्यास सदा सर्वकाळ दुटप्पी नसलेले वर्तन करून राहता येणे अशक्य आहे.

सर्वसामान्य माणूस हा दुबळा, स्खलनशील आणि प्रवाह-पतितच असतो. तो जगण्याच्या ओघात काहीच क्षण त्याच्या परिस्थितीजन्य सामर्थ्याने प्रवाहाच्या विरुध्द जावून लखलखीत चमकदार करू शकतो.

जो जन्मजात / अभ्यासाने सामर्थ्यवान असतो त्याच्याही जीवनात काही क्षण तरी काळे / घसरडे / प्रवाह पतित असे प्रसंग येतातच.

इथे मला एक इंग्रजी सुभाषित आठवते आहे. त्याचा मराठी भावानुवाद असा की
'प्रत्येक संताला भूतकाळ असतो आणि पाप्याला भविष्यकाळ'

त्यामुळे आपण ज्यांना आदर्श मानतो अशा माणसांनी सदासर्वकाळ आपल्या आदर्शपणाच्या व्याख्येत बसेल असे वागावे ही अपेक्षा जरा जास्तच नाही का

आपला प्रदीर्घ लेख अजीबात कंटाळा न येता वाचला गेला. लेखन शैली चांगली आहे.
पण स्वतंत्र विचार करणार्‍या व्यक्तीच्या लेखात नवीन काही विचार सापडेल अशी आशा होती ती फोल ठरली.
शिवाय आपल्या म्हणण्याच्या पुष्ट्यर्थ जी उदाहरणे दाखल केली आहेत ती फारच कमी आहेत. अजून कितीतरी मोठी यादी देता आली असती.

असो.

चेसुगु, आपल्या सारख्या स्वतंत्र विचार करू शकणार्‍या माणसाने आपली विचारशक्ती केवळ समोरच्याला निरुत्तर करण्याजोगे प्रश्न विचारणे ( जे वयाच्या एका टप्प्यात मजा आणते हे ही मानावेच लागेल) यापुरती सिमित न ठेवता जीवनात मानवाला भेडसावणार्‍या अनेकानेक समस्या कशा सुटतील हे बघण्याकरता खर्ची घालावी अशी अपेक्षा कोणी ठेवील तर जास्त होत्ये का ?

हेच बघा ना तुमच्या मायबोली वरच्या वावरामुळे मी तुम्हाला पेडेस्टल वर ठेवतोय, तुम्ही न सांगता / तुमची मागणी नसताना तुम्हाला आदर्श बनवतोय आणि आता तुम्ही माझ्या मनातल्या व्याख्येनुसार न वागाल तर तुम्हाला मी नावं ठेवणार

फारच दुटप्पी नाही का Wink

गुगळे लेख वाचला. चांगला वाटला.

लोकांच्या वाग़ण्यामागे त्यांच स्वत:च अस एक लॉजीक असत मुख्य म्हणजे स्वत:चा एक मोटीव असतो. चांगला की वाईट हा मुद्दा या बद्द्ल मी काहीच म्हणत नाही पण बर्‍याचवेळा या गोष्टी त्या वेळच्या परिस्थितीवर अवलंबुन असव्यात असे वाटते. एकच माणुस वेगवेगळ्या वेळी एकसारख्या परिस्थितीत आयडेंटीकल निर्णय घेईलच याची काही शाश्वती नाही.

मात्र काही प्रतिक्रीया अतिश्य रोचक वाटल्या. जगात भारतातले लोक कसे दुटप्पी आहे हे वाचुन ज्ञानात भर पडली

जे कोणी अमेरिका / युरोप आणि भारत दोन्ही देशात राहिले आहेत, त्यांना हे नक्की पटेल कि भारतीय लोक ढोंगी / दुटप्पी आहेत. इथे समाजातील परस्पर संबध हे फक्त दोन गोष्टी वर चालतात - त्या माणसा कडे असणारा पैसा आणि त्याची उपयुक्तता . ते असेल तर त्याचाशी contact ठेवण्यात सगळे पुढे असतात. याला कारण ? तशी बरीच असतील . पण मुख्य कारण हेच कि भारतात कायद्याचे राज्य नाही. प्रत्येक ठिकाणी ओळख पाळख असणे मुख्य. कारण तुमचे सगळे मुद्दे / कागदपत्र बरोबर असताना पण कोणीही तुमचे काम अडवू शकतो.
US / युरोप मध्ये असे नसते. ( ९० % तरी ) तिथे कायदा हा मुख्य असतो. त्या मुळे इथली जनता हि अशी दुटप्पी / ढोंगी आहे.>>>>>>>>>>
याला कायदा जवाबदार नसुन कायद्यायचा दुरुपयोग करुन कायद्याला स्वता:हुन श्रेष्ठ समजण्याची (सलमान) माणसिकताआहे.सामान्य माणसाचे कायद्याबाबत अनभिज्ञ असने.यामुळे रक्षकच भक्षक बणतोय.

सगळ्यात महत्वाचे श्रध्दा/अंधश्रध्देचा सोईस्कर वापर.देवा दिकाला चुकल नाही आम्ही तर माणस(आसाराम म्हणाले होते कृष्ण पण रासलिला करत होता मी केलीतर काय चुकले.) चुकिचे काही केले मनात पाप भावना ,प्रायश्चिताची भावना निर्मान झाली तर संत महात्मे तोडगे सांगतातच काहिच नाही तर गंगा आहे पाप धुऊन द्यायला. म्हणुन भारतिय लोक ढोंगी दुप्पटी वाटतात.

@ ऋन्मेऽऽष
राजकारणी लोका विषयी हा उल्लेख नाही. कोन्ग्रेस च्या राज्यात भ्रष्टाचार विरुद्ध सतत गळे काढणारा हा वर्ग. समाजात सर्वात वर असणारा वर्ग. आणि जेव्हा फडणवीस टोल काढायला नाही म्हणाले तेव्हा त्या वर्गातील लोकांनी आकडेवारी वगैरे देऊन टोल कंत्राटदारांचा असा निर्ल्लज बचाव करायला सुरुवात केला.
त्याच्या विषयी मी हे म्हणतोय .

मध्ये पण एक whatsapp मेसेज - जो मंद सून बाई जान्हवी जे उदाहरण देऊन मोदी कसे बरोबर आहेत हे सांगू पाहत होता.
असली बकवास करून हे लोक मोदी साहेबांची लायकी च काढतायत हे त्यांना समजत कसे नाही ? मोदी ची तुलना जान्हवी बरोबर ? इतकी घसरण ?

ऊत्तम लिखाण..! लेखनशैली आवडली.

विचारपूर्वक, व प्रामाणिक असल्याने अधिक भावले. अजूनही वाचायला आवडले असते.

काही काही ऊदाहरणे व कोट्या अगदी चपखल आहेत. 'ये घोडा चतुर..' तर अगदी बेलामूम.
[सनी लिओने चा ऊल्लेख ज्या प्रकारे तुम्ही केला आहेत तो थोडा खटकला... तेही एक दुटप्पीपणाच ऊदाहरणच? :)]

लेखातील सर्वच मुद्दांशी सहमत नसलो तरी एकूणात बरेचसे पटते आहे. अर्थात हे 'मनोगतपर' लिखाण असल्याने मुद्दे सहमत का दूमत यास विशेष वाव नाही... तरिही तशी नोंद करून मग वरती तुमचे लेखनस्वातंत्र्य मान्य करायचे हा ईथला दुटप्पीपणा देखिल मान्य आहे. Happy

बाकी, दुटप्पी समाज (व्यक्ती) अगदी ऊसगाव पासून, अमिराती व भारत पर्यंत सर्वत्रच आहे हे अनुभवले आहे. it has almost become a need.. 'survival of fittest' च्या तालावर.! त्यातल्या त्यात, ज्या समाजात आपले वैयक्तीक, संसारीक, वा व्यवसायीक नुकसान सर्वात कमी होते तो समाज (मग ते ठिकाण 'टींबकटू' का असेना) आपल्याला आवडतो. ज्या समाजाच्या नुकसानामूळे आपली ऊन्नती होते तोही समाज आपल्याला आवडतोच Happy हेच सत्य आहे.

शेवटी 'जगण्याची धडपड' हेच या मागचे मुख्य कारण...! 'दुविधा, किंवा 'द्विधा' मनस्थिती वा परिस्थिती हे दुटप्पीपणामागचे मूळ कारण असावे असे वाटते.

असो... अधिक लिखाण वाचायला आवडेल.

वाचतो आहे हप्त्यांमधे.

रोख दोन वेगळ्या वेळेस वेगळ्या वागणार्‍या व्यक्तींबद्दल्/समाजाबद्दल आहे हे समजले. पण तो दीपिका बद्दलचा पूर्ण पॅरा त्या विषयाला धरून वाटत नाही. मुळात कपड्यांवरून स्त्रिया/पुरूष कोणीही कशाला ओळखता यायला हवे ते ही समजले नाही. ओळ्ख झाल्यावर (आणि झाली तर) कोण कसे आहे कळते तेवढे बास नाही का?

सचिन हा भारतातला चांगल खेळाडू त्याला भारतरत्न मिळाले वैगरे सर्व ठीक आहे . तो बर्याचदा म्हणतो कि माझे क्रिकेटवर फार प्रेम आहे ते सर्व ठीक आहे पण ह्या खेळाला पोखरणाऱ्या फिक्सिंग प्रकरणाबाबत मात्र तो नरो व कुंजरो भूमिका घेतो >>> पगारे, सचिन बद्दल तुमचे भलतेच uncompromising लॉजिक अनेक ठिकाणी बघितले आहे. मग तेच मनमोहन सिंगांबद्दल का नाही?

@ गामा_पैलवान_५७४३२,

<< आपल्या आदर्शाच्या ठिकऱ्याठिकऱ्या उडतांना पाहणे खरोखरंच यातनामय असतं. त्यामुळे परांडकर गुरुजींच्या बाबतीत तुम्हाला आलेलं वैषम्य समजू शकतो. पण शेवटी तेही एक माणूसच आहेत. त्यांच्या मर्यादा त्यांनाच ठाऊक.

अभ्यंकर गुरुजींचीही थोडीफार अशीच परिस्थिती आहे. >>

इतक्या अधिकाराच्या पदावर कार्यरत असताना देखील जर मर्यादांमुळे तत्त्वांशी प्रामाणिक राहता येत नसेल तर ते पद त्यागावे हेच उत्तम.

<< बोले तैसा चाले असे आपण स्वत: नाहीयोत, हे अभ्यंकर गुरूजींना माहीत होतं. आपल्याकडून निकोप (हेल्दी) चर्चा होणं शक्य नाही हे त्यांना आत जाणवलं. त्यांनी स्वत:स अपात्र म्हणून धरलं हा त्यांचा मोठेपणा! >>

माझे विचार त्यांनी दाबले हा माझा निष्कर्ष.

<< रामकथेतल्या दुटप्पी वर्तनावर वेगळा संदेश टंकेन. लंबाचौडा विषय आहे. >>

आतुरतेने वाट पाहत आहे.

@ मनरंग, प्रकु, विजय आंग्रे, Naxkumar, सचिन पगारे, मधुकर विनायक देशमुख, सस्मित, यूरो, पियू, योग, मुक्तेश्वर कुळकर्णी
आपणा सर्वांचा मनापासून आभारी आहे

@ हर्पेन,

<< मी दुटप्पी पणे कधीच वागत नाही
असे जर कोणी म्हणत असेल तर तो नक्कीच दुटप्पी बोलत आहे.

न मी खोटे कधीच बोललो नाही
असे कोणी म्हणत असेल तर तो नक्कीच खोटे बोलत असला पाहिजे.

जगाच्या पाठीवर कुठल्याही मनुष्यप्राण्यास सदा सर्वकाळ दुटप्पी नसलेले वर्तन करून राहता येणे अशक्य आहे.

सर्वसामान्य माणूस हा दुबळा, स्खलनशील आणि प्रवाह-पतितच असतो. तो जगण्याच्या ओघात काहीच क्षण त्याच्या परिस्थितीजन्य सामर्थ्याने प्रवाहाच्या विरुध्द जावून लखलखीत चमकदार करू शकतो.

जो जन्मजात / अभ्यासाने सामर्थ्यवान असतो त्याच्याही जीवनात काही क्षण तरी काळे / घसरडे / प्रवाह पतित असे प्रसंग येतातच.

इथे मला एक इंग्रजी सुभाषित आठवते आहे. त्याचा मराठी भावानुवाद असा की
'प्रत्येक संताला भूतकाळ असतो आणि पाप्याला भविष्यकाळ'

त्यामुळे आपण ज्यांना आदर्श मानतो अशा माणसांनी सदासर्वकाळ आपल्या आदर्शपणाच्या व्याख्येत बसेल असे वागावे ही अपेक्षा जरा जास्तच नाही का >>>

माणसाकडून चुका घडणे स्वाभाविक असले तरी त्याने त्याची कबुली देत प्रायश्चित्त देखील घ्यायला हवे. जर एखाद्या मोठ्या पदावर असताना पदाला न शोभणारे वर्तन केले असेल तर ते पदही सोडायला हवे आणि पुन्हा अशा पदाची लालसाही न धरणे हे अतिउत्तम. मी मायबोलीवरच अन्यत्र लिहिलेल्या आदित्य या कादंबरीचे रसग्रहण जरूर वाचा. नायक भरत नाइलाजाने एक अपराध करतो. पुढे त्या अपराधाच्या तीव्रतेहून शतपटीने जास्त तीव्र असे सत्कृत्य देखील करतो तरीही आधीच्या अपराधाच्या शिक्षेतून स्वतःला माफ करुन घेत नाही. मला वाटते हेच जास्त महत्त्वाचे आहे.

<< आपला प्रदीर्घ लेख अजीबात कंटाळा न येता वाचला गेला. लेखन शैली चांगली आहे. >>
धन्यवाद.

<< पण स्वतंत्र विचार करणार्‍या व्यक्तीच्या लेखात नवीन काही विचार सापडेल अशी आशा होती ती फोल ठरली. >>

नवीन असे जगात काय असते? एखाद्याकरिता नवीन असणारे बरेचदा इतरांना आधीच ठाऊक असते. तेव्हा प्रत्येकालाच नवीन वाटेल असा विचार मीच काय पण जगात कुणीही देऊ शकेल असे मला तरी वाटत नाही.

<< शिवाय आपल्या म्हणण्याच्या पुष्ट्यर्थ जी उदाहरणे दाखल केली आहेत ती फारच कमी आहेत. अजून कितीतरी मोठी यादी देता आली असती. >>>

अजून मोठी यादी? हे उपहासाने लिहिले आहे किंवा कसे? कारण आधीच हा लेख लांबीला जास्त झाला आहे. पण हे नक्की की अजुनही यादी वाढविता आली असती इतकी बरीच ठळक व प्रसिद्ध उदाहरणे मजपाशी आहेत. पण ती लिहिण्याची गरज आहे काय? हा लेख वाचल्यावर तुम्हाला जगातील अनेक उदाहरणांमध्ये दुटप्पीपणा दिसून ही यादी तुमच्या (व इतर वाचकांच्याही) मनात आपोआपच वाढत जाईल.

<< आपल्या सारख्या स्वतंत्र विचार करू शकणार्‍या माणसाने आपली विचारशक्ती केवळ समोरच्याला निरुत्तर करण्याजोगे प्रश्न विचारणे ( जे वयाच्या एका टप्प्यात मजा आणते हे ही मानावेच लागेल) यापुरती सिमित न ठेवता जीवनात मानवाला भेडसावणार्‍या अनेकानेक समस्या कशा सुटतील हे बघण्याकरता खर्ची घालावी अशी अपेक्षा कोणी ठेवील तर जास्त होत्ये का ? >>

समस्या आणि उपाय या मालिके अंतर्गत समाजात भेडसावणार्‍या विविध समस्या व त्यावरील सरल उपाय लिहिण्याचा माझा मानस होता. त्यानुसार एक प्रयोग करूनही झाला आहे. फारसा जनप्रतिसाद नसल्याने तुर्तास त्यावर पुढील लिखाण स्थगित केले आहे.

<< तुमच्या मायबोली वरच्या वावरामुळे मी तुम्हाला पेडेस्टल वर ठेवतोय, तुम्ही न सांगता / तुमची मागणी नसताना तुम्हाला आदर्श बनवतोय आणि आता तुम्ही माझ्या मनातल्या व्याख्येनुसार न वागाल तर तुम्हाला मी नावं ठेवणार

फारच दुटप्पी नाही का >>

जर मी इतरांना एखादा उपदेश केला असेल (उदाहरणार्थ परीक्षेत कॉपी करू नका) आणि संधी मिळताच स्वतः तो उपदेश विसरून त्या विपरीत कृती केली असेल तर मला जरूर नावं ठेऊ शकता. नावं ठेवणारा दुटप्पी होऊ शकत नाही.

@ फारएण्ड,
<< तो दीपिका बद्दलचा पूर्ण पॅरा त्या विषयाला धरून वाटत नाही. मुळात कपड्यांवरून स्त्रिया/पुरूष कोणीही कशाला ओळखता यायला हवे ते ही समजले नाही. ओळ्ख झाल्यावर (आणि झाली तर) कोण कसे आहे कळते तेवढे बास नाही का? >>

मला वाटते तुम्हाला पटेल अशा भाषेत मी लिहू शकलो नाही. माझी लेखन मर्यादा. यापेक्षा अधिक सुस्पष्टपणे प्रयत्न करूनही लिहिता येणार नाही.

चेतन सुभाष गुगळे,

>> इतक्या अधिकाराच्या पदावर कार्यरत असताना देखील जर मर्यादांमुळे तत्त्वांशी प्रामाणिक राहता येत नसेल तर ते
>> पद त्यागावे हेच उत्तम.

तत्त्व म्हणून ठीक आहे. नोकरी सोडली तर खायचं काय हा प्रश्न आहेच. पापी पेटका सवाल है. Sad

पूर्वीच्या काळी गुरुकुले होती ती शासनाच्या दडपणाखाली नसंत. त्यांना शेत, पशु, इत्यादि स्वत:ची उत्पन्नाची साधने होती. त्यांना करही द्यावा लागत नसे. तेव्हाच्या गुरुवर्यांना प्रायश्चित्त वगैरे घेणं ठीक होतं. आजच्या परिस्थितीत तोच निकष लावणं अवघड आहे.

आ.न.,
-गा.पै.

Pages