मार्लन ब्रँडो : तीन दर्शने

Submitted by अमेय२८०८०७ on 26 May, 2015 - 04:37

दिग्गज अभिनेता मार्लन ब्रँडोविषयी इतके काही भरभरुन लिहिले गेले आहे की त्यात नवीन भर घालणे कदाचित अशक्य ठरावे. त्याच्या भूमिका, बेदरकार प्रतिमा, वादळी खाजगी आयुष्य आणि या सर्वांहूनही सरस उठून दिसत राहणारे त्याचे अचाट व्यक्तित्व याचा अनेक समर्थ लेखण्यांनी आपल्यापरीने शोध घेतलेला आहे त्यामुळे प्रस्तुत लेखाचा तो विषयच नाही.

नुकत्याच घेतलेल्या उन्हाळी सुटीत एका वेगळ्या विषयावर करायच्या लेखनाची पूर्वतयारी म्हणून काही चित्रपट - संदर्भ ताजे करण्यासाठी- पुन्हा पाहणे झाले. लेखन अजून कच्च्याच अवस्थेत असले तरी या निमित्ताने पाहिलेल्या चित्रपटांनी पुनर्प्रत्ययाचा अमाप आनंद दिला. त्यात "अ स्ट्रीटकार नेम्ड डिझायर, ऑन द वॉटरफ्रंट, गॉडफादर आणि अपोकॅलिप्स नाऊ", या ब्रँडोने अजरामर केलेल्या कलाकृतींचाही अर्थातच समावेश होता. उल्लेख केलेल्या चार चित्रपटांपैकी "अपोकॅलिप्स नाऊ"बाबत मतभेद संभवतील पण हॉलिवुडच्या कोणत्याही काळात लिहिल्या जाणार्‍या इतिहासात बाकी तीन चित्रपटांचा उल्लेख झाला नाही असे कधीही होणार नाही याची खात्री आहे. अशा तीन तीन सरस अफाट भूमिका करण्याचे भाग्य लाभलेल्या कलावंताविषयी असलेला आदर आणखीनच वाढीस लागला आहे.

या चित्रपटांची मोहिनी सुखद नशेप्रमाणे अशी जबरदस्त आहे की त्यातून बाहेर येऊ नये असेच वाटते. त्या वातावरणात अजून काही काळ राहण्यासाठी मार्लनविषयी यु ट्युबवर आणखी काय नवीन मिळते हे शोधत असता तीन दर्शने अनपेक्षितरित्या हाती लागली. दर्शने एवढ्यासाठीच म्हणतोय की या तिन्ही वेगवेगळ्या काळात घेतलेल्या मुलाखतींमधून वेगवेगळ्या स्वरुपाचा तरीही आतली मूळ गाठ जपणारा मार्लन समोर येतो.

लिंक्स देणे अपरिहार्य! मात्र संपूर्ण लेख वाचून नंतर व्हीडीओज पाहिले तरी चालण्यासारखे आहे कारण मूळ उद्देश व्हीडीओज दाखवणे हा नसून त्यातून एक आस्वादक म्हणून काय दिसले, हे थोडक्यात सांगणे, हाच आहे.एखादा समर्थ कलाकार कलेसोबतच एक माणूस म्हणून कसा बदलत विकसित होत जातो हे पाहणे किती मनोरंजक असते याचा प्रत्यय मला हे सर्व पाहताना आला.

https://www.youtube.com/watch?v=oqcOMWMSoA8

पहिली मुलाखत आहे १९५५ सालची. त्या काळात वापरलेले तंत्रही इंटरेस्टींग वाटेल. प्रश्नकर्ता स्टुडिओत आहे आणि मार्लन हॉलिवुडमधील त्याच्या घरात बसून उत्तरे देतो आहे, घर दाखवतो आहे. मार्लनचे वृद्ध वडीलही त्याच्यासोबत आहेत. लहानपणीचे फार्मवरील जीवन आठवणारा, घरात केवळ आईचे एकमेव चित्र लावले आहे हे दाखवणारा, वडिलांसोबत हास्यविनोद करणारा आणि झपाटून जाऊन ड्रम्स वाजवणारा मार्लन पाहणे चाहत्यांसांठी मनोरंजक आहे. या मुलाखतीवेळी ब्रँडो ३१च वर्षांचा असला तरी काहीसा स्थिरावलेला आहे. स्ट्रीटकारचे ब्रॉडवे प्रयोग, चित्रपट यांचे यश, ज्युलिअस सीझर, विवा झपाटा आणि द वाईल्ड वन हे चित्रपट यांमुळे आत्मविश्वास कमालीचा वाढलेला आणि त्यात भर म्हणजे ऑस्कर. सगळे जग मुठीत असल्याचा भास देणारे हे दिवस आणि तसाच सहज अभिमान (पण उद्दामपणा नव्हे) ब्रँडोच्या देहबोलीत दिसतो.

https://www.youtube.com/watch?v=LAPDQ5MlLxE

दुसरी एक दीर्घ मुलाखत नंतर १९७३ मध्ये घेतलेली आहे. गॉडफादरची अचाट सफलता, दुसरे ऑस्कर आणि ते न स्वीकरल्याबद्दल उठलेले वादळ या पार्श्वभूमीवर घेतलेली. मागचा ३१ वर्षांचा तगडा नायक आता पन्नाशीत आलाय. १९५० ते १९६० मध्ये प्रचंड यश पाहिल्यावर पुढे १९७०च्या दशकात दारुण अपयशही त्याच्या वाट्याला आले आहे. भटक्या जमाती, इंडीयन्स यांच्या भल्यासाठी काम करायला वाहून घेतो आहे, आपल्या चित्रपटांबद्दल बोलायला नाखूष आहे. त्याच्या रुपात, शरीरयष्टीतही काळानुरुप बदल झालेत पण वागण्या-बोलण्यातील उर्जा तशीच आहे. सहा भागात असलेली ही मुलाखत दीर्घ असल्यामुळे असेल, पण इथे मार्लनची मते अधिक ठाशीवपणे समोर येतात. त्या विशिष्ट कार्याच्या कैफात असल्याने त्याबद्दल मार्लन भरभरुन बोलतो, इतरांना ऐकायला लावतो. त्याच्या वैयक्तिक किंवा व्यावसायिक जीवनाकडे तो मुलाखतकाराला जास्त जाऊ देत नाही.

https://www.youtube.com/watch?v=Kz1C3p_86rY

तिसरी मुलाखत १९९४ ची. लॅरी किंगने घेतलेली. मार्लन आता सत्तरीत आहे. मुलाखत वगैरे द्यायला अत्यंत कंटाळा करणार्‍या मार्लनने ही मुलाखत दिली ती आपल्या आत्मचरित्राची पूर्वप्रसिद्धी करण्यासाठी, रँडम हाऊसशी झालेल्या कराराला जागण्यासाठी. केवळ एकच मुलाखत देईन अशी अट घातल्यामुळे कंपनीने साहजिक लॅरी किंगला निवडले असणार. मार्लन आता थोडा सौम्य झाल्यासारखा वाटतोय, म्हणजे पीळ आहे पण सुंभ काचत नाही इतकेच. ही या तिन्ही मुलाखतींमधील सर्वात परिपूर्ण वाटते. लॅरीच्या कुशलतेमुळे तो मार्लनची भव्य तटबंदी हळूहळू काबीज करतो, त्याला विविध विषयांवर बोलायला भाग पाडतो. अनेक वर्षांनी मार्लन त्याच्या अभिनयाच्या प्रक्रियेविषयी, कलात्मक वाढीविषयी विस्ताराने बोलतो. स्वतःच्या यशापयाचे काहीसे कोरडे भासणारे मूल्यमापन करतो. यशासोबत त्याच्या अंगी दाटू लागलेला प्रक्षोभ आणि त्याचे कारण न कळणार्‍या दिवसांत झालेली घालमेल, यशस्वी आणि अयशस्वी यांतील दुर्दैवी फरक, पैशाचे महत्त्व यांवरही तो मोजके पण मार्मिक भाष्य करतो. मी चांगला अभिनेता आहे याचा अर्थ मला स्वतःच्या अंतःप्रेरणांना दर्शकाला रुचेल आणि मला जितके चांगले जमेल त्या पद्धतीत पडद्यावर दाखवतो...या आशयाच्या चर्चेचा एक नितांतसुंदर भाग या मुलाखतीत आहे तो केवळ ब्रँडोप्रेमीच नव्हे तर एकूणच सिनेमावेड्यांना नक्की भावेल.

यु ट्युब कृपेने उपलब्ध असलेल्या या तीन बहारदार मुलाखती. अर्थात यातून त्याच्या पूर्ण व्यक्तित्वाचा आलेख निघतो असे मुळीच नाही पण एका अतिशय आवडत्या अभिनेत्याविषयी आणखी काही जाणून घ्यायची भूक या पाहून अंशतः तरी शमेल असे मला वाटते. स्टेssलाss असे उद्वेगाने कळवळून पुकारणारा, आय हॅव अ‍ॅन ऑफर फॉर हिम ही कान्ट रेझिस्ट असे बर्फाळ आवाजात पुटपुटणारा, लक बी अ लेडी टुनाईट असे गाणारा, आय हॅव किल्ड नोबडी म्हणणारा, हॉरर अँड मॉर्टल फीयर शुड बी युवर फ्रेंड्स...ऑर दे विल बी युवर ग्रेटेस्ट एनीमीज..असे अंधारातून भीतीच्या दार्शनिकाप्रमाणे जाहीर करणारा.. अशी अनेक रुपे दाखवून अनेकांना समृद्ध करणारा हा अभिनेता प्रत्येकवेळी तितकेच चकित करतो.

सिनेमावर पोसलेला आमचा पिंड. यात अनेक दैवतांचे अधिष्ठान. फक्त अभिनेते सांगायचे झाले तर क्लार्क गेबल, जेम्स स्ट्युअर्ट, स्पेन्सर ट्रेसी, हंफ्रे बोगार्ट, ग्रेगरी पेक, केरी ग्रांट, अल पचिनो, जॉन वायट, पीटर ओ टूल, डस्टीन हॉफमन, जॅक निकल्सन, रॉबर्ट डी निरो, ब्रॅड पिट, हॅरीसन फोर्ड, शॉन कॉनरी, जॉर्ज क्लुनी, टॉम क्रूज, लिओनार्दो दीकॅप्रिओ.......किती नावे लिहावीत! तरीही जगबुडीवेळी मोजक्या तीन सिनेमांना सोबत न्यायचे असेल तर मी "अ स्ट्रीटकार नेम्ड डिझायर, ऑन द वॉटरफ्रंट आणि गॉडफादर" यांनाच सोबत नेईन (आणि जॅकेटच्या चोरकप्प्यात "रोमन हॉलिडे" टाकेन). Wink

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अमेय .... मला या बद्द्लकाहि माहीती नाही पण तु जे लिहिले आहेस सुंदर लिहिले आहेस
यावर मामा चांगला प्रतिसाद देतील ..

मार्लन ब्रँडो बद्दल मी खूप काही ऐकले वाचले आहे पण कधी त्यांचे सिनेमे पाहिले नाहीत. मध्यंतरी मी मॅनहॅतनमधे गेलो त्यावेळी मार्लनचे चित्र असलेले टी शर्ट आणि अनेक सुवेनिअर्स मी तिथे पाहिलेत.

अमेय, तुझा हा शोध,.. हा अभ्यास लवकर पुर्ण होवो आणि तू अजून छान लिहो.

हा लेख आणि मुलाखती नंतर वेळ मिळाला की वाचेन.

छान लिहिले आहे.. पण अजून विस्ताराने लिहायला हवे होते.
मला आठवतंय त्या प्रमाणे अ‍ॅपोकॅलिप्स नाऊ मधे त्याचा चेहरा केवळ एक सेकंदच दिसला आहे.. शिवाय बाकी बरेच दिग्गज कलाकार त्यात होते,... परत बघायला हवा, निदान त्या हेलिकॉप्टर्स च्या सीनसाठी.

दिनेशदा
फक्त पाहिलेल्या मुलाखतीच्या अनुषंगाने लिहायचे असल्याने त्रोटक वाटले असेल. अन्यथा अशा अभिनेत्याची कारकीर्द म्हणजे दीर्घ लेखच हवा.

अपोकॅलिप्स नाऊमध्ये अगदी सेकंदभर नाही तरी फार कमी काळासाठी तो प्रत्यक्ष दिसतो पण संपूर्ण चित्रपट हा त्याने साकारलेल्या प्रवृत्तीचा शोध असल्याने त्या पात्राची छाया चित्रपटभर आहेच.
मार्टीन शीन हा प्रमुख म्हणाव्या अशा भूमिकेत आणि रॉबर्ट डुवाल, फ्रेडरिक फॉरेस्ट, हॅरीसन फोर्ड वगैरेही आहेत. पहिला सीनही जबरदस्त, हिरवीगार पामची झाडे नेत्रसुखद भासत असतानाच क्षणार्धात हेलीकॉप्टर्स सर्व उध्वस्त करून जातात आणि कॅमेरा हॉटेलच्या खोलीत अस्वस्थ पडलेल्या मार्टीन शीनच्या हिरव्या डोळ्यांवर येऊन स्थिरावतो.

मारीयो पुझोचा डॉन व्हिटो कॉर्लिऑन मूर्तिमंत जिवंत उभा करण्याची ताकद केवळ एका माणसात होती, तो म्हणजे मार्लन ब्रँडो! ऑन द वॉटरफ्रंट मधला टेरी मॅलरी, ज्युलियस सीझर मधला मार्क अ‍ॅन्थनी, स्ट्रीटकार मधला कोवाल्स्की, लास्ट टँगो इन पॅरीस मधला पॉल, ड्राय व्हाईट सीझन मधला इयन मॅकेन्झी अशा अनेक भूमिका त्याने अजरामर केल्या, परंतु गॉडफादर मध्ये जो ब्रँडो दिसतो, तो या सर्वांपेक्षाही सरस ठरतो!

मस्त लिहीले आहे. व्हिडीओ घरुन बघेन आता.

मारीयो पुझोचा डॉन व्हिटो कॉर्लिऑन मूर्तिमंत जिवंत उभा करण्याची ताकद केवळ एका माणसात होती, तो म्हणजे मार्लन ब्रँडो! >> +101