काय होईल मग पुढे माझे

Submitted by उगले इंद्रजित. on 19 May, 2015 - 00:58

जवळ माझ्या कुणी टिकत नाही
मी कुणालाच परवडत नाही

कान देऊन ऐक तू माझे..
सहज काहीच मी म्हणत नाही!

बाग नुसतीच ही बहरलेली..
एक झोका कुठे दिसत नाही

रान नुसतेच हे पसरलेले..
पाखरूही कुठे दिसत नाही

फक्त त्याचा विचार केल्याने
जे हवे ते कधी मिळत नाही

ही अवस्था किती बरी आहे..
मन कशातच अता रमत नाही

दिवसभर एक काम नसते पण
दिवस जातो कसा कळत नाही

काय होईल मग पुढे माझे..?
आज काहीच मी करत नाही

काय लक्षात ठेवले होते?
नेमके काय आठवत नाही??

-इंद्रजित उगले

'सप्तरंग' सकाळ पुरवणीत पुर्वप्रकाशीत..

Group content visibility: 
Public - accessible to all site users