आज हाती हात माझा घे म्हणाली ती मला

Submitted by बेफ़िकीर on 9 May, 2015 - 11:42

आज हाती हात माझा घे म्हणाली ती मला
न्यायचे आहे तिथे तू ने म्हणाली ती मला

आत गेली त्रासुनी पण दार उघडे ठेवले
जा म्हणाली ती मला की ये म्हणाली ती मला

मी अहो जाहोत माझे स्वप्न शृंगारायचो
पण 'अरे कारे'तही ना 'ए' म्हणाली ती मला

क्षण असा आला जिथे जो पाहिजे ते बोलतो
काय सांगू मी कुणाला जे म्हणाली ती मला

एवढी दिलदार व्यक्ती पाहिली नाही कधी
जे नको आहे तुला ते दे म्हणाली ती मला

मी मला तेथेच का भेटायचो हे जाणले
भेटलो तेथे तिला जेथे म्हणाली ती मला

पाचवीला पूजलेल्या काळज्या ह्या 'बेफिकिर'!
ते म्हणाली ती मला की हे म्हणाली ती मला

-'बेफिकीर'!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

एवढी दिलदार व्यक्ती पाहिली नाही कधी
जे नको आहे तुला ते दे म्हणाली ती मला
खरंच या शेरात काहीतरी विशेष दडलं आहे.
गझल आवडली.

आहाहा.. बेफिकीर, खूप आवडली ही गझल.
समोर बसून बोलल्यासारखी...

अख्खी गजल आवडलीये... तरिही,

<<एवढी दिलदार व्यक्ती पाहिली नाही कधी
जे नको आहे तुला ते दे म्हणाली ती मला>>
खासम खास

आज हाती हात माझा घे म्हणाली ती मला
न्यायचे आहे तिथे तू ने म्हणाली ती मला

आत गेली त्रासुनी पण दार उघडे ठेवले
जा म्हणाली ती मला की ये म्हणाली ती मला

एवढी दिलदार व्यक्ती पाहिली नाही कधी
जे नको आहे तुला ते दे म्हणाली ती मला

Vvaa vvaa

hats off.

मतला दुसरा आणि सहावा खूप आवडले

एवढी दिलदार व्यक्ती पाहिली नाही कधी<< फार्फार आवडली ही ओळ

बाकी शेरही आवडलेच

झकास!

मस्त गझल...

आत गेली त्रासुनी पण दार उघडे ठेवले
जा म्हणाली ती मला की ये म्हणाली ती मला ..

हे वाचून तुमच्या काही कथा आठवल्या..:)

शेवटचा शेर जरा मूड बदलत आहे गझलेचा...