मीटर डाऊन (लघु कथा )

Submitted by मुरारी on 4 May, 2015 - 02:18

ऑफिस मधून निघालो, बस स्टँड वर आलो तर हा धो धो पाऊस परत सुरु, चायला अख्खा दिवस मुसळधार पाऊस सुरु आहे, थांबायचे नाव नाही. मुंबईतला पाऊसच घाणेरडा चायला. मला २६ जुलै ची आठवण आली. FM वर सांगत होते, अर्धी मुंबई भरलीये पावसाने. बहुतेक ऑफिसेस दुपारीच सोडून दिली.आमचा बॉस हलकट पण एक नंबरचा, तो बाजूलाच राहतो. त्याला काय घेणंदेणं? अजिबात सोडले नाही आम्हाला. काम संपवून बाहेर पडेपर्यंत चांगलीच रात्र झालेली आहे. गेला अर्धा तास बसची वाट बघतोय. ना बस ना टॅक्सी.हा रोड पण भरायला लागलाय पाण्याने.

एरवी हे असले वातावरण मला जाम आवडले असते, एकदम थ्रील वाटते. मस्त अख्खी रात्र पण काढली असती.मुंबईत ढिगाने मित्र आहेत, टाईमपास करायला.पण आत्ता उद्याच्या जर्मन पेपरचं टेन्शन आलंय,मला काहीही करून घरी पोचायचेच आहे बास, एक करता येईल, मेन रोड पर्यंत चालत जाऊयात, कोणीतरी लिफ्ट दिली तर किंवा टॅक्सी मिळू शकते.तिकडून बस मिळते का ते पाहू, किंवा काहीही करू, पण इकडून निघू.
आलीया भोगासी ... अगदीच काही नाही मिळाले तर बारा किलोमीटर चालत जाऊ चेंबूर पर्यंत, पण आज घरी जायचेच.

अरे वा एक टॅक्सी थांबली चायला, भैया चेंबूर चलोगे?
हा शेरिंग ठीके, चलो जल्दी

चायला नशीब उघडलं, शेरिंग तर शेरिंग

दरवाजा उघडून आत बसलो, आत अजून एक जण होता. पण तो झोपलेला होता. परेल फ्लाय ओवर क्रॉस झाला. चायला बेक्कार पाणीच पाणी.उद्याच काही खरं नाही. मुंबई थांबली. टॅक्सीत मस्त जुनी गाणी लावलेली होती. वा मझा आ गया.तेवढ्यात बाजूला बसलेल्याकडे माझं लक्ष गेलं. हा ओळखीचा वाटतोय.. अरे हा पशा?? हो ...येस. झोपलाय, उठ्वू का?
दहा वर्षांपूर्वी, २००५ ला फोर्ट ला "ब्लू शार्क" नावाची एक छोटी कंपनी होती, त्यात आम्ही एकत्र काम करत होतो, नंतर त्या मुंबईतल्या पूर थैमाना नंतर हे साहेबही अचानक नोकरी सोडून गेले.कोणालाही न सांगता.बर मुंबईत हा एकटाच राहत असल्याने कोणाला संपर्क करायचा तेही समजल नाही. मग मीही काही महिन्यात ती नोकरी सोडली.आणि २ वर्षांसाठी पुण्याला गेलो. ते मागच्या वर्षी परत आलो.तेंव्हा फेसबुक नसल्याने आमचा संपर्क राहिलाच नाही. आणि आज अचानक या गाडीत हा बाजूला. त्याला मी उठवलच, आधी एकदम बावरून तो उठला, पण मी दिसल्यावर एकदम ओरडला अबे तू ? इथे कसा काय ? त्याला सांगितलं अरे मी इथेच असतो परेलला. आता पावसाने बस चे प्रोब्लेम्स झालेलेत म्हणून बाहेर पडलो तर हि गाडी मिळाली.नेमका तू दिसलास. तू कसा काय लेका इकडे? चायला किती वर्षांनी भेटतोय? कुठे गायब झालेल्लास? तो पण एकदम सावरून बसला.

किंग्स सर्कल क्रॉस झालं. गप्पा सुरु झाल्या.माझी सगळी राम कहाणी त्याला सांगत बसलो.तो पण उत्साहाने ऐकत होता.एक दोनदा माझं बाहेर लक्ष गेलं. परत किंग्स सर्कल क्रॉस झाल्यासारखे वाटले. पण पाऊस भरपूर होता. आणि गप्पांच्या नादात माझे लक्ष नसेल म्हणून मी दुर्लक्षित केले. जुन्या ऑफिस मधले किस्से दोघेही रंगवून सांगत होतो, आठवत होतो. परत एकदा किंग्स सर्कल क्रॉस झाले, आता माझी सटकलीच, पशा काहीतरी बोलायला जाणार तेवढ्यात त्याला थांबवून त्या भैयाची घेतलीच, साले मीटर डाऊन करके मुंबई घुमा रहा हे क्या, कितने बार किंग्स सर्कल दिखायेगा ? सीधा ले गाडी अभी, चुत्या समझके रक्खा हे क्या?

त्यावर तो काहीच न बोलता टॅक्सी दामटत राहिला, किंग्स सर्कल वरून गाडी सरळ सायन फ्लायओवर वर आली, आता उजवीकडे वळले कि चेंबूर,हे कन्फर्म.

पशा तू पण चेंबूर ला राहतोस ना अजूनही.

तेवढ्यात अचानक टॅक्सी बाहेर लक्ष गेले, परत "किंग्स सर्कल"

आता पूर्ण खोपडी सटकली, अरे काय प्रकार सुरु आहे ? अबे तिसरी बार इधरही?
त्या भैयाची गचांडीच धरली,
तेवढ्यात पशा म्हणाला, सोड त्याला,त्याची चूक नाही अरे

गेल्या दहा वर्षात लाखो वेळा आम्ही दोघे किंग्स सर्कल फिरतोय,याला अंत नाही, तुझं मीटर आत्ता डाऊन झालंय........

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चामारी

दणकाच बसला राव Sad
एकदम साधी सरळ सुरवात करून एकदम भूगाच केलात शेवटी

लघुकथेत हेच आवश्यक असते, परफेक्ट !!

Pages