देव डी / मर्दानी / मेरी कोम

Submitted by दिनेश. on 28 April, 2015 - 08:06

मायबोलीवरची चित्रपटविषयक चर्चा मला खुप आवडते. पण इथे अंगोलात आल्यापासून चित्रपट थिएटरमधे बघणे शक्य होत नाही. या सगळ्या चर्चेवरून मनात एक कल्पना केलेली असते. नेमके काय बघायचे, त्याचे आडाखे असतात.

भारतभेटीत मग या सिडीज विकत घेतो ( सगळ्या काही मिळत नाहीत ) आणि इथे आल्यावर पुरवून पुरवून बघतो.
अश्याच तीन चित्रपटांबद्दल ( मला जे वाटले ते ! )

देव डी

अभय देओलचा देव डी काही वर्षांनी परत बघितला. एखाद्या कथेला दिलेले नवीन रुप म्हणून मला हा आवडतो.

मला देवदास हे कॅरेक्टर् म्हणून अजिबात आवडत नाही. पण एके काळी देवदास हा तरुणांचा आदर्श होता. त्याच्या
सारखे, माजी प्रेयसीच्या आठवणीने झुरणे म्हणजे पुरुषार्थ वाटत असे तरूणांना.

मी सैगल साहेबांचा देवदास बघितला नाही. दिलीपकुमारचा बघितला होता. शाहरुख खानचाही बघितला होता.
दिलीपकुमारचा मला फक्त गाण्यांसाठी आवडला होता. पण नंतर तो दारुच्या आहारी जातो, चंद्रमुखीच्या
घरी पडतो, मग तो टांग्यातला कंटाळवाणा प्रवास.. मला प्रचंड बोअर झाले होते.
शाहरुखचा आवडला तो लूक्स साठी ( त्याच्या नाही, ऐश्वर्या आणि माधुरीच्या ) पण गाणी मात्र अजिबात आवडली
नव्हती. त्यातल्या त्यात डोला रे आवडले होते, पण तेही चालीपेक्षा दोघींच्या नाचासाठी.

मूळ कथेत पारो आणि चंद्रमुखी भेटतात का ते माहीत नाही. पण दिलीपकुमारच्या देवदासमधे त्या ओझरत्या भेटतात ( म्हणजे समोरासमोर येतात एवढेच ) शाहरुखच्या देवदासमधे तर अगदी एकत्र नाचतातही.

माधुरीचा मार डाला नाच मात्र मला तितकासा ग्रेसफुल वाटला नाही. एकतर अश्या टाईपची गाणी, पाकिजा, उमराव जान वगैरे चित्रपटात जास्त चांगली चित्रीत झाली होती. आणि माधुरीच्या कडून माझ्या त्यापेक्षा जास्त
अपेक्षा होत्या. तिच्याच आवाजातले गाणे आणि ते कथ्थक ( विथ दॅट हेवी घागरा ) पण मला तितकेसे प्रभावी वाटले नव्हते.

शाहरुखने बहुदा आपण दिलीपकुमारसारखा अभिनय करू शकतो, हे दाखवण्यासाठीच हा केला असेल, कारण त्याने कथेत फारसे काही वेगळे केले नव्हते. त्या दोघींचा एकत्र नाचही, पब्लिक डिमांड वरून केला होता असे मी
वाचले. कपडेपट, सेट्स आणि चित्रीकरण मात्र झकास होते.

देव डी ने मात्र सगळ्याच कल्पनांना सुरुंग लावलेत. ( सहज एक निरिक्षण, बंगाली देवदास साकारणारे चारही अभिनेते सैगल, दिलीपकुमार, शाहरुख आणि अभय पंजाबी आहेत. आणखी एक पंजाब दा पुत्तर धर्मेंद पण हेमामालिनी आणि शर्मिला बरोबर देवदास करणार होता. एखाद्या बंगाली उत्तम कुमारने तो जास्त चांगला साकारला असता का ? )

देवदास या नायकाला माझी सहानुभूती कधीही मिळणार नाही. पण अभयचा देव ला केवळ शेवटच्या एका सकारात्मक प्रसंगामूळे ती मिळाली.

आधीच्या दोन्ही चित्रपटात नायिकांना काही कणाच नाही. पारो लग्नाच्या रात्री येऊन, पळून जाऊ हे सुचवते,
ते तितकेसे पटत नव्हते. पण देवच्या पारोत ( माही गिल ) तो स्पार्क आहे. ती अर्थातच खुप धाडसी आहे पण
अभ्यासात हुशारही आहे. आधीच्या चित्रपटात तिच्या सामाजिक दर्ज्याबद्दल देवदासचे आईवडील हरकत घेतात.
इथे देव स्वतः तसे उदगार काढतो.

देवबद्दल तिला नंतरही जे ममत्व वाटत असते, ते हॉटेलमधे जाऊन त्याचे कपडे धुण्याच्या प्रसंगात नेमके टिपलेय. खरं तर तो स्वतः प्रामाणिक नसतानाही त्याने तिच्यावर अप्रामाणिकपणाचा आरोप केलेला असतो.
त्यावेळचे तिचे अपमानित होऊन त्रागा करणे पटतेच, पण त्या नंतरही हॉटेलमधल्या प्रसंगात, ती जशी
वागते, त्यातून तिच्या मनाचा थोरपणा जाणवतोच.

आधीच्या दोन्ही चित्रपटात चंद्रमुखीची पार्श्वभूमी नाही. इथे मात्र ती आहे. तिचे त्या क्षेत्रात ओढले जाणे दुर्दैवी आहेच, पण त्यातही तिचे शिक्षण चालू राहणे.. अशी एक पुसट सोनेरी किनार आहे.

चंद्रमुखीचा सल तर अधिकच गहीरा. तिची चूक तिला मान्य आहेच, पण ती क्लीप तिच्या वडीलांनी डाऊनलोड
करून बघितली, हा तिचा सल. वडीलांनी, " बेटा जो हो गया सो हो गया " असे म्हणावे, एवढीच तिची अपेक्षा.
तिचा पदोपदी अपमान करणारा, देव.. एका प्रसंगात तिला हेच शब्द बोलतो.. त्यातून त्याचेही माणूसपण
जाणवते.

आधीच्या दोन्ही चंद्रमुखी, केवळ मूकपणे देवदासची सेवा करतात.. इथे मात्र ती अत्यंत डोळसपणे त्याला मार्गावर आणायचा प्रयत्न करते. शेवट अगदी सुखांत नसला तरी अगदीच निराशाजनकही नाही.

माही गिल आणि कल्की, दोघींचाही हा पहिलाच चित्रपट. तरीही दोघींनी जे धाडस दाखवलेय त्याला तोड नाही.
कल्कीने तर संवादातही ( वेगवेगळे अॅक्सेंट्स, शब्द ) चमक दाखवलीय. पहिल्याच चित्रपटात, तू कुरुप आहेस,
असा संवाद झेलणे, चित्रविचित्र ड्रेसेस कॅरी करणे.. हे धाडसच.

गाणी मात्र मला झेपली नाहीत. बरीच आहेत ती पण बहुतांशी बॅकग्राऊंडलाच वाजत असल्याने तशी फारशी खटकत नाहीत.

मर्दानी

मी मागच्यावेळी भारतात होतो त्यावेळी मर्दानीचे प्रोमोज चालले होते. तरुण मुलींना मर्दानीपणा दाखवायचे
आव्हान केले जात होते. नंतर मी सिडी घेऊन आलो.

भारतात सेक्स ट्राफिकची समस्या आहेच. ती तीव्रदेखील आहे, पण या चित्रपटात ती दाखवलीय तितक्या सहजपणे सुटणारीही नाही.

राणी मुखर्जी मला पहिल्या चित्रपटापासून आवडत आलीय ( तिच्या आगमनाच्या वेळी, लोकसत्ता तील समीक्षकाने लिहिले होते, काजोल ला अभिनयात टक्कर देणारी तिची बहीणच असेल. ) मर्दानीमधेही तिने
उतम अभिनय केलाय. पण तिने शरीरावर मेहनत घ्यायला हवी होती. किमान कॅमेरातून तसे दिसायला हवे होते.
शेवटच्या प्रसंगात करण रुस्तोगी पडलेला आणि ती आवेशात ऊभी असा जो शॉट आहे त्यात तिचे बुटकेपण
उगाचच जास्त जाणवतेय.चित्रपटातील भाषा मला खटकली नाही, हे शब्द आता सहज कानावर पडतात. ते टाळले असते तर चित्रपट वास्तवापासून फार दूर गेला असता.

मला आणखी एक बाब आवडली, म्हणजे त्या मुलींचे उत्तेजक चित्रण टाळले आहे. तसे केले असते तर चित्रपटाच्या हेतूबाबतच शंका आली. करण रुस्तोगी, त्याचा मित्र, वकील या भुमिकांसाठी केलेली कलाकारांची
निवड योग्य आहेच पण मीनू रुस्तोगी साठी केलेली ( मोना आंबेगावकर ना ती ? ) निवडही उत्तम आहे. केवळ २/३ प्रसंगातून तिने साकार केलेली मीनू रुस्तोगी ग्रेटच.
पुर्वी तिला ट्व्हीवर अँकर म्हणून बघितले होते. नंतर आमिर खानच्या मंगल पांडे मधे एका क्षुल्लक भुमिकेत. तिला यापेक्षा चांगले रोल मिळायला हवेत.

तूमको नही मै छोडूंगी हे गाणे मला छान वाटले. त्यातले, जिस देशमे माँ बहन रिश्ते नही, गाली है.. अशा आशयाची जी ओळ आहे, ती तर अगदीच खरी आहे.

पण तरीही हे कथानक मला स्वप्नरंजन पातळीवरचेच वाटले. पटकथेतही काही (अर्थातच मला ) न पटलेल्या
बाबी आहेत.

त्यापैकी काही..

शिवानी आपल्या दत्तक मूलीला, अमूक ठिकाणी सापडली असे थेट तोंडावर सांगते. असे उल्लेख सहसा केले जात नाहीत.
दुकान तोडफोडीच्या प्रसंगात ज्या माणसाला ती थोबाडते तोच माणूस तिच्या नवर्याच्या तोंडाला काळे फासण्याच्या प्रसंगात आहे. पहिल्या प्रसंगात जी सेक्शन्स ती सांगते त्यापैकी कुठल्याच सेक्शनखाली तो
जेरबंद होत नाही ?

तिला जे पार्सल मिळते ते उघडताना ती पुरेशी काळजी घेत नाही. बेवारशी वस्तूंना हात लावू नका असा प्रचार होत असताना ती फारच निष्काळजीपणा करते. त्याच वेळी ती ज्या इमारतीत राहते तिथे सिक्यूरीटी असल्याचे जाणवत नाही. तिला पार्सलमधून जी वस्तू पाठवली जाते, ती पण मला पटली नाही. ज्या कारणासांठी मुलींचे
अपहरण केले जाते, त्या क्षेत्रात असे शारिरीक व्यंग मुद्दामहून तरी नक्कीच केले जाणार नाही.

त्या केसमधून तिला बाहेर काढल्यावर ती जे तर्कट लढवते तेही मला पटले नाही. सराईत गुन्हेगाराच्या जोडीदाराला त्याच्या उद्योगाची सर्व कल्पना असेलच, हे सगळ्या केसेस मधे खरे नसते. मृताच्या अंगावरच्या
वस्तू जमा करताना, त्याचे पुर्ण डीटेल्स नोंदवलेले असतात, त्यामुळे ती जे काही शोधून काढते, ते त्या नोंदीत
असायची शक्यता होतीच ( आणि त्या वस्तू अशा रितीने बाहेर काढणेही सोपे नक्कीच नव्हते. )

ज्या टेलरकडे ती जाते त्याला वकिलाच्या धंद्याची पुसटशी कल्पना असणारच ( कारण तोच विचारतो, कि पोलिसांशी झटापट झाली का ? ) पण त्याला वकीलाच्या प्रेमपात्राचीही माहिती असेल, याची शक्यता कमीच.
( तो काही सलूनवाला नाही, जिथे ग्राहक थोडावेळ थांबून अशा गप्पा मारतील ) आणि समजा असली तरी, शिवानीने आपले ओळखपत्रही दाखवलेले नसताना, तो ती माहिती देईल्,हेही मला पटले नाही.

नंतर ती रुस्तोगीच्या घरी जाते ( ती पुरेशी काळजी घेऊन जाते हे नंतरच्या फ्लॅशबॅकमधे कळते ) पण तिथेही
सावधपणे वागत नाही. मीनू नोकराला बाहेर पाठवते वगैरे संशयास्पद असताना ती साखर घातलेला चहा पिते,
हे पटले नाही. ( ती जरी कॅल्क्यूलेटेड रिस्क असली असे धरले तरीही. )

पुढे मीनू तिचा मेकप करायचा असा संवाद म्हणते, पण तसे काही केलेले दिसत नाही. मेकप केला असता तर तिला एखादा भडक ड्रेस वगैरे घालायला लावला असता, आणि मग कदाचित तिचे शस्त्रही सापडले असते. त्यापेक्षा तो संवादच नसता तर बरे झाले असते.

मेरी कोम

हा मला खुपच आवडला.

मला स्वतःला बॉक्सिंग च्या मॅचेस बघायला आवडत नाहीत, तरी देखील या चित्रपटातली सर्वच दृष्ये अस्सल
आहेत, हे जाणवलेच.

मेरी कोम ची कामगिरी महान आहेच आणि तिच्या जीवनावर चित्रपट काढावा, असे निर्मात्याला वाटणे हे पण
कौतुकास्पद आहे. प्रियांकाने घेतलेली मेहनत तर प्रत्येक सीनमधे जाणवते. तिचा चेहरा मणीपुरी धाटणीचा नाही, हा डोळ्यात भरणारा फरक असला तरी ती प्रत्येक प्रसंगात मेरी कोमच वाटते.

ती सोडल्यास बाकीचे सर्वच कलाकार मुद्दाम त्या तोंडावळ्याचे निवडल्यामूळे सर्व प्रसंग अस्सल वाटतात.
तिचे माहेरचे घर, नवर्याचे घर, शेत, रस्ते हे पण सगळे अस्सल वाटते.

मणीपूरची मैती भाषा ऐकायला कशी असते ते मला माहीत नाही, पण चित्रपटात त्या बाबतीत केलेले प्रयत्नही
चांगले आहेत. प्रियांकाने डबिंगवरही मेहनत घेतल्याचे जाणवते. ती प्रॅक्टीस करत असताना, बाळ रडायला लागते, त्या वेळचा तिचा संवाद बघा. प्रॅक्टीसने लागलेला दम आणि बाळासाठी आई जो खास आवाज लावते त्याचा तोल
तिने उत्तम साधलाय.

तिचे व्यायामाचे, प्रॅक्टीसचे जे प्रसंग आहेत ते इतके अस्सल वठलेत कि प्रत्यक्ष रींगमधल्या प्रसंगातही ती बॉक्सरच वाटत राहते. टिपीकल हिंदी फिल्मी फाईट्स जेव्हा चित्रीक करतात त्यावेळी स्लो मोशनमधला
एखादा ठोसा, त्यानंतर तोंडातून निघालेला रक्ताचा फवारा वगैरे असतोच, या चित्रपटात तसा अपवादानेच आहे.

एरवीच्या प्रसंगातही तिचा रागीट पणा तिने मस्तच दाखवलाय, पण लिखित माफी द्यायचा जो प्रसंग आहे,
तो बघणे मला अशक्य झाले, इतका उत्कट अभिनय केलाय तिने त्यात.

काही काही संवाद तर अफलातून ( मेरे साथ तूम बिलकूल सेफ है... कभी ना कभी तो फेस करनाही है.. आज पानी जादा ठंडा है क्या ?.. इतनाभी ना डराओ के डरही खतम हो जाये )

सर्वच मॅचेसचे चित्रीकरण, त्यातल्या प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया.. अगदी अस्सल. खरतर भारताच्या पुर्वेकडील राज्ये, तिथले लोक, संगीत आजवर कधी हिंदी चित्रपटात फारसे दिसलेच नाही.

एकमेव खटकलेली बाब म्हणजे संगीत.. मणीपूर हे संगीतमय राज्य आहे. ते संगीत या चित्रपटात कुठेच नाही.
तिच्या अंगणात सगळे नाचतात तो एकमेव नाच अस्सल. लग्नाच्या वेळचे गाणे तर आजकाल जे टिपीकल रेकून, कुंथून, श्वास कोंडत गातात त्याचा नमुना.. पण ती क्षुल्लक बाब झाली.

प्रियांका, आता काशीबाई कशी साकार करतेय, ते बघायचेय.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चांगले परीक्षण. मी ह्या तीनपैकी फक्त मर्दानी पहिला आहे. राणी मुखर्जी ऐवजी कोणीही अभिनेत्री असती तरी चालली असती इतपतच अभिनय राणीने केला आहे असे मला वाटले. चित्रपटसुद्धा खूप चांगला आहे अशातला भाग नाही. विषय मात्र चांगला आहे आणि विशेष म्हणजे असा विषय मांडताना कुठेही तोल जाऊ दिलेला नाही.

अभय देओलची मी फॅन आहे. अतिशय चांगला पण अतिशय अंडररेटेड अभिनेता आहे तो.

देव डी पाहिला नाही.
पण अभय देओल आणि कल्की दोन्ही खूप नॅचरल कलाकार असल्याने नक्की चांगला असेल.

मर्दानी आवडला.
टेलरच्या दुकानात किंवा एरियातल्या कुणाकडूनही मिनू रस्तोगीचा पत्ता कळावा अशीच त्यांची योजना असते असे वाटते.

मेरी कोम मस्तं आहे.
मला आवडला.
तो लिखित माफीचा प्रसंग भारीच आहे.

गंमत म्हणजे दोन्ही सिनेमे मी प्रवासात बघितलेत.

वरिलपैकी मी देवडी आणि मर्दानी दोन्ही पाहिलेत. पण देव डी थोडा कंटाळवाणा झाला. त्यामुळे अर्धवट पाहिला. बहुतेक तुम्ही दिलेली सीडी आहे माझ्याकडे Happy आता पुन्हा पाहिन.

मर्दानी मात्र मला खूप आवडला. राणीने खरोखरी जीव ओतून काम केलंय. बाकी निरिक्षणं पर्फेक्ट आहेत. पण चित्रपटात तितकी मोकळिक द्यायला लागते Happy

मेरी कोम मधले फेडरेशन संबंधी, मणीपूर वर होणार्‍या अन्यायासंबंधी, तिला हवालदाराची नोकरी देण्यासंबंधीचे जे प्रसंग आहेत, ते खरोखरीच एक भारतीय म्हणून मला लाजिरवाणे वाटले. अर्थात ते सत्य असतील याबाबत शंकाच नाही.

खूप सुंदर आणि बारकाव्यांनिशी लिहिले आहे. मस्त वाटलं वाचताना ! Happy

देव डी - मला चित्रपट म्हणून ठीक वाटला. देवदास ही व्यक्तिरेखा मला व्यक्तिश: मूर्ख व बिनडोक पेक्षा वरच्या पातळीची वाटते. तुम्ही लिहिल्याप्रमाणे, आधीच्या देवदासांमध्ये जसं देवदासला करुण दाखवला होता, तसं 'देव डी' मध्ये केलेलं नाही, हा एकमेव उल्लेखनीय वेगळेपणा आहे. अभय देओल आवडतोच, त्याने चांगलं काम केलं आहे. एका प्रसंगात तो टॅक्सी ड्रायव्हर सरदारजीला विचारतो, 'सरदारजी, डू यू ड्रिंक?' त्यावर तो सरदार म्हणतो, 'यस! लाईक अ फिश!! हा डायलॉग मी आजन्म विसरणार नाही ! संगीत मला पूर्णपणे 'फरगेटेबल' वाटलं. असल्या संगीताला राष्ट्रीय पुरस्कार मिळणं, ह्याचा मला संताप येतो की कीव हे सांगणं कठीण आहे.

मर्दानी - मला जाम आवडला. तुम्ही लिहिलेल्या सर्व मुद्द्यांवर माझ्या परीने लिहितो.

शिवानी आपल्या दत्तक मूलीला, अमूक ठिकाणी सापडली असे थेट तोंडावर सांगते. असे उल्लेख सहसा केले जात नाहीत.

>> तिच्या एकंदर वागणुकीत 'रफ-टफ'पणाच आहे.
तसंच माझं असं observation आहे की आजकाल दत्तक मुलांना खरं ते मुद्दामच सांगत असतात. त्यात मला काही unnatural वाटलं नाही. माझं तर असं मत आहे की थोडीशी समज आली की सांगायलाच हवं.

दुकान तोडफोडीच्या प्रसंगात ज्या माणसाला ती थोबाडते तोच माणूस तिच्या नवर्याच्या तोंडाला काळे फासण्याच्या प्रसंगात आहे. पहिल्या प्रसंगात जी सेक्शन्स ती सांगते त्यापैकी कुठल्याच सेक्शनखाली तो जेरबंद होत नाही ?

>> आधी ते जे काही बोलते ती डायलॉगबाजी असते. पण कायदा असला तरी तो सर्वांसाठी समान नसतोच. अनेक ठिकाणी कायदा हतबुद्ध होतो, सिस्टीमपुढे. अश्या मस्तवाल राजकारण्यांना जेरबंद करणं, इतकं सोपं नाही, जितकी पहिल्या प्रसंगात केलेली डायलॉगबाजी आहे.

तिला जे पार्सल मिळते ते उघडताना ती पुरेशी काळजी घेत नाही. बेवारशी वस्तूंना हात लावू नका असा प्रचार होत असताना ती फारच निष्काळजीपणा करते. त्याच वेळी ती ज्या इमारतीत राहते तिथे सिक्यूरीटी असल्याचे जाणवत नाही.

>> मला वाटतं, पार्सल पाठवण्यापूर्वी तिचं पाठवणाऱ्याशी बोलणं झालेलं असतं. त्यात काही तरी शॉकिंग असणार आहे, धोकादायक नाही; ह्याची कल्पना आधीच आलेली असते. मुरलेले ऑफिसर्स इतपत तर समजू शकतातच. अ'ब तक छप्पन' मध्ये नानाला एक भलामोठा बुके येतो, त्यावर त्या देशाबाहेर असलेल्या gangster चं नाव असतं. ते वाचूनच त्याला समजतं की ह्यात बॉम्ब वगैरे काही नक्कीच नसेल. तसंच काहीसं हेसुद्धा वाटलं मला.

तिला पार्सलमधून जी वस्तू पाठवली जाते, ती पण मला पटली नाही. ज्या कारणासांठी मुलींचे
अपहरण केले जाते, त्या क्षेत्रात असे शारिरीक व्यंग मुद्दामहून तरी नक्कीच केले जाणार नाही.

>> ठस्सन म्हणून केलं असतं ते आणि एक बोट कापल्याने काय फरक पडतो, जर मुलीकडून धंदाच करवायचा असेल तर ? पण शिवानीला घाबरवण्यासाठी ते केलेलं असतं. त्यातसुद्धा मला काही खटकलं नाही.

त्या केसमधून तिला बाहेर काढल्यावर ती जे तर्कट लढवते तेही मला पटले नाही. सराईत गुन्हेगाराच्या जोडीदाराला त्याच्या उद्योगाची सर्व कल्पना असेलच, हे सगळ्या केसेस मधे खरे नसते. मृताच्या अंगावरच्या
वस्तू जमा करताना, त्याचे पुर्ण डीटेल्स नोंदवलेले असतात, त्यामुळे ती जे काही शोधून काढते, ते त्या नोंदीत
असायची शक्यता होतीच ( आणि त्या वस्तू अशा रितीने बाहेर काढणेही सोपे नक्कीच नव्हते. )

>> त्या वस्तू बाहेर आणणं, हे काही मलाही पटलं नाही. पूर्ण डीटेल्स नोंदवले जातात, हे मान्य. पण काही वेळेस हलगर्जीपणाही होतो. मी हे त्यात जमा केलं.

ज्या टेलरकडे ती जाते त्याला वकिलाच्या धंद्याची पुसटशी कल्पना असणारच ( कारण तोच विचारतो, कि पोलिसांशी झटापट झाली का ? ) पण त्याला वकीलाच्या प्रेमपात्राचीही माहिती असेल, याची शक्यता कमीच.
( तो काही सलूनवाला नाही, जिथे ग्राहक थोडावेळ थांबून अशा गप्पा मारतील ) आणि समजा असली तरी, शिवानीने आपले ओळखपत्रही दाखवलेले नसताना, तो ती माहिती देईल्,हेही मला पटले नाही.

>> वकील वर्षानुवर्षं त्याच्याकडून सगळे कपडे शिवत असतो. अश्या वेळी ओळखी वाढतातच, माहिती असतेच.

नंतर ती रुस्तोगीच्या घरी जाते ( ती पुरेशी काळजी घेऊन जाते हे नंतरच्या फ्लॅशबॅकमधे कळते ) पण तिथेही
सावधपणे वागत नाही. मीनू नोकराला बाहेर पाठवते वगैरे संशयास्पद असताना ती साखर घातलेला चहा पिते,
हे पटले नाही. ( ती जरी कॅल्क्यूलेटेड रिस्क असली असे धरले तरीही. )

>> कॅल्क्यूलेटेड रिस्क. यु सेड इट. आणि त्याचा फायदाही होतोच की तिला !

पुढे मीनू तिचा मेकप करायचा असा संवाद म्हणते, पण तसे काही केलेले दिसत नाही. मेकप केला असता तर तिला एखादा भडक ड्रेस वगैरे घालायला लावला असता, आणि मग कदाचित तिचे शस्त्रही सापडले असते. त्यापेक्षा तो संवादच नसता तर बरे झाले असते.

>> हेसुद्धा ती तिला डिवचण्यासाठी म्हणते, असं मला वाटलं. पण हा संवाद नसता तरी काही फरक पडला नसता, हे मात्र मान्य.

मेरी कोम -

मला ठीकच वाटला. अनेक गोष्टी खटकल्या. ईशान्येकडील राज्यांतल्या अस्थिर वातावरणावर भाष्य नीट झालेलं नाही. तसंच संगीताचा भाग आहेच. इथे मला भूपेन हजारीकांची खूप आठवण आली. छोटे छोटे प्रसंगही खटकले. जसं..
मुलगी आजारी असताना आधी मेरीला तिचा नवरा काही सांगत नाही कारण ती स्पर्धेसाठी बाहेरदेशात असते. आणि सामन्याच्या काही मिनिटं आधी मात्र अगदी तिला हुडकून काढून सांगतो. आणखी तासभर थांबू शकत असतानाही. हा मला शुद्ध पोरकटपणा वाटला. त्या व्यक्तिरेखेचाही आणि दिग्दर्शक-पटकथालेखकाचाही.

देवडी चं संगीत नाही आवडलं ?? इमोशनल अत्याचार गाणे तर टेरिफीकच आहे. व एक माहीवर चित्रीत गाणे आहे ते फार सुरेख आहे. छान सिनेमा आहे.

प्रियांका चोप्रा हिला काशीबाई म्हणून मी बघू इच्छित नाही. अश्यामुळे गुणी लोकल कलाकारांवर अन्याव होतो. चपखल बसतील असे मराठी कलाकार घ्यायला हवे होते. सगळीकडे हीच का मिरवायची. ती तेच ४ प्लास्टिक एक्स्प्रेशन्स देणार.

राणी ओन्स चोप्रा स्टुडिओ. त्यामुळे माझी बॅट तर मी दोनदा बॅटिंग करनार असा प्रकार आहे. विशय चांगला आहे. पण बघायचे धैर्य झाले नाही.

मुलगी आजारी असताना आधी मेरीला तिचा नवरा काही सांगत नाही कारण ती स्पर्धेसाठी बाहेरदेशात असते. आणि सामन्याच्या काही मिनिटं आधी मात्र अगदी तिला हुडकून काढून सांगतो. आणखी तासभर थांबू शकत असतानाही. हा मला शुद्ध पोरकटपणा वाटला. त्या व्यक्तिरेखेचाही आणि दिग्दर्शक-पटकथालेखकाचाही.
>>>>>

अगदी अगदी,
शेवटाला जाताना फिल्मी बनवायचा मोह अवरला नाही की अशी चूक होते.

मात्र ओव्हरऑल आवडलाच

आणि प्रियांकाबद्द्ल काय बोलू.. __/\__
आजघडीच्या अभिनेत्रींमध्ये ती निर्विवादपणे कित्येक पटींनी बेस्ट आहे.

देव डी .. फक्त पधरा मिनिटे पहिला आणि चॅनेल बदलला .. त्यानंतर जेव्हा जेव्हा दिसलाय तेव्हा तेव्हा दुसर्‍याच मिनिटाला बदललाय...

पण त्यातील गाणे..

तौबा तेरा जलवा तौबा तेरा प्यार
तेरा इमोशनल.. अ त्या चा र !

वाह !

मर्दानी नाही पाहिला, पण शक्य झाल्यास बघेन, राणीसाठी.
ती प्रियांका चोप्राच्या तोडीची नाही, पण एक गुणी सिन्सिअर अभिनेत्री आहे. उथळपणा नेहमीच टाळते.

>>आजघडीच्या अभिनेत्रींमध्ये ती निर्विवादपणे कित्येक पटींनी बेस्ट आहे>><<

ह्या गोष्टीसाठी, एक बीबी उघडाच आता.

> देव डी - पहिल्या १५ मिनिटात बंद केल्यावर पुन्हा पहायची हिम्मत झाली नाही..
माझंही असंच झालं होतं. पण परत पाहिल्यावर मला तरी आवडला. आणि शेवटपण पॉझिटीव्ह आहे.
मला तर त्यातला चुन्नी पण भारी वाटला Proud शाखाच्या पिक्चरमधे बाकी घाण असेल सगळं, पण त्यातला चुन्नीबाबू आवडला होता. प से प्यार वगैरे Lol

<<गीत मला पूर्णपणे 'फरगेटेबल' वाटलं. असल्या संगीताला राष्ट्रीय पुरस्कार मिळणं, ह्याचा मला संताप येतो की कीव हे सांगणं कठीण आहे.>>
Uhoh उलट मला पूर्वी 'इमोशनल अत्याचार' फालतू वाटायचं, पण पिक्चरमधे बघताना चांगलं वाटलं होतं.

दिनेशदांचा देव डीचा रिव्ह्यू आवडला, पण अजून लिहीण्यासारखं खूप आहे देव डी मधे..

कारण ती स्पर्धेसाठी बाहेरदेशात असते. आणि सामन्याच्या काही मिनिटं आधी मात्र अगदी तिला हुडकून काढून सांगतो. आणखी तासभर थांबू शकत असतानाही. हा मला शुद्ध पोरकटपणा वाटला. त्या व्यक्तिरेखेचाही आणि दिग्दर्शक-पटकथालेखकाचाही.>>

सहमत!
किती इर्रिस्पॉन्सिबल बिहेविअर.
की फक्तं सिनेमात नाट्यमयता आणायला उगीच घातलाय हा प्रसंग असे वाटते.

<< की फक्तं सिनेमात नाट्यमयता आणायला उगीच घातलाय हा प्रसंग असे वाटते. >>

पण जर खरंच वास्तवात तसं घडलं असेल तर? हा चरित्रपट आहे ना?

ब्लॅक बघतानाही मला असंच जाणवलं होतं की संजय लीला भन्साळीने अमिताभ (शिक्षक) व राणी (अंध-मूक-बधीर विद्यार्थिनी) यांच्यात "ते तसले" प्रसंग उगाचच टाकलेत कारण मी वाचलेल्या हेलन केलरच्या कथेत असे काही नव्हते. मग अधिक माहिती काढून वाचले असता ते खरे असल्याचे आढळले शिवाय ते महिला शिक्षिकेसोबत होते. आपल्या प्रेक्षकांच्या ते पचनी पडले नसते म्हणून बिचार्‍या संजयने तिथे पुरुष शिक्षक नेमला. मी आधी वाचलेली कथा शालेय अभ्यासातली असल्याने फिल्टर्ड होती.

शाखाच्या पिक्चरमधे बाकी घाण असेल सगळं, पण >>> या लिस्ट मधून गाण्यांनाही वगळा.>>>>>>>>>>>>>>>>>> आणि शाखाला वगळु नका. Lol इशssssssssssss

मेरी कोम
मला पण तो हॉस्पिटलमधला प्रसंग प्रत्यक्षात घडला असेल असे वाटत राहिले. तिला सांगावे कि नाही, याबद्दल तिच्या नवर्‍याची चलबिचल दाखवलीय.

पण त्यातला एक उल्लेख मात्र नक्कीच खरा आहे. राजकारणामूळे आपल्या देशातील अनेक गुणी खेळाडू कधी पुढे येऊ शकले नाहीत.. मेडल्स मिळवणे भारताला अगदीच अशक्य कधीच नव्हते.

देव डी मधली गाणी बघताना मला बहुतेक दिलीपकुमारच्या देवदासमधल्या गाण्यांनी सतावले असणार. एकंदरीतच पंजाबी स्टाईलच्या गाण्यांचा कंटाळा आला आता.

सहज विचार आला, हेच कथानक हॉलिवूड वाल्यांनी घेतले असते तर नग्न समीप दृष्यांची रेलचेल असती Happy