तो का दुरून गेला?

Submitted by निशिकांत on 27 April, 2015 - 01:32

ओठात गीत ज्याचे, तो का दुरून गेला?
गुंत्यात आठवांच्या मज गुंतवून गेला

होती जरी निवडली, निर्मोह वाट जगण्या
आला वसंतरूपे अन् मंतरून गेला

दु:खे हजार तुमची, साकीस काय त्याचे?
धंदा झकास झाला, जो तो पिऊन गेला

पैलू विभिन्न होते माझ्या तिच्या मनाचे
समजून एकमेका, रस्ता सरून गेला

लपतोय का निखारा? राखेस पांघरोनी
का धगधगावयाला तो घाबरून गेला?

खोटेपणात ज्याचे आव्हान जिंकलेल्या
पाहून मणसांना कोल्हा पळून गेला

रुद्राक्ष घातलेला, भगव्यात नांदणारा
भोगी, स्त्रियांस भोळ्या, गोपी करून गेला

मज सावली मिळाली, अन् बोनसाय झालो
आलेख वाढण्याचा पिग्मी बनून गेला

गंगेस साफ करण्या, चांडाळ धावल्याने
"निशिकांत" पाप धूण्या, पुण्ये करून गेला

निशिकांत देशपांडे. मो. क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com

Group content visibility: 
Public - accessible to all site users