वाढदिवसाची भेट - शब्दपुष्प अनुभवाचे

Submitted by तोफखाना on 21 April, 2015 - 07:59

काल माझ्या एका मित्राचा वाढदिवस होता, त्याला काय भेट द्यावी ह्याचा विचार करत असतानाच एक कल्पना सुचली आणि त्यासोबत ट्रेक करताना आलेले अनुभव शब्दबद्ध करून हे शब्द पुष्प त्याला भेट दिलं तेच इथे देत आहे.

आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा Happy

========================================================================

जसा मी हाडाचा ट्रेकर नाही तसच मी हाडाचा लेखक पण नाही, पण काही गोष्टी ह्या ज्या त्या वेळीच केलेल्या बऱ्या 'दिसा माजी लिहावे' हा समर्थ उपदेश म्हणून हा प्रपंच.

आज दुसरी इतकी व्यसने समोर असून सुद्धा मला भटकायचा छंद लागला आणि आता ते व्यसन झालं आहे, किंवा जगायचा भाग झाला आहे. आज मला भटकत जगायलाच जास्त आवडत. हा छंद का जडला माहित नाही पण कळत नकळत मात्र जोपासला गेला आणि वरचेवर वाढतच गेला. तमाम ज्ञात अज्ञात वीरांनी पावन केलेली माती भाळी लावण्याचा पुण्य ह्या मुळे माझ्या नशिबी आलं, शिवरायांचा आणि तमाम महाराष्ट्राचा इतिहास बघता आला. गड किल्ल्यावर कित्येक रात्र घालवल्या भूतकाळात समरसून जाण्यचा भाग्य नशिबी आला ते केवळ ह्या वेडापायी. भटकण्याचा छंदाने मला बरच काही दिलं अविस्मरणीय क्षण दिले, अनुभव दिला, जगण्याची नवी उमेद आणि उर्जा हि दिली आणि त्यात तुज्या सारखे मित्र पण दिले.

सह्याद्री अनुभवला, त्याची अंग प्रत्यंग पाहिली, विविध रूपे अनुभवली. काहीना काही शिकतच आलो आहे. डोंगर माथ्यावर बेफाम, बेलगाम सुटलेला उधळलेला वाऱ्याचा 'वारू' , सरळसोट तुटून, 'उत्तुंग उभा ललकारी नभा' असे नामाभिधान सार्थ करणारे बेलाग आणि रौद्र कडे-कपार , पाताळाशी लगट करणाऱ्या आणि काळजात धस्स करणाऱ्या दऱ्या, मस्तकीच्या दागिन्याप्रमाणे माथ्यावर धारण केलेले गड कोट आणि किल्ले, प्रतिस्पर्धी मल्लास शड्डू ठोकून आव्हान देत संरक्षणार्थ उभ्या असणाऱ्या तटबंदी,बुरुज अन माच्या, केवळ थक्क व्हावं आणि आश्चर्य करावं अस स्थापत्य, कातळ फोडून कोरलेल्या गुफा, ध्यानमंदिर,धान्यकोठार, 'छीन्नी' मारू तिथून पाणी काढू अश्या दुर्दम्य इच्छाशक्ती ने कोरलेल्या पाण्याची टाकी, पायऱ्या, जंगलातून वाट काढताना मध्येच गवसणार थंडगार पाण्याचं टाक आणि त्याला लागून महादेव अथवा बजरंगबली ची विश्वासात्मक मूर्ती, नागमोडी वळणे घेत चढणारी - उतरणारी वाट, एन हंगामात मिळणारा रान-मेवा, पडणारा नाही तर अक्षरशः कोसळणारा, आणि नखशिखान्त भिजवून अंतर्बाह्य शुचिर्भूत झाल्याची अनुभूती देणारा वळीव.

हे सर्व अनुभवताना तू नेहमी सोबत राहिला म्हणून हे शक्य झालं, अगदी छोट्या छोट्या गुफा, ध्यान मंदिर,गड किल्ले पण आपण रायगड च्या जगदीश्वराच्या इतकाच पवित्र मानून पाहिलं, तिथे गेलो, चर्चा केली, तर्क केले त्याच वेडाने आपण पुस्तक सुद्धा वाचली किंबहुना एखाद्या ट्रेकच किंवा किल्यांचा प्रथम दर्शन घडला ते पुस्तकातून. कुठे कुठे मतभेद झाले असतील तर ते त्या पुरतेच होते अस मी मानत आलो आहे आणि तू त्याला खंबीर साथ पण दिली आहेस.

तू तिथे नसता तर दुसरा कोणी असता का हा प्रश्न मुळातच चुकीचा आहे 'पर्याय' हा प्रत्येक गोष्टीला असतो हो नसतो हि. आयुष्यातील एक वर्ष कमी झाल अस म्हणण्यापेक्षा त्या वर्षात आपण काय मिळवलं हि गोळाबेरीज अधिक महत्वाची आहे हेच मी मानत आलो आहे. तू असेच ट्रेक करत रहा जिथे जिथे शक्य असले आपण सोबतच आहोत, असू आणि राहूच. इतिहासाच्या पाऊलखुणा बघत राहू जमेल तिथ ह्या अफाट सह्याद्री पुढे नतमस्तक होत राहू आणि हे क्षणभंगुर जगण समृद्ध करत राहू.

Happy birthday n Keep trekking.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users