युरुगुचे पुस्तक : भाग १

Submitted by पायस on 14 April, 2015 - 23:58

पूर्वसूत्र येथे वाचू शकता - http://www.maayboli.com/node/53487

Oh moon, yes you lovely moon
the white home where fairies swarm
Our only audience, don't you enjoy
watching from up there as we perform
There is no script, we are confused
what to do here, act or sing or dance
Thus it is no surprise, as you can see
most of us are machines alive by chance
Oh moon, yes you clever moon
it is as you guessed
the biggest game of chance!

***एक कॅसिनो**

शक्यता! या जगाचा सर्वात महत्त्वाचा गुणधर्म म्हणजे निश्चित अशा नियमांनी बांधलेले असूनही अनिश्चिततेला स्वतःचे असे स्थान आहे. पण असे असूनही हा शक्याशक्यतेचा खेळही काही नियमांनुसारच असावा हा कोण विरोधाभास!! समजा तुम्हाला सांगितले कि एका अंधार्‍या खोलीत २ वेगवेगळ्या रंगांचे मोजे आहेत. तिथून तुम्हाला एक जोड आणायचा आहे कोणतेही प्रकाशाचे साधन न वापरता. तुम्ही कोणतेही ३ मोजे उचलून आणता आणि तुम्हाला यात एक जोड नक्की मिळतो. गंमत आहे नाही, कि तुम्ही या शक्याशक्यतेच्या खेळात छोटासा का होईना पण निश्चित विजय मिळवता. अर्थात दर वेळेस हा विजय इतका सोप्पा नसतो.

"फोर ऑफ अ काईंड डिफिट्स फुल हाऊस. गेम ओवर"
याहू!!! या एरियाचा भाई असूनही रसूलभाई मध्ये एका लहान मुलाचा उत्साह होता. समोरच्या गँगचा प्लेयर बघत बसला होता. आधी आपण व्यवस्थित पत्ते लावूनही हा जिंकला, बरं चीटिंग पकडता आली नव्हती. आणि या वेळेस त्याने पत्ते पिसले आणि न लावता सुद्धा तोच जिंकला. किलर कोण आहेस तू?
किलर त्याने समोर फेकलेल्या पत्त्यांकडे पाहत होता - चार दश्श्या आणि चौकटची राणी. खूप थोड्या लोकांना माहित होते कि तो मुंबईतला सर्वोत्कृष्ट पोकर प्लेयर होता. जोवर किलर खेळणार तोवर रसूलची गॅंग या खेळात हरणार नाही. अशी गॅरेंटी असल्यामुळे रसूल गँग बेधडकपणे अशा कॅसिनो बेट्स स्वीकारत असे.
रसूलने किलरला मिठी मारली. समोरचा भाई मांडवली उद्या करू असे सांगून निघून गेला. किलरसाठी लगेच एक व्हिस्कीचा ग्लास भरण्यात आला. तो एका घोटात रिचवत किलर म्हणाला
"याने काहीच गडबड केली नाही. इतनी आसानीसे इसके पोट्टे मानेंगे? लगता नही है."
"अबे ये कुत्ता थोडा टेढा किसम का है. इसे रिस्पेक्ट का कीडा कांटा है. ये कमसे कम अपने सामने तो नही भौंकेगा. बादमे देख लेंगे. पर खेल देखके मजा आ गया. वैसे आखरी बाजी तू जीता कैसे? नया कॅट तो तुझे लगाने आता नही."
"लावायची काय जरूर? नव्या कॅटचा स्वतःचा असा एक सीक्वेन्स असतो. मला सगळे पत्ते माहीत नसले तरी मला प्रत्येक पत्ता यायची प्रोबॅबलिटी(रसूल याला जादू म्हणतो) माहीत आहे. नॉर्मली प्रो गॅम्बलर्स पहिला पत्ताच टिचकी मारून कापतात, कारण चीट करायचे नक्की असते. सो मी २ तरी दश्श्या येतील असं पाहिलं. आल्या ३ दश्श्या आणि किलवर सहा व चौकट राणी. जर एक दश्शी कमी असती तर मी एक सहाचा पत्ता वाढवला असता आणि हायर फुलहाऊस मॅनेज केले असते. ३ आल्य म्हणून फोर ऑफ अ काईंड बनवला."
रसूलने मान गये टाईप्स चेहरा केला. मग त्या गुप्त रुम मधून बाहेर आले. जाता जाता नॉर्मल कॅसिनोमध्ये एक नजर टाकू असा रसूलचा विचार होता. कोणास ठाऊक एखादा मजेशीर हात पाहायला मिळाला तर.
"भाई ये देखो. ये लडका ब्लाईंडमे है. सारा पैसा हार चुका है. आखरी दांव है. अगर जीतता है तो अबतक हारा हुआ सारा पैसा वापस वर्ना.......हाहाहा."
किलर तो डाव शांतपणे पाहत होता. प्स्युडो डिसकार्ड. समोरचा चीटर आहे, तो रसूलच्या कानात कुजबुजला. पकडला नाही गेला म्हणजे स्किल बरंय, याला कदाचित वापरता येईल. ह्म्म, मग याला घे आपल्या डेबिटमे, रसूल उत्तरला.
"एक सेकंद. मित्रा इकडे कान कर." किलर त्या तरुणाच्या गळ्यात हात टाकत बोलला.
"ए तू दुसरीकडे खेळ. यहां पे जगह नही है." हारणार तरुण म्हणाला.
किलर जोरात हसला. रसूलच्या मित्रांनी लगेच त्याला गप्प केले.
"बेटा, तू नया है. दो कि जगह एक पत्ता फेंकते है तो थोडी सफाई और दिखाते है. अब अगर जीता हुआ पैसा हारना नही है तो जीतने के बाद चुपचाप हमारे साथ चलना."
त्याने एक आवंढा गिळला. त्याला आता हा गेम लवकर संपवायचा होता.
"शो" याचा बदामचा स्ट्रेट फ्लश होता. पोकर मधल्या सर्वोत्कृष्ट हातापैकी एक! याला फक्त रॉयल फ्लश (इस्पिक एक्का, राजा, राणी, गुलाम, दश्शी) हरवू शकतो. प्रोबॅबलिटी ०.०००१५४%! याचे बॅड लक बघता जवळपास शून्यच! आणि त्याने ती पाच पाने उलटली. किलर बघतच राहिला.
"रॉयल फ्लश!!!"
तो त्याचे पैसे घेऊन बाहेर पडत होता तेव्हा सगळे त्याच्या पाठीकडे बघतच राहिले. किलरचा स्वतःच्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता. रसूलने एकाला त्याचा पाठलाग करण्याविषयी डोळ्याने खुणावले. बेटला लागलेली रक्कम तशी मामुली होती पण ही नशीबाची कोलांटीउडी स्तिमित करणारी होती.
****

काणा राजू या नशीबवान हीरोचा पुरेसे अंतर ठेवून पाठलाग करीत होता. च्यायला भाईपण ना, आता जिंकतात पोट्टे कधी कधी. एवढं काय लगेच त्याचा पाठलाग करण्यासारखे झाले. च्यायला सनकीपणाची पण लिमिट झाली.
तो तरुण एका पानवाल्याकडे विडीकाडीसाठी मिनिटभर थांबला. राजूने देखील हीच संधी बघून एक सिगारेट शिलगावली. पण कसंच, तो विडी ओढत ओढत पुढे चालू लागला. "xxxx दम तो ठीकसे लगा." ते थोटूक पायाखाली विझवून राजूने पाठलाग परत सुरु केला.
तो लवकरच हमरस्ता सोडून एका गल्लीत वळला. त्या कळकट वस्तीत तो एका इमारतीत शिरला. राजूने तो पत्ता ध्यानात ठेवला आणि तो माघारी वळला. तत्पूर्वी सिगारेटची तल्लफ भागवणे आवश्यक होते. तो जरा आडोशाला येऊन भिंतीला टेकून झुरके घेऊ लागला. तेवढ्यात त्याची नजर समोर गेली. कुत्र्यासारखं काहीतरी होतं. ग्रे कलरचं ते जनावर आकाराने अंमळ मोठंच होतं. ते हळू हळू त्याच्याकडे सरकू लागलं. राजूने डोळे चोळून बघितलं तर ते गायब! एवढ्यात त्याला पायांपाशी जाणीव झाली. ते पायांपाशी घोटाळत होतं. तो कुत्रा नव्हता. तो एक करड्या रंगाच कोल्हा होता.
राजू नाही म्हणायला थोडासा घाबरला. असा क्षणार्धात कोल्हा येतो वगैरे म्हणजे.... तो त्याला चकवत पळत सुटला. कोल्हा त्याचा पाठलाग करू लागला. थोड्या वेळाने पळता पळता त्याने सहज मागे पाहिले तर कोल्हा गायब. त्याला कसलाही विचार करायची संधी मिळणार तेवढ्यात तो कशाला तरी ठेचकाळला. आईच्ची जय, तो स्वतःच्या नशीबावर उचकत उद्गारला. त्याने पाहिले तर रस्त्यात एक पुस्तक पडले होते. करड्या रंगाच्या केसाळ फरवाले कातडी कवर असलेले पुस्तक!!

(दुसर्‍या दिवशी रसूलच्या माणसांना राजू एका नाल्यात पडलेला सापडला. त्याची अवस्था फारच भयानक होती. अंगावर जखमा, केस विस्कटलेले आणि शून्यात गेलेली नजर. तो काहीतरी नॉनस्टॉप पुटपुटत होता. त्याच्या तोंडात एकच नाव होते - युरुगु)

~*~*~*~*~*~

शिंद्यांच्या घरात आज अवकळा होती. पोलिसांनी घरी येऊन ती दु:खद बातमी दिली होती. अनिरुद्ध नोकरी करणारा तरुण होता. इन्स्पेक्टर जाधवांनी जुजबी चौकशी केली होती. त्या रात्री मित्राकडे जाऊन येतो असे सांगून अनिरुद्ध एकटाच घरातून बाहेर पडला होता. पण तो कुठल्याच मित्राकडे गेला नसल्याचे कळल्यावर घरच्यांनी मिसिंग कम्प्लेंट केली. आणि दुसर्‍याच दिवशी हा धक्का बसला होता. अनिरुद्धने फोन घरीच ठेवल्यामुळे त्याला कॉल किंवा ट्रेसही करता आले नसते. केवळ योगायोगानेच बॉडी अधिक सडायच्या आत सापडली होती. प्राथमिक तपासाअंती जाधवांच्या हाती कसलाच ठोस धागा लागला नव्हता. अनिरुद्ध एक सुस्वभावी तरुण होता, त्याचे कोणीच शत्रु नव्हते. किरकोळ वादावादी झाल्याचे देखील ऐकिवात नव्हते.
इन्स्पेक्टर जाधव तिथून निघाले ते पोस्टमॉर्टेम रिपोर्ट ताब्यात घ्यायला. रिपोर्टनुसार मृत्युचे कारण गळ्याजवळील रक्तवाहिन्या फुटून झालेला अत्याधिक रक्तस्त्राव. वेळ त्या दिवशीचे रात्री १२ ते ४च्या दरम्यान. घरच्यांच्या सांगण्यानुसार तो १०:३० च्या सुमारास बाहेर पडला होता. म्हणजे त्यानंतर किमान दीड तास तरी तो जिवंत होता. गळ्यात काहीतरी खुपसण्यात आले होते पण ते हत्यार काहीसे विचित्र होते. त्या हत्याराला पंचशूल म्हणणे योग्य ठरावे कारण ५ बोथट टोके त्या हत्याराला असावीत. मर्डर वेपन आणि मोटिव या दोहोंचा अभाव होताच, त्यात हे असे विचित्र मर्डर वेपन कोण वापरत असणार? बर माहिम हे अनिरुद्धच्या राहत्या मुलुंडच्या घरापासून पुष्कळच लांब होते. अजून एक गोंधळात टाकणारी बाब म्हणजे अनिरुद्ध घरातून अ‍ॅक्टिवा घेऊन बाहेर पडला होता. ती अ‍ॅक्टिवा अजून सापडली नव्हती.
जाधव स्टेशनवर परतले. एक चहा आणायला सांगून ते डोळे मिटून पुन्हा एकदा सर्वकाही आठवू लागले. काही नजरेतून निसटू पाहतंय का? १०:३० ला मुलुंडमधून बाहेर पडल्यावर माहिमला पोहोचेपर्यंतच जे काही घडले असेल ते असणार. या दीड तासात तो कुठपर्यंत पोचू शकतो हे मॅपवर बघता येईल. अ‍ॅक्टिवा विषयी चोरबाजारात माहिती काढता येईल. ज्याअर्थी ती माहिममध्ये नव्हती त्याअर्थी ती कोणीतरी चोरली आहे. खूनी अशी चोरी कधीच करणार नाही. त्यामुळे कोणी फुटकळ चोर यात इन्वॉल्व झाल्याची शक्यता होती. कदाचित त्या चोराने काही पाहिले असले तर मदत मिळेल. बातमीदाराला बोलवावे लागणार.

~*~*~*~*~*~

त्या कचराकुंडीपाशी ही गर्दी जमली होती. आलेले पोलिस नोंदी करीत होते. मुंबईतल्या नगरवस्तीत असा प्रकार घडावा हे धक्कादायक होते. बारकू यात हडबडून गेला होता. पण त्याची चौकशी करणे भाग होते कारण हा प्रकार त्याच्या प्रथम लक्षात आला होता.
"हं नाव काय तुझे?"
"बारकू"
"अरे, शाळेत काय नाव सांगतोस?"
"साळंत न्हाई जात म्या"
"ओ बाई याचं खरं नाव काय?"
"आत्माराम. आज्याचं नाव हाये याच्या, पर आमी समदं बारकूच म्हनतो." त्याची आई उत्तरली.
"असू दे. बर बारक्या, बैजवार सांग. काय काय झालं?
"मी आयेबरोबर नेहमीप्रमाणे कचरा गोळा करायला आलो. मग कचरा हिकडं टाकल्यावर मी थोडा वेळ असाच कचर्‍यात काही कामाचं मिळतंय का बघत होतो. आई समोरच्याच बिल्डिंगमध्ये सफाईचं पन काम करते. तोवर माझं हे नेहमीचंच आहे."
"बरं मग?"
"मंग मला या काळ्या कॅरीबॅग्ज दिसल्या. म्या आपलं जुना चप्पल-बूट मिळतोय का त्ये पाहिलं. तर त्याऐवजी ही हाडकं आणि ही कवटी. म्या गेलो घाबरून. मग तेवढ्यात आईच आली. आणि आमी इतरांच्या मदतीने तुम्हाला फोन करूनशान बोलावून घेतले."
ती हाडे आणि कवटी त्या सब इन्स्पेक्टरने निरखून पाहिली. माणसाचीच होती ती. कोणीतरी नक्की मेलं होतं ज्याची खबर दुनियेला नव्हती. खूनाची शक्यता अगदीच होती पण कोणाचा?
"ह्म्म. ठीक आहे. समजा गरज लागली तर तुला परत आमच्या प्रश्नांची उत्तरे द्यायला चौकीवर यावं लागेल. यांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स घ्या रे नोंदवून."
पंचनामा नोंदवून झाल्यावर मग परतण्यापूर्वी एक चहा मारावा असा विचार करून सर्व पोलिस जवळच्याच टपरीवर गेले. चहा पिता पिता एका हवालदाराने बरोबरच्या साहेबाला विचारले
"साहेब. काहून केले असेल ओ, आनि कोनी केलं आसंल?"
"काय माहिती? तसंही फक्त हाडकं मिळाली म्हणजे लगेच खून झाला असंही नाही. एखादा अघोरी वगैरे पण यात गुंतलेला असू शकतो."
"अवो पर अघोरी कधी असा वस्तीत येतो व्हय. त्येबी हाडकं टाकायला. काय तुमी सायेब!"
"बरं मग कोणाचा झाला खून? नाही सांगू शकत ना"
"नाही."
"आला का लाईनीवर. बघतील मग वरचे लोक. आपल्यावर प्राथमिक तपास करायची जबाबदारी होती, ती आपण केली. आता हे प्रकरण आपल्या हद्दीत घडलं म्हणजे आपण इन्वॉल्व राहणार पण माझ्या अंदाजाप्रमाणे कोणालातरी या केसवर नेमतील बघ. हा प्रकार जड जाणारा आहे हे नक्की." तो त्या बॅग्ज कडे बघत उद्गारला.

~*~*~*~*~*~

ते सर्व अनिरुद्धच्या बहिणीचे मित्र होते. अनिरुद्ध वारल्याची बातमी ऐकून ते हबकलेच होते. अनिरुद्ध त्यांच्याहून काहीच वर्षांनी मोठा होता आणि एकंदरीत त्यांचे चांगलं जमायचे. ते सर्व मानसीला, अनिरुद्धच्या बहिणीला जरा चेंज म्हणून बाहेर घेऊन आले होते. आता अनिरुद्धला जाऊन ५ दिवस झाले होते. मानसीला याचा जबरदस्त धक्का बसला होता. तिचा लाडका अनिदादा असा अचानक तिला सोडून गेला होता. राहून राहून गप्पांची गाडी तिथेच येऊन थांबत होती.
" पोलिस काय म्हणाले? काही सापडंल का त्यांना?" - मयूर
मानसीने नकारार्थी मान हालविली. यावर आलोक, कुणालने गप्प राहणंच पसंत केलं. तर श्रेयाने मानसीला जवळ घेत मयूरला खडसावले.
"मयूर. आपण कशाला आलो आहोत इथे? का पुन्हा पुन्हा तोच विषय काढतो आहेस?"
"सॉरी पण मला खरंच आश्चर्य वाटतंय कि अनि बरोबर कोणी असं करू शकतं. माझी स्वतःची हीच इच्छा आहे कि पोलिसांनी गुन्हेगाराला लवकरात लवकर पकडावं"
"पण ते पकडू शकतील का?" इतक्या वेळ गप्प बसलेली प्रज्ञा बोलली.
प्रज्ञा मानसशास्त्राची विद्यार्थिनी होती. पक्की टॉमबॉय. फक्त दिसायला नाकीडोळी नीटस असल्याने आणि केस बर्‍यापैकी राखल्याने पहिल्या फटक्यात तिच्या टॉमबॉयनेसचा अंदाज येत नसे. वर अंगात डिटेक्टिवगिरीची हौस. असं हे अजब रसायन या अन्यथा शांत शांत ग्रुपला कसे काय जॉईन झालं होतं ते आता कोणालाच आठवत नव्हते. पण या ग्रुपचा एक अविभाज्य हिस्सा आता ती बनली होती.
"आपले पोलिस कधी काही करतात का? ज्या केसेस चुटकीसरशी सुटायला पाहिजेत त्या केसेस हे भिजत घोंगडे ठेवल्यासारखं वर्षानुवर्षे खेचतात. कागदपत्रांच्या ढिगार्‍यात केस आणि पुरावा हरवून जातात. मग कसला खूनी, कसला पुरावा, कसला तपास आणि कसली केस?"
प्रज्ञा! फटकळ प्रज्ञा नेहमीप्रमाणेच जास्ती बोलून गेली होती.
"प्रज्ञा हे काही बरोबर नाही. एकतर तुझा फटकळपणा यावेळेस जास्तीच झाला. म्हणजे अगदी उचलली जीभ आणि लावली टाळ्यालातला प्रकार. दुसरे म्हणजे तू पोलिसांना इतकं कुचकामी समजू नकोस. सगळेच पोलिस भ्रष्ट, कामचुकार नसतात. इन्स्पेक्टर जाधव आपण पाहिले त्यावरून चांगल्या ऑफिसर्स पैकी एक वाटतात."
श्रेयाने तिचे कान खेचले. मग कुणालही दुजोरा देत बोलला.
"आणि दुसरे म्हणजे हे काय चुटकीसरशी सुटायला पाहिजे? खाऊ आहे का? वेळ तर लागणारच."
"अरे तसं नाही. म्हणजे इतर जग बघ मानसशास्त्राची मदत घेऊन अधिक प्रगत पद्धती वापरतात. शेरलॉक प्रमाणे सीनचे मायक्रोडिटेल्स तपासणे इथे नाही. जे पॉयरो काही प्रमाणात करायचा, ते सायको प्रोफाईलिंग फक्त मोठ्या केसेस मध्येच होते. सर्व केसेस मध्ये का नाही?"
"अगं ती पुस्तकं आहेत. तुला हे सगळं एकदम सोप्प वाटतं नाही. तू हौशी डिटेक्टिव म्हणून सोडवलेल्या केसेस पाहूयात. लहानपणी शेजारच्यांची हरवलेली मांजर शोधून देणे, जी त्यांच्याच घरात माळ्यावर लपून बसली होती."
"तात्यांना झालेल्या फूड पॉयजनिंगचा गुन्हेगार, एक्स्पायरी उलटलेला केचप"
"आणि ती केस, शेजारच्या आकाशने आणली होती. क्रिकेट मॅचमध्ये चीटिंग केली का नाही?"
"बास बास" प्रज्ञा म्हणाली. आपण जरा जास्तच तारे तोडलेले दिसत आहेत याची जाणीव तिला झाली.
"ए प्रॉपर एक्सपीरियन्स नसला म्हणून माझ्या डिटेक्टिवगिरीला नावं ठेवू नका हं. मनात आणलं तर ही पण सोडवून दाखवेन."
"मग सोडव ना." - मानसी. सगळे तिच्याकडे बघू लागले.
"मी तुला ही केस सोडवायचं कॉन्ट्रॅक्ट दिलं असं समज मिस डिटेक्टिव. आणि हे मी अजिबात चिडून देत नाहीये. तू बाकी कशीही असली तरी हुशार आहेस आणि एक्स्ट्राचे प्रयत्न काही नुकसान नक्की करणार नाहीत त्यामुळे मी तुला प्रायव्हेट डिटेक्टिव म्हणून ही सोडव असं सांगत आहे."
प्रज्ञा काही क्षण आ वासून मानसीकडे पाहतच राहिली. मग भानावर येऊन ती म्हणाली
"आर यू सीरियस मानसी?"
"येस डॅम सीरियस"
"इफ सो, देन ओके. डन. प्रायव्हेट डिटेक्टिव प्रज्ञा देसाई अ‍ॅट युवर सर्विस मॅडम."
~*~*~*~*~*~

क्रमशः

पुढील कथासूत्र येथे वाचू शकता - http://www.maayboli.com/node/53576

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सर्व लोक - _/\_
हा भाग थोडा छोटा आहे हे मान्य पण वारसा ज्यांनी वाचली आहे त्यांना अंदाज आहेच कि हळू हळू भागांची लांबी वाढत जाईल. पुढचा भाग शक्यतो उद्या रात्रीपर्यंत येईल, जर वेळ झाला तर आज रात्रीच!

यावेळी वारसाप्रमाणे टीपा नसतील कारण डोगोन जमातीचा इतिहास मूळातच त्रोटक आणि विस्कळित आहे तसेच यावेळी वारसाइतकी ऐतिहासिक अचूकता गरजेची नाहीये. म्हणून युरुगुसाठी मधून मधून प्रतिसादांमध्ये असतील.......

एक्स्ट्रा फीचर
उपकथानकांच्या संख्येचा मुद्दा प्रतिसादांमध्ये आला आहे. तर मी सांगू इच्छितो कि या कथानकात केवळ २ मुख्य उपकथानके आहेत. (जर युरुगुचे पुस्तक नक्की काय आहे हे समजावण्याचा पार्ट वेगळे पकडले तर ३) वर वेगवेगळी वाटणारी उपकथानके हळू हळू एकमेकांशी जुळत जातील.
पुढच्या एक्स्ट्रा फीचर मध्ये मी युरुगुविषयी एक हिंट देईन. (खरे तर याच भागात अंधुक अंदाज दिला आहे)

पायस, हो, ते आलं लक्षात Happy खरंतर तुमची कथा वाचून मला शशी भागवतांची 'रक्तरेखा' कादंबरी आठवली. ती आठवण्याचं कारण फक्त इतकंच की त्यातही अशी खूप उपकथानकं आहेत असं वाटतं आणि ती नंतर कनेक्ट होत जातात. अशी कथा/कादंबरी वाचायला उलट जास्त मजा येते. त्यामुळे तुम्ही लिहीताय ते मनापासून एंजॉय करत आहे.

कथा छान चालू आहे, पण.... कदाचित मी घाई करत असेन मत द्यायला. पण फ्रॅन्कली, प्रज्ञा हे पात्र जरा साशंक करत आहे मला तरी .पोलिस इ. कुणाला काही ऩ कळता एका कॉलेजकन्यकेने सर्व उकल केली असे दाखवलेत तर जरा अतर्क्य वाटेल.

@मैत्रेयी - डोन्ट वरी. प्रज्ञाचा रोल महत्त्वाचा आहे पण ती काही सुपरवुमन नाही पोलिस वगैरे कोणाला कळू न देता उकल करायला.

How did I miss this! चौथा भाग पाहिला आणि माग काढत इथे आले..सॉलिड वाटतेय कथा! आता बाकीचे तीन भाग वाचते Happy