माउलीचे मन धाले...

Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 13 April, 2015 - 04:21

तपासण्या औषधांची
साऱ्या पराकाष्टा झाली
खूप यत्न करूनही
म्हातारी कोमात गेली

जीवघेणा रोग होता
कणकण थकलेला
सुडोमोनी जंतू होते
मृत्यू अन ठरलेला

यातनेत भरडला
कसाबसा टिकलेला
लाडकीला पहायाला
प्राण होता थबकला

उपचार थकलेले
चालू होते चाललेले
ठोके श्वास मंद होते
हृदयही थकलेले

परी जीव घोटाळला
कान प्राण आतुरले
लेक तिची दूर देशी
निरोपाचे दूत गेले

दहा दिस मावळले
मरणाला रोखलेले
भीष्म तन होते जणू
सुयांमध्ये खिळलेले

आणि मग एकदाचे
लेकीचे वाहन आले
कानापाशी स्फुंदत ती
कशीबशी तिला बोले

उघड ग डोळे आई
बघ दुरुनिया आले
लाडक्या या पाडसांना
घेवूनीया सवे आले

मिटलेल्या डोळ्यात त्या
काहीतरी चमकले
अडकले प्राण मग
मिनिटांत निसटले

ऐकण्याच्या पलीकडे
होते तिने ऐकियले
भेटण्याची आस होती
माउलीचे मन धाले

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मृत्यू शय्येवरील जीवाचा प्राण जीवलगच्या भेटीसाठी कसा ताटकळतो हे मागील आठवड्यात आयसीयु त प्रत्यक्ष पाहिले त्याची ही कविता.