रात्र - शालिनी वृत्त

Submitted by संतोष वाटपाडे on 10 April, 2015 - 00:50

* रात्र*
रानामध्ये झोपली रात आहे
आभाळाची तेवते वात आहे
काळोखाची वेदना गारव्याने
झाडाखाली भैरवी गात आहे...

पानांमध्ये वाजली चालताना
ओढ्याकाठी पावले शार्दुलांची
एकांताने छेडता सूर कोठे
निद्रा सारी मोडली पाखरांची....

जागोजागी थांबल्या पायवाटा
झोपेसाठी शोधती का निवारा
अस्तित्वाची सावली शोधताना
सैरावैरा धावतो गार वारा...

डोळ्यांनाही वाटते मात्र जेव्हा
शून्यत्वाला देखणे रुप आहे
काही नाही भासते आपल्याला
ठायी ठायी चेतना खूप आहे...

काही वेळा भारते रात्र सारी
अतृप्तीच्या आगळ्या जाणिवानी
काही वेळा झोंबते काळजाला
अंधाराची शांतता जीवघेणी...
-- संतोष वाटपाडे (नाशिक)

Group content visibility: 
Public - accessible to all site users