स्फुल्लिंग

Submitted by अमेय२८०८०७ on 9 April, 2015 - 23:37

हे फार घातकी असते
दुःखाला उजळत जाणे
रक्तातुन वाहत अश्रू
शोकाचे करती गाणे

काळाच्या जखमा मोठ्या
स्मरणांची काळी छाया
झाकोळे अस्तित्वाला
तिजला ना करुणा - माया

खेळास दोष का द्यावा
एखादे दान निराळे
जन्माच्या डावामध्ये
प्रत्येका दुःख मिळाले

आहेत चांगली क्षितिजे
त्यांपल्याड खुणवे काही
का मिटशी पंख स्वतःचे
जर खोट तुझ्यातच नाही?

स्फुल्लिंग जागवत नवखे
दे उपसुन जहरी काटा
अंधार मनाचा सरता
दिसतील उद्याच्या वाटा

-- अमेय

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अत्यंत आशादायी चित्र पुढे करण्यात कवी यशस्वी झाले आहेत. प्रत्येक ओळीतून मानवी मनाच्या उदासीला फुंकर घालताना उद्याच्या प्रकाशाचे सुखद स्वप्न दाखविण्याचा हा यत्न कवितेच्या माध्यमातून सरळपणे सामोरे आला आहे. अमेय पंडितांच्या नित्याच्या धाटणीपासूनची ही काहीशी आगळीच आणि आपली वाटणारी...म्हणजे जणू माझ्या मनातीलच विचार...कविता त्या काहीजणांना दिशादिग्दर्शन करीत आहे जे भूतकाळातील कोमेजलेल्या बागेतच गुंतून पडले आहेत....त्यांच्यासाठी हा उपदेश नसून सल्ला आहे....

"..अंधार मनाचा सरता
दिसतील उद्याच्या वाटा...." ~ खूपच सुंदर चित्र !

वा वा
चक्क मामाश्री दस्तुरखुद्द तेही इतका डीटेल प्रतिसाद
दिन बन गया Happy

अमेय...

मी कविता वाचताक्षणीच त्यातील भावामुळे चटदिशी तिच्या प्रेमातच पडलो....माझा आनंद तातडीने तिथे व्यक्त करावा असेच वाटले मला.

हे फार घातकी असते
दुःखाला उजळत जाणे
रक्तातुन वाहत अश्रू
शोकाचे करती गाणे >>>>> सुरुवातच एकदम जबरीए ....

आणि उत्तरोत्तर बहरत जाणारी कविता - शेवटच्या कडव्याला अग्दी अग्दी म्हणावेसे वाटते ...
सुर्रेखच - अमेयराव ...