कोण म्हणतंय जमत नाही?

Posted
9 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
9 वर्ष ago

अहो, मी डाएट बद्दल बोलतेय.
"कसं काय तुम्ही लोक डाएट करता बुवा? मला तर भात खाल्ल्याशिवाय शांत नाही वाटत."
'वडापाव आठवड्यातून एकदा तरी खाल्लाच पाहिजे'
'पोट मारून जगायचं तर खायचं कधी?'
कधीतरी मरणारच ना? मग खाऊनच मरू....
हे डाएट न करणारे किंव करू न शकणारे आणि थोडे स्थूलतेकडे झुकणारे लोक असं काहीतरी बडबडत असतात. पण कधीतरी आपण हे करून पाहू असा विचार (निदान विचार तरी) करून पाहतात की नाही कोण जाणे.

मी ही कधीकाळी भरपूर स्थूल होते (जवळपास ७७ किलो) आणि ५-६ वर्ष नुसतंच ठरवत होते की आपल्याला वजन कमी करायचं आहे. नुसत्या विचाराने वजन कमी होत असतं तर काय हो, झालं सगळं जग सुकी काठीच असतं मग. पण आम्ही म्हणजे पदार्थ समोर नुसता ठेवला की अंगाला लागतो. नुसती हवा अंगावरून गेली तरी आम्हाला कपडे इंचभर कमीच पडणार. एखादा कपडा (खास करून साडीवरचा ब्लाऊज) या वेळी बसला तर पुढच्या वेळी तो बसेलच अशी खात्री देता येणार नाही या कॅटेगरीतले.

पण मग एक काळ असा आला की मला स्फुरण चढलं आणि मी हळू हळू वजन कमी करणं मनावर घेतलं.
व्यायाम तर होताच पण त्यासोबत तोंडावर जबरदस्त कंट्रोल हे एक अत्यंत जीवघेणं काम आहे. तेव्हा होतं. पण मला आता ते काम अत्यंत सोप्पं आणि करायला सोपं वाटतं.
कसं ते सांगू ? पदार्थ समोर दिसला, कुणी ऑफर केला की फक्त मान या टोकापासून त्या टोकापर्यंत हलवायची. Lol झालं... ही पहिली पायरी आहे.

थोडं गंभीरपणे, तोंडावर कंट्रोल ठेवणं खरंच कठिण काम आहे. त्यासाठी तुम्हाला तुमच्या मनातूनच हे पटलं पाहिजे की मी जे काही खात आहे त्याने माझ्या जीभेला जरी बरं वाटत असलं तरी माझं आरोग्य धोक्यात येतंय.

खाण्याच्या वेळा : - न पाळणे हे तर आपलं एकदम आवडतं काम. पण स्वतःला थोडी शिस्त लावून ठराविक वेळी नाश्ता फळं, जेवण. चहा, इ. घेतलंच पाहिजे. जितकं जास्ती वेळा खाऊ तितकं आपलं शरीर फॅट्स जनरेट करत नाही. उलट जितक्या कमी वेळा खाणं होईल तितकं वजन वाढण्याची भिती जास्त असते.
टु स्टार्ट विथ काही छोटे बदल करून पाहिले तर डाएट मस्त चवदार आणि खाऊनपिऊन वजन कमी करायला मदत करणारं ठरतं.

डाएट न करणारे रोज खातात काय नाश्त्याला? येऊन जाऊन तो उपमा, पोहे, इडल्या, डोसे. यापेक्षा नविन काय खातात? नाहीतर ओट्स, सिरियल्स हे तरी... घरच्या घरीच काही थोडे फार बदल केले तर किती फायदे होतील.

कोणत्याही नाश्त्याच्या डिश मध्ये चिरलेल्या भरपूर भाज्या घालून पहा. सध्या प्लेटभर नुसते पोहे जात असतील तर आता त्या भाज्यांसोबत फायबर ही पोटात जाईल. आणि पोहे कमी होतील. ओघाने कार्ब्स कमी होतील. उपम्यात पण तेच करू शकतो. सो दॅट डोसे इडली. अप्पे सुद्धा भाजी घालून करू शकतो. अशाने पोटातली जास्तीत जास्त जागा कार्ब्स ऐवजी थोडी फार फायबरने ही व्यापली जाईल.
नाश्त्याला एकूण किती प्लेट पोहे खातो आपण? १ -२- फारतर ३. ही क्वांटिटी निम्मि करून उरलेली क्वांटिटी भरून काढण्यासाठी पाणिवाली फळं खाऊन पहा. उदा. कलिंगड्/खरबुज्/पपई/डाळिंब.
या शिवाय नाश्त्याला कटकट वाटेल पण जीभेला आवडातील असे ही पदार्थ करू शकतो.
* सर्व डाळी थोड्या थोड्या घेउन रात्री भिजत घालून सकाळी धिरडी.
* मुळा/ढब्बू/लाल भोपळा पैकी काहीही भरपूर किसून घालून भाजणीचं थालिपिठ.
* नाचणीची धिरडी.
* पालेभाजी बारिक चिरून घालून कणिक आणि बेसन थोडं मिक्स करून त्यांचं धिरडं.
* मशरूम चा पराठा. (किसून्/शिजवून) कसाही.
रोजच्या पोहे उपम्यापेक्षा या गोष्टी करायला ही जास्त वेळ लागत नाही. पण आपल्या डोक्यात एक खूळ बसलंय की पोहे उपमा झटपट होतात. हे पदार्थ ही झटपट होणारेच आहेत.

रोज सकाळी उठून गरम पाण्यात लिंबू पिळून त्यात मध घालून पिण्याने फायदा होतो असं अनेक लोक मानतात. ते खरं ही असेल. पण त्याने बर्‍याच जणांना अ‍ॅसिडिटी होते. त्या ऐवजी हेच पाणी नाश्त्यानंतर आणि रात्रीच्या जेवणा अगोदर असं दोनदा घ्यावं.

सॅलड चा सर्वात मोठा हात आहे वजन कमी करण्यात. कच्चं हे पोटात गेलंच पाहिजे. रोजच्या आहारात दुपारी आणि रात्री कंपल्सरी सॅलड हवंच. त्यात कच्चा कोबी लिंबू पिळून खाल्ल्यास अति उत्तम. पण गाजर, काकडी, टोमॅटो हे खाऊच शकतो. बिटात साखर असते, ती जरी नैसर्गिक असली तरिही शरिराला ती ब्रेक करण्यापेक्षा साठवून ठेवणं सोप्पं असतं म्हणून शरिर ती साठवून ठेवतं. त्यामुळे बीट टाळलेलं बरं.

जेवणातही नाश्त्यासारखी डिव्हिजन केली तर फायदा होऊ शकतो. जितक्या पोळ्या खातो त्यात एक पोळी कमी करू शकतो. आता एकच खात असेन तर काय कमी करू असा विचार करून हैराण होऊ नका.
३ पोळ्या खात असू तर २ पोळ्या भाजी आणि उरलेली तिसरी पोळी सॅलड आणि ताक या दोन गोष्टींनी कॉम्पन्सेट करावी. याने वजन कमी व्हायला मदत होईलच शिवाय जेवल्यावर येणारी सुस्ती येणार नाही.

आमच्या ओळखीचे एक आयुर्वेदाचे डॉक्टर सांगायचे पोटाचे ४ भाग करा, दोन भाग अन्न, एक भाग पाणी आणि एक भाग हवा... असं त्याचं रूटिन असायला हवं. पण आपण ४ ही भाग अन्न भरतो आणि मग गळ्यापर्यंत अन्न आलं, आता थोडी पडी मारू असे विचार डोक्यात यायला लागतात. मूळात आपण खातो त्याच्या एक चतुर्थांश भाग अन्न आपल्याला पुरू शकतं.

मी वजन कमी करायला डाएट ची मदत घ्यायला लागल्यापासून एक गोष्ट कळून चुकली की भूक आणि झोप जितकी वाढवू तितकी वाढते आणि जितकी कमी(गरजेनुसार) घेऊ तितकी पुरू शकते. झोपेचं आपापलं गणित असतं, पण भुकेच्या बाबतीत माझं हे रियलायझेशन फार उपयुक्त ठरलं.
जेव्हा मी आता विचार करते तेव्हा जाणवतं की 'बाप रे, मी हे असं खात होते? इतकं खात होते?' खरंच अबब वाटावं अशा सवयी होत्या माझ्या खाण्याच्या. साधं(?) गणित होतं, घरून निघताना अगदी जेवल्यासारखा नाश्ता (यात पोळी भाजी/ भात वरण च असे) जेवायला ३ पोळ्या भाजी/ रात्री मनसोक्त भात. आणि हे किती चुकिचं होतं हे मला हळू हळू कळलं आणि मला धडकी भरली.... फळं आणि सॅलड नाहीच. सगळे कार्बस. शिवाय आत्ता खाल्लं की डायरेक्ट १ ला च मिळणार ही सुचना मेंदूला गेली की सकाळचा ब्रेफा आपोआपच भ$र$पू$र व्हायचाच. मग शरीर पण आतल्या आत आपली गणितं करतं आणि फॅट्स्/एनर्जी जमवून ठेवतं आणि आपण सुटत जातो.

दुपारनंतर चा आहार शक्यतो हलका आणि सहज पचेल असा असावा. दुपारी लिमिटेड जेवण झालं की चहासोबत २ बिस्किट खाऊ शकतो, त्या शिवाय संध्याकाळी ७ च्या आत अजून एखादं फळ पोटात गेलं पाहिजे. सायट्रिक अ‍ॅसिड युक्त फळं खूप मदत करतात वजन कमी करायला. यात संत्री/मोसंबी/स्ट्रॉबेरी आली. संत्री मोसंबी एका वेळी अगदी २ खाल्ली तरी हरकत नसते. स्ट्रॉबेरीच पण २ च खाव्यात. त्यात साअ‍ॅ चे प्रमाण जास्त असते. याशिवाय आपलं हलकं खाणं, ज्वारी, बाजरीच्या लाह्या, फुटाणे, लाल चणे इ. ने पोट भरी तर होते पण जडत्व येत नाही.

काही लोक नाश्ता स्किप करून लंच आणि डिनर हेवी करतात. पण उलट असायला हवं. रात्री अत्यंत कमी आणि हलकं खायला हवं. यात अनेक ऑप्शन्स आहेत.
* जाडे पोहे ताकात भिजवून त्यात कच्चा कांदा, मीठ साखर आणि किंचित तिखटपणासाठी आवडीनुसार ठेचा/तिखट घालून खाऊ शकतो. एक बोल खा जेवणाची गरज नाही.
* मूग शिजवून त्यात कांदा, टोमॅटो चाट मसाला तिखट, मीठ.... किंवा कोणताही मसाला घालून आवडी नुसार...
* भरपूर सुप, सॅलड. एक ब्राऊन ब्रेड सँडविच किंवा सूपासोबत एक फुलका.
* मूग, हरभरा, मसूर्, मटकी मोड आणून सर्व थोडं थोडं मिक्स करून
* हे रोज नाही करायचं १-२ दिवस आड रात्री पोळी भाजी खाऊ शकतो. सोबत एक वाटी फक्त शिजवलेली (न फोडणी देता) वरणाची वाटी हवीच.

या व्यतिरिक्त तेल कमी खाणे, पाणी भरपूर पीणे. बाहेरचे पदार्थ आणि भात टाळणे (एखाद दिवस चालतो) पण रोज रोज डेव्हिएट करू नये. मोहाला बळी न पडणे हे अत्यंत अवघड काम पण स्वतःचं मन जिंकलं की जग जिंकू शकतो. आणि योग्य वजनाला पोचलो की बाकी सर्व खायचंच आहे की. तेव्हा खादाडीची अख्खी दुनिया आपलीच आहे. Happy

मी पण माणूस आहे त्यामुळे मोह होणं साहजिक आहे. पण मी कॅल्क्युलेट करून डाएट ला फाटा मारते. प्रत्येक माणूस आपल्या शरिरानुसार ते करूच शकतो. माबोचे मित्र मैत्रिणी वगैरे भेटले की मी त्यांच्यासोबत भरपूर खाते अगदी सामोसे/कचोरी सुद्धा पण एरवी मात्र स्ट्रिक्ट म्हणजे अत्यंत स्ट्रिक्ट डाएट. आणि काय आहे ना जमवलं की सगळं जमतं. डाएट आणि वजन ह्या दोन अतिशय रिलेटिव्ह टर्म्स आहेत. सुरूवातच अवघड असते फक्त, आपण करतोय त्याने वजन कमी होतंय हे लक्षात आलं की डाएट जमलंच समजा.

शेवटी काय तर स्वतः स्वतःला घातलेलं बंधन हे सर्वात फायदेशिर असतं.

मग चांगलं आरोग्य मिळवण्याच्या दृष्टिकोनातून हे करायची गरज भासतेय ना? तर वाट कशाची पाहताय?
शुभस्य शीघ्रम!

विषय: 
प्रकार: 

दक्षे, पोट मारून जगायचं तर खायचं कधी,?????.. डाएट न करणारा किंव करू न शकणारा आणि स्थूल लंपन Happy Happy

हे सर्व कधी आणि कसे जमणार??? Sad

दक्षु दी माबोकरीण दिवेकर.. मला म्हायतीये तू किती छान जुळवलंय्स हे , डाएट आणी वजनाचं गणित. ग्रेट जॉब, दक्स!!
माझे चाराणे Wink
रेग्युलर एक्सरसाईझ आणी डाएट कंट्रोल हे वाटतं तितकं कठीण नाहीये जमवायला...

पण पेशंस बाळगणे गरजेचे आहे.

छान लिहिलयस..
घरी असल कि जरा तरी मेन्टेन होत ग पण इथ पुण्यात आल कि सर्व गोष्टी रामभरोसे..
माझा सर्वात मोठा प्रोब्लेम हा कि कुकींग चा शौक आहे पण एकटीसाठी पसारा करण जिवावर येत मग निभावण सुरु होऊन जात .. पण कराव लागेल रुटीन व्यवस्थित .. खुप कंटाळा झाला आता .. तशी कंट्रोल मधेच आहे पण थोडुशी मेहनत हवीय अजुन.. थँक्यु दक्षे आपल हे दक्षिणा .. Happy

छान लिहिले आहे!!! पण डाएटमध्ये बदल करताना तो बदल आपण आयुष्यभर पाळू शकतो की नाही हा विचार महत्वाचा आहे असे मला वाटते. नाहीतर पुष्कळ लोक वजन कमी करतात आणि डाएट सोडले की पहिले पाढे पंचावन्न. मला आत्तापर्यंत आलेल्या अनुभवावरून हे कळले आहे की वजन कमी करण्याचा एकच मार्ग सर्वोत्तम मार्ग आहे. तो म्हणजे: Move more and lift more weights!!

@ तोंडावर जबरदस्त कंट्रोल हे एक अत्यंत जीवघेणं काम आहे. >>> व्हय जी.. Sad
मरणाप्राय यातना होतात ..हे करताना! Lol

ताई, हे भारीये तुमचं अगोदर मस्त्त मासे बनवायला शिकवलेत आणि आता हे.... Proud
मला वाटतं मासे चालतील. बरोबर ना?

लेख उपयुक्त अशा माहितीने परिपूर्ण झाला आहे हे जितके खरे तितकेच हेही खरे की समाजात डाएट ह्या टर्मला असा एक विचित्र अर्थ प्राप्त झाला आहे...जेणेकरून डॉक्टरांनीच ते पाळायला सांगितले आहे म्हणजेच आपली प्रकृतीची काहीतरी तक्रार सुरू झाली आहे असा एक अर्थ नकळत मनी उमटत जातो.

शेवटी दक्षिणा जे म्हणते..."..शेवटी काय तर स्वतः स्वतःला घातलेलं बंधन हे सर्वात फायदेशिर असतं. ..." हेच योग्य.

छान ,मी पण सध्या डाएट करत आहे,७२ कीलोवरून ६८ पर्यंत आलोय व सध्या तिथेच अडकुन पडलोय.नक्की काय करावे?दक्शीना सध्या तुमचे वजन कीती आहे,वजन उतरण्याचा रेट काय होता?

दक्षिणा, छान लिहिलंयस Happy

एकंदरित 'खाण्यासाठी जन्म आपुला' ह्या कॅटेगरीत असल्याने वजन कमी करायचं कशासाठी तर परत ( गिल्ट न बाळगता ) खाण्यासाठी असे ध्येय असते Happy
पाच वर्षांपूर्वी यशस्वीरित्या वजन उतरवल्यानंतर अधूनमधून तीन-चार किलो वाढत-उतरत असले तरी काटा नियंत्रणात राहिलेला आहे.
शक्य तितका पोर्शन कंट्रोल करते. कधीकधी नाही जमत आणि वेड्यासारखं खाल्लं जातं. खास करुन बुफे पद्धतीच्या जेवणात किंवा खूप जास्त क्वांटिटीत मिठाया, चॉकलेटं घरी आल्यास.
सोमवार ते शुक्रवार शक्य तितकं हेल्दी आणि योग्य क्वांटिटीत खायचा प्रयत्न करणे. बाहेर फिरायला गेलं की डाएट मोडायला पुरेपूर वाव असतो. ठीकच आहे कारण आधी लिहिल्याप्रमाणे वेगवेगळं खाऊन बघायला आवडतं.
रोजचा किमान अर्धा तास वॉक शक्यतोवर न चुकवणे. तो झाल्यावर मग जास्तीची काही अ‍ॅक्टिव्हिटी झाली तर तो बोनस. असा बोनस कमवायचा प्रयत्न करणे Happy

धिरज वजन कमी करणे ही एक लाँग प्रोसेस असते. माझं सध्या वजन ६५ किलो आहे. पण मध्ये मध्ये मी डाएट डिस्कंटिन्यू केल्याने थोडं वाढलं होतं. पहिल्या पहिल्यांदा वजन बर्‍यापैकी फास्ट कमी झालं होतं. (मी खूप जास्त ओव्हरवेट नसल्याने तो रेट पण तसा स्लोच म्हणायचा) जे लोक २०-३० किलो वर असतात त्यांचे पहिल्या पहिल्या महिन्यात ४ - ५ किलो सहज उतरते. माझा रेट असा होता महिन्याला एक किलो वगैरे. गेलेल्या वर्षभरात माझं ७.५ किलो कमी झालं.

तुम्ही कुणाच्या सल्ल्याने डाएट करता की मनाने? मनाने करू नका. तज्ञांचा सल्ला घ्या.
वजन अडकलं असेल तर खाण्यापिण्यात बदल करूनच ते घटते.

छान लिहीलय... वजन कमी करणे सध्या मला उपयोगी नसले तरी कदाचित भविष्यात उपयोगी पडेलही, काय झकोबा? बरोबर ना? Wink

आम्हाला आईवडील कानीकपाळी ओरडायचे लहानपणी की जेवढी भूक आहे त्यापेक्षा दोन घास कमीच जेवून उठावे. ती सवय अंगवळणी पडलीच, पण पुढल्या काही वर्षात अवघड आर्थिक परिस्थितीमध्ये तुळशीबागेतल्या दवे स्वीटमार्टमधिल एखाद प्लेट ढोकळा/पापडी यावर रात्रीचे जेवण निभावणे यामुळे ती सवय अधिकच पक्की बनली. आजही कितीही सुग्रास भरपूर अन्न समोर असले तरीही दोन घास कमीच जेवले जाते.
अन आता तर काय? दाढाच नाहीत, त्यामुळे एकेक घास रवंथ केल्यागत चघळत गिळताना कंटाळा येतो अन आपोआपच जेवण मर्यादेत रहाते. देवच माझ्या जाडी न वाढण्याची काळजी घेतोय बहुधा... Proud

छान लिहिलय दक्षिणा Happy

जमवलं की सगळं जमतं. डाएट आणि वजन ह्या दोन अतिशय रिलेटिव्ह टर्म्स आहेत. सुरूवातच अवघड असते फक्त, आपण करतोय त्याने वजन कमी होतंय हे लक्षात आलं की डाएट जमलंच समजा.

>> अगदी खर .