"त्याच्या बागेमधले"

Submitted by अमेय२८०८०७ on 27 March, 2015 - 00:43

रोज चालता झाड खुणावे
त्याच्या बागेमधले
वेदनेपरी फुटती ज्याला
रक्तचंदनी गंधफुले

हिरवे आहे जगते आहे
कमतरता मग कसली
पाखरांसवे उगा बोलणे
हसणे भासे नकली

वाटे जावे गोंजारावे
ऐकावे त्याचेही
कशी लाभली अशी उदासी
अंकुरली जी देही

कितीदातरी जाता पुढती
चमकुन येतो मागे
कराल कुंपण, फाटक मोठे
दूर राहण्या सांगे

ना वठणारी घुसमट असली
क्रूर शहारा देते
परका असुनी माझे काही
अलगद शोषुन घेते

अजूनही ते झाड खुणावे
त्याच्या बागेमधले
गहिऱ्या गहिऱ्या छटेत न्हाती
रक्तचंदनी गंधफुले

-- अमेय

Group content visibility: 
Public - accessible to all site users

फार सुंदर सुंदर लिहिता तुम्ही अमेयबाबू.. तुमच्या कवितेत जी नेहमीच अनोळखी गूढ व्यथा डोकावत राहते ती ह्या कवितेत पण आहेच. त्या व्यथेची ओळख मात्र तुम्ही क्वचितच करून देता.. ह्या कवितेत पण तुम्ही त्या व्यथेला अव्यक्तच ठेवले आहे.
झाड हिरवे आहे. फुलले आहे.मग झाडाची नक्की व्यथा काय ते कळत नाही. त्याचे पाखरांसोबतचे बोलणे तुम्हाला फसवे वाटते आहे त्याला काही तरी कारण असणारच. “ना वठणारी घुसमट” ह्या शब्दातली घुसमट झाडाची असली तर झाडाच्या उदासीचा,वेदनेचा थोडाफार थांग लागतोय असं म्हणता येईल.
आपल्या काय आणि झाडाच्या काय ,आयुष्यात उन्हाळे असतातच. पण झाडाची उदासी वेदना त्या प्रकारची वाटत नाही.काही वेळा जगण्याच्या प्रयोजनाबाबत प्रश्न पडतात. आपल्या सिद्ध अस्तित्वाची कारणे शोधू म्हणता सापडत नाहीत. मग सगळे काही लाभूनही अनुत्तरीत प्रश्न मग निष्कारण श्वास कोंडतात.झाडाची व्यथा, उदासी ,वेदना काहीशी अशीच असावी असे वाटते.
प्रत्येकाचा इतरांच्या व्यथेशी संवाद होतोच असे नाही.कुंपणाचे फाटकाचे अडथळे आडवे येतच असतात.तरीपण झाडाच्या उदासी बाबतचे कुतुहलच तुम्हाला तुमच्या ही नकळत त्या झाडाच्या वेदनेचा सहप्रवासी बनवते आहे. त्या अर्थाने "परका असुनी माझे काही अलगद शोषुन घेते" ह्या ओळी ग्रेट... .. सगळी कविताही ग्रेट..

ना वठणारी घुसमट असली
क्रूर शहारा देते
परका असुनी माझे काही
अलगद शोषुन घेते

फार फार सुरेख लिहिले आहे! ना वठणारी घुसमट! क्या बात है!