तुझ्यासारखा हुशार झालो असतो

Submitted by जयदीप. on 18 March, 2015 - 14:49

तुझ्यासारखा हुशार झालो असतो...
रस्ता नसतो, भुयार झालो असतो!

तुला पाहिले तरी भेटलो नाही!
पुन्हा एकदा शिकार झालो असतो!

ऊब तुझ्या पंखात जराशी असती ...
झाडावरती तयार झालो असतो!

नाव तुझ्या ओठांवरचे मी नसतो
फारफार तर विचार झालो असतो

इतके जपशिल माहित नव्हते आधी
तुला दिलेला नकार झालो असतो!

सूर्य व्हायचे होते, जमले नाही ...
सूर्यामधला रफार झालो असतो!

जयदीप

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सूर्य व्हायचे होते, जमले नाही ...
सूर्यामधला रफार झालो असतो!

व्वा. खयालाची मांडणी फार वेगळी वाटली.
रस्ता थोडा फार समजला. पहिल्या ओळीशी रिलेट करताना पंचाईत झाली.
शिकार सुलभ झाला आहे. गझल अजून पक्की करता आली असती असे वाटले.
आजकाल मात्र मला असे वाटत चालले की कवीच्या मतापेक्षा त्याची कविता गांभीर्याने घ्यायला हवी आहे.
शुभेच्छा.

समीर

तुला पाहिले तरी भेटलो नाही!
पुन्हा एकदा शिकार झालो असतो!

ऊब तुझ्या पंखात जराशी असती ...
झाडावरती तयार झालो असतो!

नाव तुझ्या ओठांवरचे मी नसतो
फारफार तर विचार झालो असतो

अप्रतिम शेर आहेत हे.

भुयार लक्षात आले नाही रफार उगाच वाटला. पुन्हा एकदा -> पूर्ण गद्य ओळ आहे, पण शिकार मुळे जो परिणाम साधला गेला त्यात मजा आहे. रूक्ष शब्दात मांडलेले खूपच गद्य ( पण गेय) शेर हल्ली वाचनात येतात. त्यातला खयाल कितीही उच्च असेल तरी ते फारसे अपील होत नाहीत. तुमची गझल आवडली.

तुझ्यासारखा हुशार झालो असतो...
रस्ता नसतो, भुयार झालो असतो! <<< Lol

जयदीपराव, ही गझल नीट पटली नाही. क्षमस्व!