हासलो नसतो तुला पाहून मी

Submitted by जयदीप. on 11 March, 2015 - 14:47

हासलो नसतो तुला पाहून मी
पण तुला आहे तसा जाणून मी

गोठले पाणी तुझ्या डोहातले!
पाहिला आत्ता खडा टाकून मी

पोचलो दारी तुझ्या अन् जाणले...
चाललो नव्हतो कधी वाकून मी

यायचे नाही मला ऎकायला
पाहिला आहे गळा फाडून मी

भेटणे नशिबात होते आपल्या
पाहिले रस्ते तुझे टाळून मी

जन्म मी नाही दिला आहे तुला
जन्मलो आहे तुझ्या हातून मी

जयदीप

Group content visibility: 
Public - accessible to all site users

गझल आवडली. हे शेर विशेष आवडले:

यायचे नाही मला ऎकायला
पाहिला आहे गळा फाडून मी

जन्म मी नाही दिला आहे तुला
जन्मलो आहे तुझ्या हातून मी

गोठले पाणी तुझ्या डोहातले!
पाहिला आत्ता खडा टाकून मी

यायचे नाही मला ऎकायला
पाहिला आहे गळा फाडून मी

जन्म मी नाही दिला आहे तुला
जन्मलो आहे तुझ्या हातून मी

व्वा. गझल आवडली.
तुमची गझल तुमची वाटते, तुमची वाटचाल उत्तम चालली आहे.

समीर

खूप छान

पाहिला नुसता खडा टाकून मी <<असे वाचले अर्थात मला तसे आवडले म्हणून तसे वाचले क्षमस्व
दाराचा शेर सूचक वाटला तोही आवडला

शेर १ २ ४व ६ वरून माझे काही शेर आठवले
पुनःप्रत्ययाबद्दल आभार

गोठले पाणी तुझ्या डोहातले!
पाहिला आत्ता खडा टाकून मी >>>>>>
प्रथम स्पष्ट करतो की प्रतिक्रिया देण्याचा उद्देश चुका काढणे नसून जे वाटले ते प्रामाणिकपणाने सांगणे हा आहे.
>>>>> माझ्या अल्प समजुतीप्रमाणे पाण्यात खडा टाकल्यावर लवकर बुडबुडा आल्यास पाणी जास्त खोल नसते , उशीरा आल्यास ते अधिक खोल असते. तथापि पाण्यात खडा टाकल्यावर ते गोठले आहे याची जाणीव होणे हे संयुक्तिक वाटत नाही.
...... जयदीपजी ! आपली नेमकी काय संकल्पना होती कळवाल........बाकी गझल आवडलीच - बाळ पाटील

बाळ पाटील,

पाणी गोठले तर त्याचा बर्फ होतो. बर्फावर खडा टाकला तर तो दोन तीन वेळा टण टण उडून शेवटी बर्फावर स्थिरावतो. पाणी गोठलेले नसेल तर तो खडा पाण्याच्या आत जातो. पाणी उथळ आहे की खोल ह्याच्याशी खड्याला काही घेणेदेणे नसते.

आता,

'पाणी' ह्या शब्दाच्या जागी 'एकेकाळच्या प्रियकराबाबतच्या भावना' हा शब्दसमूह योजून शेर वाचून पाहूयात.

ह्या भावना जर गोठलेल्या असल्या तर 'त्या गोठलेल्या आहेत' हे माहीत नसणारा (जुना) प्रियकर (जुन्या) प्रेमाची परिक्षा पाहण्यासाठी एक (आजही अतिशय तीव्र प्रेमभावना व्यक्त करणारा) खडा टाकून पाहील. भावना गोठलेल्या नसल्या तर खडा आत जाईल आणि प्रेयसीच्या चेहर्‍यावर (म्हणजे, येथे पाण्याच्या पृष्ठभागावर) त्याचे काही परिणाम दिसतील. भावना गोठलेल्या असल्या तर प्रेयसीच्या चेहर्‍यावर काहीही बदल होणार नाही.

आशा आहे आता तुम्हाला (ह्या विशिष्ट) शेराकडे 'आशयाच्या' तांत्रिकतेच्या चष्म्यातून न पाहता भावनांच्या वादळाच्या चष्म्यातून पाहण्यास आवडेल. Happy

धन्यवाद!

-'बेफिकीर'!

सर्वांचे मनापासून आभार!!!!
समीरजी - __/\__
बेफिजी तुम्ही जितक्या सुंदर पद्धतीने समजावले आहे ते बघून असे वाटत आहे की शेर तुम्हीच लिहिला आहे (इतक्या आत्मियतेने तुम्ही हे समजावले आहे) , इतक्या अचूक शब्दात मी सांगू शकलो नसतो!
तसेच या शेरात एक जनरल अर्थही अभिप्रेत होता मला - एखादी व्यक्ती - जिची वट आहे, तिच्या तर्फे वशीला लावून तुम्ही तुमचे काही काम करून घेऊ इच्छिता, विशेषतः ती व्यक्ती तुमच्या जवळच्या मित्रांपैकी असेल - त्या व्यक्तीला तुम्ही आधीही काही काम करायला सांगितले असेल, ते त्याने केले असेल (मनात नसताना) तर दुसर्या वेळी ती व्यक्ती नकार देईल असे तुम्हाला मनात माहित असते पण तरी तुम्ही खडा टाकून (चान्स) पाहता. त्या व्यक्तीने स्पष्ट नकार दिल्यावर कळते हा गोठलेल्या पाण्याचा डोह आहे , आपले काम होणार नाही!

" गोठले पाणी तुझ्या डोहातले! " हे रिअलायझेशन आहे! A confirmation of your doubt!
आणि हे "बघितला आत्ता खडा टाकून मी " याचा परिणाम आहे (चाचणी)

कोणी चुका काढल्या तर मला आनंद होतो, शिकायला मिळतं!

धन्यवाद बाळ जी!!

सर्वांचे मनापासून आभार!!
Happy

बेफिजि, जयदिपजी समाधान तर झालेच पण ज्या खिलाडू पणाने आपण प्रतिक्रिया देवून निरसन केलेत त्याबद्दल आपणास मनापासून धन्यवाद !

शेर छानच आहे तो बेफीजींनी सांगीतलेला प्रेयसीचा संदर्भ मीही लावला होता मला तसाच शेर आवडला होता जयदीपनी सांगीतलेला मित्र -वशीला हा संदर्भ देखील परफेक्ट आहे कारण मला वाटते की खडा टाकून पाहणे ह्या क्रियेचा इथे उपयोग जास्त चपखल वाटतो (एक व्यावहारिकता उठून दिसते जी प्रेयसीच्या बाबतीत बोलतेवेळी जरा कमी टची वाटू शकते ...असो )

मी दिलगीर आहे की माझ्या प्रतिसादामुळे चर्चेला अनावश्यकपणे सुरुवात झाली .मी शेर वाचल्यावर वेगळ्या विचारात होतो .एक तर मला माझा एक शेर आठवला . आणि दुसरे असे की मला अत्ता/ आत्ता ह्या शब्दाच्या प्रयोजनाबाबत प्रश्न पडला होता

एक माफी ह्यासाठीही की माझ्या शेराच्या प्रभावामुळे मी खयाल तसा बनवून वाचला आणि मला आत्ता ऐवजी नुसता हा शब्द सुचला माझ्या खयालात प्रियकराला त्या प्रेयसीच्या मनाच्या डोहात उतरायचे..बुडायचे आहे .ह्या जोशींच्या खयालात मला माझ्या शेरातला प्रियकर त्या आधी जराशी चाचपणी करताना दिसला आणि म्हणत आहे की मी नुसता खडा टाकून पाहिला तर तुझ्या डोहातले पाणी गोठले (की तू गोठवून टाकलेस काय माहीत) ..आणी तू असे वागशील तर मी कसा बुडणार तुझ्या डोहात ? बहुधा तुझी इच्छाच नसेल की मी तुझ्या डोहात प्रवेश करावा ..तुला मला दूर ठेवायचे आहे हे मला समजले आहे !

माझा शेर असा होता

बुडावे असे वाटते कैकवेळा
तुझा डोह इतक्यात आटून जातो

(इथे माझ्या काफियात खयालाचे डीटेलिंग वेगळे आहे हे आत्ता लक्षात आले Happy असो धन्यवाद सर्वांचे )

एक बाब मला पुन्हा आठवली की जोशींच्या शेरात पहिल्या ओळीत उद्गारवाचकता आहे आणि दुसर्‍या ओळीत ली क्रिया करून झाल्यावर जे कवीला क्लिक झाले (आकलन / शायराची शेर सुचण्यामागची मूळ संवेदना ) ते त्याने पहिल्या ओळीत लिहिले आहे असे मला वाटले कारण तुझ्या डोहातले पाणी आधीच गोठले आहे असा भाव मला त्या ओळीत दिसला नाही
तुझ्या डोहातले पाणी आधीच गोठलेले आहे (किंवा असावे )पण मला अत्ता समजले जेव्हा मी खडा टाकून पाहिला असे म्हणताना पहिल्या ओळीत गोठलेले आहे ह्या अक्षरांची / शब्दाची उणीव मला तेव्हा जाणवली होती हे आठवले
आणी मला तेव्हा दुसर्‍या ओळीत करण्या ऐवजी पहिल्या ओळीत एक बदल करावासा वाटलेला हे देखील आत्ता आठवले

डोह बहुधा गोठला आहे तुझा
पाहिला आत्ता .. खडा टाकून मी

असो
मनात येइल तशी शेराची चिरफाड करणे ह्या माझ्या वाईट सवयीबद्दल पुन्हा माफी मागतो
सॉरी जादीपराव

चर्चेमुळे वेगवेगळे अँगल समजले हा फायदाच झाला म्हणायचा पण शेर मुळातच उत्तम प्रतीचा असल्याने चर्चा अनावश्यकच होती ह्याचीही जाणीव आहे

असो
पुनश्च क्षमस्व आणि धन्यवाद सर्वांना

हासलो नसतो तुला पाहून मी
पण तुला आहे तसा जाणून मी

जन्म मी नाही दिला आहे तुला
जन्मलो आहे तुझ्या हातून मी

वावा !

गोठले पाणी तुझ्या डोहातले!
पाहिला आत्ता खडा टाकून मी << मस्त अँब्स्ट्रॅक्टिझम..