मानसोपचार आणि समुपदेशन

Submitted by साती on 6 March, 2015 - 07:08

(हा धागा प्रोग्रेसिव्ह असणार आहे. म्हणजे चर्चे दरम्यान जे काही प्रश्नं निर्माण होतील त्या अनुषंगाने मी या धाग्यात काही मुद्द्यांची वाढ करत जाईन. सध्या मोबाईलवरून लिहित असल्याने एकदम बरेचसे लिहिणे किंवा एडिट करणे किंवा संदर्भ देणे सोपे नाही. म्हणून जशी जमेल तशी भर या धाग्यात घालत जाईन)

माझ्या प्रॅक्टीसमध्ये मानसोपचाराची गरज असणारे खूप रुग्णं पहायला मिळतात. नोकरी, व्यवसाय,शिक्षणातले यश-अपयश, नातेसंबंधांतील गुंतागुंत अश्या मानसिक ताण वाढविणार्‍या कित्येक गोष्टी मधुमेह, उच्चरक्तदाब, अंगदुखी असे विविध आजार घडवून आणतात आणि असलेले आजार वाढवितात.

माझ्या कित्येक रूग्णांना तुम्हाला मानसोपचाराची गरज आहे असे सांगितले तरी ते घेत नाहीत. तुम्हीच द्या एक गोळी असे म्हणतात. खरं तर एक फिजीशीयन म्हणून मी मानसोपचाराची औषधेही लिहू शकते पण फार्मसी बाबतच्या कडक नियमांमुळे बरीचशी 'शेड्यूल एच' ड्रग्जआमच्या दवाखान्यात जास्तीत जास्त किती ठेवता येतील यांचा नियम आहे. त्यामुळे असलेला ठराविक कोटाच पुरवून पुरवून वापरावा लागतो. त्याहूनही महत्वाचे म्हणजे मानसिक रूग्णांना औषधोपचारांइतकीच समुपदेशनाचीही गरज असते जी माझ्या क्लिनिकमध्ये मला देता येत नाही. आमच्या एवढ्या मोठ्या जिल्ह्यात कायमस्वरुपी केवळ एकच सायकॅट्रीस्ट आहेत. ज्यांना त्यांच्याकडिल पेशंटच्या अतोनात संख्येमुळे एखाद्या पेशंटला द्यायला पाच मिनिटांपेक्षा जास्त वेळ नाही. त्यामुळे आमच्या जिल्ह्यात समुपदेशन नावाचा प्रकार नाही. मूळात सायकॅट्रिस्टसुद्धा नाही अश्या गावात काउंसेलर असणे तर शक्यच नाही.

मग कधीतरी मला वाटतं, शहरातल्या लोकांची मज्जा आहे बुवा. छोट्या छोट्या स्ट्रेससाठी गल्लोगल्ली काऊंसेलर उपलब्ध असतात. पण खरंच असं आहे का? जातात का शहरातले लोक काऊंसेलरकडे? काऊंसेलरकडे जाणं अजूनही तितकंच नामुष्कीचं राहिलंय का? एखाद्याला मानसिक उपचारांची किंवा समुपदेशनाची फार गरज आहे असे आपल्याला दिसतेय आणि आपण त्याला ते सुचवितोय यात ती व्यक्ती ऑफेंड तर नाही ना होत?

माझ्या प्रॅक्टीसमध्ये माझ्याकडे आलेल्या रूग्णांना मी गरज असल्यास 'मानसिक उपचार घ्या' असे सहज सांगू शकते.
गंमत म्हणजे अगदी आत्महत्येचे रूग्णंजरी असतील तरी माझ्याकडून बरा झाला आता मानसोपचारतज्ज्ञांचा सल्ला घेऊ आणि मग डिस्चार्ज देवू असं म्हणताच त्याच दुपारी बिल क्लिअर करून बहुतेक जण पळून जातात. ते डॉक्टर संध्याकाळी विजिटींगला येतात म्हणून. मग नंतर हे लोक कुढत जगतात, बरे होतात की परत एखादा आत्महत्येचा प्रयत्न करतात काही पत्ता लागत नाही.

तरिही रूग्णांना मानसोपचार देणे /द्यायची शिफारस करणे मला सहज शक्य आहे.
पण एखादा माझा रूग्णं नसेल तेव्हा? किंवा एखादा केवळ आंतरजालावरिल ओळखीचा असेल तेव्हा?
एकजण खूप चटका लावून गेला जीवाला. त्याला मानसोपचाराची गरज आहे हे त्या संस्थळावरिल प्रत्येकाला समजत होतं. काही ते उघडपणे लिहित तर काही उगाच वादासाठी वाद म्हणून त्या आयडीला / त्याच्या थोड्याफार विक्षिप्त लिखाणाला सपोर्ट करित. मग एकदा त्याने आत्महत्याच केल्याची बातमी आली. (कृपया त्याचे नाव माहित असलेल्यांनी इथे लिहू नका. मी केवळ एक उदाहरण घेतले आहे.) आपण अगोदरच त्याला समुपदेशनासाठी, मानसोपचारांसाठी का नाही जास्तं हॅमर केलं असं वाटत राहिलं.

आत्ताही कुणाला खरेच समुपदेशनाची गरज आहे असे केवळ आंतरजालावरच्या ओळखीतून लिहावे का, असा प्रश्नं मला पडलाय.

असो. तर मानसोपचारतज्ज्ञांचे एक जादाचे काम मला वारंवार पडत असल्याने माझ्यापुरते थोडेफार सतत वाचत असते.
पुस्तकांचा संदर्भ इथे दिला तर सगळ्यांनाच ते वाचायला जमेल असे नाही.
ढोबळमानाने जे आजारांचे वर्गीकरण आहे त्यापैकी कुठला आपल्याला आहे का हे समजण्यासाठी कित्येक टेस्ट जालावर उपलब्ध आहेत. यातल्या काही वर्तमानपत्रातल्या सो कॉल्ड आरोग्यविषयक स्तंभातही येत असतात. काही ठिकठाक असतात तर काही अगदीच यथातथा.
काहींची मांडणी इतकी सोप्पी असते की 'प्रत्येक प्रश्नात ए निवडला तर आपण रोगी , सी निवडला तर आपण अगदी फिट आणि बी निवडला तर सीमारेषेवर' असं कोरिलेशन चाचणी देणार्‍याला देतादेताच समजतं. त्यातही एखादा मुद्दाच उदाहरणार्थ नैराश्य, व्यसनाधिनता असे घेऊन त्यांच्या निदानासाठी बनविलेल्या चाचण्या बर्‍याच सापडतील. पण एकंदर स्वतःला मानसिक मदतीची गरज आहे का हे ठरविण्यात मदत करणार्या चाचण्या कमीच.
(याच लेखात मी अगोदर 'आपल्याला संभाव्य मानसिक आजारांकरिता समुपदेशन किंवा उपचारांची गरज आहे का?' याचा अंदाज करण्यास मदत करणारी एक चाचणी दिली होती. चर्चा पुढे जाण्यास किंवा अधिक मुद्दे पुढे येण्यास मदत व्हावी म्हणून. आणि एकदा ती चाचणी देऊन पहा असे सुचविले होते. पण त्यामुळे चर्चा पुढे सरकण्यास मदत होतेय असे न दिसल्याने ती मूळ लेखातून काढून खाली प्रतिसादात देत आहे.)
एकंदर मराठीत आरोग्यविषयक माहिती माहितीजालावर फार अपुरी आहे. इंग्रजीत प्रत्येक आजाराविषयी सामान्य माणसाला कळेल अश्या भाषेत ते अगदी व्यावसायिक आणि प्रशिक्षित डॉक्टरांसाठीच अश्या मोठ्या रेंजमध्ये माहिती उपलब्ध आहे.
आपल्याला सामान्यतः लहानमोठ्या शारिरीक आजारांच्या लक्षणांची माहिती असते. मात्र मानसिक आजारांच्या लक्षणांची माहिती नसते. आणि सर्वांना समजेल अश्या सोप्या भाषेत ती सहज नेटवर मराठीत उपलब्धही नाही.
चर्चेच्या अनुशंगाने या लेखात किंवा पुढिल भागात अशी माहिती समाविष्ट करण्याचा प्रयत्न करायचा आहे.
त्यामुळे सगळ्या प्रश्नांचं या धाग्यावर स्वागत.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझी एक मैत्रिन जी स्वःता डॉ. आहे.वय वर्ष ५२. हिच्या अवास्तव अपेक्षा मुळे योग्य वयात लग्न झाले नाही.
तिच्या निर्र्थक बोलन्यांमुळे तिच्याशी बोलायला कुणालाच आवडत नाही कारण ती फक्त होऊन गेलेल्या गोष्टीच बोलत असते.जसे की तिला त्यावेळेस किती छान छान स्थळ येत होती आणि ती तिने कशी नाकारली त्यातला एक आता IAS ऑफिसर आहे एक सर्जन वगैरे वगैरे....
तिच्याकडे बघितले की वाटते लहानपण आणि तरुनपण यात कुठेतरी ती अडकलिय आपण आपल्या आयुष्याच्या उत्तरार्धात आलोय हे वास्तव स्विकारायला ती तयारच नाही.कधी-कधी वाटते तिला मानसिक उपचार ची गरज आहे
पण सांगायची हिंमत होत नाही कारण ती खुप गैरसमज करुन घेते. एक मैत्रिन म्हणुन तिला वाईट वाटले तरी तिला सांगावे का?

अतुल ठाकुर....

अतिशय प्रभावी म्हणणे मांडले आहे तुम्ही. वाचतानाही एकप्रकारचे छानपैकी मार्गदर्शन मिळत गेले असेच मी समजत गेलो. जालावरून समुपदेशन करू नये....(म्हणजे मागूही नये किंवा मागितलेच तर क्वालिफाईड डॉक्टरांकडे तुम्ही जा...इतपतच सल्ला द्यावा असेच म्हणावेसे वाटते). अगदी सविस्तर मुद्दे मांडले आहेत तुम्ही.

"...मायेची उब या गोष्टी जादुच्या कांडीचे काम करु शकतात..." ~ हे पटले, पण मायची उब फक्त घरातील लोकांकडूनच मिळते असे नसून आपल्या स्नेहमंडळीकडूनही मिळते....अर्थात तसे वातावरण ठेवले असल्यास.

अशोकमामा, आणि अतुल आणि इतर,

जालावर समुपदेशन करू नये- कबूल.
जालावर समुपदेशनाचा सल्ला देऊ नये- विचार करायला लावणारा मुदा.

सुरूवातीस आंतरजाल नवे होते तेव्हा जालावर ओळख दाखविणे, जालावरिल ओळखीचा गैरवापर होणे अश्या बर्‍याच गोष्टी घडल्या. अजूनही होतायत.
पण अत्ता जाल आपल्या परिचयाचे होतेय. रोज येऊन बोलणार्‍या आयडीज कुठलाही बुरखा घालून येऊदेत- त्यांचे अंतरंग हळूहळू ओळखीचे होतेच. त्यातही प्रत्यक्ष फोरमखेरिज विपू, ईमेल, संपर्क अश्या अनेक गोष्टींतून ही ओळख वाढते.
कधीकधी भेटीगाठीही होतात गटग वगैरेच्या निमित्ताने.
जालावरची ओळख केवळ आभासीच उरली नाही आजकाल. एखाद्या मंडळात्,क्लबात किंवा अगदी पारावर गप्पा ठोकाव्यात इतके सोपे सोशलायझेशनचे माध्यम झालेय हे.
ट्रोल्स किंवा केवळ अमुक एका राजकीय /समाजिक/ धार्मिक दृष्टीकोनातून आलेले आयडी सोडून द्या, पण माबो किंवा तत्सम नेटवर्कींग साईटवर आलेल्या प्रत्येक आयडीमागे एक माणूस आहे हे आपल्याला माहित असतं. त्या माणसाची काही ओळख त्याच्या लिखाणातून होत असते.
असे कित्येक आयडी आहेत ज्यांच्या घरी कोण आहे, त्यांच्या मुलांची नावे काय इतकेच नव्हे तर आज सकाळी त्यांच्याकडे काय स्वयंपाक होता आणि रात्री काय शिजणार आहे हे ही माहित असते.
मग जालावरच्या ओळखीला केवळ आभासी म्हणायचा अट्टाहास का?
एखाद्याच्या लिखाणातून खरंच त्याला मदतीची गरज आहे असे कळतेय तरी फक्तं तो एक आयडी आहे, आभासी आहे , खरा माणूस नाही या विचारात त्याच्याकडे दुर्लक्ष करायचे का?

आणि दुसरे-
समुपदेशनाची गरज आहे हे सांगणे इतके ऑफेन्सिव का वाटावे.
मला थकवा येतो, मरगळ येते , धाप लागते असं कोणी म्हटलं तर डॉक्टरकडे जा, योग्य त्या टेस्टस करून घे. असं सांगितलं तर ते ऑफेन्सिव नाही. पण सायकिअ‍ॅट्रिस्टकडे जा, काउंसेलिंग घे असं म्हटलं तर ऑफेन्सिव का?

मूळात एखाद्याला काऊंसेलींगची गरज आहे म्हणजे तो ठार वेडा आहे, त्याला सांभाळायला दुसर्‍या कुणाची गरज आहे, एकदा सायकिअ‍ॅट्रिस्टकडे जा असे सूचित केल्यावर तो जातो का, गोळ्य्व घेतो का असे बघण्याची जबाबदारी त्या सुचविण्यावर यावी ही जरा जास्तच अवाजवी अपेक्षा नाही का?

>>>मला या सार्‍या थेरेपित ह्युमन टच हा भाग सर्वात महत्वाचा वाटतो आणि त्याला पर्याय नाही अशी माझी नम्र समजुत आहे.<<<

अतुल ठाकुर,

खूप छान प्रतिसाद! सर्वात आवडलेले वाक्य कोट केले इतकेच! 'ह्यूमन टच' मधून आपल्याला व्यावसायिक मानसोपचार तज्ञाने / समूपदेशकाने रुग्णाशी प्रत्यक्ष संपर्क ठेवावा असे म्हणायचे असावे असे वाटत आहे. Happy
==============

एक विचार सुचला. कृपया इच्छुकांनी आपले मत मांडावे, आत्तापर्यंत ह्या विषयाबाबत सर्व संबंधीत धाग्यांवर काय झाले असेल नसेल ते मनातून काढून टाकून मत मांडावे अशी विनंती!

माणसाला प्रत्यक्ष जगात जसे वागता येत नाही आणि तसे वागता न आल्यामुळे जो ताण / दबाव येतो, जी काही घुसमट होते, तिला आऊटलेट मिळावे म्हणून आंतरजालावर जाणार्‍यांचेही बरेच प्रमाण असू शकेल. (कदाचित नंतर नंतर तर 'येथे आऊटलेट मिळते' ही बाब आवडल्यामुळेच जालाचे व्यसनही लागत असेल). तर अशी माणसे प्रत्यक्षात मुक्त वागण्यासाठी, विचारस्वातंत्र्यासाठी, भडास काढण्यासाठी जालावर येतात. भडास काढताना ती बहकतात आणि इतरांच्या मते मानसोपचारास पात्र ठरतात. असे होणे शक्य आहे का? आणि शक्य असल्यास (ते तसे झालेले आहे हे ओळखावे कसे हा भाग वेगळा, पण) त्यांचे प्रत्यक्ष आयुष्य पूर्णपणे भिन्न असणार हे आपण समजू शकतो ना? मग प्रामाणिकपणे व आपुलकीने सल्ला द्यायचा असला तर तो फक्त त्या माणसालाच वाचता येईल अश्या रीतीने दिला जाऊ नये का?

धन्यवाद

(माझे मत - आंतरजालावर मानसोपचाराचा सल्ला 'गंभीरपणे' मुळीच देऊ नये. एखाद्याची थट्टा करण्यासाठी, स्कोअर सेटल करण्यासाठी वगैरे दिले जाणारे सल्ले हे तसेच असतात हे सगळ्यांनाच समजते. आंतरजालावर मानसोपचारांचा जाहीरपणे व गंभीरपणे दिला गेलेला सल्ला हा मला भावनिक पातळीवरील गुन्हा वाटतो. )

अवांतर - माझ्या ज्या प्रतिसादामुळे (बहुधा) ही चर्चा (बींच्या त्या धाग्यावर) ट्रिगर झाली होती त्या प्रतिसादातही मी 'गंभीरपणे' हा शब्द वापरला आहे. http://www.maayboli.com/node/52963?page=4

हे फक्त एक सपोर्टिव्ह स्टेटमेन्ट! Happy

अतुल ठाकुर यांचे ३ ते ५ मुद्दे अतिशय महत्वाचे आहेत.

अवांतर : गायत्री पगडी यांचे 'दोला' (मूळ नाव-Walking with Cris) वाचते आहे.त्यास्वतः बायपोलर डिसऑर्डरच्या पेशंट असून त्यांना आलेले काही समुपदेशक/मानसोपचार तज्ञाचे, समाजाचे आलेले अनुभव अंगावर काटा आणतात.त्या फेजमधे असतानाही नवर्‍याला पॅरॅलेसिसमधून्बाहेर काढण्याचे तिचे प्रयत्न चालू होते.

हे वाचून व माझ्या एक्सबॉसवरून (जी डिप्रेशनची शिकार होती) असं निश्चितपणे वाटते की खूप परिचय/ घसट असल्याशिवाय कोणाला समुपदेशनाचा सल्ला नाही देऊ. जालावरून तर नाहीच नाही.

मी टेस्ट घेतली. रिझल्ट्स पटले नाहीत. ह्यासाठी नव्हे की मला 'ताबडतोब थेरपिस्टला भेटा' असे सांगितले म्हणून! तर ह्यासाठी पटले नाहीत की मी फक्त तीन की चारच सिंप्टम्सवर क्लिक केले आणि त्याबद्दल त्या रिझल्ट्समध्ये काहीच आले नाही. उलट भलतेच काही पॉईंट्स आले जे माझ्या आयुष्याशी निगडीतच नाही आहेत.

Uhoh

ही टेस्ट रिलायेबल आहे ह्याचा काही पुरावा आहे का?

उदाहरणार्थः

१. इतर विचार तुम्हाला डिस्ट्रॅक्ट करतात का? - ह्यावर मी क्लिक केले. तर टेस्ट म्हणते की

More easily distracted than usual.

२. एका दिवसापेक्षा अधिक काळ काही भय मनात राहिले आहे का? (आणि एक महिन्यापेक्षा कमी काळ) - ह्यावर मी क्लिक केले कारण प्रकृतीची चिंता मनात येते.

तर उत्तर आहे की:

Greatly reduced need for sleep

माफ करावेत, मला हे काहीही वाटत आहे.

बेफि,

तो सायकॉलॉजीच्या पुस्तकातले वाचून काँप्युटरवाल्यांनी तयार केलेला अल्गोरिदम आहे. सुदुपारचं अड्ड्यावरचं चर्वण वाचलं नाही का तुम्ही?

बेसिकली तुम्ही टेस्ट घेतली, याचा अर्थ तुम्हाला कुठेतरी समुपदेशन हवे असे वाटते आहे. त्यांनी पहिल्या पानावर काय लिहिलंय? तुम्हाला गरज वाटत नसेल तर टेस्ट घेऊ नये. शिंपल.

आता तुम्ही टेस्टची टेस्ट घेण्यासाठी ती घेतलीत, तर ती घेतल्यावर 'घेतल्या'सारखे निष्कर्ष आलेत यात नवल ते काय? Wink

पहिल्या प्रश्नाचे उत्तर म्हणजे 'तुम्ही स्वतःला चोर समजता का' मग तुम्ही चार्ल्स शोभराज असाल असे आहे.

दुसर्‍या प्रश्नाचे उत्तर म्हणजे 'तुम्हाला उडदाच्या डाळीची आमटी आवडते का' मग तुम्ही इस्तंबुलला राहात असाल असे आहे.

इब्लिस,

मूळ धाग्यात साती आसरा देवींचे हे वाक्य आहे बघा:

>>>तोपर्यंत प्रत्येकाने एक चाचणी देवून पहा<<<

म्हणून दिली.

हे म्हणजे आपण पाळलेलं कुत्रं आपल्याला चावण्यासारखं झालं राव!

सॉरी चर्चेचा मूड माझ्यामुळे गढूळ झाला असल्यास! Happy निव्वळ मजा केली.

हा माणूस कुठल्याही मॉडर्न देशात शोभणारा नाही. त्याला आफ्रिकेच्या जंगलात वल्कले नेसवून पाठवला पाहिजे. विचारसरणी त्याच शतकातली आहे. (हा कोण तुम्हीच ओळखा)

( हे बेफि आणि इब्लुशा याना उद्देशून नाही. त्यांच्या पोस्टखाली योगायोगाने आले Happy )

बघा,

हे असं फुगडी खेळल्यागत वागल्याने आता तुम्हाला अन मला, दोघांनाही समुपदेशनाची गरज आहे असे लोक म्हणतील इथे.

बेसिकली, काऊन्सेलिंग उर्फ समुपदेशन हे व्यावसायिकरित्या आपल्या प्रियजनांना द्यावं/ स्वतःला घ्यावं लागावं अशी वेळच येऊ नये, अशी प्रत्येकाचीच इच्छा असते.

अन तरीही 'मी काय येडाय का?' हा प्रश्नही प्रत्येकजण कधीना कधी काकुळतीने विचारतोच. कारण त्याक्षणी मनावरचा ताण, काळजी लिमिटबाहेर वाढलेली असते वा आत्मविश्वासाला तडा गेलेला असू शकतो. चित्त थार्‍यावर नसते.

आता अशा या क्षणी 'मदत' घ्यावी का? कशी घ्यावी? कुणाची घ्यावी? कोणत्या लेव्हलचा त्रास आपल्याला होत असताना घ्यावी? याबद्दल या धाग्यावरची चर्चा असावी, असे मला वाटते.

'फंक्शनल डिसॉर्डर्स' असं ज्याला आम्ही म्हणतो, त्या नक्की का होतात, कुणाला होतात वगैरे बाबी आजच्या घडीला जितक्या ज्ञात आहेत, त्या खरं तर माझ्याही डोक्याबाहेरच्या आहेत, कारण मी मानसोपचारतज्ञ नाही. त्यातल्या रिसेंट अपडेट्स रिसर्चेस माझ्या अभ्यासात नाहीत. पण आजच्या घडीला 'त्यां'नाही मनोव्यापारांच्या अन त्यातल्या बिघाडांची संपूर्ण कल्पना आली आहे, असे नाही. मनाच्या कार्यकारणास समुद्र मानले, तर त्याच्या आकलनाबाबत डेअरिंग करून एक-दीड किलोमीटर वगैरे समुद्रात पोहायला जाण्याइतपत प्रगती आपण केली आहे, असे म्हणता येईल.

आता या पार्श्वभूमीवर मला समुपदेशनासंदर्भात काही गोष्टी सांगायच्या आहेत.

एकतर काउन्सेलर नक्की काय करतो? हे जाणून घेणे गरजेचे आहे. उदा. लग्नाआधी जोडप्याने काऊन्सेलिंग घ्यावे असे आजकाल म्हणतात. ते कशासाठी? ते दोघे 'येडे' असतात का? तर नाही. इथे, एका टोटली अनुभवपरिघाबाहेरच्या नातेसंबंधास सुरुवात करायची आहे. अनेक मित्र मैत्रिणी, वा मोठा चुलत-मामे-मावस भावंडांचा परिवार असेल तर एकमेकांशी बोलून, पाहून काउन्सेलिंगचे अनेक टप्पे आपोआप पार होतात; तेच आजकालच्या चौकोनी तुकड्यांच्या कुटुंबातून येणारे प्रिन्स अन प्रिन्सेस, किंग अन क्वीनच्या भूमीकेत जाताना वेगळ्याच अडचणी समोर उभ्या राहू शकतात. त्यांचे निराकरण त्या उभ्या रहाण्याआधीच करणे या प्रकारचे हे 'प्रिव्हेंटिव्ह' काउन्सेलिंग असते.

याव्यतिरिक्तही अनेक कारणांसाठी काऊन्सेलिंगची गरज असते. उदा. मला सिगारेट सोडायची आहे. अन ते जमत नाहिये. किंवा माझ्या मुलाच्या खिशात मला गांजाने भरलेली सिगारेट सापडलिये. नव्या जॉबवरचं प्रेशर सहन होत नाहिये. अचानक नुसतीच अनामिक भीती वाटतेय.. अनेक. अक्षरशः अगणित कारणे आहेत.

असले काहीही असेल, अन या टोकाच्या इमोशन्स/सवयी तुमच्या प्रिय व्यक्तीच्या रोजच्या जगण्यात अडथळा ठरताहेत असं तुम्हाला वाटत असेल, तर तुमच्या त्या प्रिय व्यक्तीस नक्कीच काउन्सेलिंग घेण्याचा सल्ला द्या, स्वतः काउन्सेलरकडे घेऊन जा. ती व्यक्ती स्वतः काउन्सेलरकडे जायच्या परिस्थितीत ९९.९९% वेळा नसते, वा असे काही करायला हवे हे तिला उमजत नसते. तेव्हा तुम्ही जर त्या/तिला घेऊन गेलात, तर ते तुमच्या प्रेमाचे प्रतिक आहे. एक पॉझिटिव्ह अ‍ॅक्शन आहे.

पण यात प्रॉब्लेम असा आहे, की तो समुपदेशक जे काही सांगतो, ते 'प्रोफेशनल' असते. अर्थात, ते सध्याच्या शास्त्रीय कसोटीवर योग्य व अद्ययावत असतेच, पण ते शेवटी महिन्यातून ३ दिवस वगैरे, एकावेळी १ तास वगैरे ऐकलेले भाषण/प्रवचन असते. उरलेले दिवस-तास-मिनिटे व सेकंद, त्या 'आजारी' व्यक्तीची काळजी कोण घेणार आहे? त्या काउन्सेलरने दिलेल्या सल्ल्याची अम्मलबजावणी करीत, त्या बिचार्‍याची सेवा करणारा/री, त्याला त्या योग्य मार्गावर रहाण्यास प्रवृत्त करणारे कोण आहे?

तर उत्तर आहे "मी". या ठिकाणी, 'समुपदेशन घे', असा सल्ला देणारा मी.

ही जबाबदारी जर पार पाडता येत नसेल, येण्याची शक्यता नसेल, तर कृपया, कु णा ला ही, 'उपचार घे' असा सल्ला, नेटवर सोडाच, तोंडावरही देऊ नका.

*

अजून या विषयावर लिहिण्यासारखे भरपूर आहे. स्वतःच स्वतःचे काउन्सेलिंग करता येईल का? काऊन्सेलरचे काउन्सेलिंग कोण करतो? इ. अनेक गमतीदार फाटे या विषयाला आहेत, पण याक्षणी पळावे लागते आहे. जमेल तसे लिहितो नंतर.

>>>तर उत्तर आहे "मी". या ठिकाणी, 'समुपदेशन घे', असा सल्ला देणारा मी.

ही जबाबदारी जर पार पाडता येत नसेल, येण्याची शक्यता नसेल, तर कृपया, कु णा ला ही, 'उपचार घे' असा सल्ला, नेटवर सोडाच, तोंडावरही देऊ नका. <<<

उस्ताद प्रतिसाद आहे हा!

पूर्ण समजला आणि तितकाच पटला.

इब्लिस,

>> तर उत्तर आहे "मी". या ठिकाणी, 'समुपदेशन घे', असा सल्ला देणारा मी.

प्रचंड सहमत.

एक शंका आहे. पीडित व्यक्ती समुपदेशकाकडे जाऊन स्वत:च स्वत:चं समुपदेशन करण्याइतपत सक्षम होऊ शकते. किंवा तसा इतरांना विश्वास वाटतो आहे. अशा वेळेस समुपदेशनास जाण्याचा सल्ला तिऱ्हाईताने द्यावा का? अर्थात तिऱ्हाईतास पीडिताच्या क्षमतांचा योग्य अंदाज आहे. तिऱ्हाईत पूर्ण परका नसून जालमित्र वगैरे असू शकतो. अशा प्रसंगी समुपदेशन घेण्याचा सल्ला देणं कितपत उचित मानावं?

आ.न.,
-गा.पै.

अवांतर :

रॉबिनहूड,

>> त्याला आफ्रिकेच्या जंगलात वल्कले नेसवून पाठवला पाहिजे. विचारसरणी त्याच शतकातली आहे.

Rofl

आफ्रिकेच्या जंगलात पाठवायचं तर वल्कलं कशाला पाहिजेत? शिवाय त्याची विचारसरणी कुठल्या शतकातली आहे, याचा कशाशी काय संबंध? Lol आफ्रिकेतले आदिवासी २१ व्या शतकात असोत वा १५ व्या, काहीच फरक पडत नाही. Uhoh

आ.न.,
-गा.पै.

धाग्याचे शीर्षक आणि टायमिंग बघता मनात शंकेची पाल चुकचुकलेली, पण साती यांचे नाव बघता तसे काही नसेल असेच वाटले, आणि पुढे धागा, प्रतिसाद वाचून खात्रीही पटली.

काउन्सेलिंग आणि मानसोपचार खरेच खूप प्रभावी औषधे, उपाय आहेत.. असावीत..
असावीत कारण यांचा स्वतःबाबत वा ओळखीच्या कोणाबाबत अनुभव नाही.
पण नाही म्हणायला आंतरजालीय ओळखीच्या एक काऊन्सलर मॅडम आहेत आणि त्यांच्या एकंदरीत पोस्ट पाहता त्यांच्यात वा त्यांच्या विचारांत एखादे भरकटलेले तारू सुखरूप मार्गी लावण्याची ताकद आहे हे जाणवते. किंबहुना माझ्याबद्दलही त्यांनी दोनचार गोष्टी मला तर्काने अश्या सांगितलेल्या की मला प्रत्यक्ष न भेटणार्‍यांना ते समजणे अवघडच.. अर्थात त्या सकारात्मक गोष्टी होत्या, आणि त्याउपर मला असाच राहा वगैरे सल्लाही त्यांनी दिला होता.. पण जर तसे नसते, काही खोटच असती तर त्यांनी मला थेट तसे सांगितले असते का? आणि ते बरोबर ठरले असते का?

हाच विचार करता अजून एक जण आठवला ज्याबद्दल त्यांना असे वाटलेले की याला कदाचित कौन्सेलिरची गरज आहे. पण आधी एके ठिकाणी त्याच्याशी त्यांचे वैचारीक मतभेद झाल्याने त्यांनी कितीही प्रामाणिकपणे सांगितले असते तरी त्याचा परीणाम उलटाच झाला असता हे त्यांना ठाऊक होते. त्यांनी काय केले असावे, त्याच्यातील इतर चांगल्या गुणांचे कौतुक करत त्याच्याशी आधी थोडाफार स्नेह वाढवला. खरे तर तेव्हा त्यांचे असे वागणे बघून मी कन्फ्यूज झालो की यांना कधीपासून तो आवडायला लागला. मला हे थोडेफार सलण्याचे कारण म्हणजे माझेही त्याच्याशी फार पटायचे नाही आणि या माझ्या आवडीच्या ताई आहेत तर त्याचे का कौतुक करत आहेत. पण पुढे हे त्यांनीच मला उलगडून सांगितलेले. त्यांनी त्याला सहज स्वताला भेटायचा सल्लाही दिला होता. पण दोघांची शहरे वेगळी असल्याने ते सहजशक्य नव्हते आणि राहिलेच. ती केस तशीच राहील. जेव्हा त्याचे लग्न झाले तेव्हा मात्र त्यांनी त्याला शुभेच्छा दिल्या खरे पण मला म्हणाल्या की त्याच्या होणार्‍या पत्नीबद्दल वाईट वाटतेय.

अर्थात वरील घटनेतील नाव आणि संदर्भ इथे फार देऊ शकत नाही, पण सांगायचा मुद्दा हाच की खरेच इथे पब्लिक फोरमवर कोणाला कौन्सेलर वा मानसोपचाराचा सल्ला देणार्‍याने आपल्यात असा प्रामाणिकपणा आणि सोबत तो सल्ला कसा द्यावा याची जाण आहे का हे स्वत:लाच विचारावे. जेणेकरून एखाद्या ओपन धाग्यावर ल्यूडो खेळताना कवड्या टाकाव्यात तसे सल्ले कोणी टाकणार नाही.

इथे कोणा सल्लागाराच्या हेतूच्या प्रामाणिकतेबद्दल वा जाण असल्याबद्दल शंका उपस्थित करतोय खरे. पण जर कोणी सोशलसाईटच्या ओळखीवर एखाद्याच्या मानसिक स्थितीबद्दल शंका घेऊ शकतो तर त्याच धर्तीवर आपल्याही सल्ला देण्याच्या हेतूवर कोणी शंका घेऊ शकते हे समजून त्याने त्याच स्पिरिटमध्ये घ्यावे. कृपया वैयक्तिक घेऊ नये. माझे मतच मांडलेय. या आंतरजालावर वैयक्तिक आणि वैचारीक वादात फरक करणे फार कमी लोकांना जमते, त्यामुळे कृपया इथे असले सल्ले देणे योग्य आहे असा कुठलाही समज प्रचलित होऊ देऊ नका. असे झाल्यास अभावानेच एखाद्याचा फायदा होईल आणि कित्येकांचे नुकसान!

इनोची,
नाही. मला त्या टेस्टच्या रिलायबिलिटी आणि स्टँडर्डायजेशनची माहिती नाही.
कारण ही काही 'दि डायग्नोस्टिक' टेस्ट नाही. ह्या टेस्टमध्ये इतका स्कोअर म्हणजे हे तुमचे डायग्नोसिस असा या टेस्टचा इपयोग नसल्याने हिला स्टँडर्डायजेशन लावण्याची गरज नाही.
स्वतःला सायकॅट्रिक काउंसेलींग किंवा औषधोपचार यांची गरज आहे का याची शंका येणार्या आणि ती पडताळणी करू पहाणार्‍या प्रौढ व्यक्तीकरता ही टेस्ट आहे.
ज्यांचे मेंटल स्टॅटस अत्यंत बिघडले आहे अश्यांसाठी किंवा लहान मुलांसाठी ही टेस्ट नाही.
यात काही महत्वाच्या मानसिक आजारांची लक्षणे १६मुद्द्यांखाली दिलीत.
यापैकी काही लक्षणे आपल्यात 'स्वतःला' दिसत असतील तर आपल्याला सायकॅट्रिक हेल्थ वर्कर्सच्या मार्गदर्शनाचा फायदा होऊ शकेल.
मुख्यतः या लक्षणांना समजावून घेण्यासाठी ही टेस्ट दिलीय मी.

मी आधीच म्हटल्याप्रमाणे हा धागा प्रोग्रेसिव्ह आहे. तुम्हाला जसजश्या शंका येत जातील त्यांना मी माझ्या आकलनानुसार उत्तरे देत जाईन.

लेखात उल्लेखलेली टेस्ट
ही होती.

या टेस्टमधील मुद्द्यांच्या अनुशंगाने चर्चा पुढे जाण्यास मदत होईल असे वाटले होते पण तसे झालेले नाही.
तसेच एका प्रोफेशनल ग्रूपने स्वतः डेवलप केलेली टेस्ट असल्याने ती टेस्ट लेखात समाविष्ट करणे योग्य वाटत नाहीये.
म्हणून प्रतिसादात देतेय.

तरिही या टेस्टमधली लक्षणे बरिच काँप्रिहेन्सिव आहेत असे मला वाटते.
ती टेस्ट देऊन (एक प्रोजेक्ट म्हणून का होईना) काही शंका असल्यास मला विचारल्यास चर्चा पुढे जाऊ शकेल.

तसेच प्रकाश घाटपांडे यांनी वर दोन लिंक दिल्यात त्याही खूप चांगल्या आहेत. त्या ही वाचाव्यात.

मितान मराठीत मानसिक आरोग्याविषयी एक छान लेखमाला लिहित आहे. ती प्रकाशित होताच 'मानसिक आजार' या संकल्पनेविषयी मराठीतून अधिक माहिती मिळण्यास मदत होईल.

मानपसोपचाराचा सल्ला कोणी व कसा देऊ नये याचे एक जवळचे उदाहरण आहे.
नामांकीत विद्यापीठात पीएचडी करणारा माणूस. सासरच्या लो़कांबरोबर काही बेबनाव झालेला. त्याचा राग बायकोवर काढणारा. बायकोवर हात उगारणारा, खरं तर मारझोड करणारा म्हणावं असा. मग आपल्याच कृत्याचे वाईट वाटल्याने स्वता:लाही मारून घेतलेला. कोणालाही समजलं असतं की समुपदेशनाची गरज आहे. पण हा सल्ला आला तो ही सासरच्या नातेवाईकांकडून. सल्ला देणारी व्यक्ती डॉक्टर होती तरीही आधीच मनात राग असलेल्या व्यक्तीने दिलेला सल्ला आणि समुपदेशनाबद्दल असलेला पूर्वग्रह यामुळे व्हायचा तोच विपरीत परीणाम झाला. रागावर काबू मिळवण्यासाठी असलेली समुपदेशनाची गरज यावर बायकोने दिलेल्या माहीतीमुळेही काही विषेश फरक पडला नाही. मानपसोचार तज्ज्ञाला " मी वेडा आहे का? मला पकडून इस्पितळात नेणार का, मला विजेचे झटके देणार का" असे प्रश्नं विचारले गेले. तज्ज्ञाने "तसे काही नाही, तुम्हाला विवाहविषयक समुपदेशनाचे गरज आहे" असे सांगितल्यावर जग जिंकल्याच्या आनंदात आणखीनच परिस्थिती बदलली. "तुम्ही लोकांनी मला वेडा ठरवले पण मी तसा नाही असे तज्ज्ञ म्हणतात" असे म्हणत अजूनच विक्षीप्तपणा वाढला. त्यानंतर मात्रं सर्वांचे बाकीचे सगळेच प्रयत्नं थिटे पडले कारण मनात एक अढी कायम राहीली.
घरच्यांच्या सल्याचा असा विपरीत परीणाम होत असेल तर जालीय ओळखीत कोणी असा सल्ला दिला तर असेच काहीसे होणार नाही का? जोपर्यंत तुम्ही "विश्वासातील व्यक्ती, शुभचिंतक" अशी पदवी प्राप्त करत नाही, जोपर्यंत मानसोपचार/समुपदेशन यांची कार्यप्रणाली व फायदे सांगता येत नाहीत, तोपर्यंत "तुम्हाला मानसोपचाराची गरज आहे" असे नुसतेच विधान करणे धोकादायक वाटते. तोवर मानसोपचारासंबंधी जनजाग्रुतीसाठी असे धागे उपयुक्त ठरतील.

<< शेवटी 'त्या'च्या बद्दल. माझी चांगली ओळख होती त्याच्याशी. एकाच गावचे असल्याने संवादही होता. आत्ता सध्या त्याच्या कुटुंबाची परिस्थिती इथे न बोलणंच योग्य.
त्याची आत्महत्त्या निश्चितपणे थांबवता आली असती. त्याच्या मानसिक आजाराविषयी बोलण्याचे हे स्थान नव्हे.
बाकी त्याची ज्ञानेश्वरांशी तुलना, आणि समाधी, संथारा, संन्यास वगेरे गोष्टी चालू द्या ! ही मते तुमच्यापुरतीच ठेवा ही विनंती. एवढ्या उच्च विषयावर समजून उमजून बोलण्याची आणि मग निर्णय घेण्याची ज्यांची कुवत नाही अशी अनेक डोकी हे वाचत आहेत याचे भान ठेवा हे मात्र आग्रहाने सांगतेय. >>

ठळक केलेल्या वाक्यांविषयी - त्याच्या मानसिक आजाराविषयी बोलण्याचे हे स्थान नसेल तर मूळ धाग्यात त्याचा उल्लेख का आहे? त्याच्या उल्लेखाची सुरुवात त्याची "ज्ञानेश्वरांशी तुलना, आणि समाधी, संथारा, संन्यास वगेरे गोष्टी" करणार्‍यांनी केलेली नाहीये याची नोंद घ्यावी. ही मते तुमच्यापुरतीच ठेवा असे सांगणे हे लोकशाहीवर विश्वास नसल्याचे निदर्शक आहे, म्हणजे ठराविक बाजूने असलेली मतेच मांडली जाणार व विरोधी मते मांडण्याचे स्वातंत्र्यच नाही? असे असेल तर विषय चर्चेला घ्यायचा तरी कशासाठी? आपल्याला मंजूर असणारा निष्कर्ष धाग्यात मांडून सरळ प्रतिसादांना कुलूप लावून टाकायचे की.

<< एवढ्या उच्च विषयावर समजून उमजून बोलण्याची आणि मग निर्णय घेण्याची ज्यांची कुवत नाही अशी अनेक डोकी हे वाचत आहेत >>

एखाद्याची कुवत ठरविण्याचा अधिकार खरंच कुठल्या कुणा त्रयस्थाला आहे? असं असेल तर वरील विधान करणार्‍या व्यक्तिची कुवत कुणी ठरविली तर? आवडेल त्या व्यक्तिला? तसंही आंतरजाल, वर्तमानपत्रं, इतर प्रसिद्धीमाध्यमं यात इतकं विविध विषयांवर विपुल प्रमाणात आणि सर्वांना सहज उपलब्ध होईल असं असतं की ते कुणाची समजण्याची कुवत असो वा नसो त्याच्यापर्यंत सहजगत्या पोचतंच की. सिद्धार्थ गौतमावर दु:खाची छाया पडू नये म्हणुन त्याच्या आईवडिलांनी कितीही प्रयत्न केले तरी ते दु:ख त्याला दिसलंच आणि म्हणुनच जगाला बुद्ध भेटला.

मतस्वातंत्र्य मान्य नसणार्‍यांनी आंतरजालावरील चर्चा करणे हाच मोठा विरोधाभास.

जर एखाद्या व्यक्तिचे मानसिक स्वास्थ्य बिघडले असेल तर त्या व्यक्तिला शांततेची, प्रेमाची, समजून घेणार्‍या लोकांची, धीर देणार्‍यांची, आधार देणार्‍यांची, उत्तम मित्र मैत्रिणींची गरज असते. ही गरज नॉरमल जीवन जगणार्‍या व्यक्तिलाही असते. पण ज्या व्यक्तिचे मानसिक आरोग्य बिघडले आहे तिला ह्या सर्वांची गरज जास्तच असते. अशा प्रकारच्या आजारात आपण एखाद्याला डॉक्टर कडे जा असा सल्ला दिला तर तो व्यवसायिक सल्ला होईल. डॉक्टर काय त्यांची कामे करतात. म्हणजे एखाद्याला डॉक्टरांकडे पाठवू नये असे नाही पण नुसता डॉक्टरी उपाय पुरेसा वाटत नाही.

मला जेंव्हा मानसिक त्रास होतो तेंव्हा मी योगक्रियेचा अधिक आधार घेतो. माझा पुर्ण विश्वास आहे की योगाभ्यास हे आपले नुसते शारिरिकच नाही तर मानसिक स्वास्थ उत्तम राखते. मी इथे दर रविवारी रामकृष्ण मिशन मधे योगाचे वर्ग शिकवायला जातो. तिथे बरेच पिडीत लोक येतात. चिनी, मलय, ईंडोनेशियन, काही वेस्टर्न. त्यावरुन असे वाटते की आपल्या योगक्रियेत खूप शक्ती आहे. हल्लीचे समुपदेशक चांगले असतील पण मी मला स्वतःला योगाभ्यासावर जोर द्यायला आवडेल. प्राणायम करताना आपल्या शरिरातील विकृत गोष्टींचे अधःपतन होऊन आपल्यातले विकार जळून जातात हे अगदी खरे आहे.

एखादा व्यक्तिला आपण मानसिक त्रास देतो आहोत का हे आपण शोधायला पाहिजे. एखादी व्यक्ती जर वारंवार एखाद्या व्यक्तिचा निषेध करत असेल, तिला चुप बसण्यास विनंती करत असेल, अनुल्लेख करत असेल, त्या व्यक्तिच्या अलिप्त रहाण्याचा प्रयत्न करत असेल तर ह्याचा अर्थ नक्कीच असा होतो की आपण त्या व्यक्तिला मानसिक त्रास देतो आहे. इथे खूपदा आपण कुणाचा तरी 'अभिमन्यु' करत असतो. एखाद्याला मधे घेरुन त्यावर वार करत असतो. कित्येकदा अनुल्लेख करुनही उपयोग होत नाही. ही लोक आपल्याला इन्स्टिगेट करु पाहतात.

मी माझ्या उदाहरणाहून इतके म्हणेल की मायबोलि हे जरी आभासी जग आहे पण तरीही, इथल्या काही व्यक्तिंचा मला त्रास झालेला आहे आणि आपल्याला त्रास होउ नये म्हणून मी अशा व्यक्तिंच्या अलिप्त .. दूर राहण्याचा प्रयत्न करुनही त्या व्यक्ति माझा माग धरतात!! जर एखादी व्यक्ति स्वत:ला सुज्ञ समजत असेल तर त्या व्यक्तिला मानसिक रित्या दुखावलेल्या व्यक्तिचे इतकही कसे कळू नये? इथे मायबोलिवर काही लोक खरच एक सॅडिस्टिक आनंद उपभोगत असतात.

अतुल ठाकुर तुम्ही लिहिलेले सगळे मुद्दे पटले. मायबोलिवर वा एकूणच नेटवर समुपदेशन घ्या असे सल्ले देणे मला उचित वाट्त नाही. त्यापेक्षा मी स्वतः त्या व्यक्तिला भेटण्याचा प्रयत्न करेन. फोन वर बोलेन. थेट भेट घेणे, फोनवर बोलणे, स्काईप वर बोलणे हे मार्ग मला जास्त उचित वाटतात.

असो.. योगा कर्मण्ये लभते!!!

बींच्या

<< इथे खूपदा आपण कुणाचा तरी 'अभिमन्यु' करत असतो. एखाद्याला मधे घेरुन त्यावर वार करत असतो.

मी माझ्या उदाहरणाहून इतके म्हणेल की मायबोलि हे जरी आभासी जग आहे पण तरीही, इथल्या काही व्यक्तिंचा मला त्रास झालेला आहे आणि आपल्याला त्रास होउ नये म्हणून मी अशा व्यक्तिंच्या अलिप्त .. दूर राहण्याचा प्रयत्न करुनही त्या व्यक्ति माझा माग धरतात!! जर एखादी व्यक्ति स्वत:ला सुज्ञ समजत असेल तर त्या व्यक्तिला मानसिक रित्या दुखावलेल्या व्यक्तिचे इतकही कसे कळू नये? इथे मायबोलिवर काही लोक खरच एक सॅडिस्टिक आनंद उपभोगत असतात. >>

या विधानांशी अत्यंत आग्रही सहमती नोंदवितो.

>>मी माझ्या उदाहरणाहून इतके म्हणेल की मायबोलि हे जरी आभासी जग आहे पण तरीही, इथल्या काही व्यक्तिंचा मला त्रास झालेला आहे आणि आपल्याला त्रास होउ नये म्हणून मी अशा व्यक्तिंच्या अलिप्त .. दूर राहण्याचा प्रयत्न करुनही त्या व्यक्ति माझा माग धरतात!! जर एखादी व्यक्ति स्वत:ला सुज्ञ समजत असेल तर त्या व्यक्तिला मानसिक रित्या दुखावलेल्या व्यक्तिचे इतकही कसे कळू नये? इथे मायबोलिवर काही लोक खरच एक सॅडिस्टिक आनंद उपभोगत असतात<<
सोशल नेटवर्क वर वावरणार्‍या व्यक्ती या समाजातील घटक असल्याने सर्व प्रवृत्ती त्यात येतात. यावर एक चांगल लेख
प्लीज डू नॉट फीड दी ट्रोल्स

>>त्याने आत्महत्या केली असं नाही म्हणता येणार. कारण याच न्यायाने उद्या कोणी म्हणेल की ज्ञानेश्वरांनीही आत्महत्या केली किंवा इतर कुणी म्हणेल की त्या काळात ज्ञानेश्वर होऊन आजच्या काळात तसे काही नाही. असे असेल तर मग लोणावळा येथील मनःशक्ती आश्रमाच्या स्वामींनी केली ती आत्महत्या होती काय?<<
मला तर अशा गोष्टी आत्महत्येच्या मार्गाने स्वीकारलेले स्वेच्छामरण वाटते. प्रत्येक वेळी आत्महत्या ही नैराश्याशी संबंधीत असते असे नाही. जीवन नकोसे नाही पण पुरेसे झाले असे वाटल्याने स्वीकारलेला तो मार्ग आहे

घाटपांडे,
तुम्ही ऐसी अक्षरेवरच्या सुलभा मॅडमच्या मुलाखतीची लिंक दिलीत ती छान आहे.
धन्यवाद!

धन्यवाद साती.
ऐसी वरील त्या लेखांवरील प्रतिक्रियांमधे मी माझा व्यक्तिगत अनुभव व मते देखील दिली आहेत.

<< मला तर अशा गोष्टी आत्महत्येच्या मार्गाने स्वीकारलेले स्वेच्छामरण वाटते. प्रत्येक वेळी आत्महत्या ही नैराश्याशी संबंधीत असते असे नाही. जीवन नकोसे नाही पण पुरेसे झाले असे वाटल्याने स्वीकारलेला तो मार्ग आहे >>

मला जे सांगायचे होते तेच नेमक्या व प्रभावी शब्दांत सांगितल्याबद्दल घाटपांडेसाहेबांचे आभार.

मग जालावरच्या ओळखीला केवळ आभासी म्हणायचा अट्टाहास का?
एखाद्याच्या लिखाणातून खरंच त्याला मदतीची गरज आहे असे कळतेय तरी फक्तं तो एक आयडी आहे, आभासी आहे , खरा माणूस नाही या विचारात त्याच्याकडे दुर्लक्ष करायचे का?

सातीजी आपला मुद्दा महत्त्वाचा आहे. उत्तर देण्याचा प्रयत्न करतो.

जालीय ओळखीतल्या फार कमी ओळखी ज्याला मैत्री म्हणता येतील इथपर्यंत जातात असे माझे मत आहे. खरडवही, विपु, मेल तर सोडाच पण अगदी गटग मध्ये भेटलो तरीही मैत्री झाली असं कसं म्हणता येईल? काही तास मौजमजा करण्यासाठी भेटलेल्या माणसांच्या ओळखीला मैत्री म्हणता येईल का? मैत्रीसाठी काही कालावधीचा सहवास, सततचा संपर्क, त्यातुन हळुवारपणे एकमेकांच्या वैयक्तीक गोष्टींची देवघेव करण्याइतपत वाटणारा विश्वास या गोष्टी आवश्यक आहेत.

इथे मी अशोकरावांचेच उदाहरण दिले तर ते हरकत घेणार नाहीत अशी आशा आहे. मायबोलीवर त्यांचे अनेक भाचे भाच्या आहेत. त्या आपल्या अशोकमामासाठी किती जीव टाकतात ते पाहायचं असेल तर आम्ही कोल्हापुरी चा वाहता धागा पाहावा. रक्ताच्या नात्याइतकीच अशोकरावांची ही नाती दृढ आहेत याचा अनुभव मी एका गटगच्यावेळी घेतला आहे. मात्र याची सुरुवात जरी जालावर झाली असली तरी अशोकरावांचा दांडगा पत्र संपर्क, नियमितपणे फोनवर असलेला संपर्क, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे शक्य होईल तेव्हा प्रत्यक्ष भेटी या लोकांच्या अनेकदा झाल्या आहेत. हे संबंध जालावरुन सुरु झाले असले तरी जालाच्या पार पोहोचुन प्रत्यक्षात अस्तीत्वात आलेले आहेत. उद्या देव न करो पण असा सल्ला कुणाला देण्याची वेळ अशोकरावांवर आली तर अशोकराव हा सल्ला जालावर न देता फोनवर देतील किंवा ही माणसे एकमेकांना प्रत्यक्ष भेटतील याबद्दल माझी तरी खात्री आहे.

या उलट कधीही न पाहिलेला माणुस जो फक्त लिखाणातुन माहित झालेला आहे. आधी मुळात लिखाणातुन प्रत्यक्ष माणसाची नक्की कितपत अंदाज येतो याबद्दल मला शंका आहे. फार तर त्याच्या बौद्धीक कुवतीबद्दल सांगता येईल, पण त्याच्या स्वभावाचं काय? जालावर भन्नाट विनोदी लिहिणारा माणुस स्वतःच्या मुलांना बदडुन काढत नसेल असं थोडंच आहे? त्यामुळे अशा कधीही न पाहीलेल्या, विपुतुनच माहित झालेल्या आणि गटग मध्ये इतर अनेकांबरोबर ओळख झालेल्या व्यक्तीला समुपदेशनाचा सल्ला देणे हे मला योग्य वाटत नाही. शेवटी सिईंग इज बिलिव्हींग हेच खरं. आणि हे पाहणं जालावरच्या ओळखिने घडु शकतं असं मला वाटत नाही. जालावरुन फार तर सुरुवात होऊ शकते. पण मैत्री ही प्रत्यक्ष भेट, चर्चा, एकमेकांना आवडलेल्या एकमेकांच्या गोष्टी, मग हळुच पण आपोआप सुरु झालेले वैयक्तीक गोष्टींचे शेअरींग यासारख्या रुळलेल्या मार्गानेच घडते अशी माझी समजुत आहे. जालावर यातील काहीही घडु शकत नाही आणि हीच जालाची मर्यादादेखिल आहे असं मला वाटतं.

आणि दुसरे-
समुपदेशनाची गरज आहे हे सांगणे इतके ऑफेन्सिव का वाटावे.
मला थकवा येतो, मरगळ येते , धाप लागते असं कोणी म्हटलं तर डॉक्टरकडे जा, योग्य त्या टेस्टस करून घे. असं सांगितलं तर ते ऑफेन्सिव नाही. पण सायकिअ‍ॅट्रिस्टकडे जा, काउंसेलिंग घे असं म्हटलं तर ऑफेन्सिव का?

मला वाटतं यात थोडीशी गडबड आहे. आपल्याकडे काही आजारांना प्रतिष्ठा आहे तर काहींच्यामागे स्टीग्मा आहे. मला मधुमेह आहे, बीपी आहे हे फुशारकीने सांगणारे मिळतीलही कदाचित पण मला नैराश्याचा रोग आहे. मला सोशल फोबिया आहे म्हणुन मी गर्दीच्यावेळी स्टेशनात जाऊ शकत नाही. मला शंभरवेळा हात धुवावे लागता असा कंपल्सिव डिसऑर्डर आहे असं कोण कुणाला सांगेल? या सार्‍या गोष्टी लोक लपवायच्याच मागे असतात. शिवाय थकवा येणे, मरगळ येणे म्हणुन कुणी डॉक्टरकडे जाण्याचा सल्ला दिला तर ज्याला सल्ला दिला त्याच्या डोक्याबद्दल समाज शंका घेत नाही. मात्र सतत चिंता वाटते म्हटल्यावर सायकियाट्रीस्ट कडे जा म्हटले म्हणजे त्या माणसाकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टीकोण लगेचच बदलतो ही वस्तुस्थिती आहे. म्हणुन ते मला ऑफेन्सीव वाटते.

Pages