तिने रुसायला हवे

Submitted by संतोष वाटपाडे on 6 March, 2015 - 01:34

कुशीत घ्यायला तिला.. तिने रुसायला हवे
म्हणून रोज एकदा तिला छळायला हवे....

समर्पणात सौख्य केवढे असेल जाणण्या
पतंग होउनी दिव्यावरी जळायला हवे..

भविष्य पाहण्यात वेळ घालवायला नको
घडेल त्यास फक्त चांगले म्हणायला हवे...

जखम जुनी मनातली जपून ठेव वेदने
कशी परत करायची मला शिकायला हवे..

नको पळूस युद्ध सोडुनी उगाच जीवना
जगायचे असेल तर पुन्हा लढायला हवे...

तुझ्या अढळपदास मी जपेन नेहमीच पण
नभा तुला समोर माझिया झुकायला हवे..

पुसून आरसा कसा दिसेल स्वच्छ चेहरा
तुला स्वतःवरील डागही पुसायला हवे..

तुझी खट्याळ ओढणी नकोच सावरूस ना
ऋतूबदल जगातले प्रिये घडायला हवे..

-- संतोष वाटपाडे (नाशिक)

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुझ्या अढळपदास मी जपेन नेहमीच पण
नभा तुला समोर माझिया झुकायला हवे..

पुसून आरसा कसा दिसेल स्वच्छ चेहरा
तुला स्वतःवरील डागही पुसायला हवे..<<< वा वा

खालील शेरात जगातले ऐवजी जगामधे अधिक शोभेल असे वाटले. कृ गै न. तसेच, हवे(त)

तुझी खट्याळ ओढणी नकोच सावरूस ना
ऋतूबदल जगातले प्रिये घडायला हवे..

मतला म्हणजे अगदी गणिती समीकरण मांडल्यासारखा झाला आहे. Happy

धन्यवाद भूषणजी...... तुम्ही दिलेल्या सुचना मी लक्षात ठेवेन नक्कीच.... उत्साह वाढविलात तुम्ही माझा....स्पेशल आभार त्यासाठी...