पळ पळ राधे, आला कान्हा घेऊन ग पिचकारी -

Submitted by विदेश on 4 March, 2015 - 11:32

पळ पळ राधे, आला कान्हा घेऊन ग पिचकारी
सोडणार ना रंगविल्याविण नटखट ग गिरीधारी ..

'नको' 'नको' तू म्हणुन सारशिल, दूर दूर ग त्याला
'हो' 'हो' म्हणतच, पुढे पुढे तो धरील पिचकारीला
खट्याळ किती तो तुजला ठाऊक आहे ना गिरीधारी
पळ पळ राधे, आला कान्हा घेऊन ग पिचकारी ..

रंगबिरंगी इंद्रधनूतील सप्तरंग आणील
रंगवून तुज सर्वांगाला खुषीत तो येईल
काही न घडल्यासम.. पावा तो वाजवील गिरीधारी
पळ पळ राधे, आला कान्हा घेऊन ग पिचकारी ..

एकटीच तू दिसता येथे, गोपिकाही जमतील
मोहित करील बासरीवाला, सर्व फेर धरतील
समोर असुनी, नसेल कोठे, अद्वैतच गिरीधारी
पळ पळ राधे, आला कान्हा घेऊन ग पिचकारी ..
.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान

बेफिकीर, अमेय, वैशाली...
प्रतिसादासाठी मनापासून आभार !

बाळू -

राधाकृष्णाची अनंत काळाची अमर्याद धावाधाव आहे, सांगायलाच पाहिजे ?
प्रतिसादाबद्दल अर्थातच आभार !