दिलीप पुरुषोत्तम चित्रे-कवीचं गद्यलेखन

Submitted by भारती.. on 2 March, 2015 - 14:08

दिलीप पुरुषोत्तम चित्रे-कवीचं गद्यलेखन

नुकताच मराठी भाषा दिन होऊन गेला.. एका कवीच्या- कुसुमाग्रजांच्या जन्मदिवसाला हा मान प्राप्त झाला आहे. मला मात्र या दिवशी मराठी भाषा , तिची सद्यकालीन गती,तिच्या पुनरुत्थानाचा ध्यास या विचारांनी सतत तळमळणाऱ्या दुसऱ्याच एका कवीची खूप खूप आठवण आली. स्वत:चं जगणं आणि लिहिणं एका परीक्षानळीत घालून तपासणाऱ्या या कवीच्या कविता नाही, पण भाषा आणि अस्तित्वविषयक चिंतनाने भारलेल्या गद्य-ललितलेखनाची आठवण सर्वांसोबत जागवावीशी वाटली.

दिलीप पुरुषोत्तम चित्रे.

एका अस्सल कवीचं गद्यलेखन गद्याची प्रतच बदलून टाकतं असा माझा नेहमीचा अनुभव.काव्यमूलतत्त्वाने रसरसलेलं असं चिंतन व्याकरणदृष्ट्या गद्य असलं तरी त्याची शब्दकळा कवितेच्या धगीने व्यापलेली असते. आशयदृष्ट्याही हे विचार वेगळ्या अर्थाने स्वयंप्रकाशी असतात. घटनांकडे पाहाण्याची कवीची प्रकाशयोजना त्याच्या प्रतिभेइतकीच वैशिष्ट्यपूर्ण असते. पांडित्य आणि प्रतिभा या दोन्ही गणकांमधलं नेहमीचं गुणोत्तर बदलल्याने हे वाचताना हाती येणारे निष्कर्ष हे ‘सत्या-असत्याशी मन केले ग्वाही | मानियले नाही बहुमता ‘’ अशा साक्षात्कारी स्वरूपाचे असतात.

कवी दिलीप पुरुषोत्तम चित्रेंच्या वाङमयीन कारकिर्दीकडे पाहाताना याच कारणाने मला त्यांनी लिहिलेलं गद्य आरपार आकर्षून घेतं. कवितेच्या अंगभूत मर्यादा ओलांडून चित्रे यांनी केलेलं हे ललितलेखन प्रामुख्याने तीन पुस्तकांमध्ये व्यक्त झालं आहे ,’’ तिरकस आणि चौकस ‘ आणि ‘पुन: तुकाराम ‘ ही त्यांच्या मराठीपणाशी , महाराष्ट्रीय अस्तित्वभानाशी ( त्यांचा आवडता शब्द ) जास्त निगडित पुस्तके. ’शतकांचा संधिकाल‘ हा जरा वेगळा लेखसंग्रह .

आज ‘मराठीच्या ओळखपत्रा’चं आत्मविश्लेषण करणारा ’’ तिरकस आणि चौकस’’ हा संग्रह या लेखनाचा मुख्य विषय.

परंपरा आणि आधुनिकता या संघर्षमय द्वैताने ज्यांचे संज्ञारिंग व्यापून गेले आहे अशा आधुनिक कवीजाणिवेच्या आमच्या पिढीचे दिलीप पुरुषोत्तम चित्रे खरे तर सुरुवातीपासूनचे ज्येष्ठ आप्त होते..

१९३८-२००९ ! चित्रे आज आपल्यात नाहीत. त्यांच्यामागे त्यांच्या हातातली पताका सांभाळण्याजोगं कुणी तयार झालं नाही. मायमराठीच्या घरी प्रतिभेची वाण पडली असं तर मुळीच नाही पण निष्ठेची चणचण आमच्या पोटार्थी पिढीला नक्कीच होती. दोष सगळाच स्वत:कडे कसा घ्यावा ! काळाने मानववंशाला जे नवीन उखाणे घातले त्यात जीवनशैलीचा अर्थ झपाट्याने बदलत गेला हे चित्रेंनाही तर माहिती होते.त्यांच्याच शब्दात -
‘’चक्रधरांनी सांगून ठेवले आहे,’’महाराष्ट्री असावे ‘’. हा जमिनीचा लागाबांधा आधुनिक काळात कदाचित टिकण्यासारखा नसेल . ज्ञानदेवांनी मराठी भाषेचा जो अभिमान व्यक्त केला , तो आज कुणाला शक्य वाटत नसेल. ‘’आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने’’ म्हणणाऱ्या तुकारामांचं ऐश्वर्य आजच्या चंगळवादी जगात कवीला पुरेसं वाटत नसेल. पण वाङमयाला जीवनात केंद्रीय स्थान आम्ही देऊ शकत नाही हीच आमच्या वाङमयीन संस्कृतीची मूळ कमजोरी आहे ..’’ (‘निरोपाचा निबंध’)

तर ‘तिरकस आणि चौकस’(१९९०) आणि ‘शतकांचा संधिकाल (१९९५) ‘या दोन्ही स्तंभलेखनातून साकारलेल्या व शेवटी पुस्तकबद्ध झालेल्या लेखमाला होत्या. स्तंभलेखन कित्येकदा आपल्याला वेगळ्याच कारणाने स्तंभित करते. त्या नावाखाली चाललेले पाट्या टाकणे आपण सहन करतोच, नंतर लिहिणाऱ्याची हौस व वाचणाऱ्याच्या नशिबातला दुष्काळ अशा ऋतुमानावर हे अत्याचार पुस्तकरूपाने संकलित होतात.पण दिलीप चित्रेंचं ‘तिरकस आणि चौकस’ मात्र जेव्हा ‘सकाळ’मध्ये प्रकाशित होत होतं तेव्हाच त्याचा आवाका , वेगळेपण , त्यातली शाश्वतमूल्ये आणि तात्कालिक घटकद्रव्ये वाचकांच्या मनावर काही ताजा व वेगळा परिणाम करत होती.

याचं काही निश्चित कारण चित्रेंच्या व्यक्तिमत्वात होतंच.चित्रेंच्या व्यक्तिमत्वाचे मुख्य विशेष म्हणजे त्यांचे विश्वनागरिकत्व.त्याचं बडोद्यात मुळं रुजवलेलं, मुंबईत जडणघडण झालेलं आणि पुढे निरनिराळ्या विदेशांमधील वास्तव्यांमधून पिकत गेलेलं विस्तारित मराठीपण हा एक पैलू तर कवितालेखन , पेंटिंग्ज , पटकथालेखन , समीक्षा ,अनुवाद या विविध विशुद्ध आणि उपयोजितही कलामाध्यमांना हाताळताना प्रातिभ/वैचारिक पातळीवरही आलेलं बहुआयामीत्व हा दुसरा पैलू.. अस्तित्वाच्या अशा सर्वांगीण ग्लोबलायझेशनमधून लेखकाची अभिव्यक्ती कशी समृद्ध होत जाते याचा एक वस्तुपाठ चित्रेंचं ललितलेखन वाचताना मिळत जातो.

मराठी भाषेच्या , परंपरेच्या भवितव्याची सतत काळजी करणारे आणि तिचा सार्थ अभिमानही बाळगणारे चित्रे गुजराथी, इंग्लीश, हिंदी या तीन महत्वाच्या भाषापटांवर सफाईदार खेळी करताना निरनिराळ्या कार्यक्रमांतून व ललितलेखनातून दिसले होते. पण या सर्वच अन्य वाङमयीन घटनांच्या स्तरावर वावरताना त्यांची मराठीची महत्ता वाढवण्याची आंतरिक तळमळ कधी उणावली नाही .
‘तिरकस आणि चौकस’ मध्ये हा वाङमयीन वारकरी निरनिराळ्या भाषा, देश व माणसे यांना अनुभवण्याच्या विशाल यात्रेवर निघतो. या प्रवासाची कारणे कधी वैयक्तिक असतात तर कधी देशी राजकारणात रुजलेली.. जसे की आणीबाणीच्या काळात देश सोडून अमेरिकेला केलेलं प्रयाण. हा प्रत्येकच अनुभव त्यांनी ‘संकटाचं संधीमध्ये‘ रुपांतर केल्याची प्रक्रिया आहे.या लेखनातून व्यक्त झालेलं त्यांचं आत्मचरित्र एखाद्या धाडसी पण खूप खाजगी सफरीसारखं रोमहर्षक आहे.. या अशा वाटचालीतून त्यांनी जोडलेलं मित्रवर्तुळ संख्यात्मक आणि गुणात्मक दृष्ट्या हेवा वाटण्यासारखं आहे.

स्वतःच्या सीमा ओलांडण्याच्या प्रकल्पात गुंतलेल्या चित्रेंना मराठी भाषेच्याही मर्यादांबद्दल बरंच काही म्हणायचं आहे.’’ मराठी वाङमयाच्या मर्यादा या मानवनिर्मित आहेत, त्या मराठी लेखकांच्या ,वाचकांच्या आणि समीक्षकांच्या मर्यादा आहेत, कृतीला आणि संकल्पनेला आपणच घातलेल्या त्या मर्यादा आहेत ‘ असं एक महत्वाचं विधान ते करतात.सर्जनशील साहित्य जगाच्या कानाकोपऱ्यातून पुढे येत असताना मराठीला साचलेपण का यावं ? यावर ते लिहितात , ‘’ज्या मराठी कवितेची सुरुवात ‘अनुभवामृत’ सारख्या चिंतनपर दीर्घकाव्याने झाली त्या परंपरेत १९ व्या शतकापासून ते आजतागायत श्रेष्ठ चिंतनपर कवितेचा अभाव का असावा ? ठराविक प्रकारच्या भावकवितेच्या गौण परंपरेलाच आधुनिक मराठी कवितेत महत्व का लाभावे ? लावणीपासून थेट भावगीत आणि गझलांसारखे गौण करमणुकीचे प्रकार मराठीत का फोफावावेत ? प्रेमकविता आणि व्यासपीठीय सामाजिक जाणीव यांच्या सांकेतिक आणि बोथट आवर्तनात बहुसंख्य कविता का संपून जात राहावी ? दिवाळी अंकातले वाड़मयीन फटाके आणि फराळवजा साहित्य आणि कवीसंमेलनांमधले करमणुकीचे विविध कार्यक्रम यापलीकडे आमची वाड़मयीन संस्कृती अजूनही का जाऊ नये ? या प्रकाराला जे अपवाद आहेत ते सन्माननीय आहेत, पण तरी ते अपवादच आहेत.......’’ ( ‘थोडं वळून मराठी कवितेकडे ‘)

तरीही त्यांनी आशा गमावली नव्हती. खरे नवे लेखक कवी वाड़मयाबाहेरच्या व्यापक जीवनक्षेत्रातून वाड़मयात येणार आहेत असा त्यांनी १९९० मध्ये व्यक्त केलेला विश्वास आज सार्थ ठरताना दिसत आहे.

भाषेचं यौवन हे कालातीत कवितेतून चिरंतनपणे व्यक्त होतं. चित्रे ज्ञानेश्वरीवरील एका लेखात तिला ‘सात शतकांचा सण’ म्हणतात.त्यांच्या मते ज्ञानेश्वरी हे एक प्रदीर्घ प्रवचन असेल तर अनुभवामृत हे तत्त्वज्ञान, चिंतन आहे. भाषिक पूर्वपरंपरा नसताना ज्ञानेश्वरांनी तत्कालीन मराठी भाषा लवचिक अशा सौंदर्याने, अर्थवत्तेने वाकवली, राबवली होती. ‘’म्हणोनि माझे नित्य नवे | श्वास उच्छ्वासही प्रबंध होआवे ‘’ असा आत्मविश्वास असलेला ज्ञानेश्वरांसारखा प्रतिभा-प्रज्ञावंतच भाषेला ऊर्जितावस्था ( चित्रेंचा सुंदर शब्द ‘उफाडा’ ),आणू शकतो हे चित्रे नमूद करतात. ‘तुकारामांनंतर मराठीत मोठा म्हणावा असा कवी झाला नाहीच ‘ असंही धक्कादायक वाटू शकणारं विधान ते करतात.( पुढे ‘पुन: तुकाराम’च्या प्रस्तावनेत बरीच धक्काबुक्की आहे ! )

चित्रेंना सनसनाटी विधान करून वाद निर्माण करण्याची नक्कीच खुमखुमी होती ! अनेकांना एका वाक्यात दुखवण्याचीही क्षमता होती. आणि तरीही वादाचा धुरळा विरेल तेव्हा पुन: एकदा कळकळीने, ‘सत्याअसत्याशी मन केले ग्वाही ‘ असं म्हणत हे वाचून पाहाताना आपल्याला अंतर्मुख करण्याची हातोटीही होती.
.
भाषेइतकंच एका कवी-लेखकाचं मन आकर्षून घेणारा विषय म्हणजे भाषांतर. या विषयावर ‘’भाषांतर की भ्रम’’ या लेखातून मुख्यत्वे आणि अन्यत्रही चित्रे आपले विचार मांडतात. कवीचं कुतूहल म्हणजे भाषाशास्त्रज्ञाचं कुतूहल नाही याची जाणीव ठेवून ते म्हणतात,’’मी पद्धतशीर असा कसलाच अभ्यास केलेला नाही. अनुवादाच्या बाबतीत माझ्याकडे कसलं भांडवल असेल तर ते कृतीचं आहे.’’

पण ही नुसती विधानात्मक बाब. खरं तर निर्मितीच्या वेगळ्या वाटा म्हणून अनुवादांकडे एक कवी म्हणून वळताना चित्रेंमधला अभ्यासू स्कॉलर नेहमीप्रमाणे जागा आहे.बेंजामिन ली व्हार्फ ( अमेरिका ) किंवा कार्ल हंबोल्ट ( जर्मनी ) अशा भाषाशास्त्रज्ञांचे दाखले देत ते म्हणतात की प्रत्येक भाषेच्या नियमात पडणारं जगाचं प्रतिबिंब जर वेगळं असेल तर तर त्या त्या भाषेतील तत्त्वज्ञानात्मक विधानंसुद्धा अनुवादात आशयभ्रम निर्माण करतील !

इथे ‘शब्दभ्रम’ या विषयाबद्दल थोडंसंच. आजच्या तत्त्वज्ञांना/ मानसशास्त्रज्ञांच्या सखोल चिंतनाचा हा विषय. शब्द-योजनातून वास्तवाबद्दल निर्माण होणारा भ्रम, भाषेतून संक्रमित होणारी सांस्कृतिक सत्ता-उतरंड, भाषेमुळे अस्तित्वाला पडणारे उखाणे असं मोठं आव्हान आकलनशक्तीला देणारा. अस्तित्वाच्या जाणिवेच्या अगदी खोलवर पाझरलेला, अनेक विद्वानांच्या परिशीलनाचा हा विषय.

तर असा हा विषय अनुभवामृतात शब्दखंडण करताना ज्ञानेश्वरांनी सातशे वर्षांपूर्वी ‘मिस्कील तरीही तीक्ष्ण तार्किक’ पद्धतीने मराठीत मांडला होता याची चित्रे आठवण देतात . संस्कृत भाषेत भाष्य,मीमांसा , युक्तीवाद आणि आकलन याची एक जोरदार परंपरा होती. अस्सल देशीवादातून ती ज्ञानेश्वरांनी मराठीत ,आणि शिवाय काव्याच्या रूपबंधात आणली. पण त्यांनीच स्थापलेल्या वारकरी पंथीय भक्तिमार्गाची जेवढी जोमाने महाराष्ट्रात वाढ झाली तशी या ज्ञानमार्गी/वैचारिक परंपरेची झाली नाही. हे अतिशय महत्वाचं निरीक्षण चित्रे नोंदवतात.

या परिस्थितीत ते अनुवादांबद्दल म्हणतात,’’मूळ भाषा आणि अनुवादाची भाषा यांच्या दोन स्वतंत्र विश्वांच्या दरम्यान अनुवादाचं एक स्वतंत्र विश्व असू शकतं... आजच्या सांस्कृतिक आक्रमणांच्या भाऊगर्दीत अनुवाद हे स्वत:च्या संस्कृतीची आत्मप्रतिमा प्रक्षेपित करून टिकवण्याचं साधन मानलं पाहिजे.’’

पुढच्या ‘मराठीचं ओळखपत्र ‘ या लेखात ते म्हणतात,’’आपण मराठी भाषी लोक जगातल्या अदृश्य लोकांपैकी आहोत ..जोपर्यंत मराठी भाषेतील निदान एखादी तरी वाड़मयीन कृती जगात जास्त प्रभावी असलेल्या भाषांमध्ये अभिजात मानली जात नाही तोपर्यंत आपण अनोळखीच राहू..’’

यात कदाचित साहित्याच्या शाश्वततेवरचा त्यांचा प्रगाढ आणि काहींना भाबडाही वाटू शकणारा विश्वास व्यक्त होतो आहे, पण चित्रेंनी मराठी भाषा स्वत: तुकारामांच्या अभंगांचे इंग्लिश अनुवाद करून अशी जागतिक पातळीवर नेली आहे. भाषाऋण प्रभावीपणे फेडले आहे.

‘महाराष्ट्रात ‘वागर्थ’ का नाही’,’महाराष्ट्राचा शोध’ या आणि अशा लेखांमधून चित्रेंचं महाराष्ट्रासाठी, मराठीसाठी तळमळणारं मन निरनिराळ्या तऱ्हेने व्यक्त होत रहातं . ‘’आमची गरीबी जरूर जावो . ताकद असेल तर हटवणारे ती हटवोत. पण या गरीबीतही सांस्कृतिक विविधता टिकवून पुढे नेण्याची क्षमता आहे ती गरिबीच्या नावाने हिरावली न जावो’’ हे त्यांचं भय मराठीसारख्या संपन्न भाषिक अवकाशाचं जागतिकीकरणाच्या रेट्यात निर्मूलन होण्याचाच एक उच्चार आहे.

पुढे ‘’भारतीय वाड़मयाची जागतिक प्रतिमा ‘ या लेखात एका वेगळ्या अंशातून तथाकथित ‘भारतीय’ वंशाच्या पण खरे तर पश्चिमाळलेल्या व्ही.एस. नायपॉल , सलमान रश्दी आदि लेखकांनाच प्रातिनिधिक भारतीय लेखक जागतिक पातळीवर मानले जाते या विपर्यासावर लिहितात आणि या कारणासाठी तरी चांगल्या प्रादेशिक वाड़मयाचे अनुवाद होणे कसे आवश्यक आहे ते ठसवतात.

‘मॉस्कोतलं चिंतन ‘, ‘यास्नाया पोल्याना’ ,’परक्या चौकटीतलं साहित्य ‘ या तीनही लेखातून चित्रे रशियाच्या आंतरिक सफरीवर आपल्याला नेतात. महान रशियन उपखंड हे युरप आणि आशिया यांच्यामधल्या दुव्यासारखं एक वेगळंच सांस्कृतिक /साहित्यिक विश्व. आपल्या अपार कुतूहलाचा, आकर्षणाचा विषय. चित्रेंना या देशाला एक कवी-लेखक म्हणून भेट देता आली. स्वत: कम्युनिस्टविरोधी विचारवंत असा शिक्का असलेल्या चित्रेंनी लोहियावादी यू आर अनंतमूर्ती,आणि कम्युनिस्ट कार्ड फाडून टाकलेले निर्मल वर्मा अशा दोन लेखकांबरोबर रशियन विश्वात प्रवेश केला होता.
अर्थात इथेही एक साहित्यिक म्हणून चित्रेंची पूर्वतयारी कमी नव्हती. ‘’ तोल्स्तोयइतकाच हा देश दोस्तोयेफस्की , पास्तरनाक आणि सोल्झेनित्सिनचा,चेखेवचा. पण माझी काकणभर जास्तच आस्था आधुनिक रशियन कविता आणि चित्रपट यांच्याबद्द्ल.ब्लोक , मांदेलश्ताम,आख्मातोव्हा, स्वेतायेव्हा , व्हाझनेसेन्स्की ..रशियन कवितेचा अग्रगण्य इंग्रजी अनुवादक डॅनियल वाईसबोर्ट हा माझा फार जवळचा मित्र ‘’... !!’

यास्नाया पोल्याना’ हे तोल्स्तोयचं साधंसं जन्मगाव.रशियन बर्फाळ भूभागांचा दृष्टीपातळीवर अनुभव घेताना मनाने तोल्स्तोयमय झालेले चित्रे ‘’ तोल्स्तोय हा नुसता कादंबरीकार नव्हता. मानवतेच्या भानाने पीडित झालेला , गुंतागुंतीच्या व्यक्तिमत्वातून मुक्त होऊन जीवनाच्या सर्वस्पर्शी साधेपणाचा शोध घेणारा तो एक वेदनावंत होता ‘’ असं एका कवीलाच सुचणारं काही लिहून जातात.

‘उपनिषदं आणि हंगेरियन रंगारी ‘ सारखं प्रसंगचित्र असो वा ‘एक बंडखोर जपानी कवयित्री’ सारखं एका काझुको शिराईशी या जिवाभावाच्या समकालीन कविता-सखीचं काहीशा अभिमानाने ओसंडून केलेलं व्यक्तिचित्रण असो, ‘असाध्य दुखणं’ मधील अमेरिकेतील कविमित्र विल्यम ब्राऊनचं व्यसनाच्या आहारी जाणं आणि स्वत: चित्रेंनी त्याला मोठा ताण सोसून वेडाच्या काठावरून परत माणसात आणणं असो,’कवीने गमावलेला जबडा ‘ मधल्या पूर्व युरोपातून अमेरिकेत स्थलांतरित ज्यू कविमित्र डॅनियल वाईसबोर्टच्या व्यक्तिचित्रणातून वारंवार स्थलांतर करण्याचा आणि बहुभाषिकत्वाचा सांधा जोडणे असो या सर्व आत्मकथनातून चित्रे आपल्याला सतत वेगळ्या अर्थाने सांस्कृतिकदृष्ट्या दचकवत राहातात. त्यांचं विश्वकुटुंबी अंतर्याम विशाल वैश्विक संदर्भांनी ओथंबून आपल्याला सामोरं येतं. आपल्या कोशाबाहेर पाहायला आपल्याला भाग पाडतं.

‘बर्लिनची भिंत बघताना ‘ मध्ये चित्रे फाळणी नावाच्या ‘खोलवर पोहोचणाऱ्या अव्याहत’ जखमेवर आणि शोकांतिकेवर लिहितात. ‘’पहिल्या महायुद्धापर्यंत बृहन्जर्मनीचं अस्तित्व मध्य युरोपात वरचढ ठरलं होतं.. बाख बेथोव्हान मोत्सार्त ब्राह्मससारखे संगीतकार , कांट ,शॉपेनहाउर , नित्शे , विटगेन्स्ताईनसारखे तत्त्वज्ञ , ह्योल्डर्लीन, ग्योएटे, रिल्क सारखे कवी ,फ्रॉईड आणि त्याचे अनुयायी मानसशास्त्रज्ञ, मार्क्स आणि वेबर सारखे समाजशास्त्रज्ञ ‘’ हे आणि याहून अधिक उल्लेख वाचताना युद्धांच्या विध्वंसक परिणामांमुळे झालेले हे चित्रेप्रणित ‘सांस्कृतिक आत्मकल्पनेचे खंड ‘ , हे खंडित होणं आपणही सोसलं आहे हे जाणवतं .. आपल्याही मनात एक सहवेदना भळभळते .

पॅरिसमध्ये परागंदा व्हावं की महाराष्ट्री असावं ‘ या लेखात अनेक निर्वासित कलावंत ज्या फ्रेंच कलासंस्कृतीच्या तीर्थक्षेत्री आश्रय घेतात तिचा असाच संपृक्त लेखाजोखा चित्रे घेतात..पण त्याहीपेक्षा लक्षात राहातं त्यांचं हे स्वानुभवातून आलेलं एक विधान-‘’ ज्या लेखक-कलावंतांनी आपापला जीवनानुभव पूर्वीच काठोकाठ भरून घेतला आहे त्यांना अंतिम कलात्मक प्रक्रिया पार पाडण्यासाठी विदेश हा विजनाइतकाच सोईचा वाटतो’’ !!

‘लॅटिन अमेरिकेचं पुनरुत्थान’ या अगदी छोट्याशा लेखात स्पॅनिश भाषा ,तिच्यातील समृद्ध साहित्य-कविता, इस्लामच्या संकरामुळे वैशिष्ट्यपूर्ण झालेली अशी तिची वळणं , तिच्या प्रसाराचे देश-भूखंड याचा विचार करताना तसं पाहिलं तर स्पेन हे युरोपातील अगदी तिय्यम दर्जाचं राष्ट्र आहे आणि स्पॅनिश जिथे बोलली जाते ते बरेचसे मागास देश आहेत तरीही जगाला दिपवून टाकणारं साहित्य त्या भाषेत निर्माण होत आहे यातून ‘’आपापल्या भाषिक संस्कृतीला’’ मिळणारा आशावादी संकेत चित्रे अधोरेखित करतात.

तसे तर चित्रे परागंदा झाले ते अमेरिकेत, आणीबाणीच्या काळात. देशाबाहेरून देशाकडे आणि मराठी भाषेबाहेरून मराठी साहित्याकडे पाहायचं ठरवून. इंटरनॅशनल रायटिंग प्रोग्रॅमचं अनेक वेळा आलेलं आमंत्रण स्वीकारून . अंतर्गत जगभरच्या लेखक-लेखिकांच्या सहवासाचा लाभ त्यांनी या काळात घेतलाच,पण आपली चित्रकलेची (‘ शुद्ध तैलरंगातील परंपरानिष्ठ तंत्र ‘) हौस भागवून चित्रप्रदर्शन भरवून चित्रं विकलीसुद्धा ! पर्यटनापुरती बऱ्यापैकी प्राप्ती करून देण्याइतपत याही माध्यमावर चित्रेंची पकड होती !

‘अमेरिका , अमेरिका ‘, ‘पानगळीने झालेली सुरुवात’ बर्फाचे दिवस ‘ या प्रदीर्घ लेखांमध्ये त्यांनी या आठवणी जागवल्या आहेत.याच काळात त्यांनी तुकारामांचं, ज्ञानेश्वरांच्या अनुभवामृताचं , मराठी भक्तीकाव्य आणि मराठी दलित कवितांच्या इंग्लिश अनुवादाचं काम केलं. तेव्हा मराठीचे एका अर्थी राजदूत म्हणूनच ते अनेक महत्वाच्या देशांमध्ये वावरले हे विसरता येत नाही.

तैलचित्रांचा उल्लेख मघाशी आला ,आता चित्रपट ! ’’सहधर्मचारिणी कला आणि इतर ‘प्रकरणे’ ‘’ या लेखात चित्रे कविता आणि चित्रपट यातली सूक्ष्म साम्यस्थळे उलगडतात. वस्तुदर्शी किंवा डॉक्युमेंटरीपासून जाहिरात व्यवसायात असताना त्याचा अभ्यास आपण कसा केला हे सांगतात.पुढे भाऊ पाध्यांच्या गोदाम या कथेवर पटकथा विकसित करून ते याही माध्यमाच्या राष्ट्रीय चित्रपट महामंडळ पुरस्काररूपी प्रकाशझोतात आले.पुरस्कार म्हणून त्यांना ही पटकथा दिग्दर्शित करण्याचा संपूर्ण खर्च मिळाला आणि गोदाम हा चित्रपट त्यांनी १९८३ मध्ये पुरा केलाही ! आता आंतरराष्ट्रीय दिग्दर्शनाचे फ्रान्समध्ये मिळालेले दोन पुरस्कार ! चित्रकला आणि सिनेमा, या न परवडणाऱ्या वादळी प्रेमकथा अशा रीतीने त्यांच्या कलात्मक अनुभवांचा एक भाग बनून राहिल्या.

‘हिंदी कवी आणि कविता’’ , ‘हिंदी भाषासाहित्याच्या क्षेत्रात ‘ या दोन लेखांचे विषय पुरेसे स्पष्ट आहेत. जागतिक साहित्याचा अभ्यास करताना अर्थातच चित्रेंनी समकालीन मुख्यप्रवाही हिंदी कविता व साहित्य यांचा मराठीशी तौलनिक अभ्यास कधीही सोडला नाही. भोपाळ येथील ‘वागर्थ’ या भारत भवनच्या काव्यशाखेचे चित्रे १९८४ मध्ये निदेशक झाले ही मराठीसाठी केवढी अभिमानाची गोष्ट होती ! या मुक्कामात अशोक वाजपेयी , श्रीकांत वर्मा या हिंदी कवितेतील महानुभावांबरोबर त्यांनी स्नेह जोडला, काम केलं. कुंवर नारायण , रघुवीर सहाय , केदारनाथ सिंह , विनोदकुमार शुक्ल , चंद्रकांत देवताले , विष्णू खरे आदि हिंदी कवी आणि अनेक हिंदी साहित्यिकांशी दृढ परिचय करून घेतला.

‘शतकांचा संधिकाल‘ आणि ‘पुन: तुकाराम ‘ बद्दल अगदी थोडंसं.

‘शतकांचा संधिकाल‘या लेखसंग्रहामध्ये चित्रे मूलत: विसाव्या शतकाच्या भूतवर्तमानाचं आसन मांडून एकविसाव्या शतकाबद्दलच्या त्यांच्या भाकितांची आणि भयांचीही चर्चा करतात .इथेही त्यांच्यातला स्कॉलर खूप माहिती जमा करतो, त्यांच्यातला कवी त्या माहितीतल्या सत्य-सत्वात्मक केंद्राचा शोध घेतो.आपल्याला तसे माहिती असलेले अनेक विस्कळित वाटणारे तपशील त्यांच्या आंतरिक सूत्रांसकट चित्रेंच्या निवेदनशैलीत प्रमाणबद्धतेने गोवले जातात.

दुसरं महायुद्ध, अणुध्वंस , इस्लामी आव्हानाचा इतिहास आणि भवितव्य , कम्युनिस्ट राष्ट्रांचं उत्थान आणि पडझड , अमेरिकेचा महासत्ता म्हणून उदय , भावी शतकातील भारताची ( ‘हिंदुलँड’) शक्तीस्थाने ( ‘भारतीय उपखंड हा सांस्कृतिक परंपरांचा कोशच आहे ‘-) व मर्यादा, गांधीवादातले चिरंतन तत्त्व ( ‘ गांधींची समाजव्यवस्था नैतिक व आध्यात्मिक आहे ‘) , त्यात चित्रेंना गवसणारे आश्वासन ही सर्व दोन शतकांच्या संधिकालात सामावलेली आव्हानं ,आशा..

सगळ्यात मोठा प्रश्न हिंसेचा. हिंसेचा अनेक पातळ्यांवर चित्रे विचार करतात. लैंगिक संबंधातली , चंगळवादातून होणाऱ्या पर्यावरणसंहारातून ओढवणारी , व्यापारी वर्चस्व स्थापण्यासाठी महासत्तांच्या संघर्षातून पोसणारी व शेवटी महायुद्धात परिणत होणारी हिंसा. ही या शतकाची सर्वात मोठी देणगी असे मानणारे चित्रे पुन:पुन: गांधींच्या अहिंसेकडे, त्यातून प्रतीत होणाऱ्या संतत्वाकडे , बुद्ध-जैन दर्शनांकडे भविष्यातल्या हिंसेवरचा प्रभावी उतारा म्हणून पाहातात.

मात्र त्यांचा हा बहुआयामी आवाका एका कवीच्या जाणीवेत सामावलेला, प्रत्यक्ष कृतीला पारखा असाच आहे. स्वत:च्या आयुष्यातील वादळांना,शोकांना कवितेवरील निष्ठेसकट सामोरा जाणारा , त्यासाठी देशांतर, भाषांतर स्वीकारणारा हा कवी काही कवी-क्रांतीकारक नाही किंवा परिवर्तनासाठी कृतीशील कवी-कार्यकर्ताही नाही.तो कवी-तत्वज्ञ-संतप्रवृत्त माणूस आहे.

इथेच चित्रेंचं मराठीपण त्यांना पुन: मराठीच्या माहेरी तुकारामांच्या पदरी घालतं.
अणुहून तोकडे आणि आकाशाएवढे तुकोबा त्यांच्या प्रश्नांकित तळमळीला शांततेचा पूर्णविराम देऊ शकतात.

तसं तर ‘तिरकस आणि चौकस ‘ मध्येही ‘’तुकारामाशिवाय कविता ?’’’’कलियुगी कवित्व करती पाखांड ‘’ यातून तुकाराम आलेच होते. पण उत्तरोत्तर रांगडे तुकाराममहाराजच चित्रेंचं भावविश्व व्यापताना दिसतात .

‘पुन: तुकाराम ‘ च्या दीर्घ प्रस्तावनेत याची कारणं येतात.ती काहीही असोत,ती अनेक आहेत, विवाद्य पवित्र्यांनी भरलेली आहेत. जसे की तुकोबांचे कुणबी असणे !‘’तुकोबांचा भाषाविश्वाशी असलेला संबंध हा शेक्सपिअर , राब्ले , सेर्व्हातेझ सारखा आहे : तो प्रथम जीवनाशी भाषेद्वारा असलेला संबंध असून पुढे त्याचे रुपांतर भाषेद्वारा वाड़मयाशी असलेल्या संबंधात होतं’’..
’’आपण तुकोबांची गाथा वाचतो ती तिच्या अप्रतिम बाह्य भाषारूपाचा आस्वाद घ्यावा म्हणून नव्हे , तर तिच्या अंत:स्तरीय आशयाचा विवरणातीत बोध व्हावा म्हणून.’’..

पण हे लिहिणाऱ्या चित्रेंचा मानसिक व्यूह कोणता आहे याचा विचार करताना जाणिवेच्या पातळीवर स्वीकारून आयुष्यभर धांडोळलेल्या अस्तित्ववादी , ईश्वरनिरपेक्ष विचारसरणीतून नेणिवेतल्या अस्सल मराठी भक्तीमार्गाने तुकारामांमार्फत ते स्वत:ची सुटका करून घेत आहेत अशी शंका येत राहते.
चित्रेंचा तुकारामांना अभ्यासण्याचा दृष्टीकोन त्यांच्या इतर दृष्टीकोनांइतकाच ताजा व वेगळा आहे..परंपरा व आधुनिकतेची सांगड घालणाऱ्या अनेकांना त्यात आत्मशोधाचे पडसाद सापडतील. तो एक स्वतंत्र विषय आहे.

समारोप करताना मी मात्र पुन: ‘तिरकस आणि चौकस ‘ कडे आणि त्यातल्या ज्ञानेश्वरांवरच्या एका लेखाकडे परतून येणार आहे.
अनेक देश, परिसर, भाषा, संस्कृती. कविता, चित्रकला, जाहिरातसृष्टी आणि मग चित्रपट हेही माध्यम. कवितेसाठी आयुष्याशी कोणतीही तडजोड न करणाऱ्या, त्यासाठी आर्थिक अनिश्चितीची निवड करणाऱ्या ,भोपाळच्या मुक्कामी दुर्देवी वायुगळतीत आपला एकुलता एक मुलगा आशय याचा अकालमृत्यू साहणाऱ्या दिलीप पुरुषोत्तम चित्रेंनी या पुस्तकातील पस्तीस लेखांमध्ये अगदी शांत संतुलित स्वरात जीवनाच्या या परा-कोटींवर लिहिले आहे. सर्व लेखनात स्वदेश आणि स्वभाषा यांचा त्यांनी यथार्थ अभिमान बाळगला आहे. ‘’ आता उपायवनवसंतु ‘’ या तरल लेखात ते ज्ञानेश्वरांनी ‘उपायवनवसंतु’ असं जे विशेषण निवृत्तीनाथांना उद्देशून योजलं आहे त्यावर सुंदर भाष्य करतात ..’’ आत्मविमोचनाचे शास्त्रोक्त मार्ग अरण्यासारखे विविध, घनदाट, वाट काढायला कठीण.पण या सगळ्याच अरण्यात वसंतऋतु येतो तेव्हा अरण्यच बहरून त्याचा स्वर्ग होतो, वाट काढावीच लागत नाही..’’, ‘’मी कोणत्याही अर्थाने अध्यात्मपथावरला यात्रेकरू नाही . ज्या अस्तित्वबिंदुवर मी आहे तिथल्या तिथे माझं आत्मभान उदंड व्हावं असं मला वाटतं !’’

एका कवीचं मागणं हे असं अमर्याद सौंदर्याने लखलखतं ,अनाकलनीय आनंदाने आपण भारावून जातो..
आपलं ‘मराठीचं ओळखपत्र ‘ किती अनमोल आहे याची यथार्थ जाणीव होते.

-भारती बिर्जे डिग्गीकर

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुंदर लिहिलेय.
चित्र्यांचे काही लेख वाचल्याचे आठवतेय, पण ते समजण्याची कुवत त्यावेळी नव्हती. आता परत एकदा वाचायला हवे.

दिलीप पुरुषोत्तम चित्रे या लेखक-कवीच्या समग्र साहित्यावर प्रबंध तुम्ही लिहित आहात की काय अशी रास्त शंका (जी आनंददायीही आहेच) माझ्या मनी हा लेख वाचत असताना उमटत गेली. लेखन आणि मांडणी अतिशय प्रभावी आणि परिणामकारक तर झालीच आहे शिवाय वाचकवर्गाला....त्यातही दि.पु.चित्रे नामक लेखकाची..... खूप जवळून ओळख होण्याचे सारे संकेत तुमच्या या अभ्यासू आणि दीर्घ लेखातून निश्चित मिळत आहे. खूप अभ्यास तुम्ही केल्याचे तर स्पष्टच आहे. शिवाय चित्रे यांच्याबरोबरीने त्यांच्या काळातील लेखक...जसे भालचंद्र नेमाडे, अरुण कोलटकर, अशोक शहाणे, रघु दंडवते, तुळशी परब, भाऊ पाध्ये, र.कृ.जोशी आदी १९६० च्या दशकात आघाडीवर असलेले तरूणाईच्या जवळ झालेले....तुम्ही निश्चित अभ्यासले असणार....कारण दि.पु.चित्रे नाम घेताच ही मंडळीही आपसूकच त्यांच्या जोडीने पुस्तकरुपाने समोर येत राहतात. "सत्यकथा" आणि खुद्द बाबुराव चित्र्यांचे "अभिरुची" ही नियतकालिके चित्रे सारख्यांच्या बुद्धिमत्तेला व्यासपीठ निर्माण करून देणारी ठरली होती आणि चित्र्यांच्या कविताच मला वाटते सुरुवातीला पुढे आल्या. मला आठवते १९६५-६६ च्या आसपास त्यांची "शक्तीची प्रार्थना" ही कविता चर्चेचा विषय ठरली होती.

भारतीताई....तुम्ही लेखाच्या सुरुवातीसच लिहिले आहे..."एका अस्सल कवीचं गद्यलेखन गद्याची प्रतच बदलून टाकतं असा माझा नेहमीचा अनुभव..." ~ हा तुमचा अनुभव असणार, कारण तुम्ही काव्यासोबत गद्यलेखनही नित्यनेमाने करत असताच. पण दि.पु.चित्रे दोन लेखनप्रकारात मूलभूत भेद मानत नसत. मनावर पडलेल्या अनुभवाच्या एखाद्या ठशात त्याना कवितेचे अथवा कथेचे मूलचित्र मिळत गेले, असे त्यानीच सांगितले होते. कथा वा कविता त्याची संदिग्ध आकृती त्यांच्या मनी वसली की विविध शब्दसमुच्चय आणि अर्थ हळुहळू आजुबाजूला जमू लागले की मग गद्यलेखन की पद्यलेखन हा विकल्प त्यांच्यासमोर उभा राही. फारच थोडे लेखक होऊन गेले आहेत ज्यानी गद्यात जितके नाव मिळविले तितकेच पद्यातही. पु.शि.रेगे, खानोलकर, ही अशीच काही नाव...पण तो या लेखाच्या चर्चेचा विषय नसल्याने तिथे खोलात जाण्याचे कारण नाही.

दिलीप चित्रेंच्या मनी कवितेविषयी जे दृढ संकेत होते त्या कारणाने त्यानी कविता लिहिल्या पण पहिल्या काव्यसंग्रहानंतर ते इथियोपियाला गेले आणि जवळपास लेखन संन्यासच घेतल्याचे दिसून आले होते. त्यानंतर त्यानी जे गद्यलेखन करायला सुरुवात केली त्यामागेदेखील त्यानी आलेल्या अनुभवांचे निवेदन असे स्वरूप न देता त्याना जाणवलेल्या अनुभवांना तीव्रता प्राप्त करून दिली असल्याचे दिसते. काही कथांच्याबाबतीत तर चांगलेच वादळ घुमले होते. अनुभवाच्या विशिष्ट उत्कटतेवर केलेले लेखन हे त्यांच्या गद्यलेखनाची व्याख्या होती.

सकाळमधून नियमित प्रसिद्ध होणारे चित्र्यांचे स्तंभलेखन सदर ‘तिरकस आणि चौकस’ त्या त्या दिवसातील घटनांवर बेतलेले असले तरी वाचकाला प्रत्येक वेळी चित्र्यांच्या रोखठोक शैली जाणवत असेच. आता पुस्तकरुपाने ते लेखन प्रकाशित झाले आहे आणि त्याच पुस्तकातील लेखन दर्जाबाबत तुम्ही इथे विस्ताराने लिहिले आहे त्याचे स्वागत इथला वाचकवर्ग आनंदाने करेल.

"...चित्रेंचा तुकारामांना अभ्यासण्याचा दृष्टीकोन त्यांच्या इतर दृष्टीकोनांइतकाच ताजा व वेगळा आहे...." ~ असेही एक वाक्य आहे तुमच्या लेखात. तुकाराम इंग्रजीमध्ये आणण्याचे जे कार्य दिलीप पुरुषोत्तम चित्रे यानी केले आहे त्याची महती यंदाच्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ.सदानंद मोरे यानी त्यांची अध्यक्षपदी निवड झाल्यावर "संत साहित्याचे अभ्यासक दिलीप चित्रे याना मी हे अध्यक्षपद अर्पण करत आहे.." असे जे सार्थ उद्गार काढले त्यामागेही चित्र्यांनी तुकारामाबाबतीत केलेल्या साहित्यसेवेचाच संदर्भ आहे.

लेखक आणि कवी दि.पु.चित्रे यांच्या दोन पुस्तकांची इतकी समर्थ ओळख करून दिल्याबद्दल भारतीताईंचे मनःपूर्वक आभार.

Take a bow ताई!
लेखनाच्या आवाक्याने स्तिमित झालोय. एखादा कवी - लेखक आवडता असणे वेगळे आणि हे असे समरसून झळाळीने लेखनात उतरवणे सर्वस्वी वेगळे! ते तुम्हीच करु जाणेत.कवीच्या गद्यलेखनाबाबतीत तुम्ही लिहिलेल्याची इंस्टंट प्रचिती हा लेख वाचतानाच आली.
कोलटकर, चित्रे आणि ढसाळ (समजून) वाचल्याशिवाय आधुनिक मराठी कवितेचे स्पंदन कळणार नाही अशी माझी माझ्यापुरती समजूत झाली आहे. यापैकी ढसाळ वाचलेत, काही सुहृदांमुळे कोलटकर वाचनही सुरु झालेय. तुमच्या लेखामुळे चित्रेंचे लेखन वाचायचा श्रीगणेश होईल आता !
एका उत्कृष्ट शोधनिबंधाची समर्थ नांदी ठरावा असा लेख आहे. पुन्हा वाचणार.

नितांत सुंदर लेख आहे.

तिरकस आणि चौकस सकाळ मध्ये येत असताना मी अगदी लहान शाळकरी मुलगा होतो पण उपनिषदे आणि हंगेरियन रंगारी वाचून प्रचंड मौज वाटली होती. आवडीच्या विषयाबद्दल असलेली विशुध्द ज्ञानलालसा आणि आपले काम याचा काहीही संबंध नसतो हे त्या वयात आपसूक ठसले गेले आहे.

'तिरकस आणि चौकस' हे एकच पुस्तक संग्रही आहे. ‘शतकांचा संधिकाल‘ आणि ‘पुन: तुकाराम ‘ मिळवून वाचायला पाहिजे . तुम्ही त्यावर सविस्तर लिहिलेले वाचायला आवडेल.

चित्र्यांचे ऑर्फिअस वाचलेय .. कॉलेजात असताना. कळले नाही. त्या वर अश्लील म्हणून त्यावेळी टीकाही झाली होती.

अत्युत्कृष्ट लेख आहे. एखाद्या मराठी संस्थळावर इतक्या उत्तम दर्जाचे परिशीलन कधी येऊ शकेल असे वाटलेच नव्हते. दिपुचि आधुनिक (त्या काळचे) साहित्यिक होते तरी मॉडर्निझ्म वगैरे इझ्म मध्ये ते अडकून पडले नाहीत. मुख्य प्रवाहापासून दूर राहिले तरी विद्रोह्यांच्या कळपात सामील झाले नाहीत. म्हणजे तसे ते या सर्वांच्यात होते, पण तरीही कुठेच नव्हते. त्यांचा अफाट चतुरस्रपणा त्यांना कुठल्या एका गटात बांधून ठेवू शकलाच नसता.
दु:ख एव्हढेच वाटते की त्यांच्या योग्यतेला साजेशी मान्यता मराठी साहित्याच्या प्रांगणात त्यांना मिळाली नाही.(इतरत्र मिळाली.) कदाचित कुठलीच बांधिलकी न स्वीकारल्याचा, कुठल्याच गटाचे कायम सदस्य नसल्याचा हा परिणाम असावा. (चंद्रकांत खोतांबाबतही अशीच थोडीशी भावना मनात आहे.)
तेंडुलकरांना ज्ञानपीठ न मिळण्याइतकेच दिपुंची उपेक्षा हे शल्यही मनात दाटून राहिले आहे.
इतक्या उत्कृष्ट लेखनाबद्दल अभिनंदन.

अतिशय सुंदर लिहिले आहेत. तुमच्यामुळे आता 'चित्रेंच्या विश्वात' वरील पुस्तकं वाचून प्रवेश करण्याची इच्छा वाढलीय. धन्यवाद.

हा लेख परत एकदा वाचला . कसल ओघवत आणि सहज सुंदर लिहिल आहेस. चित्र्यांविषयी भरभरुन बोलत होतीस तेव्हाच किती समरस होऊन लिहिले आहे ते जाणवत होतच . एकदा पुन्हा सविस्तर बोलूयात नक्की .

सर्वप्रथम सगळ्यांचे मनापासून आभार. दिपु हा विषय थोडा क्लिष्ट वाटू शकतो . हा लेख वाचला जाईल का अशीही एक शंका होती पण दिपुंवर लिहिणं ही एक मनात ठसठसणारी गोष्ट होती अनेक दिवस, लिहिल्याखेरीज मला गत्यंतर नव्हतं. त्यांच्या सगळ्या वादग्रस्त लेखनापलिकडे त्यांचा अफाट talent आणि लेखनविषयक नीतीमत्ता होती हे विसरता येत नाही.
हीरा यांनी माझ्याच मनातलं लिहिलं आहे.
>>त्यांचा अफाट चतुरस्रपणा त्यांना कुठल्या एका गटात बांधून ठेवू शकलाच नसता.
दु:ख एव्हढेच वाटते की त्यांच्या योग्यतेला साजेशी मान्यता मराठी साहित्याच्या प्रांगणात त्यांना मिळाली नाही.(इतरत्र मिळाली.) कदाचित कुठलीच बांधिलकी न स्वीकारल्याचा, कुठल्याच गटाचे कायम सदस्य नसल्याचा हा परिणाम असावा. >>
पण म्हणून हा एवढा अनमोल वारसा आपण अनुल्लेखाने हरवू शकत नाही.
अशोक, तुम्ही नेहमीप्रमाणेच अभ्यासपूर्ण प्रतिसाद दिला आहे. दिपुंची स्वभाव-लेखन वैशिष्ट्ये टिपली आहेत.मी कोणताही प्रबंध अजून तरी लिहीत नाहीय !
अमेय, तुला आवडणारच हे लेखन. होय,अगदी आतून येतं तेव्हाच लिहिते मी. आपण सर्वांनीच दिपुंकडून पुष्कळ गोष्टी घेण्यासारख्या आहेत आजही.
स्वाती, धन्यवाद Happy त्यांनी प्रत्येक गोष्टीला सन्माननीय अपवाद असतात असं पुढे म्हटलंच आहे..आपण त्यांची आत्यंतिकता समजून घेऊ .. ती तसल्याच अतिरेकांची प्रतिक्रिया आहे.
रॉबिनहूड , दिपुंची कविताही अशीच प्रतिमांचे कल्लोळ वागवणारी , आकलनास कठीण आहे ..विशुद्ध कवितेचा टोकाचा आग्रह आहे. अश्लीलतेबद्दल बोलायचं तर मर्ढेकरांचा पंथ आहे हा, अधिक आक्रमकपणे अनुसरलेला ,लोकांचा अनुनय अजिबातच नाही विद्रोह किंवा कोणतीही उत्कट भावना व्यक्त करताना..
दिनेश, जाई,खारुताई, शैलजा,हर्पेन, तुम्हाला चित्रे पुन: वाचावेसे वाटले यातच सगळं आलं.
चिनूक्स , खूप आभार !

जबरदस्त लिहिले आहेत. मी चित्र्यांच्या कविता फारशा वाचलेल्या नाहीत. फारश्या काय नाहीतच. एकुणातच कविता न वाचणारा (कारण न कळणारा)माणुस मी. मात्र "एका अस्सल कवीचं गद्यलेखन गद्याची प्रतच बदलून टाकतं असा माझा नेहमीचा अनुभव." या तुमच्या पहिल्याच वाक्यानं असा काही वेग दिलाय या परिशीलनाला (हा एक भारी शब्द दिला हिरा यांनी!). फारच सुरेख लिहिला आहेत हा लेख. लगेच ही पुस्तके वाचनाच्या यादीत टाकली.

रेगे, खानोलकर अगदी नेमाडे सुद्धा हाडाची कवी लोकं. यांचे गद्य लेखन एका वेगळ्याच उंचीला असते हे खरे. त्या तुलनेत अस्सल कादंब्रीकार/कथाकार उदा: पेंडशे. कादंब्रीकार म्हणुन पेंडशे ग्रेटच मात्र ते कवी नाहीत हे पदोपदी जाणवते. असो. तो विषय नाही.

ऑर्फिअस हा कथा संग्रह आहे ना? त्यात 'सफायर' नावाची कथा होती का? न कळत्या/अर्धवट कळत्या वयात ती पुस्तके वाचली तरी त्यांचे गारुड अजून मनावर आहे.
चित्र्यांचे भिंगरी लावून फिरणे त्यांच्या लिखाणातून आले, अस्सल पणे आले. मला वाटते चित्रे काही वर्षे आफ्रिकेत पण राहिले होते.

भारतीताई, हे वाचू आनंदे ग्रुपात हालवणार का?

भारती....

प्रतिसादांबद्दल तुमच्याकडून असेच मुद्देसूद आणि विस्ताराने लिहिलेले मला अपेक्षित होते. तसेच आले. दि.पु.चित्रे यांच्यासंदर्भात इतपत चर्चा झाल्याचे वाचून मलाही तुमच्याइतकाच आनंद झाला आहे.

तुम्ही आणि हीरा यानी दि.पुं. ची उपेक्षा झाली असे जे मत मांडले आहे, त्यास माझा विरोध राहील. १९६० चे दशक नजरेसमोर आणता येईल वा शक्य झाल्यास त्या दशकातील "ललित" चे बांधीव अंक तुम्हाला मुंबई विद्यापीठाच्या ग्रंथालयात मिळतील, ते वाचायला घ्या. चित्रे, नेमाडे, शहाणे, दंडवते, कोलटकर, भाऊ पाध्ये, ढसाळ, ढाले आदी अनेक नव्या पिढीचा पुकार घालत मराठी साहित्यविश्व ढवळून काढत होते. आचार्य अत्रे यांच्यासारखा मागच्या पिढीचा रक्षणकर्ता असल्यासारखा संपादक, ज्यांच्या हाती "मराठा" पेपर होता, त्यातून या नव्यांच्या साहित्य कलाकृती आणि व्याख्यानावर तुटून पडत होते, त्यांच्या गाजल्या गेलेल्या संपादकीयातून....पण चित्रे शहाणे याना त्याची पर्वा नव्हती. त्या सार्‍यांना पुरून उरली ही मंडळी.

कवी म्हणून तर त्यांचा दर्जा काय होता यावरही तुम्ही एक समर्थ कवयित्री या नात्याने जरूर लेख लिहू शकाल. याच दिलीप पुरुषोत्तम चित्रे याना कवितांबद्दलच "साहित्य अकादमी पुरस्कार" मिळाला होता. साहित्यातील हा मान त्याना मिळाला म्हणजे त्यांची सांप्रत प्रांती साहित्याच्या दृष्टीने उपेक्षा झाली असे मला बिलकुल वाटत नाही.

आभार टण्या , >>रेगे, खानोलकर अगदी नेमाडे सुद्धा हाडाची कवी लोकं. यांचे गद्य लेखन एका वेगळ्याच उंचीला असते हे खरे. त्या तुलनेत अस्सल कादंब्रीकार/कथाकार उदा: पेंडशे. कादंब्रीकार म्हणुन पेंडशे ग्रेटच मात्र ते कवी नाहीत हे पदोपदी जाणवते. >> अगदी हेच म्हणायचे आहे ! लेकिन वो बात कहां !
हलवण्याचा प्रयत्न केला वाचू आनंदे मध्ये . जमलं नाही Happy

अशोक, मान्य, तसे उपेक्षित नाहीत दिपु , त्यांची दखल घेतली जाऊ नये असं न त्यांचं व्यक्तित्व होतं न त्यांची प्रतिभा. त्यांची उपेक्षा पुरस्कारांच्या पातळीवर आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर झाली नाही. विचक्षण वाचक त्यांना विसरू शकत नाहीत. पण हे छोटे बेट सोडले तर महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनात आज त्यांची उपेक्षा झालेली मला दिसते. त्यांचा उल्लेख इतर गेल्या पिढीतील ठराविक लोकप्रिय कवि- लेखकांइतका होत नाही. त्यांच्यावर लिहिले जात नाही.त्यामुळे ते वाचलेही जात नाहीत हे वरील प्रतिसादांवरून दिसतेच आहे. येथे किरण नगरकरांची आठवण येते आहे..

भारती ताई, सुरेख आणि दर्जेदार लेख! दिलीप चित्रे यांचं काहीच वाचलं नाहीये मी अजून! किती किती वाचायचं बाकी आहे!!

छान लिहीले आहे! Happy

जरा, बावळट प्रश्न : गोठलेल्या वाटा लिहीणार्‍या शोभा चित्रेंचे मिस्टर वेगळे ना? की त्यांच्यावरच आहे हा लेख?

>>गोठलेल्या वाटा लिहीणार्‍या शोभा चित्रेंचे मिस्टर वेगळे ना?>> मला तेच वाटले होते, पण बहुधा नसावेत असं विकीवरून वाटतंय.

गोठलेल्या वाटा लिहिणार्‍या शोभा चित्र्यांचे पती आणि तुका सेज वाले (म्हणजे ज्यांच्यावर भारतीताईंचा लेख आहे) हे दोन वेगवेगळे दिलिप पु चित्रे. दोघाम्ची नावे सारखी, दोघेही बडोद्याचेच बहुतेक.

तुम्ही फार सुंदर लिहीता भारतीताई. सुरेख आणि अभ्यासपूर्ण लेख. छापील अंकातसुद्धा इतके सुंदर लेख आजकाल वाचावयास मिळत नाहीत. आभारी आहे.
दि.पु. चित्र्यांचे काहीच व्यवस्थित वाचले नाही कधी याची लाज वाटली.

मात्र "एका अस्सल कवीचं गद्यलेखन गद्याची प्रतच बदलून टाकतं असा माझा नेहमीचा अनुभव.">>> टण्या +१. मीही त्याच वाक्यापाशी थांबले, दाद दिली आणि मग पुढे सरसावून आणि समरसून वाचले.
खरंय, खरंय हाडाचे कवीत्व गद्यात उतरले की गद्यलेखन वेगळ्या उंचीला नेऊन ठेवते.
आणि हाडाचे कवीत्व समीक्षेत उतरले की असे सुंदर लेख लिहीले जातात बहुतेक.

'परिशीलन' म्हणजे काय ?

सुंदर लेख !!!
लेख कितपत झेपला हे मला सांगता येणार नाही, पण शेवटपर्यंत वाचत रहीलो. प्रत्येक वाक्य, प्रत्येक शब्द खूप विचारपूर्वक योजलेला असल्याने खूप प्रवाही आणि प्रभावी लेखन आहे. Happy

एका अस्सल कवीचं गद्यलेखन गद्याची प्रतच बदलून टाकतं असा माझा नेहमीचा अनुभव. >>>> मी ह्या वाक्याशी थबकलो. पुढे जावं की नाही ह्याचा विचार केला, कारण कवितांशी नसलेला संबंध ! पण पुढे वाचत राहिलो ते शेवटपर्यंत ! Happy

गोठलेल्या वाटा लिहीणार्‍या शोभा चित्रे यांचे पती म्हणजे दिलीप विष्णू चित्रे. लेख आहे तो दिलीप पुरुषोत्तम चित्रे यांच्यावर.

लेख वाचते आहे. दिलीप पु चित्र्यांचं लेखन मला थोडं समजायला अवघड जातं. पण त्यांची रोखठोक शैली आवडते. 'अश्लील लिखाण' म्हणून त्यांच्या लेखनावर झालेली टिका आठवते आहे. तसेच त्या लेखनामुळे उठलेला गदारोळही आठवतो आहे.

खूप सुंदर ओळख. सगळं नीट कळण्यासाठी पुन्हा वाचायला हवं. चित्र्यांचं लेखन वाचलं नाही याचंच वाईट वाटलं. आता मिळवून वाचायला हवं.

आभार लोक्स, रैना, परिशीलन म्हणजे अभ्यास, व्यासंग वगैरे, इथे अभ्यासापेक्षा आस्थाच जास्त आहे Happy
बस्के , अंजलीचं बरोबर आहे,या नावाचे दुसरे एक अमेरिकास्थित लेखक आहेत , ते वेगळे.
दिपुंच्या पत्नीचं नाव विजू ( विजया ?) होतं हे आठवत होतं .आताच ही एक लिंक मिळाली,कन्फर्म केलं .त्या काही लिहीत वगैरे नव्हत्या.
http://www.iloveindia.com/indian-heroes/dilip-chitre.html
जिज्ञासा,पराग, मोहना,
दिपु , ग्रेस, अशा मंडळींची कविता फार abstract असल्याने तशी कविता वाचायची सवय नसल्यास दिपुंची ही तीन पुस्तकंच आधी वाचावीत , ती केव्हाही relevant वाटतात.