बोलण्यासारखे खूप आहे तसे

Submitted by बेफ़िकीर on 2 March, 2015 - 10:32

गझल - बोलण्यासारखे खूप आहे तसे

बोलण्यासारखे खूप आहे तसे
पण जिथे पाहतो त्यातिथे आरसे

एकही वाट चोखाळलेली नसे
आणि प्रत्येक वाटेत माझे ठसे

सत्य इतिहास ऐकायला ये कधी
तूर्त बसलेत सार्‍या पिढ्यांचे घसे

अस्मिता फक्त ही बाळगावीस तू
की तुझेही पुढे व्हायचे कोळसे

पिंजरे पाहुनी काय हसतोस तू
वाघ होते कधी आजचे हे ससे

जन्म ही मी तुझा व्हायची प्रक्रिया
ही तुझी साहसे, ही तुझी धाडसे

तू झगडलास ह्या जीवनी एकटा
मात्र गाजून गेले तुझे वारसे

मायबापांमुळे नांव मिळते कुठे
जीव गेल्यावरी जग करे बारसे

जन्मलेली नसूदेत ती आजवर
नीट सांभाळ माझी तुझी पाडसे

याचसाठी तखल्लूस हे घेतले
भेटली सर्वदा 'बेफिकिर' माणसे

-'बेफिकीर'!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

गझल सुंदर आणि सहज आहे.
काही शेर झटकन समजले नाहीत.

>>मायबापांमुळे नांव मिळते कुठे
जीव गेल्यावरी जग करे बारसे >> हा आणि शेवटचा शेर सॉलिड आवडले.

अस्मिता फक्त ही बाळगावीस तू
की तुझेही पुढे व्हायचे कोळसे

व्वा व्वा.

एक-दोन ठिकाणी शब्द पुढे-मागे झाले असते तर शेर सुलभ झाले असते, असे वाटले.
एकूणच गझल आवडली.

अनेक शेर खूप आवडले

जन्म ही मी तुझा व्हायची प्रक्रिया
ही तुझी साहसे, ही तुझी धाडसे<<<सर्वात वेगळा वाटला पण नीट समजला नाही

वा वा..

मायबापांमुळे नांव मिळते कुठे
जीव गेल्यावरी जग करे बारसे.. व्वाह..

जन्मलेली नसूदेत ती आजवर
नीट सांभाळ माझी तुझी पाडसे........ क्या ब्बात है !!

बारसे आणि वारसे खुपच आवडले..... बाकि रचना अप्रतिम आहे यात शंकाच नाही...

एकही वाट चोखाळलेली नसे
आणि प्रत्येक वाटेत माझे ठसे << वा वा ..

जन्मलेली नसूदेत ती आजवर
नीट सांभाळ माझी तुझी पाडसे

याचसाठी तखल्लूस हे घेतले
भेटली सर्वदा 'बेफिकिर' माणसे

शेर आवडले.
मस्त गझल. Happy