अब तक..... पहिलाच ! (Movie Review - Ab Tak Chhappan 2)

Submitted by रसप on 2 March, 2015 - 00:09

एखादा पदार्थ खूप आवडला की आपण हौशीने तो पुन्हा ताटात वाढून घेतो किंवा कुणी तरी आग्रह करुन वाढतं. काही वेळेस ही हौस किंवा आग्रह सहज फिटतो किंवा पचतो, तर काही वेळेस तो पचण्यापेक्षा 'पचवला' जातो आणि काही वेळेस तर तेही झेपतच नाही.
हिंदी चित्रपटात रिमेक व सीक्वेलचे प्रयत्न मला असेच हौसाग्रहास्तव वाटतात. ते कधी झेपतात कधी नाही.
'अब तक छप्पन्न - २' वरीलपैकी दुस-या प्रकारातला. जरा जबरदस्तीनेच गळी उरवलेला आणि पचवलेला वाटला.

सिस्टमने केलेल्या अन्यायाला कंटाळून मुंबई सोडून आपल्या गावात जाऊन राहणाऱ्या निलंबित एन्काऊन्टर स्पेश्यालिस्ट साधू आगाशेला (नाना) पुन्हा एकदा सरकारकडून बोलावणं येतं. मुंबईत बोकाळलेल्या गुन्हेगारी कारवायांना आळा घालण्यासाठी पुन्हा एकदा एन्काऊण्टर स्क्वाड सुरु करायचा असतो आणि त्याचा प्रमुख म्हणून साधूशिवाय योग्य कुणी असूच शकत नाही, असं सरकारचे सल्लागार प्रधान (मोहन आगाशे) मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांना ठासून सांगतात. साधू मुलासह मुंबईत येतो आणि पुन्हा एकदा सुरु होतो एन्काउण्टर्सचा सिलसिला. पण साधूचं नेमकं काम, त्याचा रोल काही तरी वेगळाच असतो. तो पूर्ण झाल्यावर तो एका विचित्र वळणावर पोहोचतो आणि पहिल्या भागाप्रमाणेच दुसऱ्या भागातही एक अनिश्चित भविष्य गाठीला बांधतो.

ab-tak-chhappan-2-to-release-on-27th-february-2015-12.jpg

हा चित्रपट प्रत्येक अर्थाने पहिल्या 'अब तक छप्पन्न'चाच पुढचा भाग आहे. खरं तर पहिल्या चित्रपटाच्या अखेरीस साधू देशाबाहेर निघून गेलेला असतो आणि प्रधानांशी त्याच्या बोलण्यातून त्याचा पुढील प्रवास बराच सकारात्मक होणार असतो. पण त्यानंतर तो अचानक परत भारतात येऊन नैराश्याने ग्रासलेलं आयुष्य का जगत असतो, हा प्रश्न आपल्याला सुरुवातीसच पडतो आणि शेवटपर्यंत सुटत नाही.
चाणाक्ष किंवा माझ्यासारख्या दर आठवड्याला एक पिक्चर टाकणाऱ्या प्रेक्षकाला पहिल्या काही मिनिटांतच चित्रपट कुठे आणि कसा जाणार आहे, हे समजतं. त्यामुळे ज्या ज्या ठिकाणी जोरदार धक्का बसायची अपेक्षा असावी, त्या त्या ठिकाणी 'मला वाटलंच होतं' इतकंच वाटतं.
चित्रपट पहिल्या भागाची वळणा-वळणावर नक्कल करण्याचा प्रयत्न करत राहतो. पण कसं आहे, सचिन तेंडूलकरची नक्कल करून एखादा सचिन'सारखा' होऊ शकतो, पण 'सचिन' होऊ शकत नाही. त्यामुळे एक स्वतंत्र चित्रपट म्हणून तो जितकी अनुभूती देतो, त्यापेक्षा जास्त पहिल्या भागाची आठवण करून देतो.
निश्चितच थिल्लर विनोद, हास्यास्पद हाणामाऱ्या, फुसके थरार, पांचट भावनिक नाट्यं वगैरेंच्या जोडीला घणाघाती किंवा कंटाळवाणी गाणी अश्या टिपिकल स्वस्तातल्या फॉर्म्युलावाल्या बऱ्याच चित्रपटांच्या तुलनेत 'अ.त.छ.-२' खूप उजवा आहे. (किंबहुना ही तुलनाच होऊ शकत नाही.) पण तरी पूर्ण चित्रपट वेगवेगळी ठिगळं जोडल्यासारखा वाटत राहतो. साधू मुंबईत परतल्यावर, कामावर रुजू झाल्यावर फार विशेष असं काही करतो, असंही वाटत नाही आणि त्याच वेळी तो जे काही करतो ते एन्काऊण्टर स्पेश्यालिस्टपेक्षा सुपारी गुंडाचं काम जास्त वाटतं. तसंच उघडपणे, जाहीर, लोकांसमोर 'एन्काऊण्टर स्क्वाड' असा उल्लेख ह्या स्क्वाडचा होत नसतो. मानवाधिकार आयोग व मानवाधिकार संघटना ह्यांच्या अस्तित्वावरच असे उल्लेख प्रश्न उभे करतात. अश्या काही, वरवर किरकोळ वाटू शकणाऱ्या खबरदाऱ्या घ्यायला हव्या होत्या.

'नाना पाटेकरचं काम केवळ अप्रतिम आहे', असं म्हणणं म्हणजे 'पाणी ओलं आहे' किंवा 'आग गरम आहे' किंवा 'बर्फ थंड आहे' ह्यासारखं विधान आहे. नानाने वाईट काम केलेला चित्रपट माझ्या तरी स्मरणात नाहीच आणि ही भूमिका तर नाना ह्याआधीही जगून झाला आहे. चित्रपट साधू आगाशेचा आहे आणि तो नानाचाच राहतो.
इतर भूमिकांत आशुतोष राणा, पहिल्या भागात साधूवर खार खाणाऱ्या 'इम्तियाज'ची जागा घेतो. भेदक नजर, वजनदार संवादफेक आणि आक्रमक देहबोली ह्यांतून आशुतोष राणाने आजवर प्रत्येक भूमिकेत जान ओतली आहे, इथेही ओततोच. गुल पनाग ही गुणी अभिनेत्री तिला मिळालेल्या मर्यादित वेळेचं सोनं करते आणि गोविंद नामदेव सारख्या ताकदीच्या अभिनेत्याला फारसं काही कामच नाहीये ! गृहमंत्री जहागिरदारच्या भूमिकेत विक्रम गोखले आणि मुख्यमंत्री अण्णासाहेबांच्या भूमिकेत दिलीप प्रभावळकर हे एक उत्तम कास्टिंग आहे. प्रभावळकरांच्या भूमिकेची लांबी कमी आहे. पण विक्रम गोखलेंचा जहागिरदार मात्र जबरदस्त !

चित्रपटाच्या नामावलीवरून तरी ह्याचा रामगोपाल वर्माशी संबंध नाही, असं दिसलं म्हणून मी पाहायची हिंमत केली. कारण रा.गो.व.च्या गेल्या काही चित्रपटांमुळे मी त्याच्या नावाचा धसकाच घेतला आहे. पण तरी, हे पीक त्याच जमिनीत घेण्यात आलं असावं असं सतत जाणवत राहतं.
चित्रपटात बऱ्याच गोष्टी बऱ्याच अंशी समाधानकारक आहेत. पण तरीही मला जर 'साधू आगाशे' पाहावासा वाटला तर मी 'अ. त. छ. - १' च पाहीन, 'अ. त. छ. - २' नाहीच, हे मात्र नक्की.
कारण शेवटी ओरिजिनल, तो ओरिजिनलच !

रेटिंग - * * १/२
http://www.ranjeetparadkar.com/2015/03/blog-post.html

दर रविवारी मी 'मी मराठी लाईव्ह' ह्या मुंबई व ठाणे येथे प्रकाशित होणाऱ्या दैनिकात चित्रपट परीक्षण लिहिणार आहे. ह्या लेखाचा संपादित भाग कालच्या अंकात छापून आला आहे -

AT56-2.jpg

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दर रविवारी ह्या वृत्तपत्रात मी 'मी मराठी लाईव्ह' ह्या मुंबई व ठाणे येथे प्रकाशित होणाऱ्या दैनिकात चित्रपट परीक्षण लिहिणार आहे .
>>>>>
अभिनंदन Happy

परीक्षण छान, चित्रपट न पाहताही तो असाच असणार असे वाटणारे. काल एक मित्र म्हणत होता त्याला हा पिक्चर आवडला. काय आवडले विचारले असता म्हणाला नाना नाना नाना ..

अरेवा, रसप..

तुझी रसग्रहण करण्याची लकब रसपूर्ण असते नेहमी..व्वेरी इंटरेस्टिंग स्टाईल ..कसं छान नेमक्या शब्दात लिहितोस..

आता तुला अजून मोठा वाचकवर्ग लाभणार म्हणून हार्दिक अभिनंदन

रणजीत परिक्षण नेहमीप्रमाणेच तगडं झालंय. (ऋग्वेदला पण हेच लिहून आले बदलापूर साठी) Happy
मी अबतक छपन् पाहिला नाहीये, पहिला ही आणि दुसरा पाहिन असं ही वाटत नाही.
पण तुझं परिक्षण जबरदस्त आहे.

रसप, परिक्षण छान लिहिलं आहेत. पहिल्या भागानंतर दुसर्‍याबद्दल (अर्थातच) अपेक्षा वाढल्या होत्या. आता जरा कमी अपेक्षा ठेवून बघेन हा भाग.

तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे
>> निश्चितच थिल्लर विनोद, हास्यास्पद हाणामाऱ्या, फुसके थरार, पांचट भावनिक नाट्यं वगैरेंच्या जोडीला घणाघाती किंवा कंटाळवाणी गाणी अश्या टिपिकल स्वस्तातल्या फॉर्म्युलावाल्या बऱ्याच चित्रपटांच्या तुलनेत 'अ.त.छ.-२' खूप उजवा आहे. (किंबहुना ही तुलनाच होऊ शकत नाही.)>> आणि

>>'नाना पाटेकरचं काम केवळ अप्रतिम आहे', असं म्हणणं म्हणजे 'पाणी ओलं आहे' किंवा 'आग गरम आहे' किंवा 'बर्फ थंड आहे' ह्यासारखं विधान आहे>>

ह्या दोन कारणांमुळे हा चित्रपट मी बघणारच :)!

अरे वा वा रसप! तुमची परिक्षणं आवडतात, ती अजून जास्त लोकांपर्यंत पोहोचणार त्याबद्दल अभिनंदन!!
तसा हा चित्रपट पाहण्याची शक्यता कमीच आहे.

अरे अभिनंदन करायच राहूनच गेलं.

खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा. अशी तगडी परिक्षणं आता फक्त माबो पुरती मर्यादित न राहता अनेक लोकांपर्यंत पोहोचेल Happy