वारसा भाग १५

Submitted by पायस on 26 February, 2015 - 13:19

पूर्वसूत्र येथे वाचू शकता - http://www.maayboli.com/node/52858

दुर्जन एकेकाला निरखत होता. जहागीरदारांच्या वाड्यात जहागीरदारांचा नातू आणि त्यांचाच खास सेवक बंदी होता. तसे म्हटले तर पमाण्णा बंदी म्हणण्यापेक्षा गुंगीत होता हे म्हणणे योग्य ठरावे. त्याला एका खास खोलीत कोंडून सतत कुठल्याशा विशिष्ट वनस्पतीपासून बनवलेल्या धूपाच्या कांड्या जाळून त्याची धुरी दिली जात होती. तो आतून चित्रविचित्र आवाज काढत होता. बाहेर थांबलेले डाकू देखील घाबरे घुबरे झाले होते पण कोणाची आत डोकावायची हिंमत नव्हती. दुर्जन बरोबर संगारी व मंजू देखील होत्या. किमान काही प्रमाणात शंका निरसन करायला हवे ना कैद्यांचे?
संगारी उर्फ घरातल्या स्वयंपाकाला येणार्‍या शांताबाई. त्या बाईला नऊवारी साडीतच कायम पाहिलेले. मायकपाळमध्येच गेली अनेक वर्षे राहत असलेल्या शांताबाई व मंजूविषयी विधवा व बापाविना पोर म्हणून कायमच सहानुभूती मिळाली होती. इतर गावांच्या मानाने सामाजिक कल्पनांच्या बाबतीत पुढारलेले असल्याने त्यांना कधीच फारसा त्रासही झाला नव्हता. पण त्या तांत्रिकांच्या, दरोडेखोरांच्या टोळीत सामिल असतील असे कोणाला कधीच वाटले नव्हते. कायम खेळकर, काहीशी अल्लड स्वभावाची मंजू एक डाकू असेल याच्यावर सांगूनही गावात कोणाचा विश्वास बसला नसता.
दुर्जनच्या चेहर्‍यावर खेळकर हसू तरळत होते. संगारीची नजर कठोर होती तर मंजू हातातल्या चाकूने एका लाकडाच्या तुकड्याचे छिलके काढत बसली होती. जणू, माझे काम झालेले आहे आता मला यात ओढू नका असा तिचा आविर्भाव होता.
कैद्यांमध्ये शाम जाम घाबरला असल्याचे स्पष्ट दिसून येत होते. आपण एका डाकूवर टप्पे टाकत होतो ही कल्पनाच त्याला असह्य होती आणि त्यात कशात काही नसताना फुकटचे आपण मरणार ही भावना त्याला अर्धमेला करीत होती. बळवंत पूर्णपणे चिडलेला होता. मालकांचे मीठ खाऊन त्यांना धोका देणार्‍या या दोन्ही बायकांचा त्याला प्रचंड राग आला होता. प्रताप स्वतःला शक्य तितका शांत ठेवण्याचा प्रयत्न करीत होता. काहीही झाले तरी तो त्या सर्वांमधला सर्वात महत्त्वाचा कैदी होता. एक जहागीरदार म्हणून त्याची काय हालत केली जाऊ शकत होती याची त्याला कल्पना होती. अग्रज बरोबर राहून आता त्याचे डोकेही पुरेसे थंडपणे काम करू लागले होते. पण आतून त्यालाही थोडी भीति वाटत होतीच.
अग्रजची प्रतिक्रिया या सर्वांपेक्षा थोडी वेगळी होती. तो दुर्जन, मंजू व संगारी यांचे आलटून पालटून निरीक्षण करीत होता. त्याला भीति वाटत होती का हे सांगणे थोडेसे कठीण होते. तो अतीच शांत बसल्याचे दुर्जनलाही खटकून गेले. पण चेहर्‍यावरचे हास्य ढळू न देता तो बोलू लागला
"मेरे दोस्तो. आपकी शांताचाची कभी शांताचाची थी ही नही. माझ्या वडलांना मायकपाळ मध्ये एक हेर पाहिजे होता. तेव्हा दरोडेखोरांचे हे दल नव्हतेच होते ते फक्त मायाकापालिक. प्रताप ना तुझे नाव? तर प्रताप मला माहित नाही तुला काय गोष्ट सांगितली गेली पण मायकपाळ हे गाव तुझा पूर्वज आदित्यवर्मन् ने आम्हाला हुसकावून लावून वसवले. आमचे मूळ मंदिर अजूनही तुझ्या सीतेच्या मंदिराखालच्या तळघरात आहे. तुमच्या खजिन्याच्या गुहेपर्यंत त्याचा विस्तार जातो. आमच्या अनेक तांत्रिक क्रियांसाठी लागणार्‍या वस्तु तिथे तशाच आहेत. तर मी कुठे होतो, हां संगारी तेव्हा गर्भारशी होती. मग मंजूला वाढवण्याचा प्रश्न होता आणि हेरही हवा होता. इसलिए उन्हे गाव मे भेजा गया. मंजू भी उनसे सीखकर बडी हुई. संगारी काफी हद तक अच्छी जासूस साबित हुई पर उनपे भी कुछ पाबंदी थी. मगर जबसे तुम लोग खजाने के पीछे पडे तबसे मंजू को खुला आसमान मिल गया. बस बुरखा डालने की देरी थी. आणि पूर्ण गढीत तिचा मुक्तसंचार. व्याघ्ररुपाच्या विधीचे आणि इतरही आमचे काही ग्रंथ या वाड्यात लपवले होते ते तिने परत मिळवले. त्यातून वाचूनच हे सर्व विधी केले जात आहेत. अजून खूप बळी दिले जातील आणि शेवटचा बळी असेल हैबतचा."
अत्यंत डौलात पाऊले वाजवत तो व त्याच्यापाठोपाठ संगारी, मंजू देखील बाहेर निघून गेल्या. त्या तळघरातील खोलीचे दार लाऊन घेण्यात आले आणि बाहेर दोन रक्षक तैनात करून ते निघून गेले.
सर्वात आधी कंठ फुटला तो बळवंतला. "प्रताप, अग्रज, शाम. आपण अजूनही सुटू शकतो आणि ही परिस्थिती पलटू शकतो."
"कसे काय बल्लु?" प्रतापने विचारले.
"काही सैनिक अजून बाहेर आहेत गावाच्या आणि ते छुपा लढा देत आहेत. एवढे तर मला इतर साधारण, बिगर तांत्रिक डाकूंच्या बोलण्यातून कळले. पण आपला खरा आशेचा किरण वेगळा आहे. माजा बा अजूनपावेतो यांच्या हाती न्हाई गावला."
हणमंतराव! आता सुटकेची सर्व मदार त्यांच्यावर होती. अन्यथा .........
महाकालच्या पुनःप्रस्थापित मूर्तीसमोर कपाळ फोडले जात असलेल्या गावकर्‍यापेक्षा त्यांची फार वेगळी अवस्था होणार नव्हती.
~*~*~*~*~*~

खंजर खंड २ - आदित्यवर्मनचे आत्मवृत्त

मायाकापालिक अगदीच नामर्द निघाला. का तांत्रिक म्हणून मी त्याच्याकडून अधिक तगड्या प्रतिकाराची अपेक्षा बाळगून होतो? कदाचित माझ्या बाजूला पमाण्णा असल्याचा मला फायदा मिळाला असेल. काहीही असो गावानकडून एवढा खर्च मंजूर करून घेतला होता तर मग त्या प्रमाणात नुकसान झालेले दाखवायला पाहिजे ना. तसेही निम्मे सैनिक फुकटेच असतात. कोणालाही आपण कोणातरीविरुद्ध आहोत, त्याला आपल्याला हरवायचे आहे असा उत्साहच नाही. आयतेच मारले गेले, बहुत बढिया.
या मंदिराच्या तळघरांसाठी खरेतर मी या जागेवर हल्ला चढवला. आता नाही म्हटले तरी आमच्याकडे चोळांच्या जमान्यापासूनची कितीतरी संपत्ती होती. पुन्हा एवढ्यात पूर्वेकडच्या मोहिमांमध्ये गोवळकोंड्याच्या हिर्‍यांच्या खाणीतली मुबलक संपत्ती वापरून आम्ही विविध मौल्यवान वस्तु गोळा केल्या होत्या. अमूल्य ग्रंथसंग्रह होता. खजिनाच झाला ना? आणि तो वाढतच जाणार होता. निव्वळ श्रीमंतीच्या बाबतीत सुलतानाइतकाच मी श्रीमंत होता. पण जादाची श्रीमंती डोळ्यांवर येते ना? मग या गुहांमध्ये खच्चून भरून ठेवली सगळी संपत्ती. तिचे गुपित मी आणि पमाण्णा सोडून कोणालाच माहित नाही.
दुसर्‍या एका बाबतीत मात्र या तांत्रिकाने अगदीच काही निराशा केली नाही पण धडाचा मार्गही दाखवला नाही. आता ते व्याघ्ररुप पमाण्णा विरोधात जबरी उपाय आहे पण त्याचेही कमकुवत पैलू आहेत. पुन्हा व्याघ्ररुप मिळवायचे म्हणजे कसलीशी तांत्रिक साधना करीत बसायची. ते पुस्तक वाचले मी. बळी लागेल तेवढे देऊ ओ. पण नरमांस भक्षण, त्याच्या आतड्यांची माळच काय घालायची आणि रक्तप्राशन. शी! इतका मूर्ख असू शकतो मनुष्यप्राणी? आता कुठलीही इतर प्राण्यांची जात स्वतःच्या जातीतल्या प्राण्याला मारून खात नाही. सिंह सिंहाला खात नाही, वाघ वाघाला खात नाही अहो इतकेच काय ज्याचे रुपक अनेकदा राक्षसी प्रवृत्तीचे म्हणून दिले जाते तो नागही दुसर्‍या नागाला मारून खात नाही. असे का बरे असेल? अहो पचले पाहिजे ने ते मांस आणि रक्त. अपचन होऊन मरायचो आपण आणि पमाण्णावर आणि नंतर जगावर मग राज्य कोण करणार? येडपट कुठचे!

तरी मी काही तांत्रिक क्रिया करून पाहिल्या. पण यात मी महाकालाऐवजी लुमिखाला दैवत म्हणून कल्पिले. माझ्या लक्षात आले कि याने काहीच परिणाम होत नाहीये नुकत्याच वसवलेल्या गावात घबराट तेवढी पसरतीये. पण एक गंमत माझ्या ध्यानात आली. पमाण्णा या सर्वांकडे अत्यंत भक्तीभावाने ओढला जातो आहे. एक प्राणी असला तरी त्याची ही श्रद्धा म्हणा किंवा आंधळी भक्ती पाहून माझी करमणूक झाली. पण अरे आपण याचा वापर करू शकू काय?
मी गुणवर्धनाचे सर्व कागद पुन्हा वाचून काढले. पमाण्णा फक्त एक प्राणी आहे ज्याच्याकडे काही अतिमानवी शक्ती आहेत याबद्दल माझी खात्रीच पटली. त्याने तिथे केलेल्या साधनेची कृती पण मी वाचली. माझ्या तर्कसंगत बुद्धिला तरी यात कुठेही काही विशेष बदल वगैरे घडल्याची जाणीव झाली नाही. अतिमानवी, अतिंद्रिय शक्ती असतात याबद्दल मला शंका नाही. मी स्वतः मायाकापालिकाबरोबरच्या लढाईत हा अनुभव घेतला होता. पण पमाण्णा तार्किक जग आणि भूत-प्रेतांचे जग यांच्यामधे कुठेतरी अडकल्यासारखा वाटत होता. मग याच्या याच गोष्टीचा फायदा उठवला तर?
मी एक खोटेच कागदपत्र तयार केले आणि त्यात शक्य तितकी तांत्रिक वाटेल अशी विधि लिहिली. कुमारिका, बलिवेदी, बळी, पौर्णिमेची रात्र - अमावस्या विचार केला पण लुमिखाचे सर्व विधि पौर्णिमेला दिसत होते - नग्न करून शिरच्छेद वगैरे. त्यात एक खंजर गोवला. लुमिखाची शक्ती या खंजरात सामावेल असे मी लिहिले आणि त्या करारानुसार खंजर ज्याच्याकडे असेल त्याच्या व त्याच्या वारसांबरोबर पुढची शंभर वर्षे पमाण्णा करारबद्ध होईल आणि कायम आमच्या दिमतीस राहिल दिलेले काम कोणतीही तक्रार न करता पार पाडेल अन्यथा तो खंजरधारक त्या खंजराने त्याला सजा देईल. माझे काम भागले कि झाले नंतरच्या शंभर वर्षांची काळजी माझ्या मुला-नातवंडांनी पाहावित. तरी पमाण्णाने अश्वकाला बोलावले. पण अहो आश्चर्य त्याने देखील असे काही तरी त्यांच्यात असल्याची ग्वाही दिली. त्याने काही मुद्दे गडबड असल्याची शंका घेतली पण लुमिखाची आण वगैरे तद्दन भावनिक मुद्दे इथे कामी आले. खरेच, एखाद्या प्राण्याला जरा बुद्धिमत्ता आली कि त्याला ही भावनिक बंधने येतातच. उगाच नाही इतर प्राण्यांनी आपले ऐकले नाही तर आपण त्यांना शिव्या देतो; गाढव, माठ, मूर्ख म्हणतो पण बुद्धू (buddhu) फक्त माणसांनाच म्हणतात. हेहेहेहे काय पण विरोधाभास आहे. असो. आता वारंवार आवाहन करायची गरज नाही. आता मायकपाळ एक वेगळेच जग आणि तिथला एकमेव राजा मी!
०००००

शके १४१९, आषाढ पौर्णिमा

तो विधि अखेर पूर्ण झाला. कित्येक कुमारिकांचे बळी मी दिले. अश्वक व पमाण्णा दोघेही माझ्याकडे भयचकित होऊन बघत होते. पमाण्णा आता माझा कायमचा दास झाला. त्या खंजराने मी विधिपूर्ती - मीच लिहिले होते, खात्री करून घ्यायला - त्याला हलकेच जखम करून पाहिली. तलवारीने यापूर्वी मी पमाण्णाचे शरीर क्षतिग्रस्त होताना पाहिले होते पण कधीच त्याच्या मूळरुपाला जखमी होताना पाहिले नव्हते. त्याचे ते हिरवट-जांभळे रक्त बघून मला माझेच नवल वाटले; मी चुकून अगदी बरोबर क्रिया तर नाही केली? असेल लुमिखाची इच्छा. अश्वकाच्या म्हणण्यानुसार त्या खंजराचे धातू व गुणवर्धनाने शतकांपूर्वी तियानाकचा वध करताना वापरलेल्या तलवारीतले धातू तंतोतंत जुळत असले पाहिजे. हाहाहाहा मग तर मायकपाळमधल्या लोहाराचा सत्कारच केला पाहिजे. त्याला फक्त त्याचा आकार जरा जादुई खंजर वाटावा असा करायला लावला होता.
मी याची कारणमीमांसा करण्याची अनेकदा कोशीश केली. मानवी मन काय किंवा कुठल्याही बुद्धिमान प्राण्याचे मन ही अनाकलनीय गोष्ट आहे. अनेकदा केवळ मनाने घेतले म्हणून माणसे आजारी पडतात. त्यांना खरोखरचा ज्वर येतो. हाय खाल्लेली तर किती जण पाहिली आहेत. कालपरवापर्यंत ठणठणीत असलेले केवळ एखादी वाईट वार्ता ऐकून अंथरूण धरतात. मग तशीच भीति या प्राण्यांच्या मनात बसली असेल का? कदाचित त्यांची अन्यथा अभेद्य अशी त्वचा ते या सामान्य खंजरापुढे स्वतःच निष्प्रभ करतात. जर असे असेल तर हे हत्यार व्याघ्ररुपापेक्षा धोकादायक आहे! होय, भीति हेच सर्वोत्तम हत्यार आहे.
~~~~
एक मिनिट म्हणजे - शके १४१९ = सन १४९७. म्हणजे दर शंभर वर्षांनी अर्थातच १८९७ ला करार नव्याने करावा लागणार. हेहेहेहेहेहे. मुहाहाहाहाहाहा. आता कळले हे सर्व एवढे का मागे लागलेत आता खजिना मिळालाच पाहिजे म्हणून!
~*~*~*~
खंजर खंड २ - आदित्यवर्मन् चे आत्मवृत्त समाप्त
~*~*~*~*~*~

त्या रात्री खोलीवर पहारा देत असलेल्या दोन्ही दरोडेखोरांना खरेतर कंटाळा आला होता. आज म्हणे सरदाराच्या पूजेतला महत्त्वाचा टप्पा आला होता. त्याने मुद्दाम म्हणून कोणीतरी स्त्री-पुरुष जोडी निवडली होती. त्या जोडप्याचे हाल आता कुत्रा खाणार नव्हता. बेकार मरणार ते! पण गेले काही दिवस या अशा हत्याकांडांनंतर येथेच्छ दारु आणि उच्च दर्जाचे मटण खायला मिळत होते. आता जे पहार्‍याला थांबले त्यांच्यासाठी अर्थातच उरलासुरला हिस्सा मिळणार ना? यामुळे पण ते वैतागले होते. बाहेर जबरदस्त धिंगाणा चालू होता. टेकडावरच्या मुख्य मंदिराचा परिसर तर भारल्या गेल्यासारखा झाला होता. कसले कसले ते मंत्र आणि विचित्र व्यंजनमालांचे कर्णकटु उच्चार, श्वास कोंडायला लावणारे ते जडीबुटींचे धुपारे आणि काम झाल्यावर पायाने तुडवला गेलेला, संपूर्ण टेकाड व्यापलेला रक्तामांसाचा चिखल! या सर्वांतून देखील त्या तळघरात, त्या खोलीपर्यंत तो कसातरी पोचला.
"राव कंटाळलो या पहार्‍याला. वाईचं तमाकू भेटेल का?"
त्या दोघा पहारेकर्‍यांनी एकमेकांकडे पाहून स्मितहास्य केले. दोघांनी आपापले भाले भिंतीला टेकवले. गप्पा छाटायची वेळ झाली, असे करत एकाने कमरेची चंची काढून तंबाखू मळायला सुरुवात केली. तेवढ्यात त्याचे दोन्ही हात मनगटातून छाटले गेले. दुसर्‍याला प्रतिक्रिया द्यायची संधीही न देता त्याचा गळ्यावरून नंगी समशेर फिरली. पंजे तुटलेला पहारेकरी कण्हू लागला. लागलीच ती समशेर तशीच त्याच्या उघड्या तोंडात खुपसली गेली. आता सर्वकाही शांत होते. त्याने तरी कानोसा घेतला. कोणी नाही. हुश्श. दार उघडून तो आत शिरला आणि त्या चौघांचे बंध त्याने खोलले.
"तू कोण?"
"धनि मजला रावांनी पाठवले. मायकपाळ डाकूंच्या ताब्यात असले तरी अजूनही रावांची माणसे येथे रात्रीचा गुप्त संचार करतात. आम्हाला तुमची खबर गावताच रावांनी तुमास्नी सोडवायची व्यवस्था केली. चला आता"
हणमंतरावांचे नाव ऐकताच सर्वांनाच हुरुप आला. बळवंताने आता पमाण्णाला सोडवायचा पुढाकार घेतला. तोवर अग्रजने त्या शिपायाला आपल्या बरोबर पागेत चलण्याची विनंती केली. त्याला काहीतरी जरुरी वस्तु घ्यायची होती. जेव्हा त्याने हट्टच धरला तेव्हा नाईलाजाने पमाण्णा येईपर्यंत त्याला परवानगी दिली गेली.
तो सरळ पागेत गेला. त्या घोड्यांच्या उतरून ठेवलेल्या खोगिरांमध्ये काहीतरी शोधू लागला. त्याला हवे ते मिळाले. मग तो ते सदर्‍याच्या आत लपवून बाहेर पडला. हे सर्व एक सावली पाहत असल्याची त्याला कल्पना नव्हती. ती सावली त्याचा पाठलाग करू लागली.
पमाण्णा तोवर सुटून आला होता. त्याने सर्वांना आपल्या पाठीवर बसवून आकाशात झेप घेतली आणि ते मायकपाळ मधून बाहेर पडले. तो शिपाई पमाण्णाची ही शक्ती पाहून नाही म्हणायला दचकलाच पण आत्ता जीव महत्त्वाचा असल्याने तो गप्प बसला.
ती सावली - लाखन हे सर्व शांतपणे बघत होता. अखेरीस, तो मनाशीच म्हणाला, आता नुसती कत्तल थांबून काहीतरी टकरीचा मुकाबला करायला मिळणार. त्याने ओठांवरून जीभ फिरविली. तो हे कोणाला सांगणार नव्हता. त्याच्यातल्या युद्धपिपासुला आता समाधान लाभणार होते.
~*~*~*~*~*~

हणमंतरावांनी त्या चौघांचे स्वागत केले. त्यांना बसवून ते बोलू लागले.
" संगारीला बघितल्यावरच आम्हाला मंजू फितुर असल्याची कल्पना आली होती. पण तुमच्यापर्यंत खबर पोचवणे अशक्य होते. त्या डाकूंनी पाण्याविना संपूर्ण गावाला हैराण केले होते. अशात गाववाल्यांना हैबतराव विहिरीचे पाणी द्यायला तयार झाले नाहीत. एका विहिरीत संपूर्ण गावाची + शेकडो सैनिकांची तहान भागणे कठीण होतेच त्यात मालकांचा नसता दुराग्रह, इतरांना तुच्छ लेखण्याची प्रवृत्ती. त्यांची सारी भिस्त पमाण्णा तुमच्यावर. पण मला पक्के ठाऊक होते कि मंजूमुळे तुम्ही गोत्यात याल आणि तसेच झाले. त्यात दोन दिवसांनंतर हैबतराव ताब्यात द्या वेढा उठवतो असा प्रस्ताव त्या दुर्जनने पाठवला. गावकरी भुलले आणि बंडाळी माजली. मला याची कल्पना आधीच आल्यामुळे मी जीवाभावाचे ५० जण घेऊन आधीच बाहेर आलो होतो. आतापर्यंत. एक-दोन, एक-दोन करीत १० तरी डाकू मारले पण कोणीही रुप पालटणारा तांत्रिक मारला गेला नाहीये. आणि त्यात हे अनुष्ठाने करून त्यांची संख्या वाढवायचे ठरविले आहे. आता तुम्ही (प्रतापकडे बोट दाखवून) आणि पमाण्णा मिळून आमचे नेतृत्व करा."
प्रतापला काहीच सुचेना. एवढ्यात अग्रज उठला.
"तुमची माझ्या किंवा शामकडून काय अपेक्षा आहे?"
"तुम्हाला आम्ही लढाऊ म्हणून गृहीत धरलेच नाही आहे. तुम्हाला जर येथे थांबून कुठल्याही प्रकारची मदत करण्याची इच्छा असेल तर तुम्ही करू शकता. मी तुमच्यावर कोणत्याही प्रकारची बळजबरी करणार नाही. हे डाकू मायकपाळच्या बाहेर पडणार नाही. तुम्ही थोडके घोडे चालवता हे मला ठाऊक आहे. तुम्हाला एखादा घोडा आम्ही देऊ शकतो आणि मग तुम्ही सुखरुप पुण्यास पोहोचू शकाल. यांचा उद्देश फक्त मायकपाळवर ताबा मिळवणे आहे असे दिसते त्यामुळे तुम्ही त्याच्या बाहेर सुरक्षित असाल"
"असे असेल तर मग पमाण्णा तुमची मदत करू शकणार नाहीत."
सगळेच चक्रावले, पमाण्णासकट. अग्रजच्या सुरावरून मात्र तो अगदी ठाम असल्याचे जाणवत होते.
पमाण्णा समजावणीच्या सुरात बोलू लागला. "अग्रज. तुला जर इथून पळ काढायचा असेल तर मी काहीच आक्षेप घेणार नाही. पण मी इतरांची मदत का करू शकणार नाही?"
"कारण तुम्ही माझ्याबरोबर इथून पळ काढणार आहात."
पमाण्णाला हसू फुटले. "अरे अग्रज मला फक्त गुणवर्धनाचे वारस आज्ञा देऊ शकतात. अन्यथा खंजर वापरून धमकावले तरच काही होऊ शकते. पण खंजर निश्चित मंजूच्या ताब्यात असणार. तिला त्याचे महत्त्व माहिती नसले तरी एक हत्यार म्हणून ते जप्त झाले असणार. आणि वारस तर तू नाहीच."
" तुम्हाला सांगताना मला दु:ख होत आहे कि तुमचे दोन्ही तर्क चुकले आहेत."
हा धक्का पचला नाही. सर्वजण भूत पाहिल्यासारखे दचकले. प्रताप काहीसा दु:खी वाटला पण बळवंत, शाम, हणमंतराव व पमाण्णा पूर्णपणे हादरले.
"होय. मी अग्रज, वीराजी राजांचा अनौरस थोरला मुलगा! मलाही माझ्या उगमाविषयी फारसे माहित नव्हते, खात्रीही नव्हती पण इथे आल्यावर सगळे दुवे जुळले. तुम्ही रक्ताची चाचणी करू शकताच. पण त्याची जरुरी नाही..............
...................कारण खंजर माझ्याकडे आहे."

क्रमशः

पुढील कथासूत्र येथे - http://www.maayboli.com/node/52944

Group content visibility: 
Public - accessible to all site users

I am new member to Maayboli. I can't type in Marathi, so sorry for writing in English. The story is very good, with the twists and turns. I was following it from day one and was waiting for next part every day. This can be converted in best seller book...waiting eagerly for next part.. Bravo !

"होय. मी अग्रज, वीराजी राजांचा अनौरस थोरला मुलगा! >>> येस्स, मी म्हटलं होतं ना अग्रज सिर्फ नाम ही काफी है! Happy

मस्त चाललीये....

सर्वांना खूप खूप मोदक/लाडू/पेढे/____ (तुम्हाला काय आवडतं ते टाका गाळलेल्या जागेत)
संपत आली असेल न कथा अता? >> होय. एक शेवटचे रहस्योद्घाटन असेलच. आणि फायनल फाईट्स बाकी आहेत. त्यांच्यावर काम चालू.

khup mast aahe pudhil bhagachyaa pratikshet pls bhag lavakr taka

छान ट्विस्ट..अग्रज चा काहीतरी महत्वाचा रोल असणार याची कल्पना आलेली पण असं असेल वाटलं नव्हतं..

पुढचा भाग लवकर येऊ द्यात

हा भाग थोडा लेट झालाय.. लिंक तुटली ना राव.. सगळे भाग आले की सगळी कथा परत सलग वाचायला पाहिजे..

आणि खंजीर अग्रज कडे... हे एकदमच नवीन.. पण म्हणजे मालकच गणिती पण..

आता खंजीर मिळवण्यासाठी अग्रज आणि प्रताप मध्ये भांडणं लावून देऊ नका म्हणजे झालं..

पुढचा भाग कधी????????>+++++११११११११११११११११११११११११११११११११११११

अरे लोक्स जरा थंड घ्या. माझी काही अभ्यासाची कामे (कादंबरी संदर्भात नव्हे. खराखुरा) चालू होती/आहेत. प्लीज थोडी कळ अजून सोसा.