तुला भेटण्याची पुन्हा वेळ आली

Submitted by जयदीप. on 25 February, 2015 - 10:39

तुला भेटण्याची पुन्हा वेळ आली
अपेक्षेप्रमाणे उपेक्षा मिळाली

तुझे पाय रोवून आहेस तेथे
असावा चिखल, जात आहेस खाली

तुला दूर नेणार अपमान नव्हता
अनुल्लेख केला तुझा, सोय झाली!

तुझे पत्र पाहून आनंद झाला
रिकामेच होते, कळाली खुशाली!

बरे की उघडलेस तू तोंड लवकर
तिला वाटलेलास तोवर मवाली

तुझा पंख तुटका.. निकामी नसावा
तुझे पीस पकडून मुंगी उडाली

जयदीप

Group content visibility: 
Public - accessible to all site users