पुन्हा एक मुद्दा निकाली निघाला

Submitted by सुशांत खुरसाले on 22 February, 2015 - 22:09

पुन्हा एक मुद्दा निकाली निघाला
पुन्हा एक रस्ता घराशीच आला

तुला मिळवुनी काय मीही मिळवले
तुला मी मिळालो,मला 'मी' मिळाला

तिची वेदना फार वैश्वीक होती
अता पाहतो मी तिच्यातुन जगाला

जुनी उत्तरे लागता चार हाती
नवे प्रश्न काही उभे स्वागताला

क्षणांची तृषाही क्षणिक होत आहे
कळेना अता ओठ लावू कशाला..

--सुशांत..

Group content visibility: 
Public - accessible to all site users

क्षणांची तृषाही क्षणिक होत आहे
कळेना अता ओठ लावू कशाला..<<< व्वा

तुला मिळवुनी काय मीही मिळवले
तुला मी मिळालो,मला 'मी' मिळाला<<< सुरेख

जुनी उत्तरे लागता चार हाती
नवे प्रश्न काही उभे स्वागताला <<< सुरेख

गझल फार आवडली Happy

पुन्हा एक मुद्दा निकाली निघाला
पुन्हा एक रस्ता घराशीच आला

काय म्हणायचे ते कळाले नाही. पहिल्या ओळीचा दुस-या ओळीशी नेमका संबंध लागला नाही.

>>>पुन्हा एक मुद्दा निकाली निघाला
पुन्हा एक रस्ता घराशीच आला <<<

समीर,

मला जाणवलेले अर्थः

१. काहीतरी नवे करता येईल असा, एखाद्या वेगळ्या ध्येयाकडे नेईल असा एक रस्ता वाटत होता. पण असे वाटणार्‍या प्रत्येक रस्त्यावर चालायचे म्हणजे घर सोडावे लागण्याचे भय होते. ते तर नको होते. पण तरीही धाडस करून ह्या विशिष्ट रस्त्यावर मी निघालो. पण शेवटी तोही रस्ता घराकडेच आला, म्हणजे, त्याही रस्त्यावर 'घर कायमचे सोडून' पुढे जाण्याचे धाडस शेवटी नाहीच झाले.

२. ह्या दिशेने गेलो तर काहीतरी करू शकू अशी आशा होती. पण त्या दिशेने जाऊनही निराशाच पदरी पडली, त्यामुळे शेवटी घरीच परतलो.

मला तो शेरही फार आवडला. Happy

पुन्हा एक मुद्दा निकाली निघाला
पुन्हा एक रस्ता घराशीच आला

आता शेर समजला. व्वा व्वा.
धन्यवाद भूषण.

मस्त गझल.

क्षणांची तृषाही क्षणिक होत आहे
कळेना अता ओठ लावू कशाला..>>>>>>
मला हा शेर नीटसा समझला नाही.मला जाणवले ते असे ........क्षणांची तृषाही क्षणिक होत आहे म्ह्णजे तृषा नाममात्र होत आहे. मग कळेना अता ओठ लावू कशाला अशी इच्छा तरी का व्हावी !

मनःपूर्वक आभार सर्वांचे.. Happy

बेफिजी धन्यवाद. आपण लिहिलेल्यापैकी पहिल्या अर्थाच्या जवळ जाणारा विचार करून मी लिहिलं होतं. Happy