स्वित्झर्लंड भाग ४ - बोसविल आणि परिसर

Submitted by kulu on 22 February, 2015 - 05:06

स्वित्झर्लंड भाग १ - होहेर कोस्टन http://www.maayboli.com/node/52047
स्वित्झर्लंड भाग २ - इन्टर-लाकेन http://www.maayboli.com/node/52801
स्वित्झर्लंड भाग ३ - एगेल्सी http://www.maayboli.com/node/52810

स्वित्झर्लंड मध्ये असताना आम्ही काही ठरवुनच काही बघायला जायचो असे नाही, पण जिथे सहज फिरायला म्हणुन जायचो ती सुद्धा ट्रीपच असायची! मार्था चा मुलगा डॅनी हा पॅराप्लेजिक. त्यामुळे फार काही करता यायचं नाही त्याला, पण तरी खुप काही अ‍ॅक्टीव्ह्टीज मार्था त्याच्यासाठीच करायची, त्यातलंच एक म्हणजे अश्वारोहन! एखाद्या रविवारी जेव्हा सुर्य हा खरंच "तेजोनिधी" हे नाव सार्थ करणारा असेल त्या दिवशी मार्था जवळच्याच बोसविल नावाच्या एका गावात एका शेतकर्‍याच्या तबेल्यातली एक घोडी (खरंतर या शब्दात हसण्यासारखं काही नाही पण मला हसु येतं Proud ) बूक करायची. मी भाडेकरु आणि ती मालकीण ही औपचारीकता पहिल्याच दिवशी मी तिला "मार्था द गँगस्टर" आणि तिने मला "कुलदीप द सन्नी बॉय" असं म्हणुन संपवलं होतं! त्यामुळं त्यांच्याबरोबर ते जिथे फिरायला जातील तिथे मी जाणार हे गृहीतच धरलं जायचं. अशाच एका सुंदर दिवशी आम्ही तिघे बोसविलला गेलो!

घरातुन बाहेर पडतानाच आज मस्त ट्रीप होणार याची साक्ष पटली,

घरापासुन अगदी पाऊण तासाच्या अंतरावर होतं बोसविल, पण सुंदर दिवस म्हणुन मार्था रमत गमत गाडी चालवत होती, आणि क्षितिजावर कुठ्कुठले पर्वत दिसताहेत ते मला सांगतही होती, सगळी नावे तिला तोंडपाठ! गप्पा मारत मारत फार्म वर कधी पोहोचलं ते कळलंच नाही. गेल्या गेल्या तिथे हे रंगबिरंगी मांजर दिसलं. त्याला कुरवाळायला गेलो, मला वाटलं पळुन जाईल, पण निवांत कुरवाळुन घेत होतं, मी हात थंबवला की तिरक्या नजरेनं बघायच माझ्याकडे!

तिथल्या या अल्पाईन मेंढीला नुकतंच कोकरु ( मेंढीच्या पिलाला काय म्हणतात Uhoh ) झालं होतं!

ही आमची घोडी लिसा! तिच्या कडेला तो स्टॅण्ड ठेवलाय त्यावर चढुन मार्था डॅनीला जवळजवळ उचलुन लिसाच्या पाठीवर ठेवते. आया पोरांसाठी काय काय करतील काय माहीत. सावित्रीबाईनी यमाकडुन विनवणी करुन सत्यवान सोडवुन घेतला, हीच जर आई आणि मुलाची गोष्ट असती तर कदाचित आईने यमाच्या बखोटीला धरुन त्याला गप्प रेड्यावर बसवुन आला तसा पाठवला पण असता परत; वर "मेल्या, परत आलास तर याद राख!" अशी धमकी पण दिली असती, काय सांगावे! Happy

मार्था आणि डॅनी

डॅनी, त्याची लाडकी लिसा आणि त्याची तिथली हेल्पर हे आता सफरीला गेले.

मग मार्थाने आजुबाजुचा परिसर मला दाखवायची जबाबदारी घेतली, मग काही अंतर चालत, काही अंतर गाडीने असं करत आम्ही हिंडु लागलो!
त्यादिवशी ढगांनी मजामजा चालवली होती!

गायींच कुरण

जरा गाडीतुन फिरल्यावर मार्थाने गाडी अशी एका रानाच्या कडेला पार्क केली. मी तिच्या कारला सेक्सी कार म्हणायचो. Happy परवा ही कार विकुन नविन घेतली तर मला मेल करुन सांगितलं तिने की "तुझी सेक्सी कार अब किसि और की अमानत आहे" Proud

या रस्त्यावर आम्ही जरा चालायला सुरुवात केली

तिथुन खाली बाजुला कलत्या अंशात स्विस मेडोज पसरल्या होत्या

हेच ते मि. तेजोनिधी

एकाच देशात केव्हढे ते सुखी माणसांचे सदरे!

आणि मग आम्ही स्विस राना-कुरणांची वाट धरली.

त्यादिवशी इतक भारी स्वित्झर्लंड दिसलं मला ते मी कधीही विसरु शकणार नाही. जगापासुन अलिप्त असलेलं, आपल्या आपल्यांत रममाण होणारं आणि तरीही परक्याचं वावडं नसणारं शेतकर्‍यांचं स्वित्झर्लंड! येणार्‍या जाणार्‍याला प्रत्येकाला "ग्रुएट्जी" म्हणायचं, "तुम्हाला भेटुन आनंद झाला" एव्हढा त्या शब्दाचा अर्थ! कोण कुठला मी, मला बघुन आनंद झाला. औपचारीकता का असेना या शब्दानी सगळं संभाषण मधाळ व्हायचं स्विस जर्मन म्हणजे हाय जर्मन ची धाकटी बहीण. पण हाय जर्मन अगदी मिलिटरीतल्या ताफ्याप्रमाणे ठोक्यात चालते, स्विस जर्मन बागडते!
वातावरण इतकं मस्त होतं, की आजुबाजुचं सगळंच सुंदर वाटत होतं, किंबहुना ते सुंदर होतंच!

इंदिरा बाईंच्या "बाभळी" मधील काही ओळी आठवल्या

"अंगावरती खेळवी राघू ,लाघट शेल्या पायाजवळी
बाल गुराखी होउनिया मन ,रमते तेथे सांज- सकाळी
येते परतून नवेच होउन, लवुन हिरवे नाजुक लेणे
अंगावरती माखुन अवघ्या, धुंद सुवासिक पिवळे उटने"

पुरंदरे काकांनी कवितेत म्हटलंय
"ही रानफुले इवलीशी गिरक्या घेत
वार्‍यावरी गाणे गाती मस्त मजेत"

पक्ष्याचे सुंदर घरटे

भुक पण लागली होती, म्हणुन मग येताना एका रेस्टॉरंटमध्ये गेलो! तिथे एव्हढ्या वेगवेगळ्या प्रकारचे केक्स होते की एकच पोट असणे हा तोटा आहे असं वाटु लागलं.

मी फक्त दोनच घेतले त्यातले!

मला प्लॅस्टीकच्या प्लेट मध्ये खाल्लेलं आवडत नाही म्हणुन मार्थाने ही चिनी मातीचे प्लेट कधी कुठुन आणली मला कळ्लं पण नाही Happy

कधी कधी खुप काही सुंदर बघितलं की एक वेगळीच हवीहवीशी उदासी वाटते. तसंच काहीसं वाटत होतं. तेजोनिधीसाहेब गेले आणि जाता जाता रंगांची अशी उधळण करुन गेले!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

जगातल्या सर्व भाषांमधले अमेझिंग या शब्दा च्या अर्थाशी मिळतेजुळते सर्व शब्द या दृष्यांवरून ओवाळून टाकलेत मी Happy

मार्थाच्या चेहर्‍यावरचे प्रेमळ भाव , डोळे खिळवून ठेवतात. मार्था ची ओळख करून दिल्याबद्दल धन्स कुलू!!!

फारच गोड रे कुलु. सर्वच. फोटो, लिखाण, इंदिरा संत आणि शशांकजीच्या कवितेच्या ओळी.

मार्था, Danny आणि तू सर्वच शब्दात मांडण्यापलीकडचे.

ढग, आकाश, फुलं, घरटं, मनिमाऊ सगळंच मस्त. सूर्यास्ताचे रंग तर केवळ अप्रतिम. आणि केक! पण इतक्या खजिन्यातून दोनच ट्राय केले? आणखी ४-५ बांधून घेउन जायचे ना घरी.

मार्था सारखी माणसं भेटणं खरच नशिबाची गोष्ट आहे.

<< आईने यमाच्या बखोटीला धरुन त्याला गप्प रेड्यावर बसवुन आला तसा पाठवला पण असता परत; वर "मेल्या, परत आलास तर याद राख!" अशी धमकी पण दिली असती, >>
एकदम पटले........
डोळ्यापुढे दिसले .... Happy

इन्दिरा बाईना पुन्हा भेटवल्याबद्द्ल आभार !!!

वा, कुलु - खूपच सुंदर फोटो आणि निवेदनही मस्तच ....
त्यात साथीला इंदिरा संतांचे नितांतसुंदर शब्द - क्या बात है ..

मार्थाबद्दलचा आदर प्रत्येक भागागणिक वाढतोच आहे .... ___/\___

हाही भाग मस्तच Happy

कधी कधी खुप काही सुंदर बघितलं की एक वेगळीच हवीहवीशी उदासी वाटते. तसंच काहीसं वाटत होतं.>>>>> Happy

का कुणास ठावूक, हा भाग पाहिल्यावर माझी फिनलंडची भटकंती, माझी कलिग/ फिनलंडच्या वास्तव्यात माझी काळजी घेणारी मैत्रीण "नतासा" आणि तीचा लाडका घोडा आणि फार्म हाऊस आठवला.

जिप्सी धन्यवाद Happy फिनलंड ला जायचंय एकदा Happy जिथे जाईल तिथे प्रेमळ माणसं ही खरंच भाग्याचीच गोष्ट! फिनलंड चे फोटोज टाकलेत का तुम्ही?

जिथे जाईल तिथे प्रेमळ माणसं ही खरंच भाग्याचीच गोष्ट! >>>>अगदी अगदी Happy

फिनलंड चे फोटोज टाकलेत का तुम्ही?>>>>हो टाकलेले पण बहुतेक आता ते पिकासावरून डिलीट झाल्याने त्या धाग्यावर नुसतेच बॉक्स बॉक्स दिसत आहेत. Happy

मानुषी धन्यवाद Happy
हो टाकलेले पण बहुतेक आता ते पिकासावरून डिलीट झाल्याने त्या धाग्यावर नुसतेच बॉक्स बॉक्स दिसत आहेत.>>>> जिप्सी मग ते फोटो आता आम्ही कसे पहायचे Sad