गझल : वाट जगण्याची...

Submitted by अनिल आठलेकर on 20 February, 2015 - 05:39

वाट जगण्याची अशी मी वेगळी चोखाळली,
घेतली मागून दु:खे अन सुखे फेटाळली...

शक्य नव्हते तूर्त पदरी श्वापदांना पाळणे,
तेवढ्यासाठीच काही माणसे सांभाळली...!

वाटली नाही जराही नागवी गरिबी कधी,
लोकलज्जेस्तव सुखाची लक्तरे गुंडाळली...

ठेवली साखर जिभेवर सारखी मी एवढी,
शेवटी हडळी, भुतेही भोवती घोटाळली.....

प्रश्न प्रश्नांचे कधीही समजले नाही मला,
फक्त मी सवयीप्रमाणे उत्तरे कुरवाळली...

गर्व शक्तीचा उगाचच वाटला नाही कधी,
मी जरा गाफील झालो, सावली बोकाळली..

जन्मभर आरोप केले एकमेकांवर किती..
आपली पाहून यारी..दुश्मनी ओशाळली...!

~ अनिल आठलेकर 'नारायण '.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी जरा गाफील झालो, सावली बोकाळली..<<< सुरेख ओळ!

जन्मभर आरोप केले एकमेकांवर किती..
आपली पाहून यारी..दुश्मनी ओशाळली...! <<< वा वा

पहिले तीन शेरही छान! शेरांमध्ये सपाटपणा येणार नाही असे बघायला हवे, असे वाटते.