तरूण मनास भावलेला कवी -संदीप खरे...

Submitted by cool_vaidehi on 14 January, 2009 - 06:11


सवयीनुसार बाहेरून आल्यावर काही करायच्या आधी रेडीयो सुरू केला आणि सलीलचे मनास भिडणारे सूर कानी पडले...क्षणात कॉलेजचा थकवा दूर झाला आणि पुढची कामं करण्यासाठी मनात उत्साह संचारला..ही किमया होती सलील कुलकर्णी ह्या युवा संगीतकाराच्या साध्याच परंतू सुंदर संगीताची , भावपूर्ण आवाजाची आणि संदीप खरे ह्या युवा कवीच्या हृदयाला भिडणाऱ्या शब्दांची...
ते शब्द होते...
''व्यर्थ हे सारेच टाहो...
एक हे ध्यानात राहो..
मूठ पोलादी जयांची ,
ही धरा दासी तयांची..''
ज्या व्यक्तीचे लक्ष गाण्याच्या चालीसोबतच शब्दांकडेही असते त्या व्यक्तीला हे गाणं आवडणार नाही असं होणं अशक्य आहे.आजच्या प्रत्येक मराठी संगीतप्रेमी युवाच्या संग्रही संदीप -सलील ह्या युवा कलाकारांचा अल्बम असतोच..त्याचं कारण आहे की युवा मनाची संवेदनशीलता , तरलता आणि त्यांच्या मनातील नाजूक भाव संदीपच्या लेखणीने अचूक हेरले आहेत.
त्याच्या कवीतेला कुठलाच विषय वर्ज्य नाही...साधी सरळ सोपी भाषा आणि भाव ह्यांचा अचूक मेळ साधत संदीप त्याच्या आणि प्रत्येक युवाच्या मनात असलेल्या भावना उलगडत जातो...तरूण हळव्या चंचल मनाबद्दल सांगताना तो म्हणतो
''मन तळयात मळयात , जाईच्या कळयात ..
मन नाजूकशी मोतीमाळ, तुझ्या नाजुकश्या गळयात...''
तर कधी वेडया प्रेमवीराची सोबत करणाऱ्या आणि त्याचे मन हलके करणाऱ्या मदीरेबद्दल तितक्याच बिनधास्त आणि आजच्या युवापीढीच्या ''रिमिक्स'' भाषेत बोलत म्हणतो..
''खुदा ने कहा है ...
बंदे तेरे खाने का जिम्मा मेरे सर पर है..
लेकीन पीने के बारे मे उसने कुछ नही कहा...
सो...पीने की जिम्मेदारी मैने ही ले ली..''
एकीकडे असं बिनधास्त शैलीत ''रात्रीच्या उदरात उदासीन तळमळणारे अल्कोहोल'' म्हणत असताना तिकडे मात्र तितक्याच हळूवारपणे तो सख्याला त्याच्या जुन्या आठवणींना उजाळा देत विचारतो...
''सांग सख्या रे आहे का ती अजून तैशीच गर्द राईपरी..
सांग अजूनही तशीच का ती अस्मानीच्या निळाईपरी..''
आपल्या ''सये'' ला दूर गावात सोडून जाताना तो सखी ला ''माझी आठवण तुला येईल ना'' हे विचारताना तितक्याच हळूवारपणे विचारतो...
''कसे सरतील सये माझ्याविना दिस तुझे...
सरताना आणि सांग सलतील ना...
गुलाबाची फुलं दोन , रोज राती डोळयावर
मुसुमुसु पाणी सांग भरतील ना भरतील ना...''
तर कधी सामान्य तरूणाच्या रोजच्या कंटाळवाण्या चाकोरीबध्द आयुष्याचं अचूक वर्णन करताना म्हणतो ..
''आताशा मी फक्त रकाने दिवसांचे भरतो...
चाकोरीचे खरडून कागद सहीस पाठवतो..''
आणि पुढे ह्याच रोजच्या रहाटगाडग्यातून बाहेर पडता न येणाऱ्या तरूणाची व्यथा सांगत म्हणतो..ह्या तरूणाला रोजच्या चाकोरीबध्द आयुष्यात अडकल्याने बाहेर पडता येत नाही.त्यामुळे त्याला एकूणच सगळयाचाच कंटाळा आलेला आहे.त्याचे मनसुध्दा बधीर झाले आहे.म्हणून तो म्हणतो की...
''व्याप नको मज कुठलाही अन् ताप नको आहे..
उत्तर कुठले मुळात मजला प्रश्न नको आहे..
ह्या प्रश्नांशी अवघ्या परवा करार मी केला..
मी न छळावे त्यांना ,त्यांनी छळू नये मजला..
बधीरतेच्या पुंगीवर मी नागोबा डुलतो..''
संदीपच्या कवीतांमध्ये भलेही मोठमोठे संदर्भ नसतील...भलेही लोकांना त्याची भाषा तितकीशी आलंकारिक आणि उच्च दर्जाची वाटत नसेल तरीही युवकांच्या मनात त्याने अढळपद मिळवले आहे.ह्याचं कारण म्हणजे संदीप छोटया छोटया शब्दांतून त्याच्या भावना आपल्यापर्यंत पोहोचवतो.ह्यासाठी त्याला मोठमोठया उदाहरणांची आणि कठिण भाषेची गरज पडत नाही..आणि हीच त्याची ''सिंपल बट स्वीट'' शैली युवामनाला भावते.त्याची ही शैली मोठमोठया कवींच्या गर्दीत थोडी क्रांतीकारकच म्हणावी लागेल.कारण त्याच्या कवीतांमध्ये आपल्या रोजच्या वापरातले शब्द असतात...
आपल्या सखीपासून दूर जाताना त्याचे मन भरून येते...तो म्हणतो
''हे भलते अवघड असते..
कुणी ''प्रचंड'' आवडणारे..
ते दूर दूर जाताना , डोळयांच्या देखत आणि,
नाहीसे लांब होताना...
डोळयांतील अडवून पाणी,
हुंदका रोखूनी कंठी..
तुम्ही केवीलवाणे हसता,
अन् तुम्हास नियती हसते..''
बऱ्याच मोठया लोकांना भलेही त्याची ही शैली मनास पटणार नाही.पण त्याच्या ह्याच सरळ सोप्या शब्दांमुळेच युवकांना तो जवळचा आणि आपलासा वाटतो..स्वतःसारख्याच बिनधास्त आणि बंडखोर तरूणाईचे मनोगत सांगताना तो म्हणतो..
माझं बोलणं , माझं चालणं ,
माझं हसणं , माझं वागणं..
उन सावलीच्या परी ,
कधी नकोसं हवंसं ,तुम्ही म्हणाल तसं...''
आणि खोटी अप्पलपोटी जगरहाटी दूर सारून स्वतःच्या नियमांनी चालायचे ठरवा असे सांगताना उत्साहपूर्ण शब्दांत तो म्हणतो..
''जपत किनारा शीड सोडणे नामंजूर..
अन् वाऱ्याची वाट पाहणे नामंजूर..
मी ठरवावी दिशा वाहत्या पाण्याची...
येईल त्या लाटेवर डुलणे नामंजूर..''
जग जर अश्या स्वतःचा वेगळा मार्ग तयार करणाऱ्या तरूणाला आहे तसं स्वीकारत नसेल तर त्याही तरूणाच्या मनातील जिद्द उलगडताना तो म्हणतो..
''एवढंच ना..एकटे जगू..
एवढंच ना..
आमचं हसं , आमचं रडं..
ठेवून समोर एकटेच बघू..एवढंच ना..
रात्रीला कोण दुपारला कोण ,
जन्माला अवघ्या या पुरलंय कोण ,
श्वासाला श्वास क्षणाला क्षण
,दिवसाला दिवस जोडत जगू , एवढंच ना ....''
तरीही कितीही ठरवलं तरी माणसाला कोणाच्या तरी सोबतीची गरज तर भासतेच आणि अश्या वेळी जर जगाने आधार दिला नाही तर तो तरूण एकटेपणाच्या खोल दरीत कोसळतो आणि तेव्हा त्याच्या मनाची झालेली स्थिती सांगताना संदीप म्हणतो..
''दिवस असे की कोणी माझा नाही
अन् मी कोणाचा नाही...''
कधी जगाच्या व्यवहारावर टिका करताना म्हणतो की
''रे फुलांची रोख किंमत करू नये कोणी..
गंध मातीचा कुपीतून भरू नये कोणी..''
तर कधी म्हणतो ''जरा चुकीचे जरा बरोबर बोलू काही...
चला दोस्तहो आयुष्यावर बोलू काही...''
जगात अनेक मोठमोठे कवी होऊन गेले...त्यांनी विरहावरही अनेक कविता केल्या.पियकर दूर गेल्यावर प्रेयसीची व्यथा मांडली.पती दूर देशी गेल्यावर पत्नीचे अश्रू कागदावर उतरवले.किंवा प्रेयसी दूर गेल्यावर प्रियकराची अस्वस्थता मांडली ..परंतू घरची लक्ष्मी म्हणजेच पत्नी दूर गेल्यावर पतीची आणि एकूणच घराची काय अवस्था होते हे प्रथम संदीपच्याच लेखणीतून अगदी अचूकरित्या उलगडले असे मला वाटते..अश्याच एका पत्नीच्या विरहामध्ये बुडालेल्या पतीच्या मनातले भाव सांगताना तो म्हणतो..
''नसतेस घरी तू जेंव्हा Ê जीव तुटका तुटका होतो,
जगण्याचे विरती धागे ,संसार फ़ाटका होतो ...
तू सांग सखे मज काय , मी सांगू या घरदारा?
समईचा जीव उदास ,माझ्यासह मिणमिण मिटतो...''
एक मित्रं आणि एक मैत्रीण ह्यांच्या्तले नाजूक हळूवार नाते सांगताना तितकेच हळवे शब्द वापरत तो म्हणतो..
''तुझे नी माझे नाते काय..नाते काय..
नात्याला ह्या नकोच नाव ,दोघांचाही एकच गाव..
वेगवेगळे प्रवास तरीही ,समान दोघांमधले काही..
ठेच लागता एकाला का रक्ताळे दुसऱ्याचा पाय..''
कदाचित माझा ''साहित्य'' हा विषय अभ्यासाला असल्यामुळे का होईना पण संदीपच्या लेखणीने तो त्याच्या शब्दांनी माझ्या डोळयांसमोर हुबेहूब चित्रं निर्माण करतो...त्याच्या कित्येक कवितांमधून निसर्ग भेटतो..नव्हे तर निसर्ग् हा संदीपच्या कवितांमधला अविभाज्य घटक आहे असे म्हणावे लागेल...
हूरहूर लावणाऱ्या संध्याकाळचे वर्णन करताना तो म्हणतो...
क्षितिजाच्या पार वेडया संध्येचे घरटे ,
वेडया संध्येच्या अंगणी रात थरथरते
कुणी जाई दूर तशी मनी हूरहूर ,
रात ओलावत सूर वात मालवते ...''
तर त्याच्या ''दूर दूर नभपार डोंगराच्या माथ्यावर ...
निळे निळे गार गार पावसाचे घरदार ...
सरीवर सर..”
ह्या कवितेने तर दूरवरच्या हिरव्यागार डोंगरांवर गवताच्या पात्याला सहन होईल अशी हलके हलके हळूवार कोसळणारी सर डोळयासमोर उभी राहते..तर ''तुझ्या माझ्या सवे कधी गायचा पाऊसही.'' ह्यातून प्रियकर प्रेयसीचे नाते हळूवारपणे जपत धुवाधार कोसळणारा पाऊस डोळयापुढे येतो..
इतके हळवे शब्द आणि नाजूक भाव जपणारा संदीप महापुरूषांचे वर्णन करताना मात्र तितकेच तलवारीच्या पात्यासारखे धारदार आणि वर्मी लागणारे शब्द वापरून तरूणांच्या मनात काहीतरी करून दाखवण्याची प्रेरणा निर्माण करतो..उत्साह निर्माण करतो..तो म्हणतो..
''पैज जे घेती नभाशी ,आणि धडका डोंगरांशी...
रक्त ज्यांचे तप्त आहे , फक्त त्यांना हक्क आहे..
श्वास येथे घ्यावयाचा , आग पाण्या लावण्याचा..
उरफाडया छंद आहे , मृत्यू ज्यांना वंद्य आहे..
साजिऱ्या जखमा भुजांशी आणि आकांक्षा उराशी..
घाव ज्यांचा भाव आहे ,लोह ज्यांचा देव आहे..
माती हो विभूती जयांची , ही धरा दासी तयांची...
असा हा हृदयाला भिडणारे शब्द घेऊन भेटणारा कवी संदीप खरे युवा पीढीचा ''युथ आयकॉन''च आहे असे म्हणण्यास हरकत नाही...
....वैदेही

गुलमोहर: 

वैदेही, सुंदर लिहिलयस. 'संदीप खरे' ची कविता भिडायला फक्तं एकदा वाचावी किंवा ऐकावी लागते... ती आपली होऊन जाते.
खरच छान लिहिलयस.

धन्यवाद दोस्तो.... Happy
________________________
कॉम्प्युटरही चुका करतो......................
पण त्या दुसर्यांवर ढकलत नाही Wink Happy

छान लिहिलंय वैदेही.... आवडलं.. Happy

वैदेही मस्त लिहीलेस. आवडलं.

छान लिहीलेस!!!

अग्निपंख,
भारतीय प्रौद्योगिकी संस्थान, दिल्ली

मस्त लिहिलयस.. सन्दिप आणि सलील या दोघान्मुळे कविता पुन्हा एकदा रसरसली.
--------------------------------------------------------------------------------
ख्वाब रंगी है, इस जहां के, देख ले देख ले तु सजा के,
अपने सायेसे तु निकल के, देख ले देख ले तु बदल के,
रंगोंके है मेले, खुशीयेंके है रेले,
धडकन पे पेहेरा क्युं है क्यु......

Happy
--
आतली पणती, तेवायला अशी;
अंधाराची कुशी, लागतेच..!!

मस्तच !!!
मलाही त्याचं ' कसे सरतील सये...' खुप आवडतं.

सस्नेह...

विशाल.
____________________________________________

कुंद कहाँ, पयवृंद कहाँ, अरु चंद कहाँ ,
...................... सरजा जस आगे ...?
बाज कहाँ, मृगराज कहाँ, गजराज कहाँ ,
.................... तेरे साहस के आगे...?

कसे सरतील सये माझ्याविना दिस तुझे... सरताना आणि सांग सलतील ना....
वैदेही, कूल Happy

छानच लिहिलय.
college magazine साठी संदिप खरेंची मुलाखत घेण्याचा योग आला....
जितक्या त्यांच्या कविता मनाला भावतात तितकाच त्यांचा स्वभाव पण छान आहे एकदम down to earth...

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
हजारों ख्वाइशें ऐसी
के हर ख्वाइश पे दम निकले...............

छानच. सलील्-संदीपच्या चाहत्यांसाठी एक अजून पर्वणी...

salil_sandip.jpg

वैदेही,खूपच सुंदर लिहिलंय!
संदीप खरेंची कविता ऐकली की आत काहीतरी 'हलतं'!
कॉलेजला असताना 'दिवस असे की' ऐकली होती ....आणि इतक्या वर्षांनी
'आयुष्यावर बोलू काही-५०० वा प्रयोग' ऐकली.
दोन्हि वेळेला मनाची अवस्था तशीच..हवीहवीशी तगमग!
अक्षरश: दिवसभर तेच शब्द आणि तेच सूर डोक्यात असतात...."बरा बोलता बोलता स्तब्ध होतो" "तो कट्ट्यावर बसतो, घूमतो,शीळ वाजवतो"
" नामंजूर्" " एवढ्यात प्रलय होइल असं मला काही वाटत नाही".........अशी कितीतरी.

ह्याचा संसर्ग मी माझ्या आजूबाजूच्या लोकांनाही देतेय बहुतेक, कारण आजच मी जेव्हा भाजी टाकता टाकता "जरा चुकीचे, जरा बरोबर बोलू काही " असं गुणगुणत होते, एस एम एस आला म्हणून वाचताना गुणगुणायची थांबले तेव्हा ...."चला दोस्त हो आयुष्यावर बोलू काही" असा आवाज हॉलमधून आला. मी अवाक्!.....कारण गाणं पूर्ण करणारा गायक होता ...माझा ३ वर्षांचा लेक!!! कधी शिकला देव जाणे.
अर्थात माझ्या कानडी नवर्‍याला मात्र हा नक्कीच चंपकपणा वाटत असणार ....चालायचंच! त्याने आता 'ही केस उपचाराच्या पलिकडे' गेल्याची वस्तुस्थिती स्वीकारलीये!

मी सत्तावन वर्षांचा .
ही सहा महिने यू एस ला मुली कडे गेली होती.
"नसतेस घरी तू जेंव्हा "अजूनही डोळ्यात पाणी आणतं.

अशीच "हे भलते अवघड असते"सुद्धा-
मी त्यांचा पन्खा आहे:)